• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

प्रेमप्रवास हा सुखाचा!

- संदेश कामेरकर (मनोरंजन)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 16, 2023
in मनोरंजन
0

स्वतःच्या सुखापेक्षा मुलांच्या सुखांना जास्त महत्त्व देणारी वडीलधारी मंडळी जग बदललं तरी अजूनही स्वतःवर पैसे खर्च करायला कचरतात; त्याउलट आपल्या टर्म्स आणि कंडिशनवर आपलं जीवन जगण्याची आत्ताच्या पिढीची मानसिकता आहे. मग ते ड्रेसिंग सेन्स असो की लग्न. देवदर्शन हेच पर्यटन म्हणणारी पिढी काळाच्या पडद्याआड जाऊन आता सोलो ट्रॅव्हलर पिढी अस्तित्वात येताना दिसत आहे. ही पिढी कोणाला पत्ता विचारत बसत नाही, तर स्वतः मोबाईलच्या मॅपवर जग धुंडाळते. याच तरुणाईचे प्रतिनिधित्व करणार्‍या जग्गू (अमेय वाघ) आणि जुलियेट (वैदेही परशुरामी) यांच्या प्रेमप्रवासाची गोष्ट मांडणारा सिनेमा म्हणजे महेश लिमये दिग्दर्शित ‘जग्गू आणि ज्युलिएट’.
वर्सोव्याचा कोळी कुटुंबातला जग्गू एका मध्यमवयीन ग्रूपसोबत उत्तराखंडला पिकनिकला आलाय, पण तिथे त्याच्या वयाचं कुणी नाही म्हणून, तो एकटाच उत्तराखंड एक्सप्लोर करायला बाहेर पडतो. तिथे त्याला अमेरिकेत राहणारी ज्युलिएट चितळे भेटते. दोघांत काहीही साम्य नाही, हा ‘आगरी-कोळी‘ भाषेत बोलणारा तर ती इंग्रजीमिश्रित मराठी बोलणारी. जग्गूला ज्युलिएट पहिल्याच भेटीत आवडते. त्याने मागणी घातल्यावर ज्युलिएट म्हणते, चार दिवसांत मी तुझ्या प्रेमात पडले नाही, तर मी तुला सोडून कायमची निघून जाईन. या अटीवर देवभूमी उत्तराखंडच्या नयनरम्य वातावरणात दोघांची प्रेमाची गोष्ट सुरू होते. पदोपदी फोन करणार्‍या आपल्या बाबांवर (उपेंद्र लिमये) जग्गूचे अतीव प्रेम आहे, तर रोज फोन येऊन देखील तो न उचलण्याइतका ज्युलिएटचा तिच्या बाबांवर (मनोज जोशी) प्रचंड राग आहे. जग्गूच्या प्रेमाची जादू ज्युलिएटवर चालते का? ज्युलिएट वडिलांशी बोलते का? या गोष्टीचा शेवट गोड होतो का, या प्रश्नांची उत्तरे सिनेमा पाहिल्यावर मिळतील. जात-पात, गरीब-श्रीमंत या मळलेल्या वाटेने न जाता या सिनेमाचा प्रवास धमाल मस्ती आणि अजय अतुल यांच्या ठेकेबाज गाण्यांच्या साथीने होतो, ही या चित्रपटाची खासियत आहे. फिरायला आलेल्या ग्रुपमधील मध्यमवयीन माणसांच्या ग्रूपमधली, प्रवीण तरडे, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे, समीर चौघुले, सुनील अभ्यंकर ही अनुभवी कलावंत मंडळी छोट्या छोट्या भूमिकांमध्ये कधी डोळ्यांतून पाणी काढतात, तर कधी हास्याची कारंजी उडवतात. पण इतक्या ताकदीचे कलाकार घेतल्यावर त्यांना न्याय देण्यात मूळ सिनेमाची गोष्ट थोडीशी भरकटते. काही प्रसंगांना कात्री लावली असती, तर चित्रपट अजून क्रिस्पी झाला असता.
अनेक गाजलेल्या हिंदी मराठी सिनेमांचे सिनेमॅटोग्राफर म्हणून महेश लिमये परिचित आहेत. ‘यलो’ या पुरस्कारविजेत्या सिनेमानंतर आठ वर्षांनी ते पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर आले आहेत. ते पडद्यावर देवभूमीचे सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवतात, यात काही आश्चर्य नाही; पण, त्यांनी कथेला साजेसा उत्फुल्ल टोन जपला आहे. पालक आणि पाल्य यांच्यातील नातेसंबंधांमधील भावनिक कंगोरेही दर्शविले आहेत. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा डोळ्यांना-कानांना, सौंदर्यदृष्टीला सुखावणारा आहे. अंबर हडप आणि गणेश पंडित यांचे संवाद कथेला साजेसे आहेत. मानसी अत्तर्डे यांनी केलेली वेशभूषा सिनेमा आकर्षक करण्यात मदत करते.
दोन अभिनेत्यांच्या जिवावर एखादा चित्रपट उभा करताना त्या अभिनेत्यांचा कस लागतो. अगदी पहिल्याच दृश्यापासून कोळी बेअरिंग टिकवत फंकी, बेफिकिर, लव्हेबल तरूण साकारताना अमेय वाघने, ‘तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकलं,’ अशी कामगिरी या सिनेमात केली आहे. वैदेही परशुरामीने, बिनधास्त, मनस्वी, बाहेरून सडेतोड पण आतून हळवी ज्युलिएट उत्तम साकारली आहे. तिच्यामुळे सिनेमाला ग्लॅमरस झळाळी लाभली आहे. उपेंद्र लिमये आणि मनोज जोशी नायक-नायिकांच्या वडिलांच्या भूमिकेत भाव खाऊन जातात. अजय अतुल यांचं संगीत सैराटची आठवण करून देतं. हल्ली चित्रपट संपल्यावर मनात घर करून राहतील अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘मना तुझ्याविना’ हे गाणं स्मरणात राहतं, हे विशेष.
आमची फिल्म सगळ्यांपेक्षा वेगळी आहे हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य नवीन सिनेमा प्रदर्शित होताना सर्रास ऐकायला मिळतं. पण हे बोलून दाखवण्यापेक्षा पडद्यावर दाखवलं, तर त्याला अर्थ निर्माण होतो. सिनेमाच्या टायटलपासूनच वेगळेपण जपणारा जग्गू आणि ज्युलिएट व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने पाहायला हरकत नाही… सोबत तुमचा/ची व्हॅलेंटाइन असेल, तर बेस्टच!

Previous Post

व्यंग आणि चित्र…

Next Post

श्रेष्ठ दान

Next Post

श्रेष्ठ दान

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.