यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
तत्र रमन्ते देवता।।
हे संस्कृत सुभाषित जेव्हा ऐकायला मिळतं, तेव्हा ते कानाला खूप गोड वाटतं. कारण जगाच्या पाठीवर भारत असा एक देश आहे की तो संस्कृती टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य भारतीय महिलांमध्ये आहेच. ज्या देशामध्ये स्त्रियांची पूजा केली जाते तेथे इश्वराचे वास्तव्य असते. तो देश भरभराटीचा असतो. अतिप्राचीन काळापासून जर आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर देशाचे संरक्षण महिलांनीच केले आहे. इतकेच नव्हे तर देवतांना राक्षसाच्या तावडीतून वाचविण्यासाठी देखील स्त्रीनेच अवतार धारण केला. स्त्री ही शक्ती, सामर्थ्य व बळ याचे प्रतीक आहे.
मात्र आम्ही जेव्हा सध्या देशाच्या इतिहासाकडे पाहतो, तेव्हा सर्वत्र विसंगती पाहावयास मिळते. वृत्तपत्रातील ३-४ भाग हा महिलांवरील अत्याचारांवर असतो. आजच्या घडीला समाजकार्यकर्ते, राजकीय मंडळी ही तर महिलांना केंद्रबिंदू धरून, त्यांचा अनादर करत असतात. त्यांना लाजवेल अशा शब्दांत टिपणी करत असतात. एखाद्या महिलेला प्रवास करावयाचा म्हणजे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मग ती बस असो, रेल्वे असो किंवा विमान असो. स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार, हुंडाबळी, खून, मानसिक छळ अशा अनेक संकटाला महिलेला तोंड द्यावे लागते.
समाजात स्त्रीला दुय्यम स्थान मिळत आहे. त्यात विशेषत: विधवा, घटस्फोटित, अपत्यहीन महिलांना सन्मानित जगताच येत नाही. काहीतरी अपराध केला आहे, अशा भावनेने त्यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक व कौटुंबीक सणात व उत्सवात तिला समावेश करून घेतले जात नाही. त्यांना एखाद्या अस्पृश्यासारखी वागणूक मिळते. वास्तविक पाहता त्यांचा या ठिकाणी काही दोष नसतो. आज आपण विधवा स्त्रीचा विचार करत असताना उच्च पदावर असणारी महिला श्रीमती इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी असताना संपूर्ण ़जगाला हादरून सोडले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी तर लहान बालकाला पाठीशी बांधून इंग्रजांशी सामना केला. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, लोकमान्य टिळक इत्यादी समाज सुधारकांनी स्त्रीला मुक्त करून सन्मानाने जगण्याचा व शिक्षणाचा पूर्ण अधिकार दिला. आज तर आपण २१व्या शतकाची म्हणजे विज्ञान युगाची वाटचाल करत आहोत. अशावेळी स्त्रियांना गौण न मानता त्यांचे संरक्षण, मदत करून त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे. त्यांच्याविषयी असणारी अंधश्रद्धा दूर केली पाहिजे.
केंद्र व राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे विधवा, घटस्फोटीत, अपत्यहीन महिलांच्या पुनर्वसनासाठी जबाबदारी स्वीकारावी. त्यांच्यासाठी दर महिना त्यांच्या चरितार्थासाठी त्यांच्या बँक खात्यावर ठरावीक रक्कम जमा करावी. त्यांच्यासाठी शासकीय व खासगी नोकरीमध्ये काही टक्केवारी जागा आरक्षित ठेवाव्यात. त्यांच्या संरक्षणासाठी उपाय योजावेत. समाजात अनेक विवाह संस्था विधवा व पुनर्विवाहासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यावे. विधवांच्या पुनर्विवाहासाठी सामुदायिक विवाह करणार्या संस्थांनी दोघांनाही नवीन कपडे व भांडी द्यावी. शासनानेही त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे संसार उभे करावेत. तसेच त्यांना संरक्षण देण्यासाठी विशेष असे कायदे करावेत. मंदिराला सोन्याचे सिंहासन, सोन्याचा कळस बसवून निधी खर्च करण्यापेक्षा विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी पैसे खर्च करावेत. अनेक सामाजिक उपक्रमांत अशा महिलांना सामावून घेऊन त्यांचा सन्मान करावा. अशा महिलांनीही स्वत:ला कमी लेखून घरात बसणे टाळावे. सामाजिक उपक्रमात मोठ्या धाडसाने आणि हिरीरीने भाग घ्यावा व समतोल राखावा.
स्वराज्याची मुहूर्तपेढी रचणारे छत्रपती शिवाजी महाराज हे माता जिजाबाईंचेच दर्शन घेऊन मोहिमेला जात असत व त्यांना यश लाभत असे. शेवटी स्त्री ही शक्ती आहे. विधवा वगैरे असा भेदभाव नसतो हे ध्यानात ठेवावे. नुकताच कोल्हापुरात मुलाने विधवा आईचा पुनर्विवाह केला. युवराज सोंगे याचे वडील दोन वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू पावले. त्यामुळे त्याची आई विधवा झाली. त्याला आईच्या कपाळावर नसलेले कुंकू व हातात नसलेल्या बांगड्यांचा चुडा अशी स्थिती पाहवेना. पुरुष मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर लग्न करतात. मग स्त्रिया का नाही? या विचाराने आईला पुन्हा समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी युवराज सोंगे या युवकाने १२ जानेवारी २०२३ रोजी मारुती व्हटकर या घटस्फोटित व्यक्तीशी विवाह लावून दिला. थोडक्यात त्याने विधवा प्रथा बंद करून राज्यात एक आदर्श निर्माण केला. विधवेला देखील नवे आयुष्य सुरू करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे त्याने कृतीतून दाखवून दिले.
मो. 8793531708