मलबार हिल आणि पेडर रोड या गोष्टी फक्त जाता येता दुरून पाहण्यासाठी आहेत, हे मुंबईकरांचेच नव्हे तर सार्या महाराष्ट्राचेच मत. एकुलती एक लता ‘प्रभू कुंज’मध्ये राहायची, तेवढेच मराठी माणसाला जवळचे नाव. ग्रामीण भागातून मंत्री बनलेले लोक मलबार हिलवर राहायला आले की त्यांचे दर्शनसुद्धा दुर्लभच. अशा या पेडर रोडवर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला रोशन श्रॉफ. पिढीजात हिर्यांचा व्यवसाय. सांगण्यापुरती पेढी मुंबईमध्ये, पण खरा व्यवसाय एंटवर्पला.
ऑस्ट्रिया, बेल्जियम या दोन देशात हिर्यांचा सगळा व्यवसाय केंद्रित झालेला. दक्षिण आफ्रिका व रशिया येथील हिरे विक्रीला मात्र याच दोन देशांत येणार. एवढेच नव्हे तर घेणार्यांची सुद्धा सगळी धावपळ येथेच चालणार.
रोशनच्या वडिलांनी एकंदरीत तीन लग्नं केली. रोशन पहिल्या बायकोचा मुलगा. दुर्दैवाने तो दोन वर्षांचा असताना त्याची आई आत्महत्या करून वारली. जेमतेम महिनाभराच्या आत दुसरी आई येऊन तिने रोशनचा ताबा घेतला. खरे तर रोशनच्या आईच्या आत्महत्येचे कारण बनायला ही दुसरीच कारण होती. पण हे सगळे कळण्याचे रोशनचे वय येईपर्यंत, म्हणजेच तो हायस्कूलमध्ये जाईपर्यंत या दुसरीनेही भली मोठी पोटगी घेऊन नवर्याला घटस्फोट दिला होता. सर्व फॅमिलीला तो एक थोडासा धक्काच होता, फसवले गेल्याचा.
हा प्रसंग घडला तेव्हा रोशनच्या वडिलांचे वय जेमतेम बेचाळीस होते. यावेळेस त्यांनी बेल्जियममध्येच एका इंग्लिश बाईशी विवाह केला तोही फॅमिलीला व रोशनला अंधारात ठेवून.
एवढे मोठे व्यापारी व त्यांचे लग्न हा पेज-थ्रीचा चर्चेचा विषय नाही का? पेज-थ्री म्हणजे वृत्तपत्रात खुसखुशीत लफड्यांची बातमी देणारे पान. हीच या पानाची ओळख. रोशन शाळेत गेला, तेव्हा त्याला आई होती. तीच त्याची आई अशी त्याची ठाम समजूत होती. त्या अर्थाने तिने रोशनला चांगले वाढवले होते. पण अचानक ती गायब झाल्याचा धक्का सोसेपर्यंत महिनाभरात सर्व वृत्तपत्रात वडिलांच्या तिसर्या लग्नाची बातमी छापून आली. घराघरात चर्चिली गेलेली ही बातमी स्वाभाविकपणे काही मुलांच्या म्हणजेच रोशनच्या वर्गमित्रांच्या कानावर पडली. किशोरावस्थेत असलेल्या मुलांना चेष्टा करायला असे विषय लागतातच. एखादा वणवा पसरावा तशी त्याच्या वर्गात व शाळेत ती बातमी पसरली होती. वर्गावर आलेली नवीन टीचर मॅडम असो किंवा पीटी टीचर असोत, त्यांची बदललेली नजर रोशनला सतत खूपू लागली. त्या नजरेमध्ये नकोशी वाटणारी सहानुभूती रोशनला सतत जाणवे. वर्ग मित्रांची टिंगल आणि शिक्षकांची नकोशी सहानुभूती यामुळे रोशन आक्रसून गेला. हुशार नसला तरी सर्व विषयात उत्तम मार्क मिळवणारा रोशन अचानकपणे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागला. आजवर ऐंशी टक्केपेक्षा कमी कधीच न मिळालेल्या रोशनचे मार्क अचानक ५५ टक्क्यांवर येऊन पोहोचले.
नवीन संसारात रमलेल्या रोशनच्या वडिलांना त्याच्याशी फारसे देणेघेणे राहिले नव्हते. एवढेच काय त्यांचे मुंबईतील पेडर रोडवरचे वास्तव्यसुद्धा खूप कमी झाले होते.अशातच रोशन सातवीमध्ये जाणार तेव्हा त्याची आजी वारली. आजोबा दहा-बारा वर्षांपूर्वी, रोशनच्या जन्माआधीच गेलेले होते. रोशनची देखभाल करण्याचे काम ज्या आजीकडे होते, तीच गेली म्हटल्यावर अनेक प्रश्न श्रॉफ मंडळींसमोर उभे राहिले. पण सर्वावर तोडगा मात्र रोशनच्या तिसर्या आईने झटकन काढला. मूळची ब्रिटिश असल्यामुळे इंग्लंडमधील एका प्रख्यात पब्लिक स्कूलमध्ये रोशनची अॅडमिशन तिने पक्की करून टाकली. रोशनच्या वडिलांना नाही म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. पण वाईट गोष्ट एकच घडली की या सगळ्यांमध्ये रोशनला तुला काय हवे हे कोणीच विचारले नव्हते.
एखादं नाजूक रोपट जरा रुजतंय, त्याला चार नवीन पानं फुटतायत तोच ते उपटून दुसरीकडे भलत्याच हवामानात भलत्याच जागी लावल्यावर जे व्हायचे, तेच रोशनचे झाले. मुंबईची शाळा पॉश असली तरी इंग्लंडच्या पब्लिक स्कूलसारखी अतिकडक शिस्त तेथे कधीच नव्हती. मुख्य म्हणजे शाळा दिवसभर असली तरी संध्याकाळपासून घरातले वातावरण असे. याउलट शाळा संपल्यानंतर डॉर्मेटरीमधल्या बंकरवर झोपून मनातली चिडचिड रोशनचे डोके कुरतडत असे. अर्थातच तब्येतीवर व अभ्यासावर दोन्हीवर परिणाम सुरू झाला. शाळेच्या कडक शिस्तीमध्ये आठवड्यातून एकदाच दहा मिनिटे पालकांशी फोनवरून बोलण्याची परवानगी असे. काही वेळा वडिलांना मीटिंग असल्यामुळे ते फोनवर येत नसत. तिसर्या आईशी काय बोलायचे हा प्रश्न रोशनला कायमच सतावत असे.
पहिली आई आठवणीत नाही. तिचा फोटो फक्त दिसतो. दुसरी, जिने माया लावली तिने अचानक टाटा केले. एवढेच नव्हे, तर रोशनचा फोन घेणेही बंद केले. अशा धक्क्यांमध्ये अडकलेला रोशन अजिबात भारतीय न वाटणार्या ब्रिटिश बाईला आई मानायला तयार होत नव्हता. आणि रोशन ही नवर्याची जबाबदारी आहे, ती त्यानेच पार न पाडता मला का सांगितले, ही अढी तिच्या मनात पक्की बसलेली.
एक गोष्ट रोशनच्या आवडीची मिळाली. नवीन शाळेचे शेजारीच एक जुना व अतिशय प्रसिद्ध असलेला म्युझियम होता. पुतळे, मोठमोठी तैलचित्रे, ऐतिहासिक वस्तू, जगभरातील विविध नाणी अशा आकर्षक गोष्टींचा भला मोठा खजिनाच रोशनला सापडला. रोशनच्या होस्टेलची रेक्टर ही इतिहास विषय शिकवायची व इतिहासप्रेमी पण होती. जेमतेम चाळीशीत असलेली ही शिक्षिका आणि रोशन या दोघांच्याही आवडी समान निघाल्यामुळे त्या दोघांचे शाळेच्या शिस्तीत बसेल असे जमवून म्युझियममध्ये एकेका विभागाला अभ्यासपूर्ण भेटी देणे सुरू झाले. आवडीचा विषय सापडला, शिक्षिकेचा मायेचा हात हातात मिळाला आणि जादूची कांडी फिरावी तसा रोशनमध्ये वर्षअखेरीस बदल दिसू लागला. इतिहास विषयात त्याने पहिला नंबर मिळवला. भारतात इंग्रजीचे व्याकरण छान तयार झाल्यामुळे त्याही भाषेत त्याची वेगाने प्रगती होऊन उत्तम मार्क त्याने मिळवले.
दोन विषयांत वर्गामध्ये छान मार्क मिळवलेला मुलगा म्हणून रोशनची ओळख आता आठवीत प्रवेशताना झाली होती. दुसरी आई, तिने दिलेला घटस्फोट, वडिलांचे तिसरे लग्न तेही ब्रिटिश बाईशी असल्या थिल्लर गोष्टींमध्ये त्या पब्लिक स्कूलमधल्या कोणालाच रस नव्हता. कारण बहुतेक मुलांची हीच स्थिती होती. घटस्फोटाचे नाविन्य तर सोडाच, पण वडिलांचाही पत्ता नसणारी काही मुले शाळेत शिकत होती. मनावर खोलवर चरे उमटवणार्या या सगळ्या मुंबईच्या आठवणी आता रोशनच्या मनात खोलवर कप्प्यामध्ये दडल्या होत्या. सर्व अर्थाने फुलण्याचे वय असताना आता रोशनला त्याची त्याची आवड आणि ओळख सापडली होती. इतिहास, समाजशास्त्र व इंग्रजी या तीन विषयात उत्तम मार्क मिळवून त्याने केंब्रिजची परीक्षा पास केली. पदवीसाठी ऑक्सफर्डला जायचे का केंब्रिजला या प्रश्नावर त्यांनी ऑक्सफर्डची निवड केली. इतिहासातील पदवी घेत असतानाच म्युझिऑलॉजी या विषयातही त्याने क्रेडिट्स घेतले होते. पदवी मिळतानाच त्याने वडिलांना सांगून टाकले की, वयाच्या तिशीपर्यंत तरी तुमच्या व्यवसायात मी येऊ इच्छित नाही. ही दहा वर्षे मला द्या, त्यानंतरचे आपण पुढे ठरवू. जेमतेम पन्नाशी उलटलेल्या वडिलांना हे अमान्य करण्याचे काहीच कारण नव्हते. तू पुढे काय करणार या प्रश्नावर रोशननी एक वेगळेच उत्तर दिले. जगभरातील सुप्रसिद्ध म्युझियम्स अमेरिकेत असून त्या संदर्भातील सर्वोत्तम अभ्यासक्रमसुद्धा तिथेच उपलब्ध आहेत. तेव्हा तिथे जाऊन मी मास्टर्स करू इच्छितो. हे ऐकून त्याच्या ब्रिटिश आईला मात्र थोडासा धक्का बसला. पण तिनेही आता आपल्यावरची जबाबदारी संपली या सुटकार्यातून हे मान्य केले.
अमेरिकेस प्रयाण
पाहता पाहता अमेरिकन बर्कलेज विद्यापीठातून मास्टर्स पूर्ण करून रोशनला अमेरिकेतच उत्तम नोकरी मिळाली. त्याच्या पदवीदान समारंभाकरता खास आमंत्रित म्हणून शाळेतील इतिहासाची टीचर अमेरिकेत आली होती. शिष्योत्तमाचे कौतुक पाहून तीही भारावून गेली होती. रोशनचे कौतुक येथेच थांबत नाही. सधन, संपन्न वडिलांचा पाठिंबा असला तरी प्रतिकूल मानसिक परिस्थितीशी झगडताना भारतीय संस्कृतीशी त्याची मुळे कायम जोडलेली होती. अमेरिकेतील ज्या म्युझियममध्ये त्याला क्युरेटर म्हणून नोकरी मिळालेली होती तिथे भारतविषयक विभागाची त्याने सुरुवात केली. अमेरिकेत अशा विषयांना पैसे कधीच कमी पडत नसतात. त्यामुळे पाहता पाहता भारतातील प्रमुख राज्यांतील संस्कृतीची ओळख करून देणार्या अनेक गोष्टींचा त्या विभागात समावेश झाला. विभाग सुरू झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाले होते. रोशनने वडिलांना एक विनंती केली. आजवर मी तुम्हाला काहीच मागितले नाही ते आज मागत आहे. भारतीय विभागाच्या विस्तार करण्यासाठी फक्त एक लाख डॉलरची आपण देणगी द्यावीत. त्या बदल्यात माझ्या जन्मदात्या आईचे नाव भारतीय विभागाला देण्याची मी मंजुरी मिळवली आहे. कधी नव्हे ते अश्रूपूर्ण डोळ्यांनी रोशनच्या वडिलांनी त्याची ही ‘छोटीशी’ मागणी पूर्ण केली. रोशन सर्वार्थाने आता मोठा झाला होता.
तात्पर्य : मानसिक आघात खोलवर घाव घालणारे असतात. त्यावर सामाजिक टीकाटिप्पणी करणारे जवळचे आप्त व मित्र तिखट मीठ चोळत असतात. श्रीमंत असो वा गरीब कोणालाही यातून बाहेर पडणे खूप कठीण असते. एखादा मायेचा हात आणि आवडीचा विषय सारेच जीवन बदलून टाकणारा ठरतो. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा हा क्षण असतो.