माझा मानलेला परममित्र पोक्या हा खरे तर माझा शाळासोबती. आमची जोडी शाळेत इतकी फेमस होती की मुले आम्हाला चिकटगुंडा म्हणायची. आम्हा दोघांत एक समान गोष्ट होती ती म्हणजे आम्ही दोघेही `ढ’ होतो. पाचवीनंतर मॅट्रिकपर्यंत आम्ही प्रत्येक इयत्तेत दोन म्हणजे १४ वर्षे वनवासासारखी काढली. वर्गात मास्तर किंवा बाई फळ्यावर लिहायला लागले की उभे राहून त्याची नक्कल करणे, बाकाच्या फटीत अर्धे ब्लेड ठेवून त्याचा आवाज काढणे, वर्गातल्या घड्याळाचे काटे पुढे करून ठेवणे हे उद्योग आम्ही करायचोच; पण दांड्या मारण्यातला आमचा विक्रम नंतरही कोणी कधीच मोडू शकला नाही. आम्हाला खरे स्वातंत्र्य २०१४ला नव्हे तर शाळेत असतानाच मिळाले होते. बाई आणि मास्तरांनी सर्वांगावर केलेल्या छड्यांच्या वर्षावाने आमची चामडी इतकी निबर झाली की मोठे झाल्यावर पोलिसांनी दिलेल्या माराचे काहीच वाटेनासे झाले.
काल इंग्लिश म्हणजे विदेशी दारू स्वस्त झाली म्हणून वाईन शॉपमधून बाटली घेऊन घरीच मजा करूया म्हणून शॉपवर गेलो. आमचा ब्रॅण्ड घेऊन आम्ही घरी आलो. शुद्धीवर असेपर्यंत ताज्या बातम्या चाळूया म्हणून पेपर उघडला आणि मोदींच्या त्या बातमीने उडालोच. संसद अधिवेशन चालू असताना दांड्या मारणार्या भाजपच्या खासदारांना त्यांनी कडक शब्दात इशारा दिला होता, तुमची ही सवय बदलली नाही, तर मलाच तुम्हाला बदलावे लागेल. तुमचे बेशिस्त वर्तन मला त्रासदायक ठरणार असेल तर मी काय करू शकतो, याची तुम्हाला कल्पना आहेच. लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी जसे वागतात तसे वागणे मलाही शोभादायक वाटत नाही…
मोदींचे हे शाळामास्तरांसारखे वागणे वाचून मला आणि पोक्याला शाळेचे आणि दांड्या मारण्याचे दिवस आठवले. आमच्या दांड्या मारण्याला अनेक कारणे होती. एकतर गृहपाठ नावाचा प्रकार आम्ही दोघांनीही कधीच केला नाही. त्यासाठी वर्गाबाहेर अंगठे धरून ओणवे राहण्याची शिक्षा आम्ही कितीतरी वेळा भोगली. तेवढाच वर्गात न बसण्याचा रिलिफ मिळायचा. गणिताचा तास मधल्या सुट्टीनंतर असायचा. हा विषय शाळेत कशासाठी शिकवतात हे अजून आम्हाला कळलेले नाही. `अ’ वर्ग अधिक `ब’ वर्ग या वर्गांचा आयुष्यात काही उपयोग आहे का हा थेट प्रश्न पोक्याने गणिताच्या फाटक बाईंना विचारला होता तेव्हा त्यांनी पोक्याला वर्गाबाहेर हाकलला. नंतर बाईंनी फळ्यावर गणित घातले. अमुक मजूर, अमुक काम तमुक दिवसात करतात तर तमुक मजूर तमुक काम किती दिवसात करतील?… मी उभा राहिलो आणि म्हणालो, बाई त्या दिवशी सगळे मजूर त्यांच्या पगारवाढीसाठी संपावर गेले तर कामच होणार नाही. बाईंनी माझ्या एका मुस्काटात मारली आणि वर्गाबाहेर पिटाळले.
परीक्षेत कॉपी करून वीस-पंचवीस मार्क्स मिळायचे पण वार्षिक परीक्षेत खूपच वांदे व्हायचे. इतिहास आणि मराठी सोडले तर बाकी कोणत्याही विषयात आम्हा दोघांना काडीचाही रस नव्हता.
कधी कधी घरी शाळेत जातो सांगून आम्ही चार-चार दिवस कधी शिवाजी पार्क मैदानात, कधी चौपाटीवर, कधी मुंबईभर भटकून संध्याकाळी वेळेवर घरी जायचो. मुंबईतले सगळे पिकनिक स्पॉट आम्ही दांड्या मारून पाहिले होते. दांडी मारली की शाळेत शिक्षकांना पालकांची चिठ्ठी द्यावी लागे. मी नेहमी वेगवेगळ्या आजाराच्या चिठ्ठ्या एका मित्राकडून लिहूनच घेतल्या होत्या. फक्त तारीख घालायची आणि पालक म्हणून पोक्याची सही घ्यायची. पोक्या कोणत्याही सहीची नक्कल हुबेहूब करत असे. ते तंत्र त्यानेही मला शिकवले होते. तेव्हा त्याच्या पालकांची सही मी करायचो. आपल्या दांड्यांच्या रेकॉर्डची शाळेत चर्चा व्हायची. एकदा हेडमास्तरांनी वडिलांना घेऊन या अशी आज्ञा फर्मावली. मी वडील म्हणून वाडीतल्या टक्कल असलेल्या गणूबाबांना घेऊन गेलो तर पोक्या त्यांच्या वडिलांच्या उंचपुर्यी बॉडीबिल्डर छपरी मित्राला घेऊन गेला. त्याच्या लांब आणि मोठ्या मिशा पाहून हेडमास्तर घाबरले. माझ्या त्या टकल्या पालकाने हेडमास्तरांना मिठी मारून हंबरडाच फोडला आणि म्हणाला, सारखा आजारी असतो.
डॉक्टर म्हणाले, गंभीर आजार आहे. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येते म्हणजे फारच गंभीर आहे. शाळेतून काढून टाकला तरी चालेल… हेडमास्तरच गयावया करू लागले. की तसा अविचार करू नका. जमेल तेव्हा शाळेत पाठवा. माझा प्रश्न सुटला. पोक्याच्या फंटर पालकाने हेडमास्तरांना भेटल्या भेटल्या कोल्हापुरी भाषेत दम भरला. मास्तूर, आमचं बेणं दांड्या मारतं, पण त्येला गॅसचा त्रास हाय. घरात आम्ही सहन करतो, पण शाळेत वर्ग कसा सहन करील! तसे हेडमास्तर म्हणाले, तुम्ही चांगल्या डॉक्टरांना दाखवा आणि उपाय करा.
अॅसिडीटीचा त्रास मलाही आहे. त्याचा प्रॉब्लेम मी समजू शकतो. म्हणावं, बरं वाटलं की ये. तोपर्यंत घरी अभ्यास कर… पोक्याचाही प्रश्न सुटला. मग मात्र आम्ही सावधगिरीने दांड्या मारण्यास सुरुवात केली.
त्यानंतर काही दिवसांनी शाळेतील वकृत्वस्पर्धेत पोक्याने `दांडीयात्रा’ या शाळेने दिलेल्या विषयावर महात्मा गांधीजींच्या दांडीयात्रेवर चांगले भाषण केले. मात्र शेवटी तो जे एक वाक्य बोलला त्याने शाळेचा हॉल टाळ्या आणि हास्याच्या गडगडाटाने दुमदुमून गेला. तो म्हणाला, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक हे थोर नेते होते. लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हवäक आहे. त्याप्रमाणे दांड्या मारणे हा विद्यार्थ्यांचा जन्मसिद्ध हक्क असला पाहिजे. तो मी तरी मिळवणारच… त्यानंतर मास्तरांनी त्याला भाषण बंद करायला लावले.