राघवची ऑफर तशी वाईट नव्हती. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे आजवर जमवलेली जी काही ८०-९० लाखाची माया होती, ती त्याने या एकाच वस्तूवर खर्च केली होती. आता ह्या वस्तूमुळे त्या ८०-९० लाखाचे एकदाच दीड दोन कोटी रुपये मिळाले की सगळे धंदे बंद करून शांतपणे कुठेतरी आरामात आयुष्य जगायचे. ज्या लोकांकडून राघवला ही ’व्हेलची उलटी’ मिळाली होती, त्यांच्याकडे अजून थोडा माल शिल्लक होता. संपतची इच्छा असेल, तर राघव त्याला त्या लोकांची गाठ घालून देणार होता. संपतने बराच विचार केला आणि ही झटपट पैसे कमावण्याची आयडिया त्याला भावली. धोका असा काहीच नव्हता.
—-
’आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये… तो बात बन जाये… हाँ हाँ बात बन जाये…’ स्टेजवर उभी असलेली ती १८-१९ वर्षाची कोवळी पोरगी जीव तोडून गात होती आणि तिच्या आजूबाजूला ’लज्जारक्षण’ हा काही एक विनोदी शब्द आहे असे वाटावे असे कपडे घातलेली १०-१२ तरुण पोरं आणि पोरी जमेल तसे शरीराचे अवयव हलवत ’नृत्य’ या प्रकाराची लाज काढत होते. संपत तसा मुंबईतच लहानाचा मोठा झालेला, पण मुंबईची ही असली झगमगाटी बाजू तो पहिल्यांदाच बघत होता. बार तर त्याने देखील अनेक पालथे घातले होते, पण
’रॉकी’सारख्या हाय-फाय बारमध्ये यायची ही त्याची पहिलीच वेळ होती. फार फार तर ’सीमा बार रेस्टो’पर्यंत मजल मारलेल्या संपतसाठी हे विश्व अनोखे होते. बाजूच्या टेबलावर कोणी बसले आहे की नाही हे कळण्याइतपतच असलेला प्रकाश, चारी बाजूंनी येणारे विविध अत्तरांचे दरवळ, मध्येच कोणीतरी गप्पांच्या तारेत इंग्रजी किंवा हिंदीमध्ये घातलेली जोरदार शिवी आणि सर्व्हिस देणार्याइ पोरींचे मधूनच खळखळून हसणे… सगळ्या ’माहौल’मुळे त्याला जणू एक वेगळीच नशा चढायला लागली होती. त्याचा जोडीदार राघव मात्र अगदी सराईतासारखा सिगारेटचा धूर काढत निवांत रेलून बसला होता.
राघवकडे बघता बघता अचानक संपतला गेल्या आठवड्यातील किस्सा आठवला आणि सगळे काही विसरून तो भूतकाळात ओढला गेला. संपतच्या बाबाच्या छातीत अचानक दुखायला लागले आणि त्याला हॉस्पिटलला हालवायला लागले. हॉस्पिटल बघायची ही संपतची पहिलीच वेळ होती असे नाही; याआधी कोणा नातेवाइकाला, यार-दोस्ताला बघायला तो हॉस्पिटल फिरला देखील होता. मात्र स्वत:च्या जवळच्यासाठी धावाधाव करायची ही त्याची पहिलीच वेळ होती. संपत तसा चार पैसे राखून असल्याने खर्चाची काळजी नव्हती, मात्र हॉस्पिटलवाल्यांनी चार लाख अॅडव्हान्स भरायला सांगितले आणि संपतची तारांबळ उडाली. घरात फारतर दोन सव्वा दोन लाख रुपयांची कॅश असेल. त्यात एटीएमसारख्या भानगडी त्याने कधी जवळ केल्या नव्हत्या आणि त्याला त्यातली फारशी अक्कल देखील नव्हती. मात्र अशावेळी राघव देवासारखा धावून आला आणि त्याने स्वत: जवळचे दोन लाख रुपये टाकत संपतला मदत केली. दुसर्याच दिवशी संपतने दोन लाखाचा बेअरर चेक राघवच्या हातात ठेवला. मात्र कालपर्यंत व्याजावर पैसे घेणारा राघव ऐनवेळी अचानक दोन लाख रुपये घेऊन कसा काय धावला, हा प्रश्न त्याला सतत डाचत होता.
‘राघवभाऊ, मी लगेच चेक देतोय याचे वाईट नको वाटून घेऊ. तुझे उपकार माझ्या कायम स्मरणात राहतील. ही फक्त परतफेड करतोय असे नाही, तर याबरोबर माझे आणि कुटुंबाचे आभार देखील जोडलेले आहेत.’
‘अरे काय हे संपत? पैसे काय कुठे पळून जाणार होते का? बाबा घरी आल्यावर बघितले असते की.’
‘तसे नाही राघव. पैसे नाहीत असे नाही, पण ऐनवेळी ते उभे कसे करावे हे न समजल्याने मी गांगरलो होतो आणि तुलाही तुझ्या अडचणी असतील की. तू काही विचार न करता माझ्यासाठी धावलास हे महत्त्वाचे! राघव, मी काही विचारले तर रागावणार नाही ना? हे बघ, मी फक्त काळजीपोटी विचारणार आहे.’
‘काय बोलतो संपत? तुझा आणि राग? दोन वर्षापूर्वी मी वस्तीत राहायला आलो, तेव्हा पहिला मैत्रीचा हात तुझा होता. अन्नाचा पहिला घास तुझ्या घरातला होता. मी कोण आहे, काय करतो, हे काही न विचारता तुम्ही लोकांनी मला आपले मानले.’
‘मग राघव मला खरे सांग, माझ्या मदतीसाठी तू कोणाकडून व्याजाने तर पैसे उचलले नाहीस ना?’
‘नाही संपत.. एकवीरेची शपथ! हा पैसा माझा आहे, माझ्या कष्टाचा आहे!’
‘राघव तुझ्याकडे एकदम इतका पैसा? माफ कर, पण तुझ्या परिस्थितीचा मला थोडाफार अंदाज आहे म्हणून…’
राघव एकदम खळखळून हसायला लागला आणि संपतचे बोलणे अर्धवटच राहिले.
‘संपत, चार दिवसांत मी वस्ती सोडतोय. वस्ती सोडायच्या आधी मला तुझ्याशी मनातले बोलायचे होतेच, पण अशा कारणाने मला तुला सगळे सांगावे लागेल असे वाटले नव्हते. पण हरकत नाही, सत्य तुला कळायलाच हवे. दोन-चार दिवसांत बाबाला घरी सोडले की मग आपण निवांत भेटू आणि बोलू. चालेल ना?’
संपतने फक्त होकारार्थी मान हालवायचे काम तेवढे केले. खाली मान घालून वावरणार्या, उधारीवर जगणार्या राघवचे हे ’डॅशिंग’ रूप त्याला थक्क जे करून गेले होते.
—-
‘ये संपत…’ राघव मनमोकळे हसत म्हणाला आणि संपत त्याच्या घरात शिरला.
यापूर्वी दोन-तीन वेळा तो राघवच्या खोलीवर आला होता. अत्यंत मोजके सामान आणि टापटीप यामुळे त्याला कायमच तिथे प्रसन्न वाटत आले होते. छोट्या-मोठ्या सामानाची बांधाबांध चालू होती. पण संपत आलेला बघून राघवने कामगारांना सरळ दोन तासांची सुट्टी दिली आणि त्यांना कटवले. घराचा दरवाजा बंद करत राघवने फॅन चालू केला आणि त्या सामानाच्या पसार्यातून एक सुटकेस बाहेर काढली. त्याने सुटकेसचे झाकण उघडले आणि संपतचे डोळे विस्फारले. सुटकेसला आतमध्ये व्यवस्थित मखमली अस्तर लावले होते आणि त्यात एक वेगळ्या प्रकारचा लाकडी स्टँड होता. त्यात एक उंची दारूची बाटली, दोन व्हिस्कीचे आणि दोन वाइनचे ग्लास अडकवलेले होते. बाजूलाच बॉटल ओपनर, बर्फ उचलण्यासाठी आकडा असा लवाजमा देखील होता आणि जोडीला एक रिव्हॉल्व्हर देखील. राघवने हसत हसत एक व्हिस्कीचा ग्लास संपतच्या हातात दिला आणि त्याने संपतच्या शेजारीच बैठक मारली.
‘संपत… वस्ती सोडण्याआधी मी स्वत:च तुला भेटायला येणार होतो. जे प्रेम तू मला दिलेस, त्याचा मोबदला खोटेपणाचे चुकवावा असे मला वाटत नव्हते.’
‘तुला काय म्हणायचे आहे राघव?’
‘संपत, माझे पूर्ण नाव आहे राघव अंतुरे. पोलिस आणि स्मगलर्स मला ‘नाखवा’ नावाने ओळखतात.’ राघवचे बोलणे ऐकून संपत दचकलाच ’नाखवा’ हे नाव बरेचदा या ना त्या कारणाने त्याच्या कानावर आले होते. ’नाखवा’ ही कोळी वस्तीतली जणू एक दंतकथा बनली होती.
‘संपत, मी इथे एका खास कामानिमित्त आलो होतो. हे बघ..’ राघवने त्याच सुटकेसचा कोणतासा एक खटका दाबला आणि एक छोटा कप्पा बाहेर आला. त्या कप्प्यात शेवाळल्यासारखा दिसणारा एक पांढरा दगड होता.
‘काय आहे हे राघव?’
‘जे काही आहे, त्याची किंमत कोटी रुपयांमध्ये आहे संपत!’
‘चेष्टा करतोयस का? या दगडाची? काय परीस आहे का काय हा?’
‘परीसच म्हणावा लागेल… व्हेल माशाची उलटी आहे ती संपत. जगाच्या बाजारात करोडो रुपयांना हातोहात विकली जाते ही. आपल्या देशापेक्षा परदेशातले लोक हिच्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. आज उद्या, आज उद्या करत शेवटी गेल्या आठवड्यात तिची डिलिव्हरी माझ्यापर्यंत पोचली आणि इतक्या महिन्याचे कष्ट सफल झाले…’
—-
राघवच्या घरातून बाहेर पडताना आपले डोके नक्की दारूने सुन्न झाले आहे की, व्हेल माशाच्या मात्तबरीची कथा ऐकून झाले आहे हेच संपतला सुचत नव्हते. तशाच अवस्थेत त्याने डिसुझा अंकलच्या बारचा रस्ता पकडला. डिसुझा अंकल म्हणजे वस्तीतला सगळ्यात शहाणा माणूस अशी त्याची ख्याती होती. संपतला दुपारच्या वेळी आणि ते ही डुलत डुलत येताना बघून अंकल देखील जरा चमकला.
‘ह्यालो अंकल….’
’काय संपत शेठ, आज दुपारच्यालाच? काय आनंदाची बातमी आहे काय? का बाबाला घरी सोडल्याचा आनंद?’
‘दोन्ही पण अंकल…’ हाताची दोन बोटे नाचवत संपत म्हणाला आणि त्याने मानेनेच अंकलला शेजारी बसायची खूण केली. संपतशेठ सारखा मातब्बर माणूस इतके प्रेम दाखवतोय म्हणाल्यावर अंकलला पण भरून आले जणू.
इकडे तिकडे बघत, अंकलच्या अजून जवळ सरकत हळू आवाजात संपतने विचारले, ‘अंकल ही व्हेल माशाची उलटी काय असते?’
संपतचा प्रश्न संपला आणि अंकल चांगलाच दचकला, खुर्चीत अर्धवट उभा राहिला. संपतने त्याला हाताला धरून खाली बसवले.
‘माशाची उलटी? इथे गिर्हाईकांना उलटी करताना रोज बघतो आपण शेठ… पण ही माशाची कसली उलटी?’
‘अंकल… मी प्यायलोय हे खरंय. पण इतका पण बधिर झालो नाहीये की तुझे दचकणे माझ्या लक्षात नाही आले. काय ते खरे सांग मी कुठे बोलणार नाही. विश्वास ठेव!’ अंकलचा चेहरा पूर्ण पडला होता.
‘संपतशेठ ही खबर तुमच्यापर्यंत पण आली का?’
‘कसली खबर अंकल? आणि माझ्यापर्यंत म्हणजे? अजून कोणाला आणि काय माहिती आहे?’
आता अंकलने आजूबाजूच्या टेबलचा अंदाज घेतला आणि अडखळत्या शब्दात तो बोलता झाला, ‘संपतशेठ व्हेल माशाची उलटी करोडो रुपयात काळ्या बाजारात विकली जाते. आणि अशा उलटीचे एक पार्सल काही दिवसात आपल्या किनार्यावर उतरण्याची शक्यता आहे अशी खबर आहे. पोलिस गेले दोन महिने सतत साध्या वेषात चकरा मारता आहेत. आपल्याकडून हप्ता घेऊन जाणारा हवालदार शिर्के मला बोलला हे सगळे. पण तुमच्यापर्यंत ही खबर आली कशी? तुम्ही तर पहिल्यापासून या सगळ्या ’अंदर-बाहर’पासून दूर आहात.
अंकलच्या बोलण्यावर संपतने फक्त एक मंद हास्य केले; पण त्याचे डोळे मात्र कुठल्याशा वेगळ्याच विचाराने चमकत होते…
—-
राघवची ऑफर तशी वाईट नव्हती. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे आजवर जमवलेली जी काही ८०-९० लाखाची माया होती, ती त्याने या एकाच वस्तूवर खर्च केली होती. आता ह्या वस्तूमुळे त्या ८०-९० लाखाचे एकदाच दीड दोन कोटी रुपये मिळाले की सगळे धंदे बंद करून शांतपणे कुठेतरी आरामात आयुष्य जगायचे. ज्या लोकांकडून राघवला ही ’व्हेलची उलटी’ मिळाली होती, त्यांच्याकडे अजून थोडा माल शिल्लक होता. संपतची इच्छा असेल, तर राघव त्याला त्या लोकांची गाठ घालून देणार होता. संपतने बराच विचार केला आणि ही झटपट पैसे कमावण्याची आयडिया त्याला भावली. धोका असा काहीच नव्हता. माल विकणारी आणि पुढे माल विकत घेणारी, अशा दोन्ही पार्टी राघवच्या ओळखीच्या होत्या. आणि मुख्य म्हणजे संपतचा राघववर पूर्ण विश्वास होता. आज त्या विक्रेत्या पार्टीची ओळख करून द्यायलाच राघव संपतला इथे घेऊन आला होता.
’संपत.. ए संपत…’ कोणीतरी खांदा हालवतं आवाज दिला आणि संपत भूतकाळातून वर्तमानात पोचला.
‘संपत हा फिलिप्स. किनार्यापर्यंत माल आणण्याची जबाबदारी ह्याची. माल पारखून घ्यायची आणि माल पसंत पडला की, जागेवर पैसे मोजायची जबाबदारी आपली.’
‘तू म्हणशील तसे. फक्त पोलिसांचा काही धोका वगैरे?’
‘धोका तर प्रत्येक ठिकाणी असणारच संपत. पण या क्षेत्रात उतरायचे तर रिस्क ही घ्यावीच लागेल. अर्थात आपल्या किनार्यावर पोलिसांची नजर असली, तरी त्यांच्या नजरेतून कसे वाचायचे हे तुझ्यासारखा किनार्यावरच लहानाचा मोठा झालेला माणूस नक्कीच जाणतो.’
—-
संपतने कामगिरीसाठी अमावस्येची रात्र निवडली होती. तसा अंधार देखील असतो आणि अशुभ दिवस समजून वस्तीतले लोक देखील त्या रात्री समुद्रावर येणे शक्यतो टाळतात. हाच दिवस आपल्यासाठी फायद्याचा आहे हे संपतच्या अचूक लक्षात आले होते.
खुणेची शीळ वाजली आणि हळूच दरवाजा उघडून संपत बाहेर आला. राघव त्याची वाट बघत होता. दोघेही झपाझप किनार्याच्या दिशेने निघाले. किनार्यावर झाडांच्या पुढे एक टेकडीसारखा भाग तयार झाला होता. राघवने मालाच्या देवाणघेवाणीसाठी तीच जागा निवडली होती. खडकापाशी पोचताच राघवने कमरेला लावलेले पिस्टल एकदा तपासले आणि तो झपकन खडकावर चढला. समुद्राच्या दिशेने त्याने हातातल्या बॅटरीच्या प्रकाशाची तीन वेळा उघडझाप केली आणि तो शांत उभा राहिला. काही मिनिटातच दूर अंतरावर एक प्रकाश चमकला आणि शांत झाला. खूण पटली होती. काही वेळातच चुबुक चुबुक आवाज करत एक तराफा किनार्याला लागला आणि त्यातून फिलिप्स आणि एक काळा जाड माणूस खाली उतरले. खुणेचे हात हालले आणि राघव आणि संपत खडक सोडून पुढे धावले. फिलिप्सच्या हातातला माल राघवने तपासला आणि होकारार्थी मान डोलवली. संपतने हातातील पैशाची बॅग फिलिप्सकडे सोपवली.
पुन्हा एकदा चुबुक चुबुक आवाज करत तराफा समुद्राच्या दिशेने निघाला आणि राघव अन संपत देखील वस्तीच्या दिशेने वळले. ते वस्तीजवळ पोचत नाहीत तोच एकदम शिट्टीचा आणि पावलांचा आवाज घुमला आणि मोठ्या बॅटरीच्या प्रकाशात दोघेजण प्रकाशात न्हाऊन निघाले. समोर पिस्तूल ताणून इन्स्पेक्टर वाघमारे उभे होते.
‘संपत पोलीस!!!’ कमरेची पिस्टल हातात घेत राघव ओरडला आणि धावत येणार्या पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली.
दुसर्याच क्षणी गोळीबाराच्या फैरींचा आवाज दणाणला आणि अचानक पायात तीव्र वेदना घेऊन संपत खाली कोसळला. आपल्याला गोळी लागली आहे हे त्याच्या लक्षात येईपर्यंत त्याचे डोके मागच्या दगडावर आदळले आणि डोळ्यापुढे पूर्ण अंधार दाटला…
—-
‘पोलिसांना सापडलेला माल नकली निघाला अंकल आणि मुख्य म्हणजे पैसे काहीच जप्त झाले नाहीत!’
‘पण साहेब नाखवा तर सापडला ना?’
‘मेलेल्या नाखवाचे पोलिस काय करणार अंकल? अर्थात त्याला पकडून दिल्याबद्दल पाच लाखाचे इनाम तुला मिळेल हा भाग वेगळा…’
‘पाच लाख तर पाच लाख साहेब. म्हातारपणी कष्ट कमी करायला उपयोगी पडेल.’
‘ठीक आहे अंकल, आम्ही निरोप पाठवला की, येऊन कमिशनर साहेबांच्या हातून तुमचे इनाम घेऊन जा.’
अंकलने मान डोलवली आणि वाघमारे साहेब बाहेर पडले. साहेबांची गाडी नाक्याकडे वळली आणि झपाझप पायर्या चढत हवालदार शिर्के बारमध्ये शिरला. अंकलने त्याला मानेने खूण केली आणि मागच्या खोलीत बोलावले.
‘काय अंकल कसा आहे आपला नेम? थेट गोळी ’नाखवा’च्या छाताडात!’
‘अरे बाबा, तुझ्या नेमाच्या भरवशावर तर येवढा मोठा डाव खेळला मी. हे तुझे दोन लाख.. नीट मोजून घे बाबा. नाहीतर पुढचा नेम माझ्या छाताडाचा धरशील.’ हसत हसत अंकल म्हणाले.
‘पण अंकल मला एक कळले नाही, त्या नाखवाला तुम्ही मारायला का लावले? तसा पण तो आत गेला असता, तरी पैसे मिळाले असते की.’
‘शिर्के, तुम्ही कधी नाखवाला पाहिले आहे? कोण्या दुसर्या पोलिसाने तरी? तो कसा दिसतो कल्पना आहे?’
‘नाही बा! कोणालाच नाही. नाखवा म्हणजे भूत होते म्हणा ना!’
‘होते नाही.. आहे!’
‘काय?’
‘खरा नाखवा मी आहे शिर्के. पाच वर्षे इथे लपून राहिलोय डिसुझा बनून. राघव तर फक्त माझे प्यादे होता. राघव एक छोटासा स्मगलर होता. त्याला व्हेल माशाच्या उलटीचा ‘नाद’ लागला आणि त्यासाठी तो स्वत:च्या बॉसच्या पैशावर हात मारायला तयार झाला. त्याच्या याच ’नादा’चा फायदा घेत, मी त्याच्यापर्यंत व्हेलच्या उलटीची खबर पोचवली आणि तो वेड्यासारखा माझ्याकडे धावला. फिलिप्सला हाताशी धरून मी त्याला सहा-सात महिने चांगला खेळवला. ‘नाखवा’ बनवून त्याच्याकडून एक एक करत माझे शत्रू देखील संपवले. शेवटी राघवने मालकाच्या पैशावर एक मोठा हात मारला आणि एकदम एक कोटी रुपये उडवले. बस! त्याचक्षणी माझ्या खर्या खेळाला सुरुवात झाली. नशिबाने संपत देखील अलगद जाळ्यात आला आणि माझा अजून ९० लाखाचा फायदा करून गेला.’
शिर्के चक्क खुर्चीवर उभा राहिला आणि त्याने अंकलला दोन्ही हात जोडून नमस्कार ठोकला. ‘इथे भेटलात वर भेटू नका आता गुरुदेव.’
‘आता कोणाची भेट नाही शिर्के… आता थेट मॉरिशस झिंदाबाद!’
‘नो नो अंकल… म्हणा व्हेल मासा झिंदाबाद!!!’
दोघांच्याही हसण्याने बार दणाणून गेला…