सुमारे अडीच लाखांवर लाडक्या बहिणींनी खोटं उत्पन्न दाखवून सरकारकडून कोटी कोटी रुपयांची लाच घेऊन महायुतीला मतदान केल्याचं उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारची भंबेरी उडाली आहे. या लाचखोरीचे मास्टर माईंड त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळात सुरू केली आणि लाडक्या बहिणींनी त्यात हात धुवून घेतले. मोठ्या पगाराची नोकरी, चारचाकी आणि दुचाकी घरात असली तरी या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी दरमहा दीड हजारांची रक्कम स्वीकारली आणि लाडक्या भावाच्या महायुतीतील तीनही पक्षांना भरभरून मतदान केलं. आता यातील सधन लाडक्या बहिणींचा बनाव उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारचं धाबं दणाणलं आहे. या योजनेचे पितामह मा. एकनाथरावजी शिंदे यांची याबाबतची प्रतिक्रिया घेण्यासाठी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या मी न सांगताच जाऊन त्यांची मुलाखत घेऊन आलासुद्धा. तीच ही मुलाखत.
– नमस्कार एकनाथरावजी.
– जय महाराष्ट्र.
– आपल्या लाडकी बहीण योजनेचा आता पर्दाफाश झाल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाऊन राज्याची तिजोरी रिकामी झाल्यानं तुम्हाला पश्चात्ताप नाही वाटत?
– मुळीच नाही. मी जर माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाने ही लाडकी बहीण योजना जाहीर केली नसती तर राज्यात सरकारविरुद्ध असंतोष असताना आमची महायुती सत्तेवर आलीच नसती. कोणत्याही भल्याबुर्या मार्गाने महायुती सत्तेवर येण्यासाठी मी माझ्या सुपीक डोक्यातून या योजनेची शक्कल काढली होती.
– तुम्ही ढीग काढली असेल हो, पण त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला त्याचे काय?
– पण सत्तेवर येण्याचा मार्ग तर खुला झाला ना त्यामुळे?
– तरीही ही एकप्रकारे दिलेली लाचच होती ना!
– मी तसं मानत नाही. मी त्यावेळी ती योजना लागू केली नसती, लाडक्या बहिणींना दीड-दीड हजार रुपये महिन्याला देण्याचं वचन दिलं नसतं तर आज मुख्यमंत्रीपदावर मिरवणारे देवेंद्र फडणवीस कुठल्या वळचणीत असते त्याचा पत्ताच लागला नसता. आणि आता गमजा मारणारे अजितदादा बारामतीत बाराच्या भावात गेले असते आणि त्यांचा पत्ताही लागला नसता. म्हणूनच मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्याचं ठासून सांगत होतो. पण शेवटी या दोघांनी दावा साधलाच आणि मला अमित शहांकडून दम देऊन मुकाटपणे डेप्युटी सीएम पद स्वीकारायला लावलं.
– तुमची ही बाजू रास्त वाटत असली तरी तुमच्या या योजनेमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली ना!
– अरे पोक्या, या भाजपकडे सगळ्या यंत्रणांना टांग देऊन कमावलेला इतका पैसा आहे की त्यांना कशाचाच काहीच फरक पडत नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात तर त्यांनी गावागावात, शहराशहरात इतका पैसा वाटला की माझेही डोळे पांढरे झाले त्यावेळी.
– तुम्ही पण तेच केलेत ना?
– माझी गोष्ट सोड. लोक काहीपण बोलतात. त्यावर विश्वास ठेवू नकोस. मी माझ्या लाडक्या बहिणींच्या जिवावर, प्रेमावर आणि माझ्या कर्तृत्त्वावर निवडून आलोय आणि या दोघांना निवडून आणण्यात माझाही मोठा वाटा आहे. पण हे दोघेही कृतघ्न आहेत. आपला स्वत:चा हेतू साधल्यावर मला बाजूला सारणारे.
– ते दोघे तर लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मार्गावर आहेत असं दिसतंय एकूण.
– उपकारकर्त्यांवर लाथा मारणे हा स्वभावच आहे त्यांचा. त्यांना माझ्या लाडक्या बहीण योजनेविषयी जर नफरत वाटत होती, तर निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी त्या योजनेचा प्रचार करून आम्हीही त्या योजनेचा एक भाग आहोत असं नाटक केलं नसतं.
– पण आता या योजनेतील पैसेवाल्या बोगस लाडक्या बहिणींना डिच्चू देऊन पैशांची झालेली लूटमार थांबवणार आहेत असं म्हणताहेत ते.
– त्यांना काहीही करूं दे. तिजोरी त्यांच्याच हातात आहे. ते करतील ती पूर्व दिशा. मी मात्र डोक्याला हात लावून बसलोय. मला मोदी-शहांनी मुख्यमंत्री केल्यावर त्यांचा जो अपमान झाला त्याचं उट्टं काढायचं होतं त्यांना. म्हणून सारखं ‘मी पुन्हा येईन’ हा नारा लावला होता त्यांनी. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून त्यांनी भाजपावर दबावतंत्राचा वापर केला आणि फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्यात पक्षाचा आणि आपला कसा फायदा आहे, हे पटवून दिलं त्यांना. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केलं तर ते डोक्यावर बसतील आपल्या आणि राज्याच्या हे मनावर ठसवलंय त्यांनी त्यांच्या. म्हणूनच माझा जाहीर अपमान करून माझ्या पुढच्या भवितव्याची चुणूक दाखवली त्यांनी शपथविधीच्या वेळी. बाळासाहेबांच्या असली शिवसेनेतही माझा कधी इतका अपमान झाला नव्हता. उलट असली शिवसेनेने मला भरभरून दिलं, जे उभ्या आयुष्यात कुणी दिलं नसेल. ज्या दिघे साहेबांमुळे ठाण्यात मला हातपाय पसरायला मिळाले आणि बाळासाहेबांनी माझ्यावर अगणित उपकार करून मला समाजसेवेची दीक्षा दिली, त्यांच्याशीच मी माझ्या स्वार्थासाठी कृतघ्न झालो. त्याचीच शिक्षा भोगतोय मी आता. बाळासाहेबांचा शब्द अखेरचा होता. त्यांना आव्हान देण्याची ताकद कुणात नव्हती. भुजबळांसारखे स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेसमध्ये गेलेले गद्दार होते. बाळासाहेब गेल्यावर मलाही तो मोह झाला आणि चाळीस आमदारांना घेऊन मी शिवसेनेशी गद्दारी केली. ज्यांची बाळासाहेबांच्या नखाजवळही उभं राहण्याची लायकी नाही त्या माझ्यासारख्या गद्दाराने सीएमपद भोगलं. आज त्याच पापाची शिक्षा भोगतोय मी.