सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. प्रत्येक जण काहीतरी अभूतपूर्व करण्याच्या मागे आहे. या काळात आजूबाजूला बघितले की आपण मागे पडतो आहोत की काय असे भय सतत मनात दाटून येते. अशावेळी नेमकी अशी काही पात्रं समोर आली, जी वेंधळी, गडबड करणारी, गोंधळ घालणारी, चुका करणारी, मी मी म्हणणारी असतील तर त्यांच्याकडे बघून आपणच एकटे नाही हा विश्वास मनाला वाटतो. आपण एकटेच सामान्य नाहीत हे बघून बरे वाटते. आपली वाट थोडी चुकली असेल, पण आपण अगदीच हुकलेले नाहीत असेही वाटते. ज्यांची कधीच कुठे दखल घेतलेली नसेल, ज्यांनी आयुष्यात सामान्य असण्यापलीकडे काहीही वेगळे केले नसेल. ‘मी काय म्हणते’ हे असतील तुमच्या माझ्यासारखे सर्वसाधारण लोक.
– – –
शांतिप्रसाद गृहनिर्माण सोसायटीतील एकेक नमुन्यांची क्रमवारी लावायची झाली तर त्यात ‘मी काकूं’चा नंबर कदाचित पहिल्या पाचात लागेल.
‘काय सांगू अगं तुला मानसी? मी किनई बाजारात गेले होते. रस्ता ओलांडणार तर सिग्नल हिरवा झाला. पुन्हा थांबले. तर शेजारी एक काकू आल्या (मला खात्री आहे की स्वत: त्या काकूंच्या वयाच्या असूनही आमच्या ‘मी’ काकू त्यांना काकू म्हणत असणार). त्या काकूंना बाई रस्ता ओलांडताच येईना. दोन सिग्नल घालवले तरीही या तिथेच. मग काय धरला हात आणि आणले या बाजूला. सगळेजण बघतच राहिले माझ्याकडे. एक तर बाई म्हणाली सुद्धा की तुम्ही वसुधा काकू ना? मी लगेच ओळखले. इतक्या परोपकारी अजून कोण असणार?’ जगातल्या सगळ्या परोपकारी घटना या काकूंच्या माध्यमातूनच पुढे सरकतात असा काकूंचा दावा आहे. त्याला आव्हान देण्याची हिंमत आम्हा कोणामध्येही नाही.
आता वास्तविक पाहता रस्ता ओलांडायला कोणाला मदत करणे हे काही फार मोठे काम नाही, पण वसुधा काकू ते इतके मोठे करून सांगणार जणू काही हनुमानाने संजीवनी आणायचा पराक्रम केलाय. मोहरी उचलली तर शंभर किलोचा भोपळा उचलण्याचा अविर्भाव वसुधा काकू अशा काही पद्धतीने रंगवून सांगतात की त्यांना संपूर्ण शांतिप्रसाद सोसायटीने त्यासाठी ‘मी काकू’ असे नाव दिलेले आहे.
अर्धे पांढरे झालेले केस, अजूनही कमरेच्या खाली आलेला वेणीचा पातळ शेपटा. मध्यम बांधा. सलवार, कुर्ता आणि दुपट्टा घातला तर त्यातले कधीही काहीही एकमेकांना मॅचिंग होणार नाही याची काळजी घेतलेली, साडी नेसली तर त्यावर कुठलेतरी वेगळेच ब्लाउज घातलेले असा त्यांचा वेष. म्हणजे ‘मी काकूं’नी मॅचिंग कपडे घातलेले दाखवा आणि शंभर रुपये घेऊन जा, असे शांतिप्रसाद सोसायटीत जाहीर आव्हान आहे. असे का करता, असा प्रश्न काकूंना विचारल्यावर त्या उलट जोरात म्हणत असत, ‘ती पल्लवी जोशी कशावरही काहीही घालते ते तुम्ही आवडीने बघता आणि माझेच चालत नाही होय? तिलाही फॅशन मीच शिकवली आहे बच्चमजी.’ हे वाक्य म्हणताना अर्जुनाला गीता सांगताना श्रीकृष्ण कसा दिसला असेल याची आपल्याला लगेच कल्पना येऊ शकते. असे काही किस्से सांगताना काकूंच्या चेहर्यावर एक अभूतपूर्व आत्मविश्वास झळकत असतो. डोळे थोडे बारीक होतात, अगदी तुला म्हणून सांगते असा भाव चेहर्यावर दाटून येतो. आवाज किंचित घोगरा होतो, ‘सा’ लावण्यासाठी पट्टीचा गायक जी एकतानता साधेल ती दिसू लागते आणि मग काकूंच्या तोंडून ती ‘मी’ वाणी बाहेर पडते.
हे वाक्य त्या इतके बेमालूमपणे टाकतात की ते ऐकल्यावर पल्लवी जोशींची फॅशन नक्कीच वसुधा काकूंनी शिकवली असणार यात कोणाला शंकाच राहणार नाही. घाईघाईने चालताना आणि सतत बोलताना कोणी दिसलं आणि त्या बोलण्यात प्रत्येक चार शब्दांमागे ‘मी’ असा शब्द ऐकायला आला तर खुशाल समजा की त्या वसुधा काकूच आहेत. त्यांच्या बोलण्यात इतका ‘मी’पणा आहे की त्या लहानपणी बोललेला पहिला शब्द ‘मी’ असणार हे आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे.
काकूंना अध्यात्म, भाषा, भूगोल, इतिहास, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, गणित, राजकारण, काव्य, विनोद, भूगर्भशास्त्र असे कशाचे म्हणजे कशाचेही वावडे नाही. तुम्ही काढाल त्या विषयावर काकू फक्त आपलं ज्ञान वाटणारच नाहीत तर त्यातील मूलभूत गोष्टींना त्याच कशा जबाबदार आहेत हे देखील त्या सोदाहरण स्पष्ट करतात. कुणी काही म्हणाले असे काकूंना सांगायचा अवकाश की काकू लगेच ‘तू तिचे काही ऐकू नको गं, मी काय म्हणते ते ऐक.’ अशी सुरुवात करणार. मला तर खात्री आहे की आर्किमिडीज ‘युरेका युरेका’ असे म्हणत बाहेर आला, तो आपला गैरसमज असणार. तो नक्की ‘काकू काकू’ म्हणत बाहेर आलेला असणार आणि त्याला लागलेला शोध काकूंनी आधीच कसा लावून ठेवलाय हे सांगून काकूंनी त्याला तिथेच झापला असणार शिवाय कपडे न घालता बाहेर आल्याबद्दल त्याला ओरडादेखील खावा लागला असणार. काकूंच्या या कमालीच्या आत्मविश्वासाचा स्रोत जाणून घेण्याचा मी बर्याचदा प्रयत्न केला, पण मला तर त्या स्वयंभू वाटतात. जसे भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते, मी होतो मी आहे आणि मी राहणार. तसेच काकूंचे आहे. त्या होत्या, त्या आहेत, त्या राहणार.
शांतिप्रसाद गृहनिर्माण सोसायटीत ‘मी’ काकूंशिवाय कोणाचे पान हलत नाही, असे स्वत: काकूंचेच म्हणणे आहे. म्हणजे संदेश दादांना नुकतेच मिळालेले प्रमोशन, छोट्या चिनूला लागल्यावर त्याला झालेली मलमपट्टी, आज पडवळाची भाजी करायची की दुधीची असे माधुरी वहिनींना पडलेल्या प्रश्नावरचे उत्तर, माधव आजोबांना हृदयविकाराचा झटका आल्यावर तो झटका आहे हे ओळखून त्यांची बायपास करावी लागेल असे सांगणे, असे सगळे काकूंनी केलेले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्याचा काकूंचा आवाका प्रचंड मोठा आहे. पण गमतीची गोष्ट म्हणजे काकूंचे म्हणणे एवढे ठाम असते की त्यांनी हे सगळे केलेले नाही, असे खुद्द माधुरी वहिनी, माधव आजोबा, चिनू, संदेश दादा किंवा डॉक्टर असे कोणीही म्हणणार नाही. बरे काकूंच्या मीपणातून त्यांच्या घरचे सुटले म्हणावे तर तसेही नाही. मी तर असं ऐकून आहे की मागे त्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणाल्या होत्या, ‘काय सांगू तुला, मी पुढाकार घेतला म्हणून मुले तरी झाली.’ आता जिथे त्यांचे पती अच्युतराव काका त्यांच्या तडाख्यातून सुटले नाहीत तिथे आम्हा पामरांची काय कथा!
दिवसाच्या कुठल्या प्रहरी बाहेर पडलं की काकू आपल्याला भेटतील याचा नेम नाही. प्रत्येक प्रहरी त्यांच्याकडे मीपणाची कुठली तरी कथा तयार असते. आणि ती एकदा सुरू झाली की मग चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी आपली अवस्था होते. शिवाय काकूंच्या मते त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. त्यामुळे तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांवर देखील त्यांच्याकडे उत्तर असते आणि ते तुम्हाला देऊन त्या मोकळ्या होतात. पुन्हा मग त्या दिवशीच्या इतरांना सांगितलेल्या ‘मी’ पणाच्या कथेचा तुम्ही भाग असता. त्या महाभारतातल्या, पांडवांना प्रश्न विचारणार्या यक्षाने काकूंना प्रश्न विचारायला हवे होते असे मला फार मनापासून वाटते, काकूंनी केवळ त्याच्या प्रश्नाची उत्तरेच दिल्याचा दावाच केला नसता तर आपणच यक्षाला उलटप्रश्न करून कसे जेरीस आणले याचासुद्धा पुरावा दिला असता.
निवडून आलेल्या आमदार खासदारापासून ते अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांच्या त्या प्रेरणास्थान आहेत, असे त्या सांगतात. एवढेच नव्हे तर ‘लाडकी बहीण’ योजना म्हणू नका, ‘जलयुक्त शिवार’ म्हणू नका, अशा कुठल्याही योजनेची मूळ कल्पना काकूंची आहे हे एव्हाना तुम्ही ओळखले असेलच. राज्यापासून ते देशापर्यंतच्या पातळीवरील ‘मी’पणा करणार्या कित्येक मंत्र्यांपेक्षा काकू त्याबाबतीत अग्रेसर आहेत हे शांतिप्रसाद सोसायटी ओळखून आहे.
काकू असे ‘मी’पण कधीपासून बाळगू लागल्या हे कोणालाही सांगता येणार नाही. अच्युतराव काकांना विचारले तर त्यांना काकू भेटल्या तेव्हाही त्या तशाच होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे बहुधा जन्मत: त्या तशाच असणार. जन्माला आल्यावर मातेलाच ‘तू कुठले कष्ट घेतलेस? मीच माझ्या डोक्याला जोर लावून तुझ्या पोटातून बाहेर निघाले’ असेही त्या म्हणाल्या असणार. किंवा स्वत:च्या प्रसुतीच्या वेळी देखील ‘डॉक्टर, एवढी सात टाक्यांची गरज नाही, एखादा कमी घातलात तरी चालेल’ असे म्हणाल्या असतील असा विचार करायला वाव आहे.
काकूंच्या या असल्या मीपणामुळे त्या सोसायटीत कुप्रसिद्ध असणार असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे काहीही नाही. त्यांच्या मीपणाच्या सुरस कथा ऐकायला सगळ्यांना आवडते. खरे तर बर्याचदा या कथांत आमच्यापैकी कोणी आले की शाळेच्या बॅण्डपथकाच्या शंभर मुलांपैकी एक म्हणून माझे नाव मुख्याध्यापकांनी स्टेजवर घेताना मला जेवढा आनंद होतो तेवढाच अभिमान दाटून येतो.
काकू मीपणा करणार्या आहेत, पण दुष्ट किंवा वाईट नाहीत. सगळ्या चांगले घडण्याच्या मागे त्या आहेत हे कथानक त्यांना हवे असते एवढेच. पण म्हणजे सगळ्यांचे चांगले व्हावे हा भाव त्यात आहेच की. आजकाल एकमेकांचे वाईट व्हावे असे चिंतण्याच्या, किंवा पराकोटीची स्पर्धा असण्याच्या काळात कोणाचेतरी चांगले माझ्यामुळे झाले हा भाव काकूंच्या मनी असेल तर तो बिनदिक्कत असू द्यायला आम्हा कोणाचीच ना नाही. आमच्या संपूर्ण शांतिप्रसाद गृहनिर्माण सोसायटीच्या ‘से मी क्वीन’ म्हणून त्या सगळ्यात उच्चपदी केव्हाच विराजमान झालेल्या आहेत.
मी काय म्हणते, उद्या कोणी तुम्हाला असे सांगितले की मला हा लेख लिहिण्यासाठी त्यांनीच प्रेरणा दिली आणि शब्दही त्यांचेच आहेत, तर बिनदिक्कत ओळखा की त्या आमच्या ‘मी काकू’ आहेत.