घराला कोणता रंग द्यावा याबाबत ग्राहक विक्रेत्याकडे सल्ला मागतो. अशावेळी रंग माणसांवर काय प्रभाव टाकतात याची माहिती असणे उत्तम. घराला घरपण देणारे रंग भिंतींपुरते नसतात, ते घरातील भावनांचे, आठवणींचे आणि नात्यांचे रंग असतात, घरातल्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक होतात. ऊबदार पिवळा, शांत निळा, नेत्रसुखद हिरवा… प्रत्येक रंगाने घराला एक वेगळी ओळख मिळते..
– – –
रंगांचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे. रंगांमुळे मानवी मन आणि भावनांवर मोठा प्रभाव पडतो. निसर्गात रंगांची उधळण आहेच, पण त्याशिवाय माणसानेही असंख्य रंगछटा तयार केल्या आहेत. आयुष्य रंगीबेरंगी करणार्या कपड्यांइतकाच घराचा रंग हाही माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. प्राचीन मानवांनी गुफांच्या भिंतींवर चित्रं काढली. घरं, मंदिरांची सजावट करण्यापर्यंत मजल आली, तेव्हा त्यांनी नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग वापरले. फुलं, पानं, माती, खनिजे आणि नैसर्गिक रसायनांनी बनवलेले हे रंग आजही टिकून आहेत. राजस्थानच्या किल्ल्यांवर आजही दिसणारा लालसर गेरू रंग मातीच्या नैसर्गिक गुणधर्मातून तयार झाला आहे. तिथे वापरलेली पद्धत इतकी टिकाऊ होती की आज ५०० वर्षांनंतरही ते रंग तितकेच ताजे वाटतात. दुसरीकडे, निळ्या रंगासाठी निलगिरीसारख्या फुलांपासून काढलेल्या रसाचा वापर केला जाई.
या निळ्या रंगाच्या प्रेमापायी राजस्थानातील एक धनाढ्य राजा कंगाल झाल्याची दंतकथा सांगितली जाते. राजाने दरबाराच्या भिंतींवर निळा रंग लावण्याचा आदेश दिला. निळा रंग म्हणजे श्रीमंती, प्रतिष्ठा आणि उच्च दर्जाचं प्रतीक. त्या काळात निळा रंग तयार करणं खूप कठीण आणि महागडं होतं, निलगिरीची फुलं हाताने गोळा करून, ती कुटून विशिष्ट प्रक्रियेद्वारे रस काढला जाई. तो रस वाळवून त्यापासून गडद निळ्या रंगाची पावडर केली जायची. या प्रक्रियेसाठी बराच वेळ आणि कौशल्य लागत असल्याने हा रंग ‘सोन्याइतका’ महागडा होता. राजाच्या एका किल्ल्याच्या आसपासची शेतं फुलांच्या लागवडीसाठी वापरण्यात आली, परिणामी त्या गावात अन्नधान्याची टंचाई झाली. शिवाय, फुलांच्या काढणीसाठी रोज लोक दिवसभर काम करायचे, ज्यामुळे किल्ल्याचा आणि आसपासचा सामान्य कारभार ठप्प झाला. रंग तयार करणं एवढं खर्चिक होते की राजाच्या खजिन्याचा भला मोठ्ठा हिस्सा त्यासाठी खर्च झाला. ही गोष्ट खरी की खोटी माहित नाही, परंतु त्या काळात रंग बनवणं किती खर्चिक होतं, ते कळून जातं.
काळानुसार घराला रंग लावण्याचा प्रवास बदलत गेला. आज आपण रासायनिक रंगांच्या युगात आहोत. या शुभ्र पानावरील काळया अक्षरात आपण या रंगीबेरंगी व्यवसायाची स्थित्यंतरे आणि गंमती जाणून घेणार आहोत. औद्योगिक क्रांती (१८वे शतक) हा मानवी इतिहासातील महत्त्वाचा टप्पा. मोठे कारखाने, कार्यालये आणि पूल या काळात बांधले जाऊ लागले. बांधकाम आकर्षक दिसण्यासाठी आणि टिकाऊपणा वाढण्यासाठी रंगाची मागणी वाढली. या आधुनिक काळात रंगरंगोटी केवळ राजे महाराजे आणि धनिकांपुरती मर्यादित राहिली नसून जगाला लोकशाहीचा रंग लागला होता. या काळात रंगांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. पारंपारिक नैसर्गिक रंगांचं स्थान रासायनिक प्रक्रियांद्वारे निर्मित रंगांनी घेतलं. पूर्वी साध्या पाण्यावर आधारित रंग प्रचलित होते. कालांतराने ऑइल-बेस्ड रंग आले, ज्यामुळे ते अधिक टिकाऊ झाले. आज अँटी-फंगल, वॉशेबल, आणि पर्यावरणपूरक रंग प्रचलित झाले आहेत.
गेल्या ५० वर्षांत रंग व्यवसायाने प्रचंड प्रगती केली. १९७०च्या दशकात हाताने मिसळून तयार केलेले रंग प्रचलित होते. १९८०-९०च्या दशकांत रेडिमेड रंग बाजारात आले. आधुनिक काळात टेक्नोलॉजीच्या आधारे तयार केलेल्या इको-फ्रेंडली, शून्य-व्हीओसी (व्होलाटाइल ऑरगॅनिक कंपाऊंड्स) असलेल्या रंगांचा वापर वाढला आहे. डिजिटल रंग सल्लागार आणि रंग परीक्षण उपकरणांमुळे ग्राहकांना घरासाठी योग्य रंग निवडणे सोपे झाले आहे.
रंगाचं जग दोन भागांत सामावलेलं आहे. पहिला, इंडस्ट्रियल पेंट, ज्यात ऑटोमोबाईल, मशिनरी, औद्योगिक साधनं यांच्यासाठीचा रंग येतो. दुसरा डेकोरेटिव्ह पेंट, जो घरासाठी, इमारतींसाठी वापरला जातो. रंगाच्या एकूण व्यवसायात डेकोरेटिव्ह पेंटचा भाग ७५ टक्के आहे. घराचा रंग फक्त सजावटीपुरता मर्यादित नसतो, तो घरमालकाच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंबही दाखवतो. १९५०-६०च्या दशकात एशियन पेंट्ससारख्या कंपन्यांनी आधुनिक रंग निर्माण करून बाजारावर वर्चस्व प्रस्थापित केलं. तत्पूर्वी घर रंगवणं ही श्रीमंतांची मक्तेदारी होती, सर्वसामान्यांच्या घरात चुन्यावर फार तर निळा डिस्टेंपर फासला जायचा; पण एशियन पेंट्सने ‘हर घर कुछ कहता है’ या जाहिरातीने मध्यमवर्गीयांच्या घरी रंग पोहोचवले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांच्या जीवनात रंग भरणार्या या कंपनीचा शून्य ते तीन लाख कोटींचा टर्नओव्हर गाठण्याचा प्रवास उत्कंठावर्धक आहे.
१९४२ सालातील गोष्ट. दुसरे महायुद्ध सुरू होते. चंपकलाल चोकसी, चिमणलाल चोकसी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील या मुंबईतील चार गुजराती मित्रांच्या जुहूच्या स्टॉलवर वडा-पाव खाताना गप्पागोष्टी सुरू होत्या. त्यात बिझनेसचा विषय आला नसता तरच नवल. ब्रिटिश सरकारने भारतातील पेंटच्या आयातीवर बंदी घातल्याचा मुद्दा चर्चेत आला. या आपत्तीमुळे निर्माण झालेली संधी ओळखून या चौघांनी नवीन पेंट कंपनी सुरू केली. मुंबईतील एका मोठ्या गॅरेजमधून कंपनीचं कामकाज सुरू केलं. या कंपनीचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न होता. बराच विचार करूनही नावावर एकमत झालं नाही, म्हणून टेलिफोन डिरेक्टरीमधून एक रँडम शब्द निवडला गेला आणि कंपनीचे नाव ठेवले, ‘एशियन ऑइल अँड पेंट्स प्रायव्हेट लि.’
एशियन पेंट्स कंपनीने सुरुवातीला हिरवा, पांढरा, लाल, काळा आणि पिवळा असे एकूण पाच रंग तयार केले. या चौघांना वाटलं की रंग बनवले म्हणजे लढाई जिंकली. परंतु ते या व्यवसायात नवीन असल्यामुळे कोणत्याही वितरकाने त्यांचा माल घेतला नाही. व्यवसाय नवीन असताना प्लॅनिंगप्रमाणे गोष्टी घडत नाहीत हे चंपकलाल चोकसी यांच्या लक्षात आलं. मुंबई आणि पुण्यातील वितरकांऐवजी गावोगावी डीलर्सना पेंट विकायचे ही नवीन योजना त्यांनी तयार केली. त्यांनी पेंट प्लास्टिकच्या छोट्या डब्यांमध्ये पॅक केले आणि ते खेडोपाडी आणि शहरांमध्ये घरोघरी विकून आपल्या रंगाचा प्रसार करायला सुरुवात केली. त्याचवेळी तामिळनाडूमध्ये पोंगल सण येणार होता. त्यात बैलांच्या शिंगांना रंग लावून त्यांची पूजा केली जाते. चंपकलाल यांनी विचार केला की या पारंपारिक सणासाठी लहान पॅकिंगमध्ये गडद रंग भरून ते तामिळनाडूच्या गावांमध्ये विकायला सुरुवात केली तर आपल्या कंपनीचा प्रसार आणि प्रचार गावोगावी होईल. ही आयडिया हिट झाली.
हळुहळू त्यांच्या पेंट्सची मागणी बाजारात वाढू लागली. पण जोपर्यंत कोणी मोठा डीलर तुमचा माल घेत नाही तोपर्यंत तुम्हाला बाजारात मान्यता मिळत नाही. महाराष्ट्रातील सांगली शहरात एक मोठा डीलर मिळाल्यावर आसपासच्या इतर रंग वितरकांना एशियन पेंट्सबाबत विश्वास वाटू लागला. यानंतर रंगाच्या किरकोळ व्यापार्यांनी देखील एशियन पेंट्सचा रंग आपल्या दुकानात ठेवायला सुरुवात केली. महाराष्ट्र आणि तामिळनाडूत रंग विकले जायला लागल्यानंतर कंपनीने विक्री क्षेत्र आणि व्यवसाय वाढवायचे ठरवले. १९४२ ते १९४५ या तीन वर्षांत कंपनीने साडेतीन लाख रुपयांची उलाढाल केली. तेव्हा कंपनीचा कामाचा धडाका इतका होता की १९५२पर्यंत या कंपनीची उलाढाल २० कोटींपेक्षा जास्त झाली.
कंपनीची कमाई सतत वाढत होती, पण मालकांची इच्छा होती की खाद्यपदार्थातल्या पार्ले, कॅडबरी या कंपन्यांसारखं रंग म्हटलं की एशियन पेंट्स हे नाव ग्राहकांच्या ओठावर सहजतेने यायला पाहिजे. म्हणून त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली. कॉमन मॅनपर्यंत आपला रंग पोहोचवण्यासाठी कार्टूनमधल्या कॉमन मॅनचे जन्मदाते व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना साकडं घातलं. लक्ष्मण यांनी चितारलेला मॅस्कॉट कंपनीने वर्तमानपत्रातील जाहिरातीद्वारे लोकांसमोर ठेवला आणि त्याचं नाव सुचवायला सांगितले. पन्नास हजार लोकांनी कंपनीला पत्रं पाठवली आणि शेवटी ‘गट्टू’ हे नाव निश्चित करण्यात आलं. ते सुचवणार्याला पाचशे रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. त्यानंतर कंपनीने ट्रॅक्टर डिस्टेंपर या सर्वात लोकप्रिय रंगाच्या डब्यावर ‘गट्टू’चा मॅस्कॉट वापरला. कंपनीचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि पुढील चार वर्षांत एशियन पेंट्सचा व्यवसाय १० पटींनी वाढला.
एशियन पेंट्सने आपला पहिला पेंट प्लांट भांडुप मुंबई येथे स्थापन केला. १९६०च्या दशकात कंपनीने फिजीमध्ये आपला पहिला परदेशी प्लांट स्थापन केला. १९६५मध्ये कंपनीचं एशियन पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड असं नामकरण करण्यात आलं. १९६७पर्यंत ही कंपनी बाजारातील सर्वात मोठी पेंट कंपनी बनली. चोकसी यांना वाटलं की व्यवसाय पुढे नेण्यासाठी कंपनीला बुद्धिमान लोकांची गरज आहे. ते सहकार्यांना म्हणाले की यापुढे कंपनीत व्यावसायिक लोकांनाच काम देऊ या. यानंतर कंपनीने बिझनेस स्कूल आणि आयआयएम पासआउट विद्यार्थ्यांना नोकरी देण्यास सुरुवात केली. जुन्या तंत्रज्ञानाऐवजी नवीन तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरुवात केली. नवीन प्लँट उभारण्यास सुरुवात झाली आणि यंत्रांच्या वापरावर भर दिला गेला. आज कंपनीचे भारतात सहा प्लांट आहेत. तसेच ही कंपनी आता १५ देशांमध्ये कार्यरत असून जगभरात सत्तावीस पेंट उत्पादन सुविधा देत आहे. ६५पेक्षा जास्त देशांमध्ये ग्राहकांना ही कंपनी सेवा देते. हजारो रंग, थीम, टेक्श्चर आणि शेड्सचे पेंट्स ती बनवते.
कंपनीच्या भरघोस यशाचं श्रेय अश्विन दाणी यांच्या दूरदर्शीपणाला जाते. कंपनीचा व्यापार वाढवण्यासाठी दाणी यांनी १९७०मध्ये (इस्रो आणि आयआयटीच्या खूप आधी) सीडीसी ६६०० हा सुपर कम्प्युटर परदेशातून मागवला. तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून मागवलेल्या या सुपर कम्प्युटरच्या मदतीने त्यांना देशभरातील कोणत्या गावात कोणता रंग जास्त विकला जातो, लोकांना कोणते रंग आवडत आहेत, किती रंग विकला जातो आणि त्यातून नफा किती याची इत्थंभूत माहिती तातडीने मिळत होती. त्यामुळे आधीच्या वर्षी ज्या भागात ज्या रंगाची सर्वाधिक खरेदी झाली, त्या ठिकाणी त्या रंगाचा साठा आधीच नियोजन करून ठेवला जात होता. सुपर कम्प्युटरमुळे एशियन पेंटचा महसूल ६० वर्षांपासून प्रत्येक वर्षी २० टक्के दराने वाढल्याचे सांगितले जाते. आज ग्राहकांच्या खरेदी डेटाचा वापर करून स्विगी, झोमॅटो, अॅमेझॉन हे आपलं विक्री धोरण ठरवतात. हीच गोष्ट एशियन पेंट्सने १९७० साली केली होती.
एशियन पेंट्सने १९७९मध्ये रंगांच्या नवीन छटा तयार करण्यासाठी संगणक वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे जे काम करायला सहा-सात दिवस लागत ते काही तासातच होऊ लागलं. एशियन पेंट्सचं नाव घराघरात पोहोचवण्याचं श्रेय त्यांच्या कल्पक जाहिरातींना जातं. जाहिरातींच्या टॅगलाईन्स नेहमीच भावनात्मक, सांस्कृतिक, आणि सौंदर्यपूर्ण दृष्टिकोनातून डिझाइन केल्या गेल्या. ‘हर घर कुछ कहता है’ ही टॅगलाईन आजही हिट आहे. यासोबतच हर खुशी मे रंग लाये, डोन्ट जस्ट पेंट इट, एशियन पेंट इट, रंग बदलो, दुनिया बदलो… यासारख्या टॅगलाइन्सनी कंपनीचं भारतीय ग्राहकांच्या मनातलं स्थान पक्कं झालं. रंगव्यवसायात ही भारतातील सर्वात मोठी, आशियातील दुसरी आणि जगातील दहा सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. २०२२ साली एशियन पेंट्सने भारतातील पेंट मार्केटचा ५९ टक्के भाग व्यापला होता. कंपनीची उलाढाल सुमारे ७० हजार कोटी रुपये होती.
भारतात बर्जर पेंट्स (१८ टक्के), कॅन्साई नेरोलॅक (१५ टक्के), ड्युलक्स (७ टक्के) आणि इतर कंपन्या या क्षेत्रात आहेत. रंगाच्या एकूण क्षेत्रात मोठ्या संघटित कंपन्यांचा वाटा ७५ टक्के असून छोट्या प्रमाणात रंग बनवलेल्या कंपन्यांचा वाटा २५ टक्के आहे. काही मराठी उद्योजकांनीही या क्षेत्रात योगदान दिलं आहे. विष्णू अंजनकर यांनी १९७०च्या दशकात नागपूरमध्ये व्ही अंजनकर पेंट्स ही कंपनी स्थापन केली. सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेपुरतेच उत्पादन होते. नंतर त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांनी विदर्भ आणि मध्य भारतातल्या बाजारपेठेत विस्तार केला. कोल्हापूरमध्ये डी. एस. माने यांनी माने इंडस्ट्रियल पेंट्सची स्थापना १९९०मध्ये केली. तिथून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार केला. मुंबईतील आर. के. फडणीस यांनी १९६५मध्ये फडणीस पेंट्स ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला छोटेसे उत्पादन युनिट होते, पण १९८०नंतर त्यांनी डेकोरेटिव्ह पेंट उत्पादनाला सुरुवात केली. १९९५मध्ये नाशिकमध्ये अशोक साळुंके यांनी साळुंके पेंट्सची स्थापना केली. विशेषत: फर्निचर पेंट्समध्ये त्यांनी नाव कमावले.
रंग बनवण्यासाठीच्या कच्च्या मालाचा खर्च टक्केवारीत पुढीलप्रमाणे विभागला जातो. टायटॅनियम डायऑक्साइड : २५-३० टक्के, सॉल्व्हंट्स आणि क्रूड ऑईल डेरिव्हेटिव्ह्ज : २०-२५ टक्के, इतर अॅक्डिटिव्ह्ज (बाइंडर्स, पिगमेंट्स, रेजिन्स) : १५-२० टक्के, पॅकेजिंग आणि लॉजिस्टिक्स: १०-१५ टक्के, मार्केटिंग आणि वितरण : १०-१५ टक्के. यातील टायटॅनियम डायऑक्साइड साउथ कोरियामधून आयात करावं लागतं आणि क्रूड ऑईलबद्दल तर सर्वसामान्यांना माहीतच आहे. या दोन्ही घटकांच्या किंमती वर-खाली झाल्यास रंग बनविण्याच्या खर्चात ३५ ते ४० टक्के फरक पडतो. म्हणूनच क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या की रंगांच्या कंपन्यांचे भाव शेअर मार्केटमध्ये ढासळतात.
धंद्यात मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे प्रमुख रंग कंपन्यांचे १२ ते १५ टक्के नेट मार्जिन गेल्या वर्षीपर्यंत शाबूत होते. पण वर्षानुवर्ष प्रचंड फायदा मिळवून देणार्या व्यवसायात एकाच कंपनीची मक्तेदारी फार काळ चालू शकत नाही स्पर्धक तयार होतातच. मागील वर्षी आदित्य बिर्ला समूहाच्या ग्रासिम इंडस्ट्रीजने बिर्ला ओपस पेंट्स या ब्रँडसह पेंट उद्योगात प्रवेश केला. त्या दिवसापासून एशियन पेंट्सच्या ८२ वर्षाच्या साम्राज्याला तडे जायला सुरुवात झाली. १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून बिर्लाने रंगाच्या क्षेत्रात खरी रंगत आणली आहे. या गुंतवणुकीमुळे भारतातील पेंट इंडस्ट्रीची क्षमता ४० टक्क्यांनी वाढणार आहे. रंगाची निर्मिती जास्त होणार म्हटल्यावर ते विकण्यासाठीची स्पर्धा तीव्र होणे अपेक्षित आहे. ही गुंतवणूक तीन वर्षात परत मिळवण्याचं ध्येय बिर्लांनी ठेवलं आहे. या व्यवसायात प्रमुख कंपन्यांनी बस्तान बसवलेले असताना देखील बिर्लासारख्या मोठ्या कंपनीला त्यात यावसं वाटण्याचं पहिलं कारण आहे या क्षेत्रात मागील वीस वर्षात झालेली ११.०७ टक्क्यांची संयुक्त वार्षिक वाढ. ती कायम राहील अशी शक्यता वर्तवली जाते. वाढतं शहरीकरण, विभक्त कुटुंबं, ग्राहकांचं वाढलेलं स्टेटस या सर्व गोष्टी वाढीव रंग विक्रीला कारणीभूत आहे. एका सर्व्हेनुसार पूर्वी सात ते आठ वर्षातून एकदा घराला रंग काढणारे ग्राहक आता चार ते पाच वर्षात नवा रंग लावताना दिसतात.
दुकानात रंग घ्यायला गेल्यावर चुना रंग (लाइम वॉश), ऑइल पेंट, डिस्टेंपर, एमल्शन पेंट, टेक्सचर्ड पेंट, एनॅमल पेंट, रॉयल पेंट्स, कस्टमाइज्ड किंवा म्युरल पेंट्स यापैकी कोणत्या प्रकारचा रंग हवा आहे हे दुकानदार विचारतो. भिंतीला चिकटल्यावर तिचा रंग आपल्या कपड्यांना लागत असेल तर तो चुन्याचा रंग आहे. आता फारसा तो वापरला जात नाही. प्रामुख्याने ऑइल पेंट, डिस्टेंपर आणि एमल्शन हे तीन प्रकार घरांना वापरले जातात. रंगाचा प्रकार नक्की केला की दुकानदार आपल्यासमोर दोन हजार शेड्सचं सॅम्पल पुस्तक ठेवतो. इतक्या विविध शेड्स दुकानात मावतात कशा? रंगांच्या दुकानात एक जादूई टिंटिंग मशीन असतं जे बेस पेंट आणि कलरंट्सना मिसळून हजारो शेड्स बनवत. बेस पेंट (न्यूट्रल किंवा व्हाईट पेंट) हा रंग तयार करण्याचा पाया असतो आणि कलरंट्स ही दाट रंगद्रव्ये म्हणजे पिग्मेंट्स त्यात मिसळून हवे तसे शेड बनवले जातात. ५ ते ७ बेस पेंट आणि १५ ते १७ कलरंट्स दुकानात ठेवले की दुकानदाराकडे रंगांचा महासागर निर्माण होतो. प्रत्येक कंपनीचं टिंटिंग मशीन वेगळं असतं. या मशीनचं आकारमान आणि किंमत जास्त असते. कमी जागा असलेल्या दुकानात जास्त कंपन्यांचे मशीन राहू शकत नाहीत. यामुळे रंगाच्या व्यवसायात नवीन कंपनीला मार्केटमध्ये स्थान मिळवणं कठीण असतं. सीएनबीसीच्या सर्वेनुसार एशियन पेंटचे देशभरात ७५ हजार टिंटिंग मशीन आहेत. एका टिंटिंग मशीनसाठी दुकानदाराला दीड ते तीन लाख रुपये खर्च येतो. रंग-व्यवसायात नवीन आलेल्या बिर्ला ओपस पेंट्सने हे मशीन फुकटात द्यायला सुरुवात केली. या दोन मोठ्या कंपनीच्या चढाओढीमध्ये कोणत्या कंपनीच्या चेहर्यावरचा रंग उडेल हे काळच ठरवेल. रंगाच्या व्यवसायात घराला कोणता रंग लावावा याचा सल्ला देणारे आर्किटेक्ट, इंटरियर डेकोरेटर, रंगाचे कॉन्ट्रॅक्टर आणि रंग दुकानदार हे महत्त्वाचे घटक आहेत. जी कंपनी या मधल्या साखळीला जास्त कमिशन देईल आणि रंगाची किंमत किफायतशीर ठेवेल, त्याचा रंग जास्त विकला जाईल हे नक्की.
घराला लागणारे रंग फॅक्टरीत बनवून ते विकणे हा मोठा खर्चिक मामला आहे. मराठी तरुणांना स्वयंरोजगार म्हणून या व्यवसायात येण्यासाठी रंगाचं दुकान सुरू करणं किंवा व्यावसायिक स्तरावर घरांचं रंगकाम हे कमी भांडवलाचं आणि जास्त सोयीस्कर आहे. रंग-दुकानासाठी जास्त रहदारीची जागा शोधायला हवी. दुकानाच्या परिसरात नवीन कन्स्ट्रक्शन सुरू असेल तर जम लवकर बसेल. शिवाय त्या भागातील ग्राहकांची गरज, स्पर्धा आणि मागणी समजून घ्यायला हवी. एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, नेरोलॅक अशा प्रमुख कंपनीचे रंग दुकानात हवेत. स्पर्धा करण्यासाठी योग्य किंमती ठेवावी. मार्केट ट्रेंड, नवीन उत्पादनांची माहिती ठेवावी. होर्डिंग्ज, फ्लायर्स आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकल प्रमोशन करायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक पेंटर आणि बिल्डर्सशी संपर्क असायलाच हवा. रिस्क घ्यायची नसेल तर दुकान सुरू करण्यापेक्षा रंगकाम सुरू करणे जास्त सोयीस्कर आहे.
घर रंगवण्यासाठी रंगांव्यतिरिक्त सँडपेपर, पुट्टी, रोलर, ब्रश, बकेट, मास्किंग टेप या बेसिक साधनांसाठी २,००० ते ५,००० रुपये लागतात. मोठ्या प्रमाणावर रंगाच्या कामासाठी कामासाठी १५,००० रुपये ते ५०,००० रुपये खर्च अपेक्षित आहे. परदेशात मजुरी दर जास्त असल्यामुळे तिथे घराला रंग देण्याच्या खर्चात रंगाचा खर्च फक्त १० टक्के असतो, परंतु भारतात तो ३० टक्के आहे. ७० टक्के खर्च मजुरीसाठी येतो.
घराला कोणता रंग द्यावा याबाबत ग्राहक विक्रेत्याकडे सल्ला मागतो. अशावेळी रंग माणसांवर काय प्रभाव टाकतात याची माहिती असणे उत्तम. घराला घरपण देणारे रंग भिंतींपुरते नसतात, ते घरातील भावनांचे, आठवणींचे आणि नात्यांचे रंग असतात, घरातल्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक होतात. ऊबदार पिवळा, शांत निळा, नेत्रसुखद हिरवा… प्रत्येक रंगाने घराला एक वेगळी ओळख मिळते.. या व्यवसायात करिअर करताना वितरण नेटवर्क, विक्रीकौशल्ये, आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. रंगाच्या कामासोबतच वॉलपेपर, कारपेट्स, विंडो ब्लाइंड्स आणि टेक्सचर फिनिशिंग या जोडधंद्याकडे लक्ष द्यायला हवे.
शहरीकरण वाढत असताना रंगाचा व्यवसाय अधिक वाढणार आहे. या क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तरुणांना करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात. २०२५ शेवटपर्यंत भारतातील रंगाच्या व्यवसायाचा आकार आज सुमारे ९० हजार कोटी रुपयांचा आहे आणि तो दरवर्षी १० टक्के वेगाने वाढतोय. स्वयंरोजगाराच्या वाहत्या रंगात हाथ धुण्याची हीच ती वेळ.