दुपारची वेळ. गावचा पार. पारावर वडाच्या झाडाला शर्ट अडकवून नाना उघडाबंब पालथा झोपला आहे. शबनम बॅग काखेत अडकवलेला बोरूधर त्यावर नाचून अंग चेपतो आहे. हा रोजचाच नित्यक्रम. तितक्यात वेशीपासून मोबाईल चोराच्या मागे पळत हुलचुके धापा टाकत पारापर्यंत येतो.
‘ओऽऽऽ पाव्हणे! या इकडं!’ बोरूधर हसून त्याला आवाज देतो. हुलकावणी देऊन चोर पाराच्या कुठल्या बाजूनं कुठल्या फाट्याला गेला? याची काहीही टोटल न लागलेला हुलचुके भांबावून जागच्या जागी उभा आहे. दम लागून जीव निघण्याच्या बेतात आहे. पण बोरूधरचा आवाज ऐकून किमान बसण्याला जागा मिळेल ह्या आशेने हुलचुके पाराकडे येतो. आणि बसतो.
‘तो चोर त्या पलीकडल्या श्टॉपवर यश्टीत बसून फरार झाला बगा. तुम्ही दोन मिनिटं उशिरा आले,’ नाना पालथ्यानंच माहिती देतो. धाप लागल्याने हुलचुके लोहाराच्या भात्यावानी फुफतोच आहे.
‘थोडं पाणी पेता का?’ बोरूधर मालिशच्या तेलाची बाटली पुढं सरकवत बोलतो.
‘अय येड्या! ते तेल आहे. तेबी मालिशचं! डोकं बिमार आहे का तुझं? त्यात माणसाला धाप लागलीय. जरा गार वारा पिऊन शांत होऊ दे. मग पाणी दे, पाहिजे तर…’ नाना बोरूधरवर खेकसतो तसा बोरूधर चपापतो आणि तेलाची बाटली खाली ठेवतो.
‘तुम्ही एवढं पाहिलं. मग त्याला अडवलं का नाही?’ हुलचुके नानाला सवाल घालतो.
‘ते होय? मी काढलंय शर्ट! त्याच्यात बोरूधरची चालू होती मालिश! तिकडून गंज तो पळत येताना दिसला, पण बिनशर्टाचं पळत त्या श्टॉपवर जायचं. तर तिथं बँकात जाणारा सगळा लेडीज बायांचा स्टाफ बससाठी उभा! ते बरं दिसत नाही ना? त्यांच्यासमोर उघड्यानं जाणं? आणि शर्ट घालून मग पाठलाग करावा तर तो शंभर टक्के पळताच. हाती न लागता. मग पळून उपयोग काय? त्याच्यात ह्या बोर्यानं टिळकाभर तेल पाठीवर वतलेलं. तसाच पळतो तर वघळ पँटीत शिरता. आता मागून तेलकट पँट त्या बायांत बरी दिसती का? सांगा तुम्हीच!’ नाना हुलचुकेला अक्षरशः निरुत्तर करतो.
‘त्याच्यात आमचे नाना लंबोदर! असली ढेरी बायांनी पाहिली असती तर…? हा आताच्या बाया बिनपदराचे कपडे घालित्या, पण समजा एखादी असतीच साडीवाली तर तिनं लाजून अख्खा पदर तोंडात घातला नसता का? डॉक्टरला ताण!’ बोरूधर हसून पदर जोडतो.
‘गेलाच म्हणायचा माझा मोबाईल. आता तेच्यात तुम्हाला दोष देऊन काय होईल म्हणा,’ हुलचुके निराश होत बोलतो.
‘कुठल्या कंपनीचा होता मोबाईल?’ नानाच्या नाना चौकश्या.
‘जावोमीचा! सहा महिने झाले हप्त्यावर घेतला होता,’ हुलचुके भरल्या कंठानं सांगतो.
‘पण अलीकडं जावोमीचे मोबाईल लैच चोरी जायला लागले नाही? गेल्या आठवड्यापासूनची ही तेरावी घटना. दरवेळी आम्ही ह्या पारावर अन् चोर पलीकडल्या श्टॉपवर. हे ठरलेलंच!’ बोरूधर डिटेलवार आकडेवारी देतो.
‘मग एखाद्या आठवड्यात वेळ साधून तुम्ही आधीच पलीकडल्या श्टॉपवर उभं राहायचं ना? तेवढाच चोर धरल्या जाईल?’ हुलचुके रास्त प्रश्न करतो.
‘हां, आम्ही तेपण करून पाहिलं. अगदी परवाच्याच दिवशी श्टॉपवर बोरूधर माझ्या डोक्याची मालिश करीत होता. त्यानं भडाभडा तेल वतलं. तव्हाच एक चोर-भामट्यासारखा एकजण श्टॉपवर आला, मी डोक्यावरला वघळ मानीवर यायच्या आत त्याची मानगूट पकडणार तोच चारदोन जणांनी त्याच्या गळ्यात माळा घातल्या. तव्हा कळालं तो मंगळसूत्र चोर नाही तर रुलिंग पार्टीचा मेंबर आहे म्हणून. मग काय? डबल डोकं झोडून घ्यायची वेळ माझ्यावर आली. तशी मी धास्तीच घेतली. पुरावे, निकष-अटी-शर्तीं आणि वरिष्ठ यांच्या मर्जीनंच जायचं! उगाच बालंट नको. काय?’ नाना हुलचुकेला पुन्हा निरुत्तर करतो. बोरूधर होकाराची मान बैलागत हलवतो.
‘पण इथली व्यवस्था एवढी भंगली आहे का? चोर-भामटे पार मेंबर होताय. राजरोस फिरताय आणि लोकांच्या चीजवस्तू सुरक्षित नाहीत?’ हुलचुके उद्विग्नतेतून बोलतो.
‘कोण म्हणलं व्यवस्था भंगलीय? कायदा कायद्याचं काम करतोय. व्यवस्था जागच्या जागी आहे. सगळं कसं ठीकठाक आहे. बोर्या जरा मानगुटीवर पाय दे रे!’ नाना व्यवस्थेला क्लीनचिट देत बोरूधरला आदेश देतो. तसा बोरूधर मानेवर नाचू लागतो.
‘तुम्ही चीजवस्तूचं बोलताय. इथं त्या डोंगरावरल्या कंपनीत दिवसा एक पोर कोयत्यानं कापून काढली. पण लोकांनी हूं का चुं केलं नाही. लोकं आपापल्या कामाला पुढल्याच मिनिटाला लागून गेली. काही झालं का नाहीच! पण तुमच्यासारखं अर्बन नक्षलिस्ट कुणी नव्हतं. व्यवस्थेवर बोट ठेवणारं! व्हायच्या घटना होतातच!’ बोरूधर व्यवस्थेला ढाल होतो.
‘पण व्यवस्थेचं काम आहे ना? ही गुन्हेगारी लोकं पकडायचं? ही गुन्हा करेपर्यंत मोकाट फिरतात कशी?’ हुलचुके चिडून प्रश्न करतो.
‘पण पाव्हणे गुन्हा घडल्याशिवाय गुन्हेगार शोधणार कसा ना? त्याच्यासाठी गुन्हा घडलाच पाहिजे. आता तो पोरीला मारणारा गुन्हेगार पण पकडलाच गेलाय ना? आधी काय म्हणून पकडायचा? धमकी दिल्याच्या गुन्ह्यात तर काही दम नसतो हो. आता अंगणातलं ढुंगणाला पँट नसलेलं पोर शेजारच्याला दम देतं, ‘नीट र्हाय, नाहीतर बुक्कीतच आउट करिन.’ आता त्या पण एफआयआर नोंदवायच्या का? सगळ्याला एक प्रोसिजर असते…’ नाना लाम्हण लावतो.
‘मग तोपर्यंत गुन्हे घडू द्यायचे का?’ हुलचुके फणकार्यानं विचारतो.
‘हे बघा. आमच्या इथं गुन्हे ढिगानं होत असतील. पण गुन्हेगार मात्र आमच्याकडं मोकाट सोडले जात नाहीत. २५ दिवस लागू दे नाहीतर २५ महिने! पकडणार म्हणजे पकडणार! फक्त त्यांचे बिर्याणीचे चोचले पुरवण्याऐवजी आम्ही त्यांना झटपट जामीन मिळवून देतो. काय खायचं ते स्वतःच्या पैश्याचं खा बाबा!’ नाना आपला स्टँड क्लिअर करतो.
‘पण मग गुन्हे कसे आटोक्यात येणार अश्यानं?’ हुलचुकेची रास्त शंका!
‘त्यासाठी गुन्हा घडला का बाबा आमच्या इथं समिती नेमली जाते. ती अगदी खोलात जाऊन अभ्यास करते. का बाबा असा गुन्हा घडलाच कसा? आणि गुन्हेगारानं तो केलाच कसा? एवढं डीपमधी अभ्यास करायचा तर डोकं काम करायला पाहिजे? म्हणून त्या कमिटीवरच्या पासष्टीपुढच्या रिटायर म्हातार्यांना आमच्याकडं काजू-बदामाचा खुराक द्यायची प्रथा आहे.’ बोरूधर शेपूट जोडतो.
‘त्या समित्या रिपोर्ट सादर करत असतील ना?’ हुलचुकेला एक छोटीशी आशा!
‘हां म्हणजे दर मिटिंगला डिशभर काजू बदाम मिळाले तर साधारण मिटींगा होतात. अश्या साडेत्रेपन्न कमिट्या काम करताय. काहींचे म्हातारे बदामाऐवजी पिस्ते पाहिजे म्हणून काम अर्ध्यात सोडून गेलेत. तिथं नवीन नेमले जातील. अशी राज्यभर कामं चालू आहेत,’ नाना माहिती देतो.
‘मग रिपोर्ट यायचे कधी?’ हुलचुकेची घोर शंका!
‘हां, ते येतात! एकवेळ म्हातार्यांचे डेथ सर्टिफिकेट आधी येईल,’ बोरूधर कुत्सित हसतो.
‘सगळा घोनाटाच आहे म्हणजे! बरं इथं कायदा-सुव्यवस्था कोण पाहतं? मी मोबाईलची रीतसर कम्प्लेन्टच करतो. मग बघू… ‘ हुलचुके न राहवून शेवटचा निर्णय घेतो, तसा नाना उताणा होतो.
‘हे काय? नाना! तेच कायदा कानून, सुव्यवस्था असलं सगळं बघतात!’ बोरूधर हसून माहिती पुरवतो.
‘काय? गुन्हा घडत असताना गप्प तमाशा बघणारे हे? मला यांच्यावर विश्वास नाही! इथं निर्भीड निष्पक्ष पत्रकार कोण आहे? मी यांच्या नाकर्तेपणावर त्यांना पानभर बातमीच छापायला सांगतो,’ हुलचुके रागाच्या भरात निर्धार जाहीर करतो.
उताणा झालेला नाना गालात मुलकत फक्त एवढंच म्हणतो. ‘हे काय? निर्भीडपणे माझी दरदिवस मालिश करणारे स्वतंत्र बाण्याचे बोरूधर! हेच ते!’
‘तुम्हीही इतके लाचार झालात? चक्क हातातल्या लेखण्या मोडून त्याच हातानं यांची मालिश करू लागलात?’ हुलचुके कीव येऊन बोरूधरला विचारतो.
‘जो पैका बोरूला धार लावून मिळाला नाही. तो लेखण्या विकून मिळाला. शिवाय दर मालिशचं इनाम वेगळं मिळतं. मग धरतीचा स्वर्ग करण्याच्या नादात मुकेशसारखा आयुष्याचा नरक कोण करील?’ बोरूधर निर्विकारपणे बोलतो.
तेवढ्यात उघड्या जीपड्यातून तलवारी बंदुका मिरवत एक हुल्लडबाजांची वरात जाते. नाना किंचित मान वर करून बघतो. बोरूधर चष्म्याच्या काचा पुसत बघतो. तर हुलचुके भयचकित मुद्रेने नाचवल्या जाणार्या तलवारी, हवेत निघालेले बार, त्याचं होणारं लाईव्ह शूट बघत रहातो.
‘तुम्ही यांनाही सोडून देणार का?’ हुलचुके हताशपणे विचारतो.
‘मुळीच नाही. कारवाई होणार! प्रत्येक दोषींवर होणार. कुणी कितीही मोठा असला तरी होणार. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.’ निर्ढावलेला नाना जांभई देत बोलतो.
‘अहो, पण ती ‘त्यां’ची गाडी होती. ते कॉलेजच्या पोरींचा पाठलाग करत होते…’ हुलचुके विषयाला वळण देतो.
‘हे मघाच नाही सांगायचं का? ये घे रे शर्ट! पुढल्या मिनिटाला यांचा जिहादच बाहेर काढतो. तरवारी-बंदुका मिरवता म्हणजे मोगलाई लागली का?’ बोलता बोलता ताडकन उठत नाना शर्ट अंगात घालतो. हातात काठी आणि कमरेला रिव्हॉल्व्हर अडकवतो. आणि निघू लागतो.
‘पण तुम्हाला कळलं कसं? ते ‘ते’ होते ते?’ बोरूधर हुलचुकेला शेवटची शंका विचारतो.
‘ते कोण होते? हे मला खरंच ठाऊक नाही. पण आरोपी इतरधर्मीय आहे म्हंटल्यावर नानानं जी तत्परता दाखवली, ती बघता इथली कायदा सुव्यवस्था सुधरवायची असंल तर एकतर आधी सार्या आरोपींचं धर्मपरिवर्तन करावं लागेल. म्हणजे झट्दिशी कारवाया होतील. नाहीतर नानाला बदलावं लागेल. हे दोनच उपाय मला दिसताय. बरोबर ना?’ हुलचुकेच्या तिरकस उत्तरावर नाना आणि बोरूधर निरुत्तर होतात.