मुंबईच्या क्रिकेटची कर्मभूमी असलेल्या वानखेडे स्टेडियमला पन्नास वर्षं पूर्ण होतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईची ओळख म्हणजे इथले क्रिकेटपटू, संघटक, तसेच हे स्टेडियम. या ऐतिहासिक क्षणी वानखेडे स्टेडियमनं आठवणीतले अनेक क्षण जिवंत केलेत, तसेच ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या भावना व्यक्त केल्यायत. पाहूया वानखेडे स्टेडियम काय बोलतंय…
– – –
आज आयुष्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना मी अत्यंत आनंदित आहे. वयाची पन्नाशी हा तसा तारुण्याच्या मावळतीचा आणि वार्धक्याच्या प्रारंभीचा एक टप्पा. एक कौटुंबिक परिपक्व अवस्था. जागतिक क्रिकेटमधील अनुभवांतून ही परिपक्वता माझ्यात आलीय. क्रिकेटविश्वात माझा दरारा आहे, तो मुंबई क्रिकेटनं मिळवून दिलाय. एखाद-दुसरं नव्हे, तर तब्बल ४२ विजेतेपदं मुंबईनं जिंकलीत. आंतरराष्ट्रीय क्षितिजावर देशाचं नाव गाजवणारे हे क्रिकेटपटू माझ्याच अंगाखांद्यावर खेळलेत. या मैदानावर त्यांनी झळकवलेली शतकं-अर्धशतकं, तर कधी साकारलेल्या बळींच्या पराक्रमाची क्रिकेटगाथा अजरामर झालीय. ती पुढे अनेक वर्षं नव्हे, अनेक युगं प्रेरणादायी ठरेल. त्यामुळेच हा क्षण माझ्यासाठी भावनिक आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननं (एमसीए) माझा पन्नाशीचा वाढदिवस ऐतिहासिक करण्यासाठी जय्यत तयारी केलीय. १९ जानेवारीला माझ्या साक्षीनंच माझ्यावर निस्सीम प्रेम करणारे ‘वानखेडेचे वानरवेडे’ म्हणजेच क्रिकेटरसिक आवर्जून हजेरी लावतील.
माझ्या सीमारेषेच्या पलीकडे एकीकडे सचिन तेंडुलकरचा प्रेरणादायी पुतळा उभा आहे. हे मैदान ‘सचिन… सचिन…’ अशा आरोळ्यांनी अनेकदा दुमदुमलंय, तोच तो अवलिया. तर एके ठिकाणी ‘एमसीए’चं बोधचिन्ह म्हणजे सोनेरी मुकुट परिधान केलेला सिंह, ज्याचा एक पंजा जेतेपदाच्या ढालीवर वर्चस्व दाखवतोय. हाच मुंबई क्रिकेटचा रुबाब. मुंबईच्या क्रिकेटमध्ये भिनलेला खडूसपणा हा काही सहजासहजी आलेला नाही. सचिन, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, संजय मांजरेकर, अजित वाडेकर, पॉली उम्रिगर, प्रवीण अमरे, अजित आगरकर, झहीर खान, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, पद्माकर शिवलकर, इत्यादी अनेक नामांकित क्रिकेटपटूंनी मुंबईची परंपरा जपलीय. पण आज या आनंदाच्या क्षणी मला माझी देखरेख राखणार्या ग्राऊंड्समनचे आभार मानायचेत. इतकी वर्षं अभिमानानं मी काढली आणि क्रिकेटवैभवाचे जे क्षण दिसू शकले, त्याचं खरं श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही उन्हातान्हाची तमा न बाळगता माझी खेळपट्टी उत्तम खेळण्यायोग्य कशी राहील, यासाठी जिवाचं रान केलं. सामन्यात पाऊस येतो, तेव्हा त्या झोडपणार्या पावसाची तमा न बाळगता तुम्ही संरक्षक आच्छादन टाकण्यासाठी धडपडता. कधी आक्रमक वेगवान गोलंदाजांचं, तर कधी फिरकीचं वळणदार यश, तर कधी फलंदाजीचं नंदनवन… हे सारे क्षण अनुभवण्यासाठी तुमचं योगदान हे माझ्या आयुष्यात सर्वात मोलाचं आहे.
माझं स्थान चर्चगेटला अगदी पश्चिम रेल्वेच्या स्थानकाशेजारचं. एका प्रेक्षागृहातून मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी लोकल ट्रेन दिसते, तर एका बाजूला थोड्याच अंतरावर रस्त्यावर ‘क्वीन्स नेकलेस’ असं बिरुद मिरवणारा मरीन लाइन्सचा समुद्र किनारा. एका प्रेक्षागृहातून मावळतीचा सूर्यसुद्धा आकाशात भगवे रंग उधळतो. एक ऐतिहासिक घड्याळसुद्धा तितकंच माझ्या वास्तुरचनेत भर घालणारं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (बीसीसीआय) मुख्यालयही २००७पासून या वास्तूत उभं आहे.
माझी यशोगाथा सर्वश्रुत आहे. पण माझी जन्मकथाही तितकीच रोचक. १९३०मध्ये मुंबई (त्यावेळी बॉम्बे) क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. परंतु चार दशकांहून अधिक काळ ‘एमसीए’कडे स्वत:ची जागा नव्हती. त्यामुळेच मुंबईतले सामने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियमवर व्हायचे. त्यावेळी राज्याच्या विधानसभेचे सभापती शेषराव वानखेडे हे ‘एमसीए’चे अध्यक्ष होते. बर्याचदा ‘एमसीए’ची सामन्यांसाठीच्या अधिक तिकिटांची मागणी ‘सीसीआय’कडून झिडकारली जाई. ब्रेबॉर्न स्टेडियमच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे सवलतीत तिकीटं दिली तर मोठा तोटा सहन करावा लागेल, असं ‘सीसीआय’चं आडमुठेपणाचं धोरण होतं. १९७३मध्ये ‘एमसीए’ आणि ‘सीसीआय’ यांच्यातील वादाची ठिणगी वणवा पसरवणारी ठरली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर आमदारांच्या मदतनिधीसाठी काही प्रदर्शनीय सामने खेळवण्याचा वानखेडे यांचा प्रस्ताव ‘सीसीआय’चे तत्कालीन अध्यक्ष विजय मर्चंट यांनी फेटाळून लावला. ‘सीसीआय’च्या या वर्तनामुळे वानखेडे यांचा स्वाभिमान दुखावला. मुंबई क्रिकेटला मिळणार्या वागणुकीला आधीच कंटाळलेल्या वानखेडे यांनी ‘सीसीआय’ला धडा शिकवण्याच्या निर्धारानं नवं स्टेडियम बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. मग ११ महिने आणि २३ दिवस अशा विक्रमी कालावधीत हे बांधकाम झालं आणि माझा जन्म झाला. म्हणूनच माझं नामकरणही ‘वानखेडे स्टेडियम’ करण्यात आलं.
२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेआधी माझा ‘मेकओव्हर’ करण्यात आला. या नूतनीकरणात प्रेक्षकसंख्या थोडी कमी झाली. शेषराव वानखेडे यांच्याप्रमाणेच डॉ. एच. डी. कांगा, माधव मंत्री, मनोहर जोशी, शरद पवार, विलासराव देशमुख असे ‘एमसीए’चे अनेक नामांकित अध्यक्ष होते. सध्याचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि सचिव अभय हडप यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी या प्रतिष्ठेत भर घालीत आहे.
अनेक ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदार राहिलोय. आज ते आठवताहेत. १९८४-८५च्या रणजी हंगामात रवी शास्त्रीनं बडोद्याविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले होते. मग १९८७चा रिलायन्स विश्वचषक चषक वेदनादायी ठरला. उपांत्य सामन्यात इंग्लंडनं आपल्या देशाची वाटचाल रोखली (एक सुस्कारा सोडला). २००२मध्ये इंग्लंडच्या अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफनं भारतावरील विजयाचा आनंद जर्सी काढून फडकावत साजरा केला होता. ते माझ्या जिव्हारी लागलं होतं. पण सौरव गांगुलीनं लॉर्डसवर त्याची परतफेड केली, तेव्हाच माझा क्रोधाग्नी शांत झाला.
मग २०११च्या विश्वचषकाचा अंतिम सामना. आनंदानं बेभान होऊन नाचण्याचाच जणू क्षण. कर्तबगार संघनायक महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वचषक जिंकला, तो क्षण आजही आठवला की मला अभिमान वाटतो. धोनीचा तो षटकार आजही जस्साच्या तसा पुन्हा पुन: मनोपटलावर ‘रिवाइंड’ होत असतो. तो चेंडू प्रेक्षागृहात ज्या आसनावर पडला, ते आसन ‘एमसीए’नं ऐतिहासिक ठेव्याप्रमाणे जपलंय. त्यानंतर २०१३मध्ये सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील तो अखेरचा सामना. त्याच्या निरोपाच्या भाषणाच्या वेळी मीसुद्धा ढसाढसा रडलो होतो. सचिननं मैदान सोडण्यापूर्वी मला वाकून नमस्कार केला होता. कारण क्रिकेटच्या या देवाचं पहिलं हास्य इथलंच. म्हणजे रणजी पदार्पणातलं पहिलं शतक. याशिवाय अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षणांचा मी जिवंत साक्षीदार आहे. २०२१मध्ये न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं भारताविरुद्ध एका डावात १० बळी घेण्याची किमया साधलेली.
तसंच सहा महिन्यांपूर्वी आणखी एक हेवा वाटणारा सुवर्णक्षण माझ्या वाट्याला आला. ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची मुंबईत विजयफेरी जल्लोषात काढण्यात आली आणि त्यानंतर या जगज्जेत्या शिलेदारांचा यथोचित सत्कार इथेच झाला. एके काळी भारतीय संघात मुंबईचे सहा-सात खेळाडू असायचे. हे सर्व मुंबई‘कर’ जुन्या गुणपत्रिका पाहिल्यावर सहज लक्ष वेधतात. कालांतरानं अन्य राज्यंसुद्धा क्रिकेटमध्ये बळकट झाल्यानं ही संख्या आता कमी झाली. पण तरीही मुंबईच्या क्रिकेटची मक्तेदारी संपलेली नाही. त्या ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या संघात रोहित, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे असे तीन मुंबईकर होते.
राजकारणाची इच्छाशक्ती किती प्रगल्भ असते, हे आपण अनेकदा अनुभवतो. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या वाट्याला येऊ शकतील असे अनेक महत्त्वाचे क्षण हिरावण्यात आले. माझं शल्य समजतंय ना? एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकाचा अंतिम सामना खरं तर माझ्याच साक्षीनं व्हायला हवा होता, पण तो अहमदाबादेत नेण्यात आला. मुंबईकरांना आणि मला वाईट वाटू नये, म्हणून उपांत्य सामना इथे ठेवण्याचा चाणाक्षपणा नक्कीच दाखवण्यात आला.
पण पन्नाशीच्या आयुष्यपटात काही दुखावणारे क्षण सोडले, तर असंख्य क्षण हे भारावणारे आहेत. त्यामुळेच माझ्या आनंदाला पारावार नाही. न मिळालेल्या काही क्षणांपेक्षा मिळालेल्या अनेक क्षणांच्या ठेव्यामुळे माझा जीवनप्रवास समृद्ध केलाय. त्यामुळेच मी समाधानी आहे.
अर्धशतक हा फक्त एक टप्पा आहे, पुढे शतक, द्विशतक, त्रिशतक… असे अनेक टप्पे गाठायचेत. मुंबईच्या वैभवशाली इतिहासाची पताका सदैव फडकत ठेवायचीय. खेळाडू घडवण्याचं कार्य चालूच राहील. मी उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही. सरतेशेवटी माझं आयुष्य प्रेरणादायी बनवणार्या क्रिकेटपटू, संघटक आणि चाहत्यांचे पुन्हा एकदा आभार!