आजच्या पिढीतल्या अनेकांना दादर टीटीमध्ये ब्रॉडवे नावाचं टॉकिज होतं हे माहीत असण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे गोष्ट सांगण्यापूर्वी ब्रॉडवे टॉकिज कुठे होतं ते सांगतो. दादर टीटीला ‘बाबुभाई जगजीवनदास’ हे कापडाचं प्रसिद्ध शोरूम ज्या इमारतीत आहे त्या ठिकाणी हे टॉकीज होतं. आता टॉकिज नाही, पण त्या इमारतीचं नाव ‘ब्रॉडवे शॉपिंग सेंटर’ असंच आहे. टॉकिजची शिल्लक असलेली नाममात्र खूण.
तर ही गोष्ट आहे १९३७ सालची. दादर टीटीला या टॉकिजचं बांधकाम चालू होतं. त्या काळातलं एक अत्याधुनिक टॉकिज म्हणून ते भविष्यात प्रसिद्धीला येणार होतं. साहजिकच त्याचं नावंही त्याला शोभेसं, भारदस्त असावं असं त्याच्या मालकांना वाटत होतं. पण ते काय असावं हे मात्र त्यांना सुचत नव्हतं. म्हणून त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी नवीन टॉकिजसाठी नाव सुचवण्याची स्पर्धा वर्तमानपत्रातून जाहीर केली. जी नावं सुचवली जातील त्यातली त्यांना आवडलेली निवडक नावं पुन्हा प्रसिद्ध केली जाणार होती व त्यावर सर्वसामान्य लोकांचं मतदान घेतलं जाणार होतं. ज्या नावास जास्त मतं मिळतील, ते नाव टॉकिजला दिलं जाणार होतं व ते नाव सुचविणार्यास सोन्याचं मनगटी घड्याळ बक्षीस मिळणार होतं.
लोकांनी जाहिरातीस उदंड प्रतिसाद देऊन टॉकिजसाठी अनेक नावं सुचवली. त्यातील तिवोली, मॉडेल, मॉडर्न, ब्रॉडवे, जवाहीर, पॅव्हेलिअन, दादर टॉकिज, न्यू सिनेमा, कॅसिनो, सिने-स्प्लेन्डिड, कलिम किनेमा, सोसायटी हॉल, गोल्ड टोन, स्काला, स्ट्रॅन्ड, कलोनिअल, आयडीयल सिनेमा, आयवन, ग्रॅन्ड, इंडिया आणि बेबी बायोस्कोप अशी २१ नावं त्यांनी निवडली आणि ती पुन्हा प्रसिद्ध केली व त्यातील एक जनतेने निवडावं असं आवाहन वर्तमानपत्रांतून केलं गेलं.
काही दिवस गेले. सुचवलेल्या नावांपैकी ‘ब्रॉडवे’ नावास जास्त लोकांची पसंती मिळाली व तेच नाव टॉकिजला दिलं गेलं. हे नाव ज्या कुणी सुचवलं त्याची माहिती मात्र मिळाली नाही. त्या व्यक्तीला जाहीर केल्याप्रमाणे सोन्याचं घड्याळही दिलं गेलं असावं. त्या काळातले लोक प्रामाणिक होते. दिल्या शब्दाला जागणारे होते. असो.
ब्रॉडवे नावाला केवळ जास्त लोकांनी पसंती दिली म्हणून निवडलं नाही, तर हे नाव त्या काळातल्या त्या रस्त्याचं यथार्थ वर्णन करणारं होतं म्हणूनही निवडलं. ‘ब्रॉडवे’ हा न्यूयॉर्क शहरातला थिएटर्ससाठी प्रसिद्ध असलेला रस्ता. दादरचं ब्रॉडवे ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर (पूर्वीचा ‘व्हिन्सेंन्ट रोड’ किंवा ‘किंग्स वे’) उभं होतं, त्या रस्त्यावर भायखळा ते दादर टीटी पर्यंतच्या साधारण दीड-दोन किलोमीटर्सच्या पट्टात एकून आठ टॉकिज उभी होती. पॅलेस, जयहिंद, भारतमाता (जुनं नांव ‘लक्ष्मी’), धरती (सूर्या), हिंदमाता, चित्रा, रस्त्याच्या काहीसं आतल्या बाजूला शारदा आणि नंतर हे ब्रॉडवे. न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेपेक्षा ही संख्या बरीच कमी होती, पण मुंबईसाठी मात्र बरीच होती.
तर, नवीन टॉकिजचं उद्घाटन शनिवार ९ ऑक्टोबर १९३७ रोजी होर्मसजी दिनशॉ यांच्या हस्ते केलं गेलं. या प्रसंगी फिरोजशा मेहता यांनी सुरु केलेल्या ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्राचे संपादक, भारतीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते बेंजामिन गाय उर्फ बी. जी. हॉर्निमन (फोर्टच्या हॉर्निमन सर्कलला यांचंच नाव दिलेलं आहे) उपस्थित होते.
उद्घाटनाच्या दिवशी टॉकिजमध्ये ‘गार्डन ऑफ अल्ला’ हा पहिला चित्रपट प्रदर्र्शित केला गेला, जो सर्व उपस्थितांना दाखवण्यात आला आणि टॉकिज खुलं झाल्याचं जाहीर करण्यात आलं..!
– नितीन साळुंखे