निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आली, आमच्या कोकणात गावागावाला पाच पाच लाख रुपये वाटले गेले म्हणे! साडीवाटप वेगळंच, घरटी पोहोचलेली पाकिटं वेगळीच; आपल्याला वाटायला एवढा पैसा राजकारण्यांकडे कुठून येतो, याचा विचार न करता मतं विकणार्या लोकांना राज्यकर्ते असे मिळाले म्हणून तक्रार करण्याचा हक्क आहे का?
– अंजली मालवणकर, रत्नागिरी
तुम्हाला पाकिट मिळालं नाही म्हणून तक्रार करताय का? पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मतदारांना पाकिटं पोहचली असतील, तर त्यापेक्षा जड जड पाकिटं ज्यांच्याकडे तक्रार करायची असते त्यांना पोहोचली नसतील? एवढा पैसा राजकारण्यांकडे कुठून येतो? याचा शोध ज्यांनी घ्यायचा, त्यांच्याकडे तर त्यापेक्षाही मोठी मोठी पाकिटं पोहोचली नसतील? (तुमच्यासारखेच लोक असे नको ते प्रश्न विचारतात… मग आमच्या मनात उत्तराऐवजी असे नको नको ते प्रश्न येतात? या प्रश्नातच तुमचं उत्तर सापडतंय का बघा… कारण आम्हाला तुमच्या प्रश्नावर कमेंट करायची नाही बाबा!)
आता यूपी-बिहारची माणसं एकमेकांमध्ये बोलताना आपल्या राज्याचा बीड करू नका, असं म्हणत असतील का हो?
– व्यंकट नरसे, नंदूरबार
त्यासाठी यूपी बिहारमध्ये सांगली-सातारा नसलं, तरी कराड असायला पाहिजे ना. म्हणायला काय कोणी काही म्हणू शकतो. पण कोणी किती काही म्हणालं तरी आत्याबाईला मिशा असल्या तर तिला काका म्हणू शकतात, पण ‘आका’ म्हणू शकत नाही. आणि आका बनायला यूपी बिहारवाल्यांसारखं नुसतं बंदुका असून भागत नाही. ‘सुदर्शन’ बाळगावं लागतं. त्यामुळे तुम्ही उगाच काही म्हणू नका. यूपी बिहारवाल्यांच्या काळजात अजिबात ‘धस’सुद्धा होणार नाही… कारण त्यांना मराठीच कळणार नाही…
पेट्रोल डिझेलचे भाव निम्म्यावर होते तेव्हा आणि रुपया आजच्याइतका घसरला नव्हता, मजबूत होता तेव्हा त्याच्यावर विनोद करणारे सेलिब्रिटी आता तोंडाला कुलूप लावून बिळात का लपून बसले आहेत?
– जुही शिरसेकर, मालाड
कुठल्याही सेलिब्रिटीला स्वत:हून विनोद करताना पाहिलंय का? त्यांना जे स्क्रिप्ट लिहून दिलं जातं तेच ते बोलतात. ‘तेव्हा’ अभिनेत्यांना स्क्रिप्ट लिहून देणारे आत्ता ‘नेत्यांना’ स्क्रिप्ट लिहून देण्यात बिझी असतील. आधीच्या स्क्रिप्टचा मोबदला सेलिब्रिटींना मिळाला असेल… अजून मिळतही असेल. आताच्या भाववाढीवर विनोद करायला सेलिब्रिटींना ज्यांनी स्क्रिप्ट द्यायला पाहिजे, त्यांच्याकडे सेलिब्रिटींचा मोबदला द्यायला पैसेच नसतील.
मध्य प्रदेशात भीक मागण्यावर बंदी घातल्यामुळे १६०० भिकारी नागपुरात पळून आलेत म्हणे; तुमची काय प्रतिक्रिया?
– विकास बोडके, लातूर
त्या सर्वांना रात्री लपत छपत सुरत-गुवाहाटी-गोवा असं करत नागपुरात आणायला हवं होतं का? किंवा त्यांचा एखाद्या पक्षात जाहीर पक्षप्रवेश करायला हवा होता का? किंवा वाजत गाजत, हवेत बंदुकीच्या फैरी झाडत, मिरवणुकीने नागपुरात आणायला हवं होतं का? आमची प्रतिक्रिया कसली बोडक्याची विचारताय बोडके? हा ‘अमृताहुनी गोड काल’ आहे. जिथे एक्सपर्टना त्यांची प्रतिक्रिया विचारली जात नाही… तिथे आमच्या प्रतिक्रियेला धूप काय, कोळसा लावून पण कोणी विचारणार नाही.
कर्मचार्यांनी रविवारी पण काम करावं, बायकोच्या तोंडाकडे किती काळ बघत बसणार, असं एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याचं मत आहे. तुम्ही काय करता… रविवारी?
– मोनिका पेठे, डोंबिवली
अहो ताई, त्या अधिकार्याला त्याच्या बायकोने ‘तुमचं तोंड रविवारी सुद्धा दाखवू नका’ असं सांगितलं असेल… किंवा असेही असेल की, त्याच्या कर्मचार्यांपैकी एखादं ‘सुंदर तोंड’ त्याला रविवारी सुद्धा बघावंस वाटत असेल… बिच्चारा कोणाला सांगू शकत नसेल… आमचं म्हणाल तर, आम्ही रविवारी नाट्यरसिकांची सुंदर हसरी तोंडं पाहतो आणि घरी येऊन बायकोला आमचं मेकअप काढलेलं तोंड दाखवतो… (आठवड्याचे सातही दिवस…) हे तोंड घेऊन दुसरीकडे जाणार कुठे आम्ही?
राज्यात खून, दरोडे, बीडसारख्या ठिकाणी अनाचार, अनागोंदी, सगळी प्रशासन व्यवस्था, कायदे सुव्यवस्था सडलेली असणं… हे सगळं उघड होत असताना एकही विरोधी पक्ष राज्याच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही, यामध्ये काय गौडबंगाल असावं?
– राकेश पाटील, धाराशिव
सार्यांनाच एकमेकांची गौडबंगालं माहीत असतील… वा एकमेकांनी एकमेकांवर ‘गौड बंगाली’ जादू केली असेल… किंवा जीव गेला (कोणाचाही) तरी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत, हे विरोधी नेत्यांना माहीत असेल… (असं आम्हाला वाटतं… ते सुद्धा तुम्ही विचारलंत म्हणून, नाही तर जिथे विरोधी नेते बोलत नाहीत, तिथे आम्ही बोलल्याने उगाच गृहमंत्री पटकन राजीनामा द्यायचे… आणि ‘हे काय गौडबंगाल आहे?’ असा तुमच्यासारखे विचार करायचे!