हे मुखपृष्ठचित्र आहे १० नोव्हेंबर १९६८ रोजीच्या अंकावरचं. एस. निजलिंगप्पा हे कर्नाटकातले काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री आणि हे व्यंगचित्र बाळासाहेबांनी रेखाटलं तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. देशाची भाषावार प्रांतरचना करताना मैसूर संस्थानाचं विलिनीकरण करून कर्नाटक राज्याची रचना करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यात त्यांनी बेळगाव, कारवार हा मराठीबहुल प्रांत बळकावला होताच. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसल्यावर मात्र त्यांच्या लक्षात आलं की भाषिक, प्रादेशिक अस्मिता केंद्र सरकारच्या एकचालकानुवर्ती रेट्याच्या आड येतात, संघराज्य पद्धतीमुळे केंद्राला आपला अजेंडा रेटता येत नाही. त्यांनी लगेचच भाषिक राज्यांमुळे देश दुभंगण्याची शक्यता आहे, असा कांगावा करून सगळ्या देशात एकच सरकार असावं, अशी योजना मांडली. म्हणून बाळासाहेबांनी निजलिंगप्पांना मांजराच्या रूपात दाखवून आता या मांजरीला हज आठवते आहे, अशी मार्मिक टिप्पणी केली होती… आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेत्यांनाही याच पद्धतीने एक देश, एक निवडणूक, वगैरे स्वप्नं पडायला लागली आहेत, ती याच हुकुमशाही वृत्तीमुळे. भारतासारख्या देशात संघराज्य पद्धती असेल, तोवरच लोकशाही टिकेल, ही खूणगाठ बांधली पाहिजे. एकाच पक्षाच्या, एका व्यक्तीच्या हातात सत्ता एकवटली की त्याला अशीच सर्वशक्तिमान बनायची स्वप्नं पडायला लागतात, हे विसरता कामा नये. कोणत्याही मांजरीला सोकावू देता कामा नये, हेच खरं.