□ पाश्चिमात्य देशांप्रमाणे आपल्या देशात शास्त्रज्ञांच्या कार्याचा योग्य गौरव झाला नाही, म्हणून एक मोठा वर्ग विज्ञानाच्या बाबतीत उदासीन राहिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ आणि त्या वर्गाने राज्यकर्ते निवडले तेही गटारातून गॅस काढणारे आणि ढगांआडून रडारला चकवणारे!
□ विदेशी टी शर्टवर राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका.
■ ‘मेक इन इंडिया’चे नारे देऊन विदेशी घड्याळं, गॉगल, गाड्या वापरणार्या आणि फकीर आहोत असं सांगून पंचतारांकित मौज करणार्या पंतप्रधानांचा आदर्श घेतला असणार राहुल यांनी!
□ राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, एक कार्यक्रमाला जातील, दुसरे मंत्रालयात : सुप्रिया सुळे.
■ अहो ताई, हे नावाचेच मुख्यमंत्री आहेत, त्यांचं खरं पद उत्सवमंत्री हेच आहे… खरी महाशक्ती कोणाकडे आहे, ते सत्तावर्तुळात सगळ्यांनाच माहिती आहे.
□ ठाण्यात वाचनालयाच्या नावाखाली फक्त टपरी उभारली, १५ लाख रुपयांची उधळपट्टी.
■ संबंधितांनी ‘चनालय’ (चणे फुटाण्यांची टपरी) असं वाचलंय की काय चुकून!
□ मालासह ट्रक पळवणारे ११ दरोडेखोर भिवंडीत गजाआड.
■ चिन्ह आणि नावासह पक्ष पळवून नेऊ पाहणारे अलीबाबा आणि ४० चोर यांनी ही बातमी पाहून ठेवावी.
□ गुलामगिरीचे प्रतीक असलेला राजपथ इतिहासजमा झाला आणि आता कर्तव्यपथ तयार झाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ अशी लोकार्पणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करायची असतात, या प्राथमिक कर्तव्याचा विसर पडलेल्या आणि स्वत:ला राजा समजू लागलेल्या मोदींनी इतरांना कर्तव्य शिकवावं!
□ नवनीत राणा यांची लव्ह जिहादची थियरी बोगस निघाली, घरच्यांना कंटाळूनच मुलगी पळाली…
■ या आहेत म्हटल्यावर काही ना काही बोगसगिरी असणार, हे आता वेगळं सांगायची गरज पडत नाही. सिर्फ नाम ही काफी है.
□ पश्चिम बंगालमध्ये सलग १०० दिवस झोपून तरुणीने पटकावला पाच लाख रुपयांचा पुरस्कार.
■ राज्य सरकारांसाठी असा झोपा काढण्याचा पुरस्कार ठेवा, आपले ईडी सरकार तो नक्की पटकावेल!
□ बेंगळुरूमधील पूरस्थिती हे काँग्रेसचे पाप : मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप.
■ नशीब टिपू सुलतानाला दोष नाही दिलात! जनाची नाही, मनाची तरी बाळगा आणि सतत कुणाकडे तरी बोटं दाखवणं थांबवा!
□ लादेनसारखे याकूब मेमनला समुद्रात का गाडले नाही? आदित्य ठाकरे यांचा भारतीय जनता पक्षाला सवाल.
■ तसे केले असते तर आपल्या सोयीने गाडलेली भुते बाहेर काढून नाचवता आली असती का आदित्यजी!
□ हिंदू हे अव्वल भोंदू, दूध देते तोवर गाय बाळगतात, नंतर तिला बाहेर काढतात : गुजरातच्या राज्यपालांचे वादग्रस्त उद्गार.
■ भाजपची भाडोत्री ट्रोल गँग आता यांचं पाकिस्तानचं तिकीट कधी काढून देणार?
□ ब्रह्मास्त्रची पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई.
■ मोडकळीला आलेल्या फांद्यांवर बसून पराक्रम गाजवल्याच्या बाता मारणार्या बहिष्कारी कावळ्यांचा पंचरंगी पोपट झाला तर!
□ सरकारने भाजपमधल्या भ्रष्टाचारी लोकांवरही छापे घालावेत : मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा घरचा आहेर.
■ तसं झालं असतं तर पक्षोपक्षीच्या भयभीतांनी भाजपा वॉशिंग मशीनमध्ये स्वेच्छेने उड्या मारल्या असत्या का?
□ कम्युनिस्टविरोधक रॅमन मॅगसेसे यांच्या नावाचा पुरस्कार घ्यायचा नाही या कम्युनिस्ट पक्षाच्या फतव्यामुळे कोरोनाकाळात उत्तम कामगिरी केलेल्या केरळच्या माजी आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी हा पुरस्कार नाकारला.
■ ही लालभाईंची नतद्रष्ट पोथीनिष्ठा आड आली नसती, तर ज्योती बसूंसारखा पंतप्रधान देशाला लाभला असता आणि देशाला वेगळी दिशाही मिळाली असती.
□ पुण्यातील गणेशोत्सवात जपानी तरुणीने मराठी गाणे गायले…
■ त्यामुळे कोरियन गाण्यांनी वेडे केलेल्या काही मराठी मुलांना आपल्या भाषेतही गाणी असतात, हे कळलं असेल कदाचित!