रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा सुपरहिट होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही हे संपादकीय वाचत असाल तेव्हा त्या सिनेमाच्या कमाईचा आकडा २०० कोटी रुपये झाला असेल. ‘मार्मिक’च्या संपादकीयात दखल घ्यावी, इतके हे यश मोलाचे का आहे? पहिले कारण म्हणजे कोरोनाकाळ उलटल्यापासून हिंदी चित्रपटसृष्टीला पहिला मोठा हिट ब्रह्मास्त्रच्या रूपाने मिळाल्याने या चित्रपटसृष्टीशी संबंधित सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. ही चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या राजधानीत आहे आणि ती कलावंतांपासून कामगार-तंत्रज्ञांपर्यंत हजारो मराठीजनांचीही घरे चालवते, हे लक्षात घ्यायला हवे.
मात्र, ‘ब्रह्मास्त्र’चे यश साजरे करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या सिनेमाने बॉयकॉट गँगचे थोबाड फोडले. हिंदी सिनेमा आता रसातळाला गेला आहे, दक्षिण भारतीय सिनेमानेच सगळा भारत पादाक्रांत केला आहे, अशी आवई आधी उठवण्यात आली. त्याला ‘आरआरआर’, ‘केजीएफ-२’, ‘पुष्पा’, ‘विक्रम’ आदी सिनेमांच्या सणसणीत यशाची पार्श्वभूमी होतीच. मात्र, त्या यशाचे सिनेमाकलेच्या किंवा व्यवसायाच्या अंगाने विश्लेषण केले जात नव्हते. हिंदी सिनेमात घराणेशाही आहे, इथले कलावंत सतत हिंदू धर्माचा अपमान करत असतात, त्यांना हिंदूंनी एक होऊन धडा शिकवला पाहिजे, अशी ही ‘वळवळ’ होती. रणबीर सिंगने आपल्याला ‘रेड मीट’ (लाल मांस- ते बकर्याचे असू शकते किंवा कोणत्याही अन्य प्राण्याचे) आवडते, असे विधान ११ वर्षांपूर्वी केले होते. त्या आधारावर आता त्याला हिंदुद्वेष्टा ठरवून बहिष्कार जाहीर केला गेला आणि त्याला उज्जैनच्या मंदिरातही मज्जाव केला गेला. केरळमध्ये हिंदू सर्वाहारी आहेत. बंगालचे ब्राह्मण ताटात मासे नसतील तर जेवणार नाहीत. या सगळ्यांना हिंदू धर्माचा अपमान करणार म्हणून बहिष्कृत करणार का? त्यांना बहिष्कृत करण्याचा अधिकार उत्तर भारतातल्या काही मागासबुद्धी टाळक्यांना कोणी दिला? ज्या काश्मीर फाइल्स या एकांगी सिनेमाला ही गँग डोक्यावर घेऊन नाचत होती, त्या सिनेमाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने तर थेट आपल्या आवडत्या ‘बीफ’ डिश कोणत्या, हे ट्विटरवर सांगितले आहे. त्याच्या सिनेमावर बहिष्कार कसा नाही आला?
आपण अमक्या जातीत जन्मलो म्हणजे आपली काहीही कर्तबगारी नसतानाही आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असं ज्या सनातन्यांना वाटतं, त्यांना सिनेमातल्या घराणेशाहीबद्दल बोलण्याचा काही हक्क आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा गांधी घराण्याच्या घराणेशाहीबद्दल भाषण ठोकत असतात, तेव्हा त्यांच्या किंवा ऐकणार्यांच्या नजरेसमोरून जय अमित शहा यांचा चेहरा तरळून जात नसेल का? हातात बॅटही न धरता हे गोंडस बाळ बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कोणत्या गुणांवर पोहोचलं आहे?
मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टी कायमच सर्वसमावेशक, उदार राहिली आहे, ही जीवनदृष्टी मुंबईला मराठी माणसांनी दिली आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इथे मराठी अस्मिता चेतवली, महाराष्ट्रात मराठी माणसाला डावलता येणार नाही, हेही ठणकावून सांगितले. मात्र, त्याचवेळी मुंबई हे महानगर कॉस्मोपोलिटन आहे, हाच ‘मिनी इंडिया’ आहे, इथले हे वैविध्य जोपासले पाहिजे, हेही त्यांनी ओळखले आणि जपले. शिवसेनेनेही जपलेली ही सर्वसमावेशकताच या बहिष्कारपटूंना खुपते आहे, तेच त्यांचे खरे दुखणे आहे. आमीर खानच्या ‘लालसिंग चढ्ढा’ या सिनेमाचे पतन आपल्याच बहिष्कारामुळे झाले, अशा भ्रमात असलेल्या या गँगवर अखेर हिंदी चित्रपटसृष्टीचे ब्रह्मास्त्र चालले आणि ते उताणे पडले, ही आनंदाचीच गोष्ट आहे.
त्याचबरोबर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दक्षिणेतून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवते आहे, तेही दिलासादायक आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या इशार्यावर चालणार्या गोदी मीडियाने या यात्रेवर जणू बहिष्कार घातला आहे. कुठे राहुल यांच्या टी शर्टची किंमत मोज, कुठे एसी कंटेनर का, असले बालिश सवाल कर, असले फुसके बार फोडून ते बिचारे स्वत:चे हसे करून घेत आहेत. पण, सोशल मीडियावर राहुल यांचीच हवा आहे. भारतीय जनता पक्षाने याचा धसका घेतला आहे. अमित शाह एका सभेत म्हणाले, राहुल बाबा, तुम्ही इतिहासाची कोणती पुस्तके वाचली. या देशासाठी लाखो लोकांनी रक्त सांडले आहे. अमितभाई हे विसरले की राहुल यांच्या वडिलांनी आणि आजीनेही या देशासाठी रक्त सांडले आहे. तुम्ही त्यांना काय शिकवताय? आणि कोणत्या तोंडाने? स्वातंत्र्याच्या लढ्यात जेव्हा सर्वसामान्य नागरिकही रक्त सांडत होते, तेव्हा तुमची विचारधारा ब्रिटिशांची चाकरी करत होती, त्यांच्यासाठी गुप्तहेरगिरी करत होती.
राहुल यांच्याकडून बोलताना अनवधानाने झालेल्या गफलती असोत किंवा त्यांच्या तथाकथित महागड्या टी शर्टवरून वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न असो; ही ब्रह्मास्त्रे बुमरँग होऊन भाजपच्याच तोंडावर आपटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून निघालेल्या मौक्तिकांच्या माळा भाजपच्या गळ्यात घातल्या गेल्या आणि त्यांच्या महागड्या पंचतारांकित राहणीमानाचा खर्च कोण करते, याचीही विचारणा झाली.
महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतही अशाच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. भाजपने कितीही कोंबडे झाकून ठेवले तरी देशातल्या तरुणाईचा त्या पक्षाने फार मोठा अपेक्षाभंग केला आहे, या सत्याचा सूर्य काही उगवायचा राहिलेला नाही. आज राहुल, आदित्य यांच्याकडे ही पिढी आशेने पाहते आहे. इकडून तिकडून कचरा गोळा करून फुगलेल्या महाशक्तीच्या बेडकीचा ढोल तरुणाईच्या ब्रह्मास्त्रानेच फुटणार आहे.