योगेशची आई स्वाती हिचं नवर्याशी पटत नव्हतं. तिला छानछोकीचं आयुष्य हवं होतं आणि नवरा पैसे असूनही फार खर्च करण्याच्या प्रवृत्तीचा नव्हता. त्यातून सावत्र मुलगा असलेल्या योगेशवर स्वातीचा आधीपासून राग होता. म्हणूनच तिनं भाऊ संदीपच्या मदतीनं मुलाच्या अपहरणाची आणि त्यासाठी नवर्याकडूनच पैसे उकळण्याची योजना आखली होती. आधी पाच लाख सांगून निदान पन्नास हजार तरी वसूल करू, असं सांगून त्यांनी शिरभातेंकडून तेवढी रक्कम उकळली. पण डाव फसला.
– – –
नववीत असलेला योगेश हा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन त्याचे आईवडील पोलीस स्टेशनला आले आणि दुपारनंतर काहीशा शांत झालेल्या पोलीस स्टेशनमध्ये हालचालींना वेग आला.
“कधीपासून घरी आला नाहीये तुमचा मुलगा?“ इन्स्पेक्टर मिरजकरांनी चौकशी केली.
“तीन दिवस झाले साहेब.“
“तीन दिवस?“ मिरजकर जवळपास ओरडलेच. “तुमचा मुलगा बेपत्ता आहे आणि तुम्ही तीन दिवसांनी आमच्याकडे येताय? का? एवढा वेळ का घालवलात मध्ये?“
“साहेब, आधी दोन दिवस आम्ही सगळ्या नातेवाईकांकडे शोध घेतला. त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. तो परत येईल, असं वाटलं होतं, पण आला नाही, म्हणून इथे आलो,“ योगेशचे वडील प्रभाकर शिरभाते यांनी उत्तर दिलं. त्याची आई स्वाती तर घाबरूनच गेली होती. दरम्यान त्या दोघांमध्येही काही बोलाचाली सुरू होती.
“तरी तुम्हाला सांगत होते, नसते खेळ करू नका. आधी पोलिसांकडे जाऊया. पण तुम्ही ऐकलं नाहीत. आता काय करायचं?“ आईनं मध्येच वडिलांवर चिडचिड केली. मिरजकरांना या दोघांच्या वागण्या-बोलण्यावरून वेगळंच काहीतरी जाणवत होतं. ते दोघं काहीतरी लपवत आहेत, हे लक्षात येत होतं.
“हे बघा, आमच्याकडून मदत हवी असेल, तर सगळं स्पष्ट आणि खरं सांगावं लागेल. काही दडवलेलं आम्हाला नंतर कळलं, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत,“ त्यांनी थोडं पोलिसी खाक्यात दरडावल्यानंतर शिरभाते रुळावर आले.
“साहेब, थोडंसं आमच्या चुकीमुळेच प्रकरण चिघळलंय,“ त्यांनी कबूल केलं.
“नक्की काय झालंय, ते पहिल्यापासून स्पष्ट आणि नीट सांगा,“ असा दम मिळाल्यावर शिरभातेंनी घडलेला प्रकार प्रामाणिकपणे सांगायला सुरुवात केली.
शिरभातेंचा मुलगा योगेश हा शाळेतून स्कूलबसने यायचा. त्या दिवशी शाळेतून यायची वेळ झाली तरी तो आला नाही, म्हणून त्याच्या आईने बस ड्रायव्हरना फोन केला, तर त्यांनी योगेशला नेहमीच्या स्टॉपला घराजवळ सोडल्याचं सांगितलं. तिथूनच योगेश गायब झाला होता. दोन मुलं तिथे उतरायची, त्यातला दुसरा घरी गेला, योगेश मात्र घरी आलाच नाही. योगेशचा बराच वेळ पत्ता लागेना, तेव्हा मात्र आईवडील हैराण झाले. त्यांनी सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली. कुठूनही त्याच्याविषयी काहीच माहिती मिळाली नाही. शेवटी संध्याकाळी एक निनावी फोन आला. पलीकडून बोलणार्या माणसाने योगेशला ताब्यात घेतल्याचं सांगितलं. त्यासाठी खंडणीची मागणीही केली. आता मात्र शिरभाते दांपत्याची पाचावर धारण बसली.
“म्हणजे तुमच्या मुलाला किडनॅप केल्याचं तुम्हाला पहिल्या दिवशीच समजलं होतं तर!“ मिरजकर म्हणाले. शिरभातेंनी मान खाली घालून होकार दिला.
“तरीही तुम्ही आज तीन दिवसांनी आमच्याकडे आलात. अजूनही तुम्ही काहीतरी लपवताय. सगळं सत्य सांगितलं नाहीये तुम्ही,“ मिरजकरांनी दरडावलं, तेव्हा शिरभातेंच्या चेहर्यावर पुन्हा भीतीची छाया पसरली.
“त्यांनी पाच लाखाची खंडणी मागितली होती, साहेब. त्यांना पन्नास हजार रुपये देऊनही टाकले. तरीही योगेश घरी आला नाही, म्हणून….“ ते बोलता बोलता गप्प झाले.
“वा. म्हणजे आधी तुम्ही परस्पर तडजोड करण्याचा प्रयत्न केलात, तिथे काहीच होईना, तेव्हा नाइलाज म्हणून पोलिसांकडे आलात, असंच ना?“ मिरजकर आता चिडलेच होते. शिरभातेंना अश्रू अनावर झाले होते. आपलं चुकलं, मुलाच्या प्रेमापोटी त्या माणसांवर विश्वास ठेवला, पण यापुढे असं करणार नाही, आमच्या मुलाला वाचवा, अशी गयावया करायला लागले. मिरजकरांनी त्यांना धीर दिला.
पहिली रक्कम कुठे ठेवली, त्यांनी काय सूचना दिल्या होत्या, हे सगळं शिरभातेंनी पोलिसांना सांगितलं. मिरजकरांनी शिरभातेंना ज्या नंबरवरून कॉल्स आले ते नंबर्सही घेतले, पण त्यातून हाती काहीच लागणार नाही, याची त्यांना कल्पना होती. अपहरण करणारी माणसं हे नंबर जास्त काळ ठेवत नाहीत, असा त्यांचा अनुभव होता.
खंडणी मागणार्यांनी आधी पाच लाख मागितले, मग पहिला हप्ता म्हणून पन्नास हजार सांगितले, ही बाबही मिरजकरांना कुठेतरी खटकत होती. अपहरण करणारे अगदीच नवखे असावेत, असाही अंदाज त्यांनी बांधला.
योगेश नक्की सापडेल, असा दिलासा देऊन मिरजकरांनी त्या दोघांना घरी पाठवून दिलं आणि तपासाला सुरुवात केली. योगेश घराजवळच्या स्टॉपवर उतरून नक्की कुठे गेला, हाच प्रश्न होता. त्याचा नेहमीचा रस्ता होता आणि ओळखीचा परिसर होता. इथून त्याला जबरदस्तीने कुणी उचलून घेऊन जाईल, अशी शक्यता नव्हती. त्या अर्थी त्याला कुणीतरी फूस लावून किंवा खोटंनाटं काही सांगून घेऊन गेलं असावं, अशीच शक्यता दिसत होती.
पोलिसांनी आजूबाजूची दुकानं, फेरीवाले, नागरिक यांच्याकडे चौकशी सुरू केली, पण कुणीच योगेशला घरी जाताना किंवा कुणाबरोबर दुसरीकडे जाताना पाहिलेलं नव्हतं. नववीत शिकणार्या योगेशकडे मोबाईल फोन असण्याचाही संबंध नव्हता.
कधीकधी योगेश त्याच्या संदीपमामाबरोबर शाळेतून परस्पर बाहेर जातो, अशी माहिती आईवडिलांच्या बोलण्यातून आली होती. या संदीपमामालाही विचारण्याची गरज होती. मिरजकरांनी त्याला पोलीस स्टेशनलाच बोलावून घेतलं.
“योगेश घरी आला नाहीये, हे मला तीन दिवस कुणी सांगितलंच नाही, साहेब. कसंही करा, पण माझ्या बबड्याला शोधा. फार जीव आहे माझा त्याच्यावर!“ संदीप जगदाळे पोलीस स्टेशनला आल्या आल्या रडायला लागला.
“योगेशला शोधून काढण्यासाठी तुमचीही मदत लागणारेय. त्याला शेवटचं कधी भेटला होतात, तेव्हा तो काही वेगळं बोलला होता का, त्याच्या बोलण्यातून कुणाबद्दल काही संशय घेण्यासारखं जाणवलं होतं का,“ असे प्रश्न मिरजकरांनी विचारले. संदीपला तसं काहीच जाणवलं नव्हतं. योगेश अगदी लहान असल्यापासून त्याची या मामाशी गट्टी होती. संदीप याच शहरात भाड्याने राहायचा.
“मी बबड्याला शाळेतून कधीकधी बाहेर जेवायला, आईस्क्रीम खायलाही घेऊन जायचो साहेब. तसं ताईला नंतर फोन करून कळवायचो. पण आठ दिवस मीच कामासाठी बाहेर होतो, बबड्याशी माझी भेटच झालेली नाही,“ त्यानं सांगितलं. योगेशच्या आईच्या बोलण्यातूनही हेच आलं होतं. पोलिसांच्या तपासाची चाकं पुन्हा त्याच जागी येऊन रुतली.
अपहरण करणार्यांकडून दोन दिवसांत पुन्हा फोनही आला नव्हता. पन्नास हजार रुपये घेऊन ते गप्प कसे बसले, की डाव फसला म्हणून त्यांनी योगेशचं काही बरंवाईट… मिरजकरांनी मनात आलेली कल्पना झटकून टाकली. या मुलाला सोडवायचं आणि सुखरूप घरी पोहोचवायचं, हेच आता त्यांच्यासमोरचं आव्हान होतं.
तंत्रज्ञानाच्या आधाराने काही शोध लागत नाही, तेव्हा माणसांच्या नेटवर्कवर विश्वास ठेवायचा, हे तंत्र मिरजकरांनी पहिल्यापासून पाळलं होतं. यावेळीही त्यांनी याच पद्धतीचा उपयोग करायचं ठरवलं.
—
दुसर्या दिवशी सकाळीच शिरभातेंच्या शेजारीच राहणार्या पाटील मावशींच्या घराची बेल वाजली आणि त्यांनी दार उघडलं.
“मावशी, अहो तुमच्याकडं लई भारी साड्या मिळतात, असं कानावर आलं, म्हणून आलते. आहेत का साड्या?“ दारात उभी असलेली, साधारण तिशीची, तरतरीत बाई म्हणाली.
“हायंत की गं. तुझं नाव काय? कुठनं आलीस? आन् माझ्याबद्दल कुठनं ऐकलंस?“ पाटील मावशी खुशीत आल्या.
“अहो हितं ढमाले वस्तीतच राहते मी. ऊर्मिला गायतोंडे नाव माझं,“ असं म्हणून तिने स्वत:ची ओळख करून दिली.
“तुमच्या साड्यांबद्दल लई बायकांकडनं ऐकलं होतं. कुठनं कुठनं शोधून निवडून आणता म्हणे तुम्ही साड्या. म्हनलं आज वेळ काढून जावंच!“ ऊर्मिलानं असं सांगितल्यावर पाटील मावशींनी लगेच साड्यांचा ढिगारा काढला. उर्मिलानं साड्या बघता बघता गप्पांना सुरुवात केली.
“तुमच्या साड्या येवढ्या फेमस हायत, तर शेजारीपाजारी बी घेत असतील ना! लांब जावंच लागत नसंल तुम्हाला!“ ती म्हणाली.
“घेत्यात, पण काही बायका असतात नाकं मुरडणार्या. ही आमची शेजारीण स्वाती त्यातलीच की!“
स्वाती म्हटल्यावर ऊर्मिलाचे कान टवकारले. तिनं पाटील मावशींची स्तुती करत त्यांच्याकडून बरीच माहिती काढून घेतली. स्वाती, म्हणजे योगेशची आई ही स्वभावानं कशी कंजूष आहे, स्वतःला छानछोकीत राहायला आवडतं, पण शेजार्यांना मदत म्हणून एक वस्तू त्यांच्याकडून कधी घेणार नाही. सतत नवर्याशी भांडते, मुलाचाही राग करते, हे कानावर आल्यावर मात्र ऊर्मिला थबकली.
“मुलाचा राग करते म्हणजे?“ तिनं विचारलं. तशी पाटील मावशींनी आणखी खाजगी आवाज काढत सांगितलं, “अहो, दुसरी बायको हाय नव्हं का ती शिरभाते भाऊंची!“
हे ऐकल्यावर मात्र ऊर्मिलाचे डोळे चमकले.
सावत्र आई असल्यामुळे स्वाती योगेशला कसं पाण्यात बघते, त्याला हवं ते मिळू देत नाही, घरात अधूनमधून भांडणं होतात, शिरभाते भाऊ तिच्यावर वैतागतात, ही सगळी माहिती तिला मिळाली. पाटील मावशींकडून बाहेर पडल्या पडल्या ऊर्मिला एका बाजूला गेली आणि तिथूनच तिनं इन्स्पेक्टर मिरजकरांना फोन केला.
“सबइन्स्पेक्टर ऊर्मिला गायतोंडे! बोला, काय खबर काढलीत?“ मिरजकरांनी विचारलं. ऊर्मिलानं सगळी माहिती सांगितल्यावर मिरजकरांच्या चेहर्यावर हास्य पसरलं. त्यांच्या डोक्यातल्या सगळ्या लिंक्स जुळल्या. त्यांनी संदीपला ताब्यात घेण्यासाठी पथकाला पाठवून दिलं.
संदीपला उचलून कोठडीत टाकल्यावर बोलतं करायला फार वेळ गेला नाही.
“साहेब, ताईच्या सांगण्यावरून मीच योगेशला घराजवळून उचललं होतं,“ त्यानं कबुली देऊन टाकली.
“योगेश आत्ता कुठे आहे? कुठे दडवलायंस त्याला?“ मिरजकरांनी संदीपच्या मुस्काटात हाणली आणि त्याच्या डोळ्यासमोर दिवसाही तारे चमकले.
“बबड्या पळून गेला, साहेब. दोन दिवस त्याला कसंबसं थोपवून धरलं होतं. इथे एक काम आहे, आईबाबा दोघंही इकडे येतील असं सांगून समजावत होतो, पण माझं आणि ताईचं फोनवरचं बोलणं त्यानं ऐकलं. त्याला भीती वाटली की काय झालं, माहीत नाही, पण दुसर्या दिवशी सकाळी तो गायब झाला होता.“ संदीपनं सांगून टाकलं. पोलिसांनी त्याला आणखी दोनचार लाथा घातल्या, पण तो सांगतोय हे खरं असावं, असं मिरजकरांना कुठेतरी वाटत होतं.
“शिंदे, हा संदीप खरं बोलत असेल आणि योगेश अजूनही घरी आला नसेल, तर कदाचित तो संकटात आहे. त्याला वाचवायला हवं,“ त्यांनी सहकारी अधिकार्यापाशी काळजी व्यक्त केली. योगेशची आई स्वाती हिचं नवर्याशी पटत नव्हतं. तिला छानछोकीचं आयुष्य हवं होतं आणि नवरा पैसे असूनही फार खर्च करण्याच्या प्रवृत्तीचा नव्हता. त्यातून सावत्र मुलगा असलेल्या योगेशवर स्वातीचा आधीपासून राग होता. म्हणूनच तिनं भाऊ संदीपच्या मदतीनं मुलाच्या अपहरणाची आणि त्यासाठी नवर्याकडूनच पैसे उकळण्याची योजना आखली होती. आधी पाच लाख सांगून निदान पन्नास हजार तरी वसूल करू, असं सांगून त्यांनी शिरभातेंकडून तेवढी रक्कम उकळली. मात्र, पुढे काही ठरवायच्या आधीच योगेश पळून गेल्यामुळे त्यांचा डाव फसला, हे पोलिसांच्या लक्षात आलं.
आता योगेशला तातडीने शोधायला हवं होतं. संदीपने त्याला ज्या खोलीवर नेऊन ठेवलं होतं, तिथला सगळा भाग पिंजून काढण्याचे आदेश मिरजकरांनी त्यांच्या टीमला दिले. त्या परिसरातल्या वस्तीमध्ये गैरधंदे करणार्या टोळ्यांची खबर काढायला त्यांनी आपलं खबरी नेटवर्क कामाला लावलं. त्यापैकी एकाकडून त्यांना हवी असलेली टिप मिळाली. अन्याभाईच्या टोळीचं गेले दोन दिवस कुणाशीतरी डील चाललं होतं. योगेश नक्की त्याच्याच ताब्यात असणार, असा पोलिसांना अंदाज आला. मिरजकरांनी तातडीने हालचाली करून अन्याभाईच्या मुसक्या आवळल्या आणि त्याचा यथासांग पाहुणचार केल्यावर त्यानं तोंड उघडलं.
“त्या पोराला बाहेरच्या टोळीकडे देऊन भरपूर पैशांचा सौदा करायचा होता साहेब. लई मोठी रक्कम भेटणार होती.“ बेदम मार खाल्ल्यावर अन्याभाईनं कबूल करून टाकलं. मिरजकरांनी त्याच्याकडून सगळं वदवून घेतलं आणि त्याच्या दुसर्या अड्ड्यावर पोलिसांची टीम पाठवून तिथून योगेशची सुटका केली. तीन दिवस घरापासून दूर राहिलेला, सैरभैर झालेला योगेश अगदीच केविलवाणा दिसत होता. वडिलांशी त्याची भेट झाल्यावर दोघांनी एकमेकांना मिठी मारून भरपूर रडून घेतलं. आईला भेटायला मात्र योगेशनं नकार दिला.
“स्वतःच्या पैशाच्या मोहापायी मुलाचा जीव धोक्यात घातलात तुम्ही. आम्हाला थोडा उशीर झाला असता, तर हा मुलगा कधीच हाती लागला नसता!“ मिरजकरांनी स्वातीला भरपूर सुनावलं. स्वाती आणि तिचा भाऊ संदीप, दोघांनाही कोठडीत टाकल्यावर पुढचं अंधारलेलं भवितव्य दिसायला लागलं आणि त्यांचे चेहरे केविलवाणे झाले.