□ केंद्राच्या कृषी कायद्यांना महाराष्ट्राचे आव्हान; जनता, शेतकरी, सामाजिक संघटनांकडून प्रतिक्रिया मागवल्या
■ ज्यांच्यासाठी कायदे करायचे, त्यांना विश्वासात घेतले पाहिजे, हे मूलभूत तत्त्व केंद्र सरकारने पाळले नाही, राज्य सरकार ते करत आहे, हे अभिनंदनीय आहे.
□ राज्यपालांच्या घाऊक बदल्या, आठ राज्यपाल बदलले
■ भाकरी फिरवत राहिलं पाहिजे, हे बरोबर आहे; पण, करपलेली भाकरी कितीही फिरवली तरी काळीच राहते.
□ फडणवीस सरकारच्या काळातल्या फोनटॅपिंगची चौकशी होणार
■ मौका सभी को मिलता है!
□ चारजणींसोबत घरोबा करून वर ५३ तरुणींशी लग्नाची बोलणी करणारा दादला पुण्यात पोलिसांच्या जाळ्यात
■ हा मनुष्य बायोडेटामध्ये ‘व्यवसाय : लग्न करणे’ असं लिहित असेल ना!
□ कृपाशंकर सिंहांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
■ करून करून भागलेल्यांना हल्ली या देवपूजेला लागावंच लागतं- नाहीतर कृष्णजन्मस्थळी रवानगी होण्याची धास्ती असते.
□ राज्यात अघोषित आणीबाणी – देवेंद्र फडणवीस
■ इथे आणीबाणी असेल तर संपूर्ण देशात काय आहे देवेनभाऊ?
□ देशात अनेक शहरांमध्ये डिझेलचीही शंभरी पार
■ हळू बोला. भाजपवाले ‘शत प्रतिशत इंधन’ असा उत्सव करतील. ती हौस फार दांडगी आहे त्यांची.
□ भाजपने ३० वर्षे शिवसेनेचा वापर केला : मुख्यमंत्र्यांनी फेटाळली पुन्हा युतीची शक्यता
■ अजूनही तसाच वापर करण्याचे चिवट प्रयत्न सुरूच आहेत. मुकाबला वाघाशी आहे, एवढं लक्षात ठेवलेलं बरं.
□ कोरोना नियमांची ऐशी की तैशी; सिमला, कुलू, मनाली येथे पर्यटकांची तौबा गर्दी
■ या बातमीचा मथळा ‘कोरोनाच्या तिसर्या लाटेचा जंगी स्वागतसोहळा’ असा द्यायला हवा होता.
□ कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम; वर्षभरात जवळपास १० हजार जणांना चावे
■ हे कुत्रे पकडून प्राणीप्रेमींकडे सोपवले पाहिजेत देखभालीसाठी. फक्त रस्त्यातल्या कुत्र्यांना खाऊ घालण्यात कसलं आलंय प्राणीप्रेम?
□ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, उत्तर कोरियाचे किम जोंग ऊन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माध्यमस्वातंत्र्याचे भक्षक असल्याचा जागतिक संघटनेच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
■ छे छे, भारतात असं काही नाही. इथे वाका म्हटलं की लोळणार्यांची, खाविंदचरणारविंदी मिलिंदायमान होणार्यांची भाऊगर्दी आहे. मालकांचे गुलाम हे मालक ज्यांचे गुलाम आहेत, त्यांचे गुलामच असतात परात्पर.
□ हिंदुस्थानींचा डीएनए एकच; हिंदू मुस्लिम भेदभावच नाही, तर ऐक्याचा नारा कशाला?- सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
■ भाजपसाठी उत्तर प्रदेशातल्या निवडणुका अवघड आहेत, एवढाच याचा अर्थ.
□ राफेल विमानांच्या वादग्रस्त व्यवहारांची संसदीय समितीमार्फत चौकशी होणे मोदी का टाळत आहेत?– राहुल गांधी यांचा सवाल
■ कर नाही त्याला डर कशाला, या म्हणीचा व्यत्यास काय होईल राहुलजी.
□ गडकरींच्या कारखान्यांची ईडीमार्फत चौकशी करा : भाजपचेच केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
■ एकमेव कार्यक्षम आणि स्वतंत्र मंत्री इतका खुपतो आहे डोळ्यांत?
□ कोरोनामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे…
■ त्यावर उपाय करता येईल, शाळाच नसल्याने मठ्ठपणा वाढला तर ते परवडणारे नाही.
□ व्यापार्यांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध- पंतप्रधान मोदी
■ हे सांगायची गरज काय? देशात बाकी सगळे मातीत जात असताना तुम्हाला फक्त शेठजींचीच काळजी आहे, हे जगजाहीर आहे.