गेल्या वर्षापासून कोरोना वायरसने देशातच नव्हे तर जगात धुमाकूळ घातला आहे. आताही दुसरी लाट आहेच. हळूहळू ती कमी होऊ लागली असली तरी त्यामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनचे दुष्परिणाम कमी झालेले नाहीत. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, कामधंदे बुडाले आहेत. सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत. यादरम्यान अनेकांची आर्थिक परिस्थिती जवळपास कोलमडून गेली. नेमका हाच विषय घेऊन तयार करण्यात आलेल्या ‘पुनश्च हरिओम’ नावाच्या नव्या चित्रपटात अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांची जी ससेहोलपट सुरू आहे, त्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. असेच हाल होत असलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीची कथा यात दाखवण्यात आली आहे. लॉकडाऊनची दाहकता या सिनेमात उभारून दाखवण्यात आली आहे. लॉकडाऊन योग्य की अयोग्य हा येथे प्रश्नच नाही. पण त्यामुळे झालेले हाल दाखवले आहेत. स्पृहासोबत या सिनेमात विठ्ठल काळे हा अभिनेताही दिसतो आहे.