शिंदे गटाच्या फुग्यात हवा भरण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. काहीही करून हा फुगा फुटता कामा नये आणि पहिली निवडणूक होईपर्यंत तरी त्याला टाचणी लागता कामा नये, याची काळजी घेण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावे, असे आवाहन अमित शहाजींनी केल्यामुळे ईडी जोडीने मुंबईत सर्व प्रमुख नेत्यांना बैठक घेऊन तंबी दिली. त्यानंतर माझा परमप्रिय मानलेला मित्र पोक्या याने या सर्वांच्या मुलाखती टेप केल्या. संक्षिप्त रुपात त्यांचा प्रमुख भाग…
– मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हा सर्वांना ताकीद देतो की आज ज्यांच्या कृपेमुळे आपल्याला हा सत्तेचा अलभ्य लाभ झाला आहे त्यांना दगाफटका होता कामा नये. तुम्हा सर्वांना तिकीट मिळेल न मिळेल, मंत्रिपद मिळेल न मिळेल; तरी तुम्ही पक्ष सोडता कामा नये. आपण आपल्या निष्ठा माननीय, पूजनीय नरेंद्रजी मोदीजी आणि अमितजी शहाजींच्या चरणी वाहिल्या आहेत. त्याला जागूया. सारखे सारखे खोके मिळणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक बर्यावाईट प्रसंगी जिभल्या चाटत फायदा उपटण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही त्यांची इतर चांगल्या ठिकाणी बोळवण केली जाईल. तसेच लायकीप्रमाणे लहान मोठे खोके दिले जातील. त्यावरून वादावादी चालणार नाही. आता माझे मुख्यमंत्रीपद ज्यांच्यामुळे शाबूत आहे ते सुराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी मार्गदर्शन करतील.
– मित्रांनो, काहीही करून मुंबई महापालिका आपल्याला जिंकायची आहे. शेंडी तुटो की पारंबी, पण आपला दोन पक्षांचा संकर अजिबात तुटता कामा नये. कोणी काहीही अफवा उठवल्या वा आमिषे दाखवली तरी त्यांना दाद देऊ नका. फेव्हिकॉल लावून आपला संकर अधिक घट्ट करा. माझ्याबद्दल तुमच्यात संशयाची भावना असल्याची जाणीव मला आहे. मी ठासून खोटं बोलण्यात हुशार आहे, राजकारण करण्यात बापाचा बाप आहे, रात्रीचा दिवस करण्यात माहीर आहे हे तुम्हाला माहीत आहे. आपण सर्वच बाबतीत समानशील आहोत, म्हणूनच आपल्याशी आमचे नाते जुळले. आपल्या एकीच्या फुग्यात दोन्ही पक्षांनी प्राणपणाने हवा भरण्याचे काम नेटाने सुरू ठेवावे. निवडणुकीआधीच फुगा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. आता विद्वानाचार्य दीपकजी केसरकरजी आजोबाकीच्या नात्याने मार्गदर्शन करतील.
– नमस्कार. माझे राणेजींबरोबरचे हाडवैर मिटू शकते, तर आपण आपल्यातील वाद का मिटवू शकत नाही? यापुढे वाद नको, नाद हवा. मी एवढे जग फिरलो, पण भाजपाच्या जगात जे विश्व सामावले आहे तसे कुठेच पाहिले नाही. केवढी मोठी प्रगाढ ज्ञान असलेली मंडळी, केवढे साधुसंत आणि बुवा, त्यात कुठे आपला इवलासा चुवा. तरी त्यांनी आपल्याला सामावून घेतले. त्यामुळे आपणही संघदिलाने त्यांच्यात एकरूप होऊन सेवाकार्य करूया. निवडणुका येतील आणि जातील, पण आपला संकर हा जगाच्या कुतुहलाचा विषय झाला आहे. त्यांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्यापेक्षा कमी जागा देऊ केल्या असल्या तरी दिले त्यात समाधान मानावे या मताचा मी आहे. म्हणून त्यांनी आपल्या जागा पाडण्याचा प्रयत्न केला तरी आपण मात्र त्यांच्या जागा जिंकून आणूया. त्यातच विश्वाचे भले आहे.
– अहो, हे पाडापाडीचे काय बोलता केसरकरजी! मी फडणवीस तुम्हाला पक्के आश्वासन देतो की असा कोणताही प्रकार आमचे लोक करणार नाहीत. आता आपण वेगळे नाही. त्यामुळे विजय आमचा-तुमचा नाही, तर संकराचा होणार आहे. आपण त्या दृष्टीने कामाला लागले पाहिजे. आता आमचे विनोदजी तावडेजी आपणास मार्गदर्शन करतील. या विनोदजी.
– सगळाच विनोद आहे. फडणवीसजी जे बोलले तेही खरे आहे आणि केसरकरजी बोलले तेही खरे आहे. कुणी कुणाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. जे घडणार आहे ते अटळ आहे. त्याचा पुनरुच्चार मी करत नाही. पण मी जो अहवाल दिलाय, त्याप्रमाणेच सारे घडणार. मग कोणीही कितीही आदळआपट करो. ज्या जागा जाणार आहेत, त्या जाणारच आहेत. ज्या येणार होत्या, त्यातीलही काही जाणार आहेत. मी आता ताजा अहवाल बनवला आहे. त्यानुसारच सारे घडणार आहे. आपण एका ध्येयाने बांधले गेलो आहोत. लढणे आपल्या हाती आहे, पडणे नाही. जे विधिलिखित आणि तावडेलिखित आहे ते घडणारच. आमची मूळ संघटना हीच खरी संघटना. आता आलेल्या काही बेवारशी कुत्र्यांनी संघटना डागाळली आहे. त्याचा परिणाम निवडणुकीवर होणारच. तरीही वरिष्ठांचा मान राखून आपण सर्वांनी आपली एकजूट कायम ठेवू या आणि फडणवीसजींनी दिलेली शिकवण अंमलात आणू या. जय विलेपार्ले. आता डॉक्टर तानाजी सावंत बोलतील. बोला तानाजी.
– मला हल्ली चिंबोरीमॅन म्हणतात. खरे म्हणजे चिडवतात. मुंग्या मेरू पर्वत गिळू शकतात, तर चिंबोर्याही धरण पोखरू शकतात. आपला पक्ष जो मुुंग्यांचा आणि चिंबोर्यांचा वाटत असला तरी आपणही बलाढ्य शत्रूचा पराभव करू शकतो. याच भावनेने आपण निवडणुकांना सामोरे जाऊ या. मी एका वेळेला शंभर पेशंट बरे करू शकतो, तसेच एका वेळेला शंभर शत्रूंशी मनातल्या मनात लढू शकतो. माझी आंतरिक शक्ती एवढी प्रचंड आहे की मी मनातल्या मनात शंभर शत्रूंना लोळवू शकतो. निवडणूक म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही. मी माननीय केसरकरजी यांच्या प्रेरणेने ‘वैद्यकीय क्षेत्र आणि निवडणूक’ या विषयावर काही प्रयोग मनातल्या मनात करत आहे. ते यशस्वी झाल्यास ही निवडणूकच काय आपण जग जिंकू शकतो. मात्र त्यासाठी माझ्यासारखी जिद्द मनातल्या मनात बाळगली पाहिजे. मी सर्व सहकार्यांना एवढेच आवाहन करीन की खोके कितीही प्यारे असले तरी लढाई करताना खोके डोळ्यांसमोर वा मनातही आणू नका. दोन मतदारसंघांत योग्य अंतर ठेवून प्रचार करा. पराजयाची साथ आली आहे, विजयाची लस टोचून घ्या. एवढे सांगून मी आपली रजा घेतो. जय चिंबोरी.
– मुख्यमंत्री या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो. आजची चर्चा साधकबाधक आणि उपयुक्त झाली. त्यातून आपणा सर्वांनी योग्य तो बोध घेतला असेलच. आपली एकजूट अभेद्य ठेवा आणि आपल्या दोन पक्षांच्या संकराला बळकटी आणा. निवडणुका आपण जिंकल्यासारख्याच आहेत. जय मोदीजी, जय शहाजी…