अनेक अनेक वर्षे आधी लग्नपत्रिका यायच्या, आठवतात का? आमच्या इथे श्री कृपेकरून यांची कन्या वा पुत्र अशा मायन्याने सुरू होऊन इष्ट मित्रपरिवारासह अवश्य येणे करावे. याने संपायचा.
हळूहळू मित्रपरिवार शब्द बाद झाला आणि बरेच फरक पडत गेले. पत्रिकेत आणि आमंत्रणात पण.
वधू किंवा वर पालक नारळ घेऊन स्वहस्ते आमंत्रण द्यायचे आणि हॉलमधील कॅलेंडरवर ठळक अक्षरात नोंद केली जायची.
पत्रिका पण साध्या सरळ असायच्या. त्यातही ग्रामीण भागातील पत्रिका एकदम भारी… पूर्ण तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांची समाजातील पत, दर्जा यानुसार नावे आणि लोक ते बारकाईने वाचायचे, नाव नसले अथवा क्रम चुकला, तर रंगीत संगीत भाऊबंदकी!!!
मध्येच कधीतरी यात आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं, आमच्या मामाच्या वा काकाच्या वा दादाच्या लग्नाला यायला हवे, असा बाळ गोपाळ मंडळींचा आग्रह सुरू झाला आणि याच सुमारास पत्रिकांमधील मजकूर प्रोफेशनल कॉपी रायटरकडून लिहून घेतला जाऊ लागला. नक्की कशाचे आमंत्रण आहे हे कळण्यासाठी साधारण पाच पंचवीस ओळी वाचायला लागून मग उलगडा व्हायचा, तोपर्यंत मुहूर्त चुकायचाच पण जेवणसुद्धा हुकायचे- उगाच जजमेंटल होऊ नका, तुम्ही पण त्यातलेच. ‘मिष्टान्न इतरेजना’ हेच खरे.
तर मुद्दा काय आधीची साधा सरळ मजकूर असणारी पत्रिका गायब झाली आणि माझ्यासारख्या साध्या लोकांच्या डोक्याला शॉट.
आता सांगा, ‘कवितेचे रसग्रहण करा’ हा जो आंबा टाकून देऊन साल खायचा प्रकार शाळेत असायचा, त्यात किती मार्क्स मिळायचे तुम्हाला? तिथल्या उत्तम कवितांचे विश्लेषण न करता आलेली माणसे असल्या काव्यमय पत्रिका काय कप्पाळ वाचणार?
कोणतेही, कसलेही आमंत्रण असते त्यात मुख्य काय असायला हवे? नाव, समारंभ पत्ता, तारीख आणि वेळ… बरोबर ना? पण साहित्य संमेलनात कविता वाचायची संधी हुकलेले कवी इथे बदाबद व्यक्त होतात आणि बाकी महत्त्वाची माहिती गायब असते. पत्रिकेवर इतका खर्च करताना लोक वेळ, तारीख, पत्ता ही सर्वात मोलाची माहिती ठळक अक्षरांत का लिहीत नाहीत, हा मला पडलेला प्रश्न आहे.
एक तर आजकालच्या पत्रिका भरभक्कम, जाडजूड पुठ्ठा असणार्या असतात. पुन्हा पूर्वी असायची तशी एक दिवसाची सुटसुटीत लग्नं (सकाळी विधी, मग लग्न, संध्याकाळी रिसेप्शन, नंतर सगळे आपापल्या घरी) गायब होऊन आठवडा आठवडा चालणारे सोहोळे होऊन राहिलेत. प्रत्येक समारंभाचे कार्ड वा पत्रिका वेगळी. आणि कहर म्हणजे बरेचदा क्रम चुकलेला, म्हणजे लग्न, मुहूर्त, समारंभ आधी आणि शेवटी संगीत कॉकटेल पार्टी… लग्नाचा शीण घालवायला बहुतेक.
मग आपल्यालाच क्रमवार लावून समजून घ्यावे लागते.
निदान या पत्रिका प्रत्यक्ष येतात, म्हणजे आपल्या हातात पोहोचलेल्या असतात; पण हल्ली प्रत्यक्ष निमंत्रण न करता पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली व्हॉट्सअपवर आमंत्रण पाठवले जाते. आता व्हॉट्सअपवर घुड मॉर्निंगचे शेकडो मेसेज ज्याला येत नाहीत असा देवाचा लाडका, भाग्यवान माणूस विरळा. त्यामुळे त्या कचरापट्टीत आमंत्रण कुठल्या कुठे लपले जाते. निव्वळ व्हॉट्सपवर आमंत्रण न पाहिल्याने माझी अनेक लग्नं चुकली आहेत आणि अनेक स्नेही लोकांचा रोष मला पत्करावा लागला आहे.
बरं, अशावेळी, अरे पत्रिका छापायला हव्या होत्या, हा सल्ला देऊन उपेग नसतो; कारण लगेच कागद, झाडे, पर्यावरण, प्रदूषण यावर मोठ्ठे प्रवचन ऐकावे लागते.गंमत म्हणजे असे प्रवचन ऐकलेल्या लग्नात अर्धा तास फटाके उडवले गेले होते… त्यांना वायूप्रदूषणाचा धडा शिकवलाच नव्हता का?
अर्थात दोषी पार्टी मी असल्याने मलाच मूग गिळून बसावे लागले. आपण भारतीय अतिशय मूर्ख असतो हा माझा समज या अशा प्रसंगामुळे दृढ होत चालला आहे.
आजकाल बहुतेक लग्न मुले आणि त्यांची मित्रमंडळीच ठरवतात. ती कशी करायची, कुठे करायची, हे सगळं- पालक फक्त कॅश देणारं एटीएम. अशा तरूण तुर्क लोकांना आमच्यासारख्या आदिमानव प्रजातीतील लोकांची मानसिकता ठाऊक नसते. त्यांना वाटते, सर्व जणू सुंदर पिचाई अथवा बिल गेट्स आहेत. पत्रिका व्हॉट्सअपवर येतात आणि पत्ता वा स्थळ, सॉरी लोकेशन, पिनने पाठवले जाते. पिन म्हंजे कपड्याला, कागदाला लावायची असते, असे समजणारे मतिमंद आम्ही, आम्हाला काय कप्पाळ कळणार यातले?
बरं पत्रिका पण एक से एक…
पूर्वीचे कवी परवडले पण हे हौशी कलाकार नको असे म्हणायची पाळी आलीय. मसुदेच अजब असतात.
एक पत्रिका चेकसारखी होती.. नक्की काय आहे हे कळायला मार्ग नाही.
एक होती सरकारी समन्ससारखी… एकात तर कहर होता, नवरा नवरीचे फोटो वॉन्टेडसारखे मग शॉट्समधे.
आता फक्त पोस्टमॉर्टम अहवालाच्या रूपात पत्रिका बघणे बाकी आहे.
मुद्दा काय की नावीन्य या नावाखाली हे प्रकार चालतात आणि त्यात समारंभ वेळ, ठिकाण, वार, तारीख हे मुद्दे राहून जातात.
आणि असले तर फिकट रंगात, बारीक टायपात, अशी पत्रिका अथवा आमंत्रण जर व्हॉट्सअपवर आले तर अगदी फिकट दिसते, कारण प्रत्येक फोनचे पिक्सेल, रंग वेगवेगळे. मी तर हाताशी भिंग ठेवले आहे. स्पष्ट कळावे यासाठी.
बरं अशा लोकांना सांगून उपयोग नसतो, तुम्हाला ना नवीन काही नकोच, अमेरिकेत बघा कशी आमंत्रणे असतात.
अरे बाबा अमेरिकेत आमंत्रण स्वतःच्या आईवडिलांना पण नसते अनेकदा, आपल्याकडे आत्याच्या नणंदेची मावस सासू, आणि मावशीच्या सासूची चुलत बहीण असली नाती जपली जातात, तिथे हे काय? पण परत, उपयोग नाही. तुम्ही असेच बुरसटलेले आहात, हे ऐकावे लागणार.
त्यामुळे हल्ली मित्रपरिवार अथवा नातेवाईक यापैकी कोणाचे लग्न म्हटले की मी आधी नकाशा घेऊन बसणे सुरू केले आहे. ते कमी की काय, म्हणून जंगी मोठे कॅलेंडर आणून टांगून ठेवलेय. त्याला पेन पण बांधून टाकले आहे. आमंत्रण आले की आधी नोंद करायची.
लग्न बदलली तशी अहेर पद्धत पण बदलली. हातात अवजड खोके घेवून धापा टाकत जायची गरज उरलेली नाही.
ऑनलाईन गिफ्ट कार्ड अथवा रोकडा रक्कम द्यायची तर गुगल पे असल्याने आधीच अहेर देता येतो आणि दिलेला अहेर वसूल केला नाही तर आपण भारतीय कसले? हॉटेलातून निघताना उरलेली बडीशोप, सुपारी, टिश्यू, सॉस पाकीट खिशात घालून आणणारे आपण, अहेर वसूल करायला चुकू? अजिबात नाही. पण या असल्या अशक्य पत्रिकांमुळे असे प्रसंग घडतात. बरं घडतात ते ठीक, पण त्याला उपस्थित राहिलेल्या लोकांकडून, काय मस्त मज्जा आली, काय जेवण होते, काय खायला भरपूर होते, रिटर्न गिफ्ट पण सॉलिड यार, तू वा तुम्ही का आला नाहीत? मजा आली असती… चुकवले तू, असा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सहन करून घ्यावा लागतो. उपस्थित लोक असे वर्णन करतात की अंबानीच्या घरचे लग्न पण फिके.
आणि याला कारण काय, तर अॅबनोर्मल पत्रिका. यावर मी उपाय शोधते आहे. कोणाच्या मुलाला, मुलीला नोकरी लागली की मी त्या माणसाच्या व्हॉट्सअपवर अधिक लक्ष ठेवू लागले आहे… कारण आता कधीही आमंत्रण येऊ शकते.
तुम्ही काय करता सांगा जरा??