मराठी व्यावसायिक रंगभूमीवर यंदा चार दोन अंकी बालनाटके चालू आहेत. ही बालनाटके केवळ सुट्टीपुरती नाहीत, तर पूर्ण वर्षभर त्याचे प्रयोग पेश करण्याचा निर्मात्यांचा पक्का इरादा आज तरी दिसतोय. त्यातलं पहिलं बालनाट्य ‘अलबत्या गलबत्या’ हे दोन पिढ्यांपुढे सादर होतंय. दिलीप प्रभावळकरांपासून ते निलेश गोपनारायण यांच्यापर्यंतची चेटकीण रसिकांनी बघितलीय. रत्नाकर मतकरी यांची संहिता आज ७०० प्रयोगांचा पल्ला पार पाडतेय. विश्वविक्रमी बालनाट्य म्हणून या निर्मितीने पताका फडकविली आहे. दुसरं बालनाट्य ‘बोक्या सातबंडे’! जे दिलीप प्रभावळकर यांच्याच कथेवर आधारित असून डॉ. निलेश माने यांनी नाट्यरूपांतर केलंय. ज्यात आरुष बेडेकर हा ‘बोक्या’ म्हणून गाजतोय. तिसरं बालनाट्य ‘घोस्ट एका जंगलाची’ ज्याचं दिग्दर्शन नीरज शिरवईकर याचे असून एक हिरवगार बालनाट्य अशी जाहिरात झळकतेय. आणि चौथे बालनाट्य ‘जाड्या, रड्या आणि चमच्या’. ज्याचं लेखन विजू नवरे यांचे तर दिग्दर्शन गणेश पंडित यानं केलंय. गेली पन्नास वर्षे बालनाट्यात सक्रीय असलेले अशोक व चित्रा पावसकर या दांपत्याने याची दिमाखात निर्मिती केलीय. एक बालनाट्याचा इतिहास जागं करणारे हे नाट्य. एकूणच या चारही पूर्ण आकाराच्या बालनाट्यामुळे काहीशी मरगळलेली बालनाट्य चळवळ पुन्हा एकदा एका सकारात्मक वळणावर पोहोचली आहे.
नाटकाचे कथानक हे बालमानसशास्त्राचा विचार करून बांधलेले दिसतेय. जाड्या, रड्या आणि चमच्या हे तिघे बालमित्र. तिघांची पक्की मैत्री. प्रत्येकाची वागण्याची तर्हाही कमालच. त्यातून एकेक गमतीजमती घडतात. हे तिघे जंगलात पोहोचतात. त्यातून एकेक घटनांना सामोरे जातात. जंगली माणसे भेटतात. हवालदारही प्रगटतो. एक धर्मगुरूही येतो. सारेजण या तिघांभोवती असतात. अखेरीस जंगलाचा राजा वाघोबाही येतो. तो रंगमंचापासून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्याच्याशी या तिघांची गट्टी जमते. ‘जंगले वाचवा! प्राण्यांवर प्रेम करा.’ पर्यावरण रक्षण करा! निसर्गाशी संवाद साधा!’ हा संदेश प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात देण्यात आलाय. कथानक टिपिकल वाटले तरी त्यातील गम्मत सादरीकरणातून प्रभावीपणे पुढे आलीय. जंगल, प्राणी, तिथल्या वस्त्या, माणसं याचे कायमच सर्वांना आकर्षण वाटतं. काँक्रीटची जंगले वाढली आणि हिरवी रानं नष्ट होऊ लागली आहेत, ही भयानक वस्तुस्थिती समोर दिसतेय. या पार्श्वभूमीवर मनोरंजनाच्या वाटेवरून जंगलात भटकंती करताना उपदेशाचे छुपे डोसही खुबीने देण्यात आलेत. मूळ नाटककार विजू नवरे आणि अशोक पावसकर यांनी कथेपेक्षा उत्स्फूर्त सादरीकरणावर भर दिलाय. त्यातील अनेक ‘जागा’ बाजी मारून जातात, खिळवून ठेवतात.
नेपथ्यकार प्रसाद वालावलकर यांनी जंगलाचा देखावा नेमका निवडला आहे. हिरवे रान नजरेत भरते. हालचालींना पुरेशी जागाही त्यातून मिळते. राजेश दुदम याने संगीताचे अनेक तुकडे चांगले वापरले आहेत. अजय अणसुरकर याची प्रकाशयोजना पूरक आहे. रंगभूषा-वेशभूषा पुरेपूर भान ठेवून आहेत. तांत्रिक बाजू चांगल्या जुळल्यात.
यातील कलाकारही उत्स्फूर्ततेने गच्च भरलेले आहेत. ‘जाड्या’च्या भूमिकेत ऋग्वेद फडके यांनी देहाकाराच्या बळावर अनेक हक्काचे हशे कमविले आहेत. घाबरटपणा, धांदरटपणा यांनी धम्माल उडविली आहे. मोकळ्या जागा चांगल्या भरल्यात. स्वप्नील राणे याने ‘रड्या’तून नकारात्मक बाजू खुबीने पेश केल्यात. जाड्या-रड्या शोभून दिसतात. ‘चमच्या’ झालाय अनिकेत वंजारे. त्यानेही देहबोलीतून लवचिकता मस्त आकारला आणलीय. जाड्या-रड्याशी याचे ट्युनिंग चांगले जमतेय. तिघांचा ‘टायटल रोल’ असल्याची पुरेपूर जाण त्यांना दिसत आहे. पळापळ आणि घबराट जशी रंगमंचावर होते तशीच ती नाट्यगृहात बालप्रेक्षकांमध्येही होते. एका प्रसंगात तर बालप्रेक्षक उभं नाट्यगृह डोक्यावर घेतात. जाड्या जंगलात झोपलेला. त्याला कुणीतरी उठवतंय. तो मित्र रड्या किंवा चमच्याही नाही. चक्क वाघोबाच समोर उभा! हा प्रसंग टाळ्या, शिट्ट्यांनी सारेजण एन्जॉय करतात.
अन्य भूमिकेत सुरेश गोताड (हवालदार आणि जंगली), विनिता माईणकर (धर्मगुरू), अनिकेत भंडारे, प्रतिक ठोंबरे यांचे जंगली माणसांच्या आणि आर्थिक आस्तिक आरेकर यांचे वाघोबाच्या भूमिकेत ‘टीमवर्क’ चांगले आहे. वाघोबाच्या प्रवेशाला मिळणारा प्रतिसाद जबरदस्तच.
मूळ पन्नास वर्षांपूर्वीची ही संहिता. काळ आणि वेळ बदलला. मनोरंजनाच्या संकल्पनाही बदलल्या. विजू नवरे यांच्या मूळ कथेला कुठेही बाधा न पोहोचू देता त्याचे पुनर्लेखन निर्माते, कलाकार अशोक पावसकर यांनी ताकदीने केलंय. त्यामुळे हे नाट्य पन्नास वर्षापूर्वीचे नव्हे, तर आजचे ‘प्रâेश’ वाटतेय. अनेक संदर्भ नव्याने जोडले गेलेय. संगणकयुगाचे आणि बालकांच्या बदलत्या अभिरुचींचे पुरेपूर भान त्यात राखण्यात आलेय. कथाविस्तारही नोंद घेण्याजोगा आहे. नाट्य अभ्यासकांसाठीही या दोन्ही संहिता अभ्यासपूर्ण ठराव्यात. ‘जुनं ते सोनं’ जरी असलं तरी ‘नवं ते देखील सोनं’ असं म्हणावं लागेल!
एकांकिकेपासून ते चित्रपटापर्यंत लक्षवेधी ठरलेला नव्या पिढीचा दमदार लेखक, दिग्दर्शक गणेश पंडित यांचं दिग्दर्शन या बालनाट्याला लाभलं आहे, ही एक जमेची आणि आश्चर्याची गोष्ट आहे. त्याने काही वर्षांपूर्वी लेखन-दिग्दर्शन केलेल्या ‘मेकअप’ या चित्रपटातून ‘रिंकू’ला नवा ‘लुक’ मिळाला. चित्रपटात ‘बिझी’ असूनही मराठी बालनाट्यासाठी गणेशने खास दिग्दर्शनाची जबाबदारी बालनाट्यावरच्या प्रेमापोटी स्वीकारली आहे. सर्व प्रसंग त्याने मजबुतीने बांधले आहेत आणि त्यांचे सादरीकरण बालप्रेक्षकांसह त्यांच्या पालकांनाही ‘रिलेट’ करणारे झालेत. दोन अंकात नाट्य कुठेही रेंगाळत नाही किंवा त्याची गतीही कमी होत नाही, हे वैशिष्ट्यच!
या बालनाट्याला एक इतिहास आहे. पन्नासएक वर्षाचा बालनाट्याचा त्यातून मागोवाच ठरेल. १९७५च्या सुमारास या नाटकाचा चक्क रौप्यमहोत्सवी प्रयोग झाला होता. त्यात जाड्याच्या भूमिकेत दिगंबर भट, रड्या अशोक पावसकर आणि चमच्या दिगंबर राणे होते. बालरंगभूमीवरला एक हटके प्रयोग हाऊसफुल्ल गर्दीमुळे सिद्धच झाला. रौप्यमहोत्सवी प्रयोगाला शाहीर दादा कोंडके बिझी असूनही उपस्थित राहिले, तर सुवर्णमहोत्सवी प्रयोग सोहळ्यास शिवसेनेचे महापौर मनोहर जोशींनी उपस्थित राहून या हटके प्रयोगाचे कौतुक केले. त्यावेळी ‘नाट्यदर्पण’ ही सुधीर दामले यांची नाट्य संघटना जोरात होती. १९७५ साली नाट्यदर्पण रजनीत नाटकाला सर्वोत्कृष्ट बालनाट्याचा पुरस्कार मिळाला आणि नाटक राज्यभरात दौर्यासाठी निघाले. बालनाट्याचा झंझावती दौरा करणारे हे नाट्य ठरले. सलग तीन वर्षांत नाबाद २०० प्रयोगांचा विक्रम या नाटकाच्या कुंडलीत जमा आहे. त्याची पुनरावृत्ती करण्याचा या ‘टीम’चा प्रयत्न दिसतोय! जादुगिरी, राजा-राणी नसूनही नाटक हाऊसफुल गर्दी खेचू लागले, त्यावेळी ‘गुंतता हृदय हे’ आणि ‘ती फुलराणी’ ही नाटके व्यावसायिकवर होती. त्यासोबत बुकिंगवर ‘जाड्या, रड्या चमच्या’ने बाजी मारली. ‘रिपीट ऑडियन्स’ फक्त मोठ्यांच्या नाटकापुरता मर्यादित होता तो या नाटकाने मिळवला. कल्पनेतील विश्वातून आजच्या दुनियेत घेऊन जाणारे नाटक ठरले! पुरस्कार, परीक्षण यामुळे वीस-पंचवीस वर्षे हे नाटक बालरंगभूमीवरले मैलाचे निशाण ठरले. आणखीन एक नोंद म्हणजे ‘जाड्या’ची भूमिका करणार्या दिगंबर भट याला चित्रपटात भूमिका फिट्ट शोभून दिसेल, असेही जाहीर वक्तव्य करून शाहीर दादा कोंडके यांनी या बालनाट्यांचे अनेकदा तोंड भरून कौतुकही केले.
‘लॉरेल अॅण्ड हार्डी’ या गाजलेल्या जोडगोळीने भरपेट हसविण्याची एक परंपराच उभ्या जगभरात सुरू केली. स्टॅन लॉरेल आणि ऑलिव्हर हार्डी या दोघांनी आजवर शेकडो चित्रपटातून रसिकांचे मनोरंजन केले. त्याच धर्तीवर मराठी रंगभूमीवरही काही बालनाटिकांनी आजवर धम्माल केलीय. बालप्रेक्षकांच्या या आवडत्या व्यक्तिरेखा ठरल्यात. पिढ्यान्पिढ्या उलटल्या तरीही यातली जादू काही कमी झालेली नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या बालनाट्यातून येतोय. यात तर या दोघांसमोर ‘चमच्या’ही आलाय. त्याचीही कामगिरी उत्तम आहे. शारीरिक जाडेपणा किंवा किडकिडीतपणाच्या मागली ‘गम्मत जम्मत’ बालकांना अधिकच भावते. संवादापेक्षा त्या तिघांचं रंगभूमीवरलं नुसतं असणं हेदेखील उत्स्फूर्त दाद मिळवून जातं.
आजची बच्चेकंपनी पालकांसोबतच लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटर यात गुंतलेली दिसते. बदलत्या काळात तंत्रज्ञानाच्या बाबतीत अशिक्षित असता कामा नये हे कबूल, पण त्याचा अतिरेकेही टाळला पाहिजे. अशावेळी सजग व सुजाण मराठी पालकांनी नाट्यगृहाकडे वळावे. त्यातून मानसिक, शारीरिक आजारांना काही प्रमाणात का होईना दूर ठेवता येईल आणि त्यावर हमखास उपाय म्हणजे ‘जाड्या, रड्या आणि चमच्या’ यासारखी दर्जेदार बालनाट्ये ही एक समर्थ पर्याय ठरु शकतील!
जाड्या, रड्या आणि चमच्या
मूळ लेखन : विजू नवरे
पुनर्लेखन : अशोक पावस्कर
दिग्दर्शन : गणेश पंडित
नेपथ्य : प्रसाद वालावलकर
रंगभूषा : देवा सरकारने
संगीत : रुपेश दुदम
प्रकाश : अजय अणसुरकर
निर्माते : अशोक व चित्रा पावसकर
सूत्रधार : गोट्या सावंत
निर्मिती : प्रेरणा थिएटर्स, व्ही. आर. प्रॉडक्शन्स