किरणची आई किरणला एका ज्योतिष्याकडे घेऊन गेली. किरणची पत्रिका (कुंडली) ज्योतिषाला दाखवून म्हणाली, याचं भविष्य सांगा गुरुजी. मी एकटी कामधंदा करून घर चालवते हाय. याला काय मनासारखी नोकरी मिळत नाय. हा कधी मार्गाला लागल?
ज्योतिषी म्हणाला, याला शनीची साडेसाती आहे. राहू केतू पण त्रास देतायत. याला दोनेक वर्ष वाईटच आहेत. दोन वर्षांनंतरच याचं काही नीट होऊ शकेल. तोपर्यंत तुम्ही शांत बसा आणि त्यालाही शांत बसू द्या. या काळात त्याच्यावर काही अरिष्ट ओढवू नये म्हणून आपण ग्रहशांती करू या. ग्रहशांतीसाठी येणारा खर्च त्यांनी किरणच्या आईला सांगितला.
ज्योतिषी बुवांचं म्हणणं आहे की किरणची येती दोन वर्षं वाईट आहेत. दोन वर्षांनी त्याला अनुकूल काळ येणार आहे. मंडळी, असा काही अनुकूल भविष्यकाळ आपल्यासाठी राखून ठेवलेला असू शकतो काय? ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो या मान्यतेला शास्त्रीय आधार नाही. शनी हा ग्रह आहे, पण तो असा कुणाला पिडा देतो असं समजणं मूर्खपणाचं आहे. राहू-केतू हे तर काल्पनिक आहेत. ते कुठेच नाहीत. अन् मंडळी, पुढे काय घडणार हे ज्योतिषांना माहित असतं असं मानलं तर नोटबंदी होणार, महामारी येणार, अतिरेकी हल्ला करणार, प्रचंड मोठा अपघात होणार, हे ज्योतिषी आधीच का नाही सांगत? आपल्याकडे ज्योतिषांची काही कमी आहे का?
किरण आणि किरणच्या आईला ज्योतिषाने जे सांगितले त्याने त्याचं नुकसान होईल की फायदा होईल? तुझे ग्रह सध्या चांगले नाहीत. तुला सध्या साडेसाती आहे असं जर कुणी सांगत असेल, तर माणूस उत्साहाने स्वतःची प्रगती करून घेऊ शकेल काय? तो निष्क्रिय, निराशा आणि निरुत्साहीच होईल ना?
किरण आणि किरणच्या आईनेच नव्हे, तर आपण सार्यांनीच कुणा ज्योतिषाच्या नादी न लागता आणि वेळ वाया न घालवता आपलं भवितव्य घडवायला हवं. थांबून चालणार नाही. जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आधीच ठरलेली असते आणि ती तशीच घडणार असते, असं जे बिनबुडाचं, अशास्त्रीय असं काही सांगितलं जातं त्यावर विश्वास न ठेवणंच शहाणपणाचं ठरेल.
मंडळी, आपल्याला आपलं भविष्य घडवायचं असेल तर आपण आपल्या जीवनाचं नीट नियोजन केलं पाहिजे.
एक आजोबा नातवाला सांगत होते. अरे बाबा अभ्यासाकडे लक्ष दे. वेळ वाया घालवू नकोस. आजोबा, काका मंडळी छोट्या मुलांनाच उपदेश करतात असं नाही- ते तरुणांना, आपल्यापेक्षा लहानांना उपदेश करत असतात. अशा आजोबा, काका वगैरे मंडळींवर (आजी, काकी, मावशी इ.सुद्धा) सगळे वैतागतात. म्हणतात, आम्ही करू हो आमचं सगळं नीट. तुम्ही जगलात ना तुमच्या प्लॅनिंगप्रमाणे? आता आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. उगीच कटकट करत राहू नका.
खरं तर आजोबा, काका, आजी, मावशी यांनी त्यांच्या जीवनाचं खूप नीट नियोजन केलंच होतं असं नाही. पण ते करायला हवं होतं. ते खूप महत्वाचं आहे हे त्यांच्या लक्षात आलंय आणि ते सगळ्यांनी लक्षात घ्यावं असं त्यांना वाटतंय म्हणून ते आपल्यापेक्षा धाकट्यांना सांगतायत असं असू शकतं.
माणसं उपदेश का करतात? त्यांना वाटतं की आपल्याकडे अनुभवातून आलेलं जे शहाणपण आहे त्याचा इतरांना फायदा व्हावा. त्यांच्या अनुभवातून इतरांनी शहाणं व्हावं. पण सहसा कुणी दुसर्याच्या अनुभवातून शिकत नाही. स्वत: फटके खाल्ल्याशिवाय माणसाला जगणं नीट कळत नाही.
एक वाक्य वाचलं होतं, ‘अनुभवाचा कंगवा जेव्हा माणसाच्या हाताशी लागतो, तेव्हा विंचरायला त्याच्या डोक्यावर केसच नसतात, टक्कल पडलेलं असतं. मग माणूस तो कंगवा इतरांना द्यायला जातो.’
एका नाटकात काहीसा असा संवाद होता की, बालपणी कसं जगावं हे माणसाला तरुणपणी कळतं. तरुणपणी कसं जगायला हवं होतं हे मध्यमवयीन झाल्यावर लक्षात येतं. वय झाल्यावर कसं जगायचं हे कळतं, तेव्हा बरंच वय झालेलं असतं. संपूर्ण जीवन कसं जगायला हवं हे कळतं तेव्हा जगायला जीवन फारसं उरलेलं नसतं, वार्धक्य आलेलं असतं.
माणसांना जीवनात अनेक गोष्टी करायच्या असतात. त्या करायच्या असं त्याने ठरवलेलं असतं. पण त्या ठरवण्याला अर्थ नसतो. कारण ते काम किती कालावधीत पूर्ण करणार? ते तडीला जाण्याची अंतिम तारीख काय, महिना काय हे काहीच ठरवलेलं नसतं. त्यामुळे मी भविष्यात अमुक करणार आहे, तमुक करणार आहे इतकंच आपण म्हणत राहतो.
माणसं जशी भविष्याची चिंता करत राहतात तशी भूतकाळाचा खेदही करत राहतात. आपण खूप वेळ वाया घालवला, अनेक वर्षे वाया घालवली; आपण असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, आपण खूप काळ वाया घालवायला नको होता, असं आज म्हणणं अर्थहीन आहे. आपण भूतकाळात फार काही केलं नाही, याचं दुःख करण्यातून काय हशील होणार आहे? भूतकाळ कधी बदलता येतो काय? भूतकाळात काही करणं शक्य आहे काय? नाही. आपण वर्तमानातच काही करू शकतो. भूतकाळातून आपण फक्त शिकू शकतो. आपण भूतकाळात जसे जगलो आहोत त्यात करायच्या होत्या त्या गोष्टी करू शकलो नसलो तरी काही इतर चांगल्या गोष्टी आपल्याकडून झालेल्या असू शकतात. आपण भूतकाळातील कामाबद्दल समाधानी नसू, तर त्याचाही आपल्याला फायदा घेता येईल. तो फायदा असा की ती कसर भरून काढण्यासाठी आता आपल्याला कंबर कसून कामाला लागता येईल.
ज्येष्ठ साहित्यिक आणि मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञ ना. सी. फडके यांनी त्यांच्या ‘टाकाच्या फेकी’ या पुस्तकात (मराठीतले पहिले छोटेसे मानसशास्त्रीय पुस्तक) म्हटलं आहे की भूतकाळाचा खेद आणि भविष्यकाळाचा खेद हे नवविवाहित जोडप्यासारखे आहेत. एक जाणार तिथे दुसरा येणारच. भविष्याची चिंता करत राहिलात तर भूतकाळाचा खेद वाटत राहणार आणि भूतकाळाचा खेद करत राहिलात तर भविष्याची चिंता वाटत राहणारच.
मंडळी, भूतकाळाचा खेद आणि भविष्याची चिंता यात आपण आजचा दिवसही वाया घालवत असतो, वर्तमान वाया घालवत असतो. आपण जे काही करू शकतो ते आज, या वर्तमानात. भूतकाळ जसा आहे त्याकडे सकारात्मकपणे बघायला हवं. आपण भूतकाळात नुसत्या उनाडक्या केल्या असतील, नुसते बोंबलत फिरलो असू, पण तोही एक आनंद होता ना? अनुभव होता ना? त्यातही एक मौज होती ना? ज्यांनी छान नियोजन करून करियर घडवलं त्यांनी तुम्ही मिळवलेला आनंद तर मिळवला नाहीय ना? त्यांच्यासाठी तुम्ही मिळवला तो आनंद, अनुभव लाख मोलाचा असू शकेल की.
मंडळी, कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकपणे बघता येतं. मग आज बदलता न येणार्या आपल्या भूतकाळाकडेही सकारात्मकपणे का बघता येणार नाही? त्यातल्या बर्यावाईट, अधिकउण्या जशा गोष्टी असतील त्यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन आज जोरकसपणे कामाला लागलं पाहिजे.