अनेक चुकांचे पर्यवसान भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद जेतेपद हुकण्यात झाले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय रणनीती सपशेल अपयशी ठरली. काही महत्त्वाच्या शिलेदारांची उणीवही तीव्रतेने भासली. याशिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दुसर्या टप्प्यानंतरही गुणपद्धतीमधील दोष कायम आहेत. तसेच ते महत्त्वाच्या संघांसाठीच पूरक आहेत.
– – –
इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) झिंग पुरती उतरलीही नसताना भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी इंग्लंड गाठले. पण ओव्हलवर जे घडले, त्यात अनपेक्षित असे काहीच नव्हते. आपण इंग्लंडमधील स्विंग खेळपट्ट्यांवर समर्थपणे उभे राहू शकतो, हे गेल्या काही वर्षांत भारतीय फलंदाजांनी दाखवून दिलेले आणि बळी मिळवू शकतो, हे गोलंदाजांनी सिद्ध केलेले. त्यामुळेच भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकू शकतो, ही आशा करायला हरकत नव्हती. पण अनेक चुकांचे पर्यावसन भारताचे जेतेपद हुकण्यात झाले. दोन वर्षांपूर्वी साऊदम्पटनला भारताने न्यूझीलंडकडून पत्करलेल्या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद गमावले होते. त्याचीच आता पुनरावृत्ती झाली. २०११चे एकदिवसीय प्रकारातले विश्वविजेतेपद हे आता क्षितिजासारखे वाटू लागले आहे. कारण १३ वर्षांचा काळ लोटला आहे. पण या कालावधीत आपण तिन्ही प्रकारच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे ‘चोकर्स’ हा शिक्का बसणे स्वाभाविकच आहे.
भारताची पहिली चूक झाली ती खेळपट्टी आणि वातावरण याचा अंदाजच आला नाही. हीच चूक मागील वेळेस न्यूझीलंडविरुद्धही झाली होती. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकूनही ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी देण्याचे धारिष्ट्य दाखवले. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या २५१ धावांच्या भागीदारीने भारतीय गोलंदाजांना झगडायला लावले. हेडला रोखण्यासाठी आखूड टप्प्याचे चेंडू हेच उपयुक्त अस्त्र होते. पण ते भारतीय गोलंदाजांना उशिराने सापडले, तसेच ते निष्क्रीयही ठरले. त्यामुळे पहिल्याच दिवशी भारताची सामन्यावरील पकड निसटली. आखलेल्या योजनेनुसार भारतीय गोलंदाजांनी गोलंदाजी केली नाही, हे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने मान्य केले. याचेच परिणाम सामन्याच्या अखेरच्या दिवशी दिसून आले.
इतक्या महत्त्वाच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनला का खेळवले नाही, यावर मात्र सर्वच थरांतून टीका होते आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर त्याची गोलंदाजी यशस्वी ठरते, तसाच तो चिवट फलंदाजीसाठीही ओळखला जातो. भारतीय संघात असलेला एकमेव फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा पहिल्या डावात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघात पाच डावखुरे फलंदाज असल्यामुळे अश्विनच्या असण्याचा नक्कीच फरक पडला असता. याच डाव्यांनी महत्त्वाच्या धावा केल्या. जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात पहिलेवहिले शतक झळकावून सामनावीर किताब पटकावणारा फलंदाज हेड हासुद्धा डावखुराच. भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर जसे अश्विनला न खेळवणे महागात पडल्याचे सांगतात तसेच मी कर्णधार असतो, तर ही घोडचूक कदापि केली नसती, असे स्पष्ट मत माजी कर्णधार सौरव गांगुली मांडतो. रिकी पाँटिंग, मायकेल वॉन आणि अन्य काही दिग्गजांनीही अश्विनला अंतिम ११ जणांमध्ये स्थान न दिल्याबद्दल टीका केली.
ऑस्ट्रेलियाच्या सामर्थ्यशाली वेगवान मार्यासमोर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा अंतिम सामन्यात चोख भूमिका बजावू शकले नाहीत. दुसर्या डावात ४४४ धावांचा पाठलाग करताना रोहित आणि कोहलीने काही अंशी टिकाव धरला, पण मोठ्या खेळी उभारून ते संघाला तारू शकले नाहीत. गिल आणि पुजारा तर पुरते अपयशी ठरले. यापैकी कसोटी फलंदाज ही विशेष ओळख जपणार्या पुजाराचे अपयश हे ठळकपणे जाणवते. कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सरे संघासाठी ओव्हलवर खोर्याने धावा केल्याचे आकडेवारी सांगते. याशिवाय ऑसी गोलंदाजांचा चिवटपणे सामना केल्याची अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. पण तो बाद झाला, त्या फटक्यांची निवड समाधान देणारी नक्कीच नव्हती.
भारतीय फलंदाजीत एकच सकारात्मकता होती, ती म्हणजे ‘अजिंक्य रहाणे २.०’! त्याच्या दोन डावांतील अनुक्रमे ८९ आणि ४६ या खेळी इंग्लिश वातावरणात कसे खेळावे, याचा वस्तुपाठ देणार्या ठरल्या. गेली काही वर्षे कसोटी संघापासून दुरावलेल्या अजिंक्यला ‘बीसीसीआय’चा करारसुद्धा देण्यात आला नव्हता. परंतु जिद्दीने त्याने कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवले आणि आपल्या कामगिरीतून क्रिकेट न संपल्याची त्याने ग्वाहीसुद्धा दिली. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर यांचा समावेश असलेला भारताचा वेगवान मारा ऑस्ट्रेलियाच्या कसलेल्या फलंदाजांवर अंकुश ठेवू शकला नाही. पहिल्या डावात ४६९ धावा उभारल्यानंतरच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज निर्धास्त होते. त्यानंतर दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाच्या झुंजार फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले नाहीत. गाबाच्या सामन्यात भारताने इतिहास घडवला होता. पण असे चमत्कार वारंवार घडत नाहीत. भारताला या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची उणीव तीव्रतेने भासली. पण तुमच्याकडे काय नव्हते, याला आता कोणतेच महत्त्व उरत नाही. कारण सर्व जागतिक स्पर्धांवर वर्चस्व गाजवणार्या ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदासुद्धा आत्मविश्वासाने उंचावली आहे.
कसोटी अजिंक्यपदाचे अगतिक सूत्र
पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदावर न्यूझीलंडने नाव कोरले, तर दुसर्या जेतेपदावर ऑस्ट्रेलियाने. या दोन स्पर्धांमधील महत्त्वाचा फरक म्हणजे गुणपद्धती. प्रत्येक संघाने मायदेशात आणि परदेशात तीन मालिका खेळाव्यात. त्यानंतर गुणपद्धतीनुसार दोन सर्वोत्तम संघांमध्ये त्रयस्थ ठिकाणी अंतिम सामना खेळवून जागतिक कसोटी अजिंक्यपदाची योजना आखलेली. २०१९-२०२१च्या टप्प्यात प्रत्येक मालिकेसाठी १२० गुणांची निश्चिती करण्यात आली होती. हे गुण मालिकेतील सामन्यांमध्ये समान विभाजित केले जायचे. म्हणजे पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्याच्या विजयासाठी २४ गुण, तर दोन सामन्यांच्या मालिकेत ६० गुण मिळायचे. सर्व संघांनी समप्रमाणात मालिका खेळाव्यात. त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवणारे दोन संघ जागतिक अजिंक्यपदासाठी अंतिम सामना खेळतील, अशी प्रारंभिक योजना होती. पण करोनाच्या साथीमुळे कसोटी कार्यक्रमपत्रिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अखेरीस मिळवलेल्या गुणांची टक्केवारी काढून संघांची स्थाननिश्चिती करण्यात आली. २०२१-२३च्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दुसर्या टप्प्यात पुन्हा मिळवलेल्या गुणांची टक्केवारी काढून संघांची स्थाननिश्चिती करण्यात आली. पण प्रत्येक सामन्यात मिळवलेल्या गुणांमध्ये मात्र समानता आणण्यात आली. त्यामुळे मालिका कितीही मोठी असली तरी प्रत्येक सामन्यात विजयाचे १२, अनिर्णित राहिल्यास चार आणि ‘टाय’ झाल्यास सहा गुण हा नवा नियम लागू करण्यात आला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत संघांना कमाल ६० गुण, तर दोन सामन्यांच्या मालिकेत २४ गुण आता कमावता येतात. यातून पहिल्या हंगामातील काही चुका सुधारल्या गेल्या. कोणतीही मालिका किंवा सामने रद्द झाले तरी गुणतालिकेत त्याचा थेट परिणाम साधला जात नाही. प्रत्येक संघ असमान प्रमाणात सामने खेळतो, त्या स्थितीतही नवी गुणपद्धती ही परिणामकारक ठरेल, असा दावा ‘आयसीसी’कडून करण्यात आला. पण जागतिक कसोटी अजिंक्यपदाची सध्याची गुणपद्धतीवर अद्यापही परिपूर्णतेची पावती देता येणार नाही. कारण सध्याची सूत्रे तितकी योग्य नाहीत. ‘आयसीसी’च्या अन्य विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्व संघांना समान संधी असते. त्यामुळे एखादा नवा विजेताही उदयास येऊ शकतो. पण ‘आयसीसी’चा पूर्णत: अंकुश नसल्यामुळे कसोटी मालिकांचा कारभार हा दोन राष्ट्रीय क्रिकेट संघटनांच्या चर्चेतून साध्य होतो. त्याला फक्त ‘आयसीसी’कडून मालिका कार्यक्रमपत्रिकेत स्थान दिले जाते, इतकेच.
अगदी ताज्या टप्प्याचा जरी अंदाज घेतला तरी इंग्लंडचा संघ २२, ऑस्ट्रेलिया १९, भारत १८ सामने खेळला. तर पहिल्या टप्प्यात इंग्लंड (२१), ऑस्ट्रेलिया (१९), भारत (१७), दक्षिण आप्रिâका (१६) हेच संघ अधिकाधिक कसोटी सामने खेळले. म्हणजेच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ही ‘आयसीसी’मधील ‘बिग थ्री’ राष्ट्रांचेच कसोटी क्रिकेटवरही वर्चस्व अधोरेखित होते. त्यानंतर न्यूझीलंड आणि आप्रिâकेला पुरेशी संधी मिळते. पण कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश या संघांना जागतिक कसोटी अजिंक्यपद पटकावण्यासाठी पुरेसे वातावरण मुळीच नाही, हे सत्य अधोरेखित होते. त्यामुळेच ‘आयसीसी’ने कसोटी सामन्यांचे आणि मालिकेचेही नियमन स्वत: करण्याची आवश्यकता आहे, तरच जागतिक कसोटी अजिंक्यपद खर्या अर्थाने सार्थ ठरेल.