आज ७ जून.. प्रदीप भिडे आपल्यातून निघून गेले त्याला एक वर्ष झाले.
आता मागे राहिल्या केवळ आठवणी…
मुंबईत दूरदर्शन सुरु झाला २ ऑक्टोबर १९७२ला. प्रदीप भिडे १९७४ साली दूरदर्शनवरच्या मराठी बातम्या वाचू लागले. बातम्या वाचण्यापूर्वी ‘ऐसी अक्षरे’ या दूरदर्शनच्याच प्रौढ शिक्षण कार्यक्रमात ते अधून मधून दिसत असत. तेव्हा ते २०-२१ वर्षांचे होते. ते मोठे दिसावेत म्हणून मिशा लावून ते हा कार्यक्रम करत असत. कारण त्यात ते शिक्षकाची भूमिका करत असत. ते त्यांचे शिकवणे आणि त्यांचा लहेजा प्रेक्षकांना आवडत असे. तेव्हाचे केंद्र संचालक श्री शास्त्री यांचेही लक्ष या तरुणाच्या रुबाबदार सादरीकरणाने वेधून घेतले होते. आणि त्यांनी त्याला बातम्या वाचण्याची संधी देऊ केली. भाषेवर प्रभूत्व, उत्तम आवाजाची देणगी, दृकश्राव्य माध्यमात सहज वावरण्याचा सराव यामुळे प्रदीप भिडे आणि दूरदर्शनच्या बातम्या हे समीकरण थोड्याच कालावधीत मराठी माणसांनी मनोमन स्वीकारले. ज्योत्स्ना किरपेकर, भक्ती बर्वे, अनंत भावे, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर, वासंती वर्तक ही मंडळीही लाखो प्रेक्षकांच्या भावविश्वाचा एक हिस्सा बनून गेली. पण या सगळ्यात प्रदीप भिडे हे प्रेक्षकांच्या पसंतीक्रमात कायम वरचे स्थान पटकावून असायचे.
मी हा प्रवास जवळून पाहिला आहे. प्रदीप माझा मामेभाऊ. पण आमच्यात मित्रत्वाचे नाते अधिक होते. त्यामुळे एकदा तो नोकरीला लागण्याच्या आधी आमच्याकडे फलटणला (जिल्हा-सातारा) आला असताना त्यानी आपण लवकरच दूरदर्शनला रुजू होत आहोत असे सांगितल्याचे मला आजही लख्ख आठवत आहे. जर्नालिझम हा पदवी अभ्यासक्रम त्याने नुकताच पुणे विद्यापीठातून तेव्हा पूर्ण केला होता आणि दूरदर्शनवर ३ दिवसाच्या कामाचे करारपत्र त्याला या अर्हतेवर मिळाले होते. ते तो स्वीकारणार होता. मला एवढेच तो म्हणाला, अरे हा कोर्स उत्तम आहे; तूही कर. तुला नक्की प्रसारमाध्यमात संधी मिळेल. मी त्याला विचारले, अरे पण तीनच दिवस नोकरी… पुढे काय? तेव्हा तो हसून म्हणाला होता, ‘तीन दिवस का होईना, अधिकृतपणे मुंबईत आणि तेही दूरदर्शन माध्यमात काम करायला मिळते आहे ना.. हे सध्या पुरेसे आहे’. त्याचं बोलण्यात मला एक जबरदस्त आत्मविश्वास आणि उडी घेण्याची तयारी दिसत होती. काही दिवस राहून तो पुण्याला गेला आणि मग तिथून मुंबईला. ते साल होते १९७४.
उंचेपुरे व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज, पत्रकारितेची पदवी या भांडवलावर तो मुंबईत दाखल झाला. आग्रिपाड्याच्या चाळीतल्या गर्दीत बाडबिस्तरा ठेवत तीन दिवसाचा हा पाहुणा ४७-४८ वर्षे मुंबईत राहिला; तेही सन्मानाने आणि एक सेलिब्रिटी बनून.
हा योगायोग नाही, हा नशिबाचा खेळही नाही. ही आहे त्याच्या कष्टाची, कौशल्याची, माध्यमक्षेत्रातील नीतीनियम निष्ठेने पाळल्याची पावती. दुसरी एक लक्षणीय बाब त्याच्याबद्दल सांगायची म्हणजे पुण्यात कॉलेजला येईपर्यंत तो अतिशय छोट्या खेड्यांमधून, रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधून शिकत होता. आष्टा (जिल्हा सांगली) निरा (तालुका पुरंदर, पुणे), मंचर, धामणी (तालुका आंबेगाव, पुणे) अशा गावांमधून प्राथमिक शिक्षण झालेला प्रदीप कॉलेजसाठी फर्ग्युसनला दाखल झाला. लहान गावात राहूनही वाचनाची आवड, रयतच्या शाळांमधील ग्रंथालयांमधून उत्तम पुस्तकांची उपलब्धता आणि शिक्षक असलेल्या आईवडिलांचे वाचनाचे, बोलण्याचे, वागण्याचे संस्कार त्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा भेद संपवत तो शहरी संस्कृतीचा सहज हिस्सा झाला.
फर्ग्युसन कॉलेजला असताना तो अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असे. साहित्य सहकार हा उपक्रम त्याला भाषा घडवण्यात सभाधीटपणा अंगी बाणवण्यात उपयोगी पडला. भालबा केळकर यांच्या पीडीएमध्येही तो होता .तो उत्तम कथाकथन करत असे. व. पु. काळे यांची ‘ऋतू बसंत रूठ गयी’ ही कथा तो अतिशय प्रभावीपणे सांगून श्रोत्यांना भारावून टाकत असे.
तो स्पष्ट आणि शैलीदारपणे बातम्या वाचत असे. आवाज चांगला भरदार, सुस्पष्ट, व्यक्तिमत्वही त्याला साजेसे. बातमी वाचताना त्यातील भावभावना फारशा नाटकी होणार नाहीत, याची तो काळजी घेत असे. त्या आशयाला त्याने दिलेली भावनिक किनारही प्रेक्षकांना आवडत असावी. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक माहिती बातमीच्या स्वरूपात समजून घेण्यास आवाजातील मूळ तटस्थता आणि त्याला दिलेले आवश्यक कंगोरे मदत करतात आणि यामुळे बातमीचा नेमका मथितार्थ ध्यानात येतो हे प्रदीपने मराठी प्रेक्षकांना दाखवून दिले.
घडलेली बातमी जशीच्या तशी, तिच्या नेमक्या वजनासह पेश करणे हे अवघड काम त्याने कमावलेल्या आवाजाच्या मदतीने आणि बातमीतील नेमका गाभा ओळखण्याच्या अंगभूत कौशल्याने सहज केले. पडद्यावर सतत दिसणारा चेहरा हे तर त्यांच्या लोकप्रियतेचे कारण होतेच, पण बातमीमूल्याचा योग्य आदर करणारा वृत्तवाचक हे त्याने आयुष्यभर पाळलेले तत्व त्यांना जनमानसात एक वेगळेच आदराचे स्थान देऊन गेले असावे. त्याची कारकीर्द आणि मुंबई दूरदर्शनचा प्रवास तसा हातात हात घालूनच झाला असे म्हणावे लागेल.
मुंबईत आल्यावर रत्नाकर मतकरी यांच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये तो दाखल झाला. काही एकांकिका, नाटके त्यांनी केलीही. पण अभिनय हे आपले क्षेत्र नाही हे त्याला ल्ागेच लक्षात आले आणि मग तिथे फार न रेंगाळता आपले शक्तिस्थान असलेल्या निवेदनक्षेत्रात त्याने स्वतःला झोकून दिले. या नाटकप्रेमी ग्रुपमध्ये त्याला सुजाता (कोठारे) भेटली, मैत्री झाली, सूर जुळले आणि मग वेळ न दवडता तिचे बायको हे कास्टिंग त्याने करून टाकले. ही भूमिका तिने अतिशय मनोभावे आणि कर्तव्यदक्षतेने निभावली.
नाटकातील मंडळीत राहून अभिनयात फारशी कामगिरी त्याला करता आली नसली, तरी नाटक नावाचे गारुड काय असते, नाटक कसे उभे राहते, कसे रंग भरते हे त्याने जवळून पाहिले असल्यामुळे पुढे तो अनेक वर्ष नाट्यसमीक्षक म्हणून लोकसत्तेत लिहू लागला. अतिशय उत्तम समीक्षा त्याने लिहिली. नाटकाचा चहुअंगाने विचार करणारा निःपक्ष समीक्षक म्हणून त्याने ओळख मिळवली.
प्रदीप भिडे याने दिगंत कीर्ती मिळवली, जनमानसात मानाचे पान मिळवले, हे केवळ त्याच्यामागे दूरदर्शनचे ग्लॅमर होते म्हणून नाही, तर या माणसाने अतिशय नियोजनपूर्वक आपली वाटचाल केली. अभ्यासाची, परिश्रमाची कास धरून निवेदन आणि मुलाखती या क्षेत्रात भरपूर रियाज करत तो नवी नवी क्षितिजे पार करत होता. त्याचा जनमानसातला प्रभाव आणि त्यांची अफाट लोकप्रियता पाहता हा माणूस बघता बघता दंतकथा कसा झाला याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे. एखाद्या सिनेकलावंताला मिळणारे ग्लॅमर या गृहस्थालाही मिळाले. हजारो स्वाक्षरीपुस्तकांत प्रदीप भिडे ही सही दिमाखदारपणे उमटली. उत्तम आवाज, कमालीचे प्रभावी सादरीकरण करणारी टीव्ही वृत्तनिवेदक मंडळी तेव्हाही होतीच की, आणि आजही आहेत. पण प्रदीप भिडे याच्याबद्दल वाटणारे आकर्षण वेगळेच असायचे हेच खरे.
बातम्यांबरोबर आणखी एक क्षेत्र त्यांनी गाजवले, ते रेडिओ जाहिरातीचे. १९८० ते २००० ही दोन दशके या माणसाने जाहिरात जगतात, विशेषतः रेडिओ जाहिरात क्षेत्रात अक्षरशः राज्य केले, असे म्हणायला हरकत नाही. किमान पाच हजार जाहिराती त्यांच्या नावावर आहेत. त्या काळात कधीही रेडिओ लावला; आणि तेही विविध भारती केंद्र लावले तर पाच मिनिटाच्या अवधीत भिडे यांचा पहाडी आवाज कानी पडला नाही असे कधी झाले नाही.
हे काम त्यांना सहज मिळाले नाही. जाहिरातक्षेत्रात गुणवत्ता असल्याशिवाय कुणी उभे करत नाही. सातत्यपूर्ण कामगिरी आणि वस्तू आणि सेवेच्या वैशिष्ट्यांचे ठळक दर्शन घडवणारी शब्दफेक, आवाजाची धार आणि गोलाई यांच्या मुलामा आवश्यक असतो. तो दिल्याशिवाय ग्राहकांपर्यंत तो संदेश प्रभावीपणे पोहोचत नाही हे पूरेपर ठाऊक असलेल्या या कलावंताने प्रत्येक जाहिरातीत सर्वस्व ओतले. त्यामुळे पुरुष आवाज कुणाचा घ्यायचा हा एजन्सीसमोरचा प्रश्न त्यांनी तीन दशके निकाली काढला होता.
सकाळी आठ वाजता कुलाब्यात, दुपारी तीन वाजता वरळीच्या रेडिओवाणी स्टुडिओत, रात्री नऊ वाजता खार इथं अशी कोणतीही वेळ असो, त्यांनी ती कधीही चुकवली नाही. सिंगल टेक ओके… हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. हा आवाज केवळ जाहिराती आणि बातम्या पुरता मर्यादित राहिला नाही तर ध्वनिफिती, रंगमंचीय-सांस्कृतिक कार्यक्रम, फिल्म्स डिव्हिजनचे माहितीपट, कॉर्पोरेट फिल्म्स यातही तो निनादत राहिला. कार्यक्रमांच्या उद्देशाचे भान ठेवून आवाजातील लवचिकता वापरत त्यांनी या सर्व क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध केली. साहित्य, शिक्षण सामाजिक उत्तरदायित्व याचा परीसस्पर्श लाभलेल्या भिडे यांनी मराठी भाषेवरील प्रभुत्वाच्या जोरावर एक बळकट अशी निवेदन संस्कृती आपल्याकडे रुजवली, वाढवली.
जाहिरात आणि टीव्हीच्या झगमगाटात राहूनसुद्धा त्यांनी आपली निरंजनी वृत्ती कधी काळवंडून दिली नाही. गॉसिपिंग, व्यावसायिक हिशेब चुकते करणाच्या क्ऌप्त्या अशा अभद्र परंपरांना त्यानी कधी उभे केले नाही. त्याच्याविरुद्ध कागाळ्या करणारे, डाव खेळणारे यांनाही त्यांनी आपली क्षमाशील वृत्तीने जिंकून घेतले. कुणाचा द्वेष नाही, ईर्षा नाही, शर्यतीत पुढे जाण्याची धडपड नाही. आत्मविश्वास आणि कामावर अविचल निष्ठा यामुळे या नकारात्मक गोष्टीसाठी त्याच्याकडे वेळच नसायचा.
बाळासाहेब ठाकरे असोत, कुसुमाग्रज असोत, मंगेश पाडगावकर, शांता शेळके या सर्वाना प्रदीपबद्दल एक वेगळा आदर होता. आपण आपल्या क्षेत्रातील दिग्गज असलो, तरी निवेदनक्षेत्रातील हा एक मोठा आणि भला माणूस आहे, या भावनेनेच ही मंडळी नेहेमी त्याच्याशी वागली. म्हणजे केवळ सर्वसामान्य प्रेक्षकच नव्हे, तर समाजातील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली ही लोकोत्तर व्यक्तिमत्वेही याच्यावर भरभरून प्रेम करत असत. मी कधी त्याच्याबरोबर गाडीत असलो आणि सिग्नलला गाडी थांबली की त्याच्याकडे कौतुकाने पाहणार्या नजरा त्याच्या यशस्वी वाटचालीची झलक दाखवत असत. ट्राफिक सिग्नलचा पोलीसही नमस्कार भिडे साहेब, असे म्हणून त्याला अभिवादन करत असे.
प्रदीपच्या काळात वाहिन्यांचा सुळसुळाट नव्हता. एकमेव दूरदर्शन हीच वाहिनी. तेव्हा घरटी टीव्ही सेटही नसे. वाड्यात सहसा घरमालकांकडे तो असे. इतर कोणतेही एवढे सहज मनोरंजन माध्यम उपलब्ध नसल्यामुळे निवेदिका शुभरात्री म्हणेपर्यंत प्रेक्षक मंडळी छोट्या पडद्याला डोळे लावून बसलेली असायची. मनोरंजनाच्या कार्यक्रमापाठोपाठ मराठी बातम्या भाव खाऊन जात. त्याला त्यामुळे छोट्या पडद्याबाहेरही मागणी येऊ लागली. अनेक सरकारी, सांस्कृतिक कार्यक्रमांना सूत्रसंचालक म्हणून त्याला बोलावले जायचे. ही परंपरा अगदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत सुरु होती. त्याला सरकार दरबारी मान होता, याचे कारण म्हणजे कार्यक्रमाचे गांभीर्य कमी होईल असे चुटके आणि शेरेबाजी करण्यात त्यांना अजिबात स्वारस्य नसे. सरकारी कार्यक्रमात डेकोरम सांभाळायचा असतो, प्रेक्षकांना हसवण्यासाठी अल्लड शेरेबाजी करायची नसते हे त्याला ठाऊक असायचे. कार्यक्रम रंगवायचा तो आपल्या धीरगंभीर, टणत्कार असलेल्या आवाजाच्या रंगांनी; याचे त्याला पुरेपूर भान होते.