येरे येरे पावसा, तुला देतो पैसा… कवीने गमतीखातर लिहिलेले हे बालगीत माणसांनी जगण्याचा महामंत्र म्हणून स्वीकारलेले दिसते. काम करून घेण्यासाठी कट देणे, लाच देणे, कामांच्या टेंडरमध्ये मंत्री, सरकारी ऑफिसर्स यांचे परसेंटेज ठेवणे परवलीचे झाले आहे.
तसं पाहिलं तर पावसाचे येणे किती रोमँटिक… आमच्या तरुणपणातील गाणे… ‘जिंदगी भर नहीं भुलेगी वो बरसात की रात.. एक अंजान हसीना से मुलाकात की रात..’ अल्लड मधुबाला, शायर भारत भूषण. रफीजींचे हे गीत एका पिढीची धडकन होती. मधुबालाचे अल्लड रूप, लोभस हसणं, हरवलेली नजर.. तरुण मनाला जायबंदी करायची. तद्वत अरुण दातेंनी गायलेले ‘भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसांची… धुंद वादळाची होती रात्र पावसाळी..’
हे भावगीत लागले की हरवायला व्हायचे. किंवा बावरलेली राधा.. सैरभैर होऊन म्हणतेय, रिमझिम पाऊस पडे सारखा.. यमुनेलाही पूर चढे.. पाणीच पाणी चहुकडे गं बाई गेला मोहन कुणीकडे!’ अशावेळी चिंब भिजलेली, अंगोपांगी वस्त्र चिकटलेली राधा कल्पनेच्या कॅनव्हासवर उतरलेली असे…
‘चोरी चोरी’मधलं मन्ना डे आणि लताने गायलेले राज कपूर आणि नर्गीस या अत्यंत रोमँटिक जोडीचे ‘ये रात भीगी भीगी.. ये मस्त फिदाए..’ कितीही वेळा ऐका. मन भरतच नाही. त्या वयात पडणारा रिमझिम पाऊस.. घन निळे मेघ.. किती आल्हाददायक वाटायचे. कालिदासाला सुद्धा मेघदूतासारखे महाकाव्य लिहावेसे वाटले. आणि ते मेघसुद्धा किती रसिक! शापित गंधर्वाचा निरोप त्याच्या विरही प्रेयसीला पोहोचविणारे… नाहीतर आताचे ढग ढगफुटी करून गंधर्वाच्या प्रेयसीला तिच्या महालातच तलाव करून पोहायला लावले असते.
हल्ली पाऊस पडायला लागला की आक्रस्ताळेपणाने वागतो. गरीब दुबळ्यांच्या संसारावर अक्षरश: पाणी फिरवतो. अत्यंत कष्टाने शेतकर्यांनी वाढवलेली पिकं आनंदाने डोलू लागली की हा अवकाळी राक्षसाच्या रूपात येऊन त्यावर नांगर फिरवून जमीनदोस्त करतो. महापूर आणून गावेची गावे आणि आधीच विस्कटलेले जनजीवन डूब डुब डुबवितो. मी पाहतोय, कित्येक वर्षे हे चालू आहे… हा माणसा माणसातला दुष्टावा पावसाने आत्मसात केला तरी कधी? कित्येक वर्षे आम्ही नाशिककर गोदावरीचा महापूर पहात आलो आहोत. पण त्यात आक्रस्ताळेपणा कधी जाणवला नाही. कितीतरी तरुण इंग्रजकालीन व्हिक्टोरिया पुलावरून पुरात उड्या घेऊन मस्त पोहायचे. पुराच्या पाण्याची आमच्या दुतोंड्या मारुतीच्या नाकातोंडात पाणी घालायची हौस कधीच फिटली नाही. हल्ली इतरत्र हा महापूर सुनामीसारखा गावे आणि शहरे उद्ध्वस्त करत फिरत असतो. आम्ही फक्त पौराणिक कथांतून राक्षस ऐकला, पण पाहिला नव्हता. तो बहुदा अशा महापुरांसारखा, अवकाळी पावसासारखा आणि माणूस रूपात वावरणार्या राक्षसी वृत्तीच्या राजकारणी मंडळींसारखा असावा याची पक्की खात्री वाटते. शेतकर्यांची पिके दरवर्षी मरतात… मात्र भ्रष्ट पुढार्यांची पिके तरारून वर वर येत आहेत. अधून मधून होणार्या नोटबंदीची झळ फक्त तुम्हाला आम्हाला… त्या आधीच राजकारण्यांच्या, शासकीय अधिकार्यांच्या नोटा बदललेल्या असतात. खरे तर दोन नंबरच्या धंद्यात नेकी असते. मटक्यासारखा गेम फक्त कागदी चिटोर्यावर चालतो. मंत्री तंत्री, त्यांचे सहाय्यक, परसेंटेज आधीच घेतात. ते सत्तेवर राहिले की काम होते. सत्ता वा पद गेले किंवा बदली झाली की हे लाखोंचे ‘परसेंटेज’ बुडवून मोकळे होतात.
एक वाचण्यासारखी गोष्ट आहे. एका सरदाराच्या लाचखोरीविषयी खूप तक्रारी आल्यावर राजाने त्याला बोलावले. चौकशीत तो दोषी आढळला. शिक्षा म्हणून समुद्रकिनारी असलेल्या दीपस्तंभावर रवानगी करायचे ठरविले. जेथे लाच खाण्याचा प्रश्नच नव्हता. सरदार म्हणाला, महाराज, मला कुठेही ठेवा, महिन्याभरात पोतेभर सोने आणून दाखवतो! राजा म्हणाला, ‘बघू या!’ दीपस्तंभ परिसर जंगलात होता. तेथे कोणीही जात येत नव्हते. सरदाराची एकट्याची रवानगी तेथे करण्यात आली. दुपारी एकदाच त्याला जेवण पोहोचवले जाई. महिनाभराने राजा त्या सरदाराचे हालहवाल व पोतेभर सोने पहायला दीपस्तंभाकडे गेला. सरदाराने पोतेभर सोने त्याच्या पुढे आणून ठेवले. राजा चकित झाला. राजाने विचारले, अरे भल्या गृहस्था, येथे तर कुत्रं देखील फिरकत नाही, तरी एवढे धन जमवले कसे? सरदार म्हणाला, ‘महाराज, गैरमार्गाने पैसे कमावणे आमच्या रक्तातच आहे. आता हे धन मी कसे कमावले ते सांगतो. समुद्रातून देशविदेशातील जहाजांची जा ये चालू असते. आपल्या हद्दीतून ते जाऊ लागले की मी कॅप्टनला बोलावून घेई व सांगे की राजाने मला येथील समुद्रातील महिनाभरातील लाटा मोजायचे काम सांगितले आहे. राजाला ज्योतिषाने सांगितलेय की, समुद्रातून राज्यावर संकट येणार आहे. महिनाभरातील लाटा मोजून संकट कसे येणार ते कळणार आहे. पण तुमच्या जहाजामुळे त्या लाटा विस्कटल्या गेल्यात. राजा अशा कॅप्टन्सना देहदंडाची शिक्षा करणार आहे. अनेक कॅप्टन घाबरून तडजोड मूल्य देऊन पळ काढतात.
राजा म्हणाला, ‘थांब, मी तुला देहदंडाची शिक्षा देतो.. यावर सरदार म्हणाला, कितीजणांना देहदंड देणार..? हजारो आहेत असे अधिकारी, व्यापारी, जमीनदार इतकेच काय, तुमचे शिपाईसुद्धा मुद्रा घेतल्याशिवाय आपणास भेटावयास आलेल्या कुणाला आत सोडत नाहीत. राजा दिङमूढ झाला. सध्या लोकशाहीत राजेच खोकेबहाद्दर बनलेत ना!
ऋतू बदलतात तसे आमची व्यंगचित्रे आणि विषय त्याच्यावर आधारित राहतात. पावसाळ्यात पावसावरचे विषय, त्यात माणसांची ससेहोलपट, महापूर, तरुण तरुणींचे पावसात भिजणे वगैरे उन्हाळ्यात तप्ततेविषयी तर हिवाळ्यात गुलाबी थंडीविषयी. इतरत्र लेखात अशी चित्रे आहेतच. एक किस्सा आठवतो, एका व्यक्तीचा. पंचवीस वर्षानंतर केसचा निकाल त्याच्या बाजूने लागतो. जज्ज स्वतः त्याचे अभिनंदन करतात. म्हातारा झालेला अशील त्यांना आशीर्वाद देतो, ‘सर तुमचे प्रमोशन लवकर हवालदार म्हणून होवो!’ जज्ज म्हणतात, ‘अहो, हवालदारापेक्षा माझे पद मोठे आहे!’
असेलही, पण मला हवालदार मोठा आणि भला माणूस वाटतो. या दीर्घकाळ चाललेल्या केसच्या दरम्यान माझे घरदार, शेत, जमीन, रोकड सर्व पणास लागले. मी कंगाल झालो. त्या सज्जन हवालदाराने अगदी सुरुवातीला जागीच प्रकरण मिटविण्यासाठी फक्त दहा हजार रुपये माझ्याकडे मागितले होते. तेव्हा मला वाटलं होतं… न्यायाचा मार्ग उचित व सोपा असेल…!