पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान आणि त्यांच्या काळात जागतिक पातळीवर खरोखरीच ठसा उमटवलेले नेते. अलिप्ततावादाच्या चळवळीचे एक बिनीचे शिलेदार. विद्वान आणि आधुनिक विचारांच्या नेहरूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणालाही मिठ्या मारायला न जाताही खरीखुरी मान्यता होती. मात्र, जगात शांतता, सौहार्द, सहजीवन, प्रेम, बंधुभाव यांची शिकवण देत असलेल्या पंडितजींच्या त्या शांतिदूताच्या झग्याआड आपल्या देशातला परस्परविसंवादाचा, द्वेषाचा, अशांतीचा, शत्रुभावाचा अंधार दडलेला होता… पं. नेहरू हे देशाला आधुनिकतेच्या, धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील नेते होते. आज नेहरू फोबिया झाल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक अपयशाचे खापर नेहरूंवर फोडणारे आणि स्वत:ला जगाने थेट विश्वगुरू म्हणूनच स्वीकारावे, म्हणून केविलवाणी धडपड करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्माण करण्यासाठी परदेशांत जातात तेव्हा महात्मा गांधींचे नाव घेतात, भारत ही जगातली पहिली लोकशाही आहे, अशी धादांत थाप मारतात, मूल्याधिष्ठित राजकारणाचे गोडवे गातात, पण प्रत्यक्षात त्यांच्या डिझायनर कपड्यांआड दडलेला अंध:कार सगळ्या जगाला दिसतो आहे… शिवाय हा अंध:कार त्यांनी, त्यांच्या पक्षाने आणि त्यांच्या विचारधारेनेच निर्माण केलेला आहे, हे जगापासून लपून राहिलेले नाही.