राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री माननीय संजयराव शिरसाट यांच्या खात्याचा ४१० कोटींचा निधी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या खात्यात वळवल्यामुळे शिरसाट साहेबांचा झालेला संताप अद्याप शांत झालेला दिसत नाही. माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या हासुद्धा शिरसाट साहेबांच्यावर झालेल्या अन्यायामुळे बिथरलाय. त्यामुळे मीच त्याला सांगितलं की बिकट परिस्थितीत सापडलेल्या शिरसाटांचं धीर देऊन सांत्वन करण्यासाठी तू त्यांच्या ७२व्या मजल्यावरल्या घरी जा. लवकरात लवकर तिथे जाऊन त्यांचे विचार जाणून घे. आपण ती मुलाखत जनतेच्या माहितीसाठी व्हायरल करू. पोक्या माझी आज्ञा प्रमाण मानून ७२व्या मजल्यावर गेला व त्यांची मुलाखत घेऊन सुखरूप परत आला. तीच ही मुलाखत…
– नमस्कार शिरसाट साहेब.
– इकडे सगळे चमत्कार होत असताना नमस्कार कसला करतोस? अरे, मी काय कुणाच्या बापाचं खाल्लं होतं काय? आणि एवढे मंत्री असून मीच सापडलो का यांना लुबाडायला? पार कफल्लक करून टाकलंय यांनी मला आणि माझ्या लाडक्या खात्याला.
– असं काय झालं शिरसाट साहेब?
– अरे ती! मोहिनी घातलीय तिने सगळ्यांवर. साला, आम्हाला कधी भेटायला मिळालं नाही त्या अमित शहांना. आणि ते या बाईसाहेबांना आणि तिच्या पिताश्रींना भेटायला त्यांच्या घरी जातात! त्याशिवाय तिथे जेवण करतात! सगळंच फार विचित्र आहे पोक्या.
– पण त्या जेवणाचा आणि तुमच्या खात्याचे पैसे त्या अदिती मॅडमच्या खात्यात वळवले याचा काय संबंध?
– तुला माहीत नाही पोक्या. त्यांच्या पक्षाची ती कुटील नीतीच आहे. एखाद्याला हरबर्याच्या झाडावर चढवायचा आणि नंतर त्याला पाडायचा. आमच्या शिंदे साहेबांचं काय केलं यांनी?
– ते सगळं सगळ्यांना माहीताय. तुम्ही त्या तुमच्या पळवलेल्या निधीबद्दल बोला.
– अरे बोला म्हणजे काय, अंगाचा तीळपापड झालाय माझ्या. कुणाचं कसलं आणि कशासाठी लाड करताय तुम्ही?
– पण त्यांनी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे कमी पडत होते म्हणूनच घेतले ना तुमच्या खात्यामधले? खरं म्हणजे तुम्ही आनंदाने त्याला मान्यता देऊन त्याचं श्रेय घ्यायला पाहिजे होतं, असं तुमच्या गटाचे सहकारीही म्हणताहेत.
– हरामखोर आहेत लेकाचे. इथे माझ्या खात्यावर डल्ला मारण्याचा विषय आहे. त्याला नको ते फाटे फोडू नकोस. आता कुठून आणू मी पैसे? भिकारी केलं रे मला यांनी भिकारी. आणि मला नापास करून तिला दिलाय पहिला नंबर.
– अहो असं कसं म्हणता साहेब. तुमच्या खात्यात असलेल्या रकमेची आकडेवारी पेपरात आलीय, ती खोटी आहे का?
– मी असले पेपर वाचत नाही. काय वाटेल ते लिहितात ते.
– हो, खरंच आहे. तुम्हाला त्यांनी ७२व्या मजल्यावरचा बडबड्या म्हटलंय. आणि तुमच्या खात्यातल्या शिल्लक रकमेची आकडेवारीही दिलीय, तीही खोटीच असणार.
– तेच तर म्हणतोय मी. केवळ मजा म्हणून ती आकडेवारी मला सांगितलीस तरी चालेल.
– मग ऐका. त्यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या सामाजिक न्याय खात्याचं वार्षिक अंदाजपत्रक अंदाजे २५ हजार कोटींचं असतं. त्यातले २२ हजार कोटी केंद्र सरकारकडून मिळतात. अडीच हजार कोटी राज्य सरकारकडून मिळतात. त्यातले अदिती मॅडमच्या बालकल्याण खात्यात वळवलेले ४१० कोटी वजा केले तरी २१०० कोटी यंदा तुमच्या सामाजिक न्याय खात्याला मिळाले आहेत. सरकारच्या पहिल्या वर्षातल्या पहिल्या शंभर दिवसांत त्यातले तुम्ही किती कोटी, कुठल्या विकासकामांवर खर्च केले याचा हिशोब मागत होते ते. म्हणूनच १०० दिवसांच्या तुमच्या प्रगती पुस्तकात तुम्हाला नापास केल्याचं जाहीर केलंय त्यांनी. एकाने तर तुमचं ते प्रगती पुस्तक नसून अधोगती पुस्तक असल्याचं म्हटलंय. यावर काय बोलणार तुम्ही?
– सगळं खोटं आहे ते. माझी कोंडी करण्याचा डाव आहे हा अर्थमंत्री अजितदादा आणि त्यांच्या पक्षाचा, आणि सीएमचा पाठिंबा असल्याशिवाय ते असं करूच शकत नाहीत. हे दोघेही मुळावर उठलेत आमच्या पक्षाच्या. पाहवत नाही त्यांना शिंदेसाहेबांची आणि माझी लोकप्रियता.
– पण त्यावेळी तुम्हीच शिंदे साहेबांच्या लाडकी बहीण योजनेची मनापासून पाठराखण केली होती ना! आता निधी अदिती मॅडमच्या खात्याकडे वळवल्यावर त्या बहिणींसाठी, शिंदे साहेबांसाठी एवढा क्षुल्लक त्याग करायची तयारी हवी होती तुमच्या मनाची.
– तुला माहीत नाही पोक्या पैशाची किंमत. गेल्या २० वर्षांत त्यासाठी जिवाचं रान केलंय मी.
– तरीही केवळ ४१० कोटी तुमच्या खात्यातून कमी झाले म्हणून तुमचं काहीही बिघडणार नाही. मग ‘माझे पाय तोडले आणि मला पळ सांगतात’ असं म्हणायला नको होतं तुम्ही. अजूनही भरपूर रक्कम आहे तुमच्या खात्यात. ती कुणाच्या विकासासाठी खर्च करायची ते मात्र तुमच्या हातात आहे. तुमचा उत्तरोत्तर विकास होऊन तुम्ही ४०० मजली टॉवरमध्ये ३९९व्या मजल्यावर राहायला जावं असं माझ्यासारख्या तुमच्या चाहत्याला वाटतं.
– अरे, जाईनच. आजही मी लिफ्टने खाली जातोच असं नाही. ते खिडकीपाशी ठेवलेलं पॅराशूट पाहिलंस? ते उघडून, पाठीला बांधून विहरत विहरत खिडकीतून खाली लांबवर जातो. तिथे गाडी असतेच. तिथून गाठतो मंत्रालय. विल पॉवर पाहिजे विल पॉवर!
– असेच कायम उडत रहा साहेब. चल उड जा रे पंछीऽऽऽ