पारंपारिक बंदिस्त सादरीकरणाच्या सीमारेषा ओलांडून नव्या वळणावरून मानवाच्या जीवनातील वास्तवावर भाष्य करणार्या नाट्यकृती समाजाचा आरसा म्हणून काम करतात. अशा आविष्कारात ‘प्रायोगिकत्व’ गच्च भरलेलं असतं. सादरीकरणाच्या या शैलीला आज मानाचे पान मिळाले आहे. त्यातून व्यावसायिक आणि प्रायोगिक यातील दरीही काही प्रमाणात बुजली जातेय. प्रायोगिक रंगभूमी अधिक सशक्त करण्याचे कार्य अनेक संस्था प्रामाणिकपणे करताना दिसताहेत. त्यात मुंबई शहराला जुळून असलेल्या वसई-विरार, भाईंदर या पट्ट्यातील रंगकर्मीही तळमळीने नवी निर्मिती घडविताना दिसत आहेत. ही जणू नाटकवाल्यांची हक्काची प्रयोगशाळाच असते. मुंबईत पूर्वी छबिलदास शाळा, वालचंद टेरेस, भुलाभाई देसाई इन्स्टिट्यूट, पृथ्वी थिएटर हे प्रायोगिक नाट्यमंडळींचं माहेरघरच होतं. काळ बदलला. आता ते उपनगरात आणि त्याही पुढे सरकत आहे. छबिलदासचे दरवाजे बंद झाले ही तशी शोकांतिकाच होती. नव्या रंगपिढीचे त्यातून नुकसानच झाले.
ही प्रायोगिक चळवळ नव्या वाटा शोधत आहे. ‘कुणी घर देता का घर?’ याचं उत्तर ‘मेन नाट्यगृहाचे मिनी थिएटर’ हे ठरू शकत नाही. कारण त्यात नाट्यखेळ बहरावा लागतो. तसे पोषक वातावरण जे छबिलदासमध्ये होतं ते आज अभावानेच अन्यत्र दिसतंय… हक्काचा रंगमंच आणि सादरीकरणातील शैली यासोबत वेळेची मर्यादाही प्रामुख्याने आजकाल आहे. प्रयोगाच्या वेळेचे आकुंचन विसरता येणार नाही. एकेकाळी चार अंकी असलेली नाटके तीन आणि आता दोन अंकी बनली आहेत. आता तर दीर्घांकाचा जमाना आलाय. एक दीड तासांचं नाट्य उभं केलं जातं. किमान डझनभर दीर्घांक रसिकांच्या प्रतीक्षेत दिसताहेत. त्यात लेखिका नीरजा वर्तक लिखित आणि आयुष आशिष भिडे दिग्दर्शित ‘घोर’ हे नाटक जन्म आणि मृत्यू याचं उत्तर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. जे विलक्षणच म्हणावं लागेल.
पडदा उघडतो. अंधारातल्या प्रकाशात धूर दाटलेला. रातकिडे आणि लाकडं जळण्याचा आवाज. गूढ तसंच थरार उडविणारं नेपथ्य नजरेत पडतं. चक्क स्मशान! हादरून सोडत. एका कोपर्यात मृतदेहाच्या विल्हेवाटासाठी अग्नी पेटलेला. दुसरीकडे मंदिराची कमान. मध्यभागी गोणीत भरलेली लाकडे. ‘जो दिख रहा है वो शिव है; जो जल रहा है वो शव है!’ अशी पाटी लटकविलेली. त्यात ‘बम् बम् बोलो’ म्हणत भयानक दिसणारा अघोरीबाबा. त्याचा वावर या स्मशानात आहे. जसे त्याचे हक्काचे घरच. चिलीम पेटवून तो काही मंत्र म्हणतोय. इतक्यात प्रेक्षकांमधून एक प्रेत आणलं जातं. चौघेजण खांदा देताहेत. शोकाकुल नजरा. अग्नी देण्यासाठी ते ठेवण्यात येतं… आणि मृत्युंजय मंत्र घुमू लागतो. अघोरीबाबा एक कवटी घेऊन काही गूढविद्या जणू करतोय. भस्म, भलीमोठी काठी यासह तंत्रमंत्र करतो. थरार जसा उभ्या रंगमंचावर आणि प्रेक्षकगृहात पसरलेला…
सायली नावाची एक बिनधास्त तरुणी स्मशानात अचानक प्रवेश करते. अघोरीबाबा प्रेत जळण्यासाठी लाकडांची जुळवाजुळव करतोय. तरुणी मोबाईलवर त्याच्या मित्राशी संवाद साधतेय. मॉडर्न लुक, हातात बॅग. परदेशातून आल्याचे संकेत मिळतात. तिला इंदापूरला जायचं आहे. पण तिला घ्यायला येणारा मित्र पोहोचू शकलेला नाही. मित्राची आई सिरियस असल्याने तो तिला डॉक्टरकडे घेऊन गेलाय. इथे सायली ड्रायव्हरला टाळून स्वत: गाडी चालवत आलीय. टायर पंक्चर झाल्याने ती स्मशानात शिरलीय. बाबा आणि तरुणी यांच्यात संवाद सुरू होतो. साधा संवाद गूढ विषयांपर्यंत पोहचतो. जगण्याचं तत्वज्ञान बाबा मांडतो. त्यामुळे काहीवेळा सायलीही सुन्नही होते. जन्म, शिक्षण, नोकरी, प्रेम, लग्न सारं काही मिळालं, तरी मृत्यू कधी येईल ते सांगता येत नाही. मृत्यू अमर आहे. तो टाळता येत नाही. त्यापासून कुणी पळ काढू शकत नाही. जगताना अपेक्षा आणि इच्छा यात फरक आहे… वगैरे.. वगैरे.. दोघांचे सवाल जवाब, मार्मिक उत्तरे सुरू आहेत. त्यात दूरवरून कुत्रे आणि एका बाईचा आवाज येतो. एक मध्यमवयीन बाई इथे येते. कुत्रे तिच्या मागे लागले आहेत. चपलेने त्यांना मारण्याचा प्रयत्न ती करते. तिचा आणि बाबांचा चांगला परिचय आहे. ती रोज स्मशानात येते. बाबांना रोज जेवण आणते. पण आज तिनं जेवण आणलेलं नाही. या अशिक्षित बाईचा नवरा रोज दारू पितो. तिला बेदम मारतो. तिची स्वतंत्र कथा आहे.
या स्मशानात योगायोगानं आलेल्या दोन वाटेवरल्या या दोघीजणी. ज्या उत्तरार्धात अधिक प्रकाशात येतात. पहिली तरुणी सायली. ‘नवरा परमेश्वर’ वगैरे कल्पनेपासून दूर असणारी. लग्न म्हणजे चक्क साथीदार ‘बुक’ करण्याचा कृत्रिम प्रकार असल्याची समजणारी. हवा तसा मुलगा मिळत नाही, तोपर्यंत ‘अफेअर’ करत राहणं आवश्यक आहे, असं तिचं तर्कशास्त्र आहे. दारू, सिगारेट आणि मुक्त सेक्सचं खुलेआम समर्थन ती करतेय. आईच्या नाजूक नात्यापासून तशी ती दुरावलेली. एका कौटुंबिक भावनिक कोंडीत अडकलेली. स्मशानात आल्यानंतर तिच्यात कोणता कायापालट होतो हे अनुभवणं नाट्यपूर्ण ठरतंय.
दुसरी बाई धुणीभांडी करून मुलगी आणि दारुडा नवरा यांचा सांभाळ करणारी टिपिकल कामवाली बाई. मुलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र धडपड करतेय. जगतेय ती फक्त मुलीच्या भवितव्यासाठी. तिला बेदम मारहाण करणारा क्रूर नवरा तिच्या जीवनातला खलनायक ठरतो. शेवट याच बाईच्या अस्तित्वावर नाट्य घडतं. जे हादरून सोडणारं.
या दोघींची कथा-व्यथा स्मशानाच्या पार्श्वभूमीवर अलगद उलगडत जातेय आणि त्याला साक्षीदार आहे तो शंकराचा चौथा अवतार असलेल्या अघोरी परंपरेतील अघोरीबाबा! याचं तत्वज्ञान भन्नाट आहे. जो दोघांवर वेळोवेळी भाष्य करतो. ‘शेवटी एकटे जाणंच प्रत्येकाच्या नशिबात असतं. मृत्यूनंतरही आत्मा जिवंत असतो. नंतर मोक्ष. त्यानंतरच जगातून मुक्तता होते, असं बाबा सांगतो. संपूर्ण नाटकात बाबाचा वावर हा गूढता वाढविणारा आणि तत्वज्ञान कथन करणारा आहे.
यात चार कलाकार. त्यात एका प्रवेशासाठी बालकलाकार आहे. तिघांभोवती नाट्य खेळवत ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. एकांकिकेपासूनची ‘टीम’ याही प्रयोगात कायम आहे. त्यामुळे कलाकारांचं ‘ट्युनिंग’ मस्त जमलं आहे. सायली गावंड हिने सायलीची भूमिका मोकळेपणानं केलीय. स्मशानातल्या वावरात मोकळेपणा दिसतो. संवादफेक व देहबोली भूमिकेला शोभून दिसते. नाटककार आणि ‘बाई’ ही भूमिका नीरजा वर्तक यांची आहे. बोलीभाषेमुळे काहीदा हशे वसूल होत असले तरी गंभीर संवादांत हेलावून सोडणारा अभिनयही नजरेत भरतो. शेवटचा प्रसंग हा नाट्याचा उत्कर्षबिंदू जो नेमकेपणानं सादर होतो. अघोरीबाबाच्या भूमिकेत नाटकाचे दिग्दर्शक आयुष आशिष भिडे असून त्यांनी या भूमिकेत बाजी मारली आहे. खिळवून ठेवले आहे. त्यांच्याकडे वडिलांकडून नाटकाचा वारसा चालून आलाय. मॉडेलिंग, लघुचित्रपट, मालिका, नाटके यात वावर असणारा हा गुणी अभिनेता. अघोरीबाबाची चाल, नजर, संवादफेक यातून गूढता उभी करण्यात आयुष यशस्वी झालाय. ‘स्टार प्रवाह’ मधील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या चित्रिकरणात बिझी असूनही प्रायोगिक नाटकांसाठी तो वेळ राखून ठेवतोय, हे नोंद घेण्याजोगे. कवटी आणि काठी या दोघांशी त्याने साधलेली जवळीक घबराट उडविणारी ठरते. एका हटके भूमिकेचं त्यानं सोनं केलंय. एका प्रसंगासाठी शर्वी वर्तक हिने मुलगी म्हणून चांगले संवाद म्हटले आहेत.
नेपथ्याला ‘टाळी’ घेणारी काही नाटके रसिकांनी अनुभवली आहेत. इथेही हक्काने ‘टाळी’ मिळाली असती, पण स्मशान हे टाळ्या देण्याचे स्थळ नसावे म्हणून रसिकांनी आश्चर्य, घबराट व्यक्त करणे पसंत केले. नवनवीन ‘प्रयोग’ हे नेपथ्यरचनेतून सुरू आहेत. यातील स्मशानाच्या नेपथ्यात अस्सलपणा जाणवतो. ‘मिनी थिएटर’मध्ये प्रयोग होत असल्यानेही अनुभवाचा थेटपणा व जवळीकही साधली जातेय. जमिनीवर विखुरलेला पालापाचोळा, लटकत्या फांद्या, जीर्ण कमानी, हे सारं काही वातावरणनिर्मिती करणारे. हालचालींना पुरेशी जागाही केलीय. नेपथ्यकार यश आणि शुभम जाधव या दोघांनी चांगले काम केले आहे.
दीर्घांकभर भगभगत्या चितेवरला अग्नी, अंधार आणि त्यामागला अंधुक प्रकाशाचा खेळ, त्यासोबतच जळत्या लाकडाचे ध्वनी, मंत्रांचे उच्चार अन् त्याचे प्रतिध्वनी, पावलांचे, पक्षांचे कर्कश्श आवाज, गूढतेकडे घेऊन जाणारे पडघम, या तांत्रिक बाजू प्रकाशयोजनाकार कैलाश ठाकूर आणि पार्श्वसंगीतकार मिहीर जोग यांनी विचारपूर्वक सांभाळल्या आहेत. त्याचा एकत्रित परिणाम नाट्यावर होत आहे. आविष्कार चळवळीशी बांधिलकी असणारे ज्येष्ठ कल्पक रंगभूषाकार शरद विचारे यांनी अघोरीबाबा रंगवलाय. जटा, भस्म आणि पूर्ण अंगभर काळी छटा यामुळे भयानकता व्यक्तिरेखेत भरगच्च भरलीय. गौतमी दातार हिने पात्रांना दिलेली वेशभूषा समर्पक असून त्याची रंगसंगतीही उत्तम.
प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीला एकांकिका स्पर्धेने अनेक सशक्त संहिता तसेच रंगकर्मी दिलेत. या नाट्याचे मूळदेखील एकांकिका स्पर्धेचे आहे. वसई कला क्रीडा केंद्राच्या एकांकिका स्पर्धेत ही एकांकिका गाजलेली तसेच अनेक पुरस्कार पटकावलेली. त्याचे दोन अंकी नाटक करण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि दीर्घांकाने ती जागा घेतली. या निर्मितीमागे निर्माते सारे रंगकर्मीच आहेत. स्वत: तिकीटविक्री करुन आजवर पाच प्रयोग हाऊसफुल्ल केलेत. कथानकाची मूळ संकल्पना आयुष भिडे याची आहे. त्यावर नीरजा वर्तक यांनी संवादाचा साज चढविला आहे.
हल्लीच्या मुख्य धारेतल्या नाटकांचे विषय हे बहुतेकवेळा कुटुंबाभोवतीच गिरक्या घेतात. ‘घराचा दिवाणखाना’ जणू पक्का ठरलेला. इथेही जरी स्थळ ‘स्मशान’ असले तरी मूळ चर्चेचा विषय हा दोघीजणींच्या घरचा आहे. कौटुंबिक ताणतणावावर भाष्य आहे. शेवट मृत्यू अटळ आहेच, पण दुसरीकडे राजकीय, सामाजिक, जागतिक, प्रश्नही आहेत. मराठी नाटककारांना कधीही तसा विषयांचा तुटवडा पडलेला नाही. जादूटोणा, बळीप्रथा यांसारख्या अनिष्ट रूढी आजही महाराष्ट्रात खेडोपाड्यात आहे. अंधश्रद्धेचा विळखा सुटलेला नाही. विशेषत: कथानकाच्या ओघात अघोरी पंथ, बुवाबाजी याकडे कथानक वळेल असे वाटत होते. पण ते झाले नाही. असो. संवाद ठसकेबाज, नेमकेपणा असणारे आहेत. दोघींची स्वगते, व्यथा या संहितेतून उत्तम आकाराला येतात. त्या अपेक्षा वाढविणार्या आहेत. हादरून सोडणारी एक स्मशानाची भेट यातून घडते हे मान्य करावे लागेल.
पारंपारिक मूल्यांना प्रश्न विचारणार्या युवा पिढीचा हा ‘फ्रेश’ आविष्कारच! व्यवस्थेला भिडण्याची प्रवृत्ती या दोघांमध्य्ो आहे. विषय, आशय हा फक्त एसी हॉलमध्ये व्यक्त न करता तो थेट स्मशानात करण्यात काय हरकत आहे, याचं उत्तरच यातून दिलंय. एकूणच सादरीकरणातील प्रायोगिकता व वेगळी शैली ही नजरेत भरते.
महिलांच्या भावभावना अधोरेखित करणारं काळाच्या कसोटीवर उतरलेले ‘घोर’ हे नाट्य एका वळणावर रसिकांना निश्चितच घेऊन जाईल, यात शंकाच नाही.
घोर
लेखन : नीरजा वर्तक
दिग्दर्शन : आयुष अशिष भिडे
संगीत : मिहीर जोग
नेपथ्य : यश आणि शुभम जाधव
रंगभूषा : शरद विचारे
वेशभूषा : गौतमी दातार
प्रकाश : कैलाश ठाकूर
निर्मिती : आम्ही रंगकर्मी