त्याचं नाव पक्या. राहणार वाटगावचा. एक नावाजलेल्या कुटुंबातला. पूर्वी एकत्रित कुटुंबांची संपत्ती, मालमत्ता, जमीनजुमला कोण्या गोर्या सावकाराने धूर्तपणे स्वतःच्या नावावर करवून घेतला होता. वर त्याच कुटुंबांला वेठबिगार बनवून त्यांच्याकडून सदर जमीन कसून त्याने छळ मांडलेला. पण पुढेमागे त्या कुटुंबात काही पोरं शिकून शहाणी झाली. कर्ती झाली. व्यवहार, आणि जगरहाटी बघताना स्वतःवर होणार्या अत्याचाराची, सावकाराच्या पिळवणुकीची त्यांना जाणीव व्हायला लागली. तशी ती सावकाराशी बोलू लागली, भांडू लागली. स्वतःच्या जमीनजुमल्याच्या, संपत्तीच्या सोडवणुकीसाठी ती सावकाराशी संघर्ष करू लागली. यथावकाश त्या घरात पक्याचा जन्म झाला.
पक्या तसा ऐतोबा. मोठे कर्तेधर्ते करणार. पक्या आयतं खाणार. त्यापेक्षा लहानग्यांना परिस्थितीची चांगली जाण आणि भान असताना पक्या मात्र हुल्लडबाज, बेफिकीर. जरा सावकाराच्या ओंजळीने पाणी पिणारा. घरभेदी. सावकार त्याच्या छानछौकीवर खर्च करी, तो मागल्या हाताने कुटुंबाकडून वसूल करी. त्यास उगा मान देऊन चारचौघांत मिरवी आणि कुटुंबांची अवहेलना करी. कुटुंबास सावकाराचं वागणं परिचित होतं नि पक्याचं वर्तन खटकत होतं. पण पक्या सावकाराच्या पुरता आहारी गेला होता.
म्हणजे कुटुंब जमीनजुमला सोडवण्यासाठी संघर्ष करीत असताना तो उलट त्यांच्याकडे त्याच्या मतास अधिकचं मोल मागत होता. घरात कारभारात त्याला अधिकचं निर्णय स्वातंत्र्य, जमीनजुमला आणि संपत्तीच्या संभाव्य लाभात अधिकचा वाटा असं बरंच काही तो मागत होता. पण संघर्षात त्याचा सहभाग मुळीच नव्हता. तो सावकाराविरुद्ध चकार शब्दही काढत नसे. उलट सावकाराघरच्या मेजवान्या झोडण्यास त्याला विशेष आमंत्रण असे आणि त्यात सहभागी होणं तो सन्मान समजे.
कालपरत्वे सावकाराला त्या कुटुंबास जमीनजुमला आणि इतर मालमत्ता परत करण्यातली अपरिहार्यता कळू लागली होती. पण त्या कुटुंबांच्या जमिनीस भौगोलिकदृष्ट्या असलेलं महत्त्व बघता पुढील भविष्यातील हितसंबंध राखण्यासाठी काही जमीन आपल्या किंवा इतरांच्या नियंत्रणाखाली असणं त्यास गरजेचं वाटू लागलं होतं. त्यात मधली वाटणी मिळाल्यास अर्धा गाव कह्यात ठेवणं आणि सगळ्या क्षेत्रावर नजर ठेवणं सोपं जाणार होतं. आता संपूर्ण जमीनजुमला कुटुंबास परत देण्याची वेळ येऊन ठेपली होती. अश्यात ह्या मधल्या वाटण्या परत जाणार होत्या. त्यामुळे सावकाराने आणि त्याच्या मित्रांनी पक्याला पुरतं फितवलं. त्याच्या उपासनापद्धतीच्या वेगळेपणामुळे त्याच्यावर अन्याय होईल ही भीती सावकार आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या गळी उतरवली व त्याला त्या कुटुंबातून वेगळी वाटणी मागण्याची मागणी रेटण्यास सांगितलं. प्रसंगी त्यासाठी भांडण्यास तयार केलं. गोर्या सावकाराच्या पुरत्या कह्यात गेलेला पक्या जमीनजुमला सावकाराकडून परत मिळण्याआधीच कुटुंबाशी ज्यादाच्या वाटणीसाठी भांडू लागला. प्रसंगी पक्या कुरापतींवर, भांडणावर, मारामारीवर उतरला. आधी वाटपावर तयार नसणारं कुटुंब पक्याच्या आगळीकीने त्रस्त होऊन नाईलाजाने का होईना, वाटपावर राजी झालं. पण त्याच वेळी कुटुंबातील कर्ते लोकं वाटपातील पक्याच्या ज्यादा हिश्श्याच्या मागणीला केराची टोपली दाखवून मोकळे झाले व सरस नीरस वाटप करत त्याच्या हिश्श्याची जमीन त्यास दिली. त्याने पक्याचा तिळपापड झाला. तो अधिकची जमीन आणि मिळालेल्या जमिनीस जोडणारा हमरस्ता द्यावा म्हणून हट्ट धरून बसला. पण कुटुंबातील समंजस कर्त्या मंडळींनी त्यास ठामपणे नकार दिला. त्यामुळे आणि अपेक्षेपेक्षा कमी मिळालेल्या हिश्श्यामुळे नाखूष होऊन पक्याने उत्तरेचं एक तुकडं दांडगाईने बळकावू पाहिलं. कुटुंबाने त्यावर शांतपणे ते क्षेत्र सोडण्यास सुचवलं व काही हिस्सा कुटुंबाच्या ताब्यात घेतला. पक्याने ते क्षेत्र सोडण्याऐवजी प्रथम सावकार आणि मागाहून सावकाराच्या नियंत्रणातील पंचांकडे त्याविरुद्ध तक्रार केली.
पण पक्याच्या क्षेत्रात वावरण्याची मोकळीक आणि स्वतंत्र झालेलं कुटुंब यांचा गावात वाढलेला मान बघता सावकाराने कुठल्याही एक गटास नाराज न करता, सर्वांशी चांगले संबंध बनवले, टिकवले, वाढवले. काही काळाने त्याचा मित्र ‘उसा’शेठ याने त्याची जागा घेतली, तो पक्याच्या हितासाठी उभा ठाकला. त्याला त्याआडून अर्थातच त्याला त्याचा दीर्घकालीन स्वार्थ साधायचा होता.
जमीनजुमला आणि गेलेली मालमत्ता परत मिळाल्यावर कुटुंब प्रगतीच्या वाटेवर चालू लागलं. पूर्ण कुटुंबातील श्रेष्ठ आणि तज्ज्ञ कर्त्या मंडळींना गावात विशेष मान आणि स्थान मिळालं. कुटुंब झपाट्याने प्रगती करत नजरेत भरेल असं वैभव, प्रतिष्ठा मिळवू लागलं. इकडे पक्या काही दिवसांत पुन्हा उत्तरेच्या तुकड्याच्या आशेने झुरू लागला. ते मिळण्यासाठी आणि कुटुंबाकडून ते मिळवण्यासाठी केवळ लष्करी शिस्त, ताकद उपयोगी पडेल, असा समज करून घेऊन पक्या कवायती करू लागला. नवीन संसारातील अधिकचा खर्च खुराकावर करू लागला. त्याच्या ह्या वेडापायी त्याच्या घरात अठराविश्व दारिद्र्य पसरलं. त्याला प्रत्येक खर्चासाठी सावकार, त्याचे मित्र आणि उपासक बंधू यांचं दार ठोठावायला लागतं. त्यात लष्करी भूत अंगात शिरल्यास घरात रक्त वाहणे घरात नित्याचंच होऊन बसलं.
त्यात मूळ कुटुंबाची प्रगतीच्या वाटेवरची घोडदौड बघून त्याचा जळफळाट होई. त्यातून तो दोनदा कुटुंबाशी भांडला. पहिल्यांदा बांधावरून. दुसर्यांदा बगळ्याच्या हिश्श्यासाठी. त्यात त्याला नाईलाजाने बगळ्याला हिस्सा द्यावा लागला. नाईलाजाने. कुटुंबाच्या दबावात. पक्याला ती वेदना असह्य झाली. त्याने उपासनेचे कट्टर मार्ग अवलंबला. मध्ययुगीन विचार, पेहराव अंगिकारला. हाती शस्त्र घेतलं. कवायती, खुराक यांवर अधिक भर दिला. स्वतःच्या घरातून विरोध झाल्यास घरात रक्त सांडवण्यास तो मागेपुढे पाहात नव्हता.
त्यात मध्यंतरी त्याला वरच्या हिश्श्यात सावकाराच्या मित्रासाठी रसद पुरवण्याचं काम मिळालं. जिथं त्याचे उपासक बंधू अति उत्तरेच्या कुणा पिवळेसोबत वाद घालत क्षेत्र कब्जात घेऊन बसले. त्यानं त्याचं मूठभर मांस वाढलं. त्याने उपासक बंधूंच्या सहवासात अधिक कट्टरतेचं जीवन स्वीकारलं.
पण त्याने काय होईल ना? इकडे मूळ कुटुंब रोज नव्या वाटा धुंडाळत उत्कर्षाचे टप्पे गाठू लागलं. कुटुंबाच्या प्रगतीचे दोर तर तो कापू शकत नव्हता. मग तो कुटुंबास त्रास देऊ लागला. कधी कधी उत्तरेच्या तुकड्यात साप, नाग, विंचू वगैरे विषारी प्राणी नेऊन सोडू लागला. येता-जाता खोड्या काढू लागला. कधी धमक्या, कधी भांडणं, कधी कुरापती करू लागला.
ह्यावेळी त्याला लाल्याशेठ साथ देऊ लागला. त्यासाठी तो हत्यारं पुरवू लागला. कधी भांडणात थेट बाजू घेऊ लागला. त्याची आर्थिक व इतर मदत करू लागला. बदल्यात पक्या त्याला उत्तरेच्या तुकड्यातील काही भाग भेट देऊन टाकला.
कुटुंब प्रथेप्रमाणे दरवेळी पक्याकडे फार लक्ष देत नाही आणि महत्त्व तर बिलकुल देत नाही. पक्यासोबतचा वाद इतर गोष्टींवर प्रभाव टाकू शकत नाही वा कुटुंब त्याचा परिणाम घरातील वातावरण खराब करण्यास होऊ देत नाही. पण पक्या मात्र वेळोवेळी जळती लाकडं वा इतर वस्तू कुटुंबातील सदस्यांवर फेकून त्यांस जखमी करण्याची संधी साधत असतो. त्याला कुटुंबही योग्य असं उत्तर देत असतं.
अलीकडे मूळ कुटुंबाचा कर्ता पुरुष बदलला, पण पक्याची वृत्ती बदलली नाही. पूर्वी पक्याच्या कुरापतींवर कुटुंब संयतपणे उत्तर देई, पण नव्या कर्त्या पुरुषामुळे कुटुंब तात्काळ नि पोरकटपणे उत्तर देऊ लागलं. त्यानं लाल्याशेठ दरवेळी सुखावू लागला. अगदी तो देखील काही बांध कोरत कुटुंबांच्या जमिनीवर अतिक्रमण करू लागला. पण नव्या कुटुंबप्रमुखाच्या भित्र्या स्वभावामुळे कुटुंब गप्प आणि शांत राहू लागलं.
त्यात ह्यावेळी पक्याने पाठीमागून वार करून कुटुंबांचं रक्त वाहवलं. त्यावर झटपट व्यक्त होतं कर्त्यानं हिंसेनं उत्तर दिलं. त्यात पक्या भाजला खरा. पण त्याचा विकृत आनंद काकणभर वाढला. कदाचित कुटुंब देखील त्याच्याइतकंच अविचारीपणे वागू लागल्याचं बघून हे झालं असावं.
त्यात म्हणे कुटुंबाच्या स्वप्नात अलीकडे कुणी दिव्य स्त्री येतेय आणि सांगतेय, ‘पक्या वाया गेलेला विखारी, विकृत तरीही आपल्याच कुटुंबातील जुना सदस्य आहे. त्याला त्या विकृतीवर चालण्यास भाग पाडणारे वा साथ देणारे, प्रोत्साहन देणारे लाल्याशेठ वगैरे व त्याचे उपासक बंधू व सावकाराचे तेव्हाचे मित्र ‘उसा’शेठ वगैरे हेच खरे कुटुंबाच्या ऐक्यावर, संपत्तीवर, वैभवावर उठलेले खरे हितशत्रू आहेत. त्यांच्यापासून आधी सावध राहायला हवं.’
पण पक्याकडे आणि त्याच्या माकडउड्यांकडेच अधिक लक्ष देणारं कुटुंबाच्या कर्त्याचं धोरण पक्याला खांद्यावर घेणार्या लाल्याशेठबद्दल काय भूमिका घेणार ह्यावर कुटुंबातचं संभ्रम आहे.