उथळ, बेजबाबदार वर्तन हा भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा स्थायीभाव होऊन बसलेला आहे. देशांतर्गत अनेक महत्वाच्या प्रसंगात याचे दर्शन घडलेच आहे. पण किमान जेव्हा प्रसंग दोन देशातल्या युद्धाचा आहे, जिथे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नॅरेटिव्ह महत्वाचे असते, त्यावेळी तरी माध्यमांनी याचं भान दाखवायलाच हवं.
– – –
पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवलं. १९७१नंतर पहिल्यांदाच भारतीय लष्कराने लाहोर, रावळपिंडीपर्यंत लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. पण हे करताना जो संयम, जी शब्दांची अचूकता दाखवत लष्कराने प्रतिष्ठा कमावली, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य मेसेज जाईल याचं भान बाळगलं; ते सगळं आपल्या बेताल प्रसारमाध्यमांनी मात्र अक्षरश: मातीत घालवलं. एकीकडे लष्कराच्या भाषेत कायम युद्ध हा शब्द वगळला जात होता, केवळ लष्करी स्थळांनाच टार्गेट करतोय असं सातत्यानं सांगितलं जात होतं, तेव्हा माध्यमांचा युद्धज्वर मात्र वेगळ्याच उन्मादी पातळीवर पोहचला होता.
काही न्यूज चॅनेल्सनी ऑपरेशनच्या पहिल्याच रात्री कराची बंदर बेचिराख झाल्याच्या (अर्थातच धादांत खोट्या) बातम्या दिल्या; काहींनी इस्लामाबादपर्यंत आपल्या फौजा दाखल झाल्याचं वृत्त दिलं. तर काहींनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांना अटक झाली आहे, असंही जाहीर करून टाकलं. मुळात हा इतका उथळपणा येतो कुठून?.. आणि आपण आपल्या देशाच्या, जवानांच्या सुरक्षेशी खेळतो आहोत, संवेदनशील विषय हाताळतो आहोत, याचंही भान का ठेवलं जात नाही? काही माध्यमांनी या पार्श्वभूमीला सायरनचा आवाज काढत या ऑपरेशनच्या बातम्या दिल्या. जणू काही न्यूज चॅनेल्सचे स्टुडिओ हे युद्धभूमीच बनलेले होते. इतका आचरटपणा केल्यानंतर शेवटी भारत सरकारला अधिकृत पत्रक काढून तो सायरनचा आवाज बंद करा असं सांगावं लागलं. म्हणजे युद्धजन्य परिस्थितीत एकीकडे शत्रुराष्ट्राच्या आक्रमणावर लक्ष ठेवताना आपल्या व्यवस्थेची सगळी ऊर्जा, ताकद ही आपल्याकडे माध्यमं काय घोळ घालतायत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यातही जात होती.
सगळ्यात कहर टाइम्स नवभारत या हिंदी वाहिनीने केला. या वाहिनीने आपल्या फौजा सीमा पार करत आता पाकिस्तानमध्ये घुसल्या आहेत, अशी बातमी दिली. त्यावर या वाहिनीचा अँकर चेकाळून वार्तांकन करत असताना तिथे बोलावलेले चार पाच ‘तज्ज्ञ’ लोकही टाळ्या वाजवत होते. पत्रकारांना अशा वार्तांकनाची अक्कल नसेल असं एकवेळ गृहीत धरलं (अलीकडे तेच गृहीत धरावं लागतं टीव्ही पाहताना) तरी जे लोक त्या क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून बोलावले आहेत त्यांना तरी किमान त्याचं भान नको का?.. अशावेळी जे बेसिक प्रश्न, सामान्य लॉजिकने पडू शकतात ते देखील त्यांच्या डोक्यात त्यावेळी का आले नसावेत? इतकी मोठी बातमी एक अँकर कोणत्याही अधिकृत लष्करी हवाल्याविना आपल्यासमोर सांगतोय, त्यावर कुठलाही विचार न करता टाळ्या वाजवत त्या उन्मादात सामील होणारे हे कसले एक्सपर्ट?.. लष्करी व्यवस्था कशी चालते, निर्णय कसे होतात, अशा मोठ्या निर्णयाची घोषणा कुठल्या पातळीवरून होऊ शकते हे त्यांना तरी माहिती असायलाच हवं ना! विचार करा, कराची बंदराचा भारतीय नौसेनेने ताबा घेतलाय किंवा इस्लामाबादपर्यंत सगळीकडे भारतीय तिरंगा फडकलाय, असं झालं असेल तर त्याची घोषणा व्हॉट्सअपवरच्या पाचकळ फॉरवर्ड्स पलीकडे कसलाही माहितीचा स्रोत जवळ नसलेल्या एका फुटकळ रिपोर्टरच्या तोंडून होईल का? त्याबद्दल अधिकृत माहिती भारत सरकार किंवा भारतीय लष्कराचे प्रमुख देणार नाहीत का? जगातील इतर राष्ट्रे, संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटना, महाशक्ती बनलेले देश याबद्दल काही तोंड उघडणार नाहीत का? यातल्या कशाचंच देणंघेणं नसल्याप्रमाणे सगळीकडे बातम्यांच्या नावाखाली कंड्या पिकवण्याचा बेजबाबदार कहर सुरू होता.
बरं केवळ शत्रुराष्ट्राच्या सीमेतल्याच बातम्या चुकीच्या दिल्यात असंही नाही. या माध्यमांनी आपल्याकडे पण भीतीचं वातावरण पसरवलं. राजस्थानातल्या हवाई तळावर आत्मघाती हल्ला झाल्याची बातमी बिनदिक्कतपणे या मर्कटमाध्यमांनी चालवली. जयपूर एअरपोर्ट टार्गेट केल्याचीही अफवा बातमी म्हणून चालली. त्यावर भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोला तातडीने स्पष्टीकरण काढावं लागलं. ही आपल्या प्रसारमाध्यमांची भयाण अवस्था. देशात गेले अनेक दशकं युद्ध झालेलं नाहीय, आपला देश काही युद्धखोर देश नाहीय. त्यामुळे माध्यमांना अशा स्थितीत कसं वार्तांकन करावं याचं भान नसेल, इतका सहानुभूतीपूर्वक विचार केला तरी या उथळपणाचं समर्थन करता येऊ शकत नाही. कुठल्याही युद्धजन्य हालचालीचे लाईव्ह कव्हरेज करु नका, शत्रुराष्ट्राला उपयोगी ठरतील असे तपशील बातमीत देऊ नका असं ओरडून ओरडून सांगूनही पुन्हा पुन्हा हे घडत राहिलं. अनेक माध्यमांनी जम्मू एअरपोर्टवरून भारतीय हवाई दलाची विमानं कशी उड्डाणं घेत आहेत, ती विमानं कुठली आहेत याचं वार्तांकन केलं. हे आपल्या माध्यमांचं सुरक्षाविषयक तपशीलांबाबतचं गांभीर्य!!
पण या सगळ्यात चिंतेची बाब अशी की अशा बेलगाम झालेल्या न्यूज चॅनेल्सना आवरण्याऐवजी या काळात कारवाई कुणावर झाली तर ती प्रश्न विचारणार्या, संयतपणे माहिती देणार्या वेब पोर्टल्सवर. द वायरसारख्या गंभीर वार्तांकन करणार्या वेबसाईटला पाकिस्तानप्रेमी ठरवून काही काळासाठी रोखण्यात आले. फोर पीएम या यूट्यूब चॅनेललाही थेट बंद करण्यात आलं. त्यातही फरक हा की नंगानाच करणार्या गोदी मीडियाला केवळ नोटीसा दिल्या जात होत्या, प्रश्न विचारणार्या माध्यमांवर मात्र कुठलीही नोटीस न देता थेट बंदीची कारवाई! त्यामुळे देशहितासाठी कुठली गोष्ट योग्य आहे याचा एकदा विचार व्हायला हवा. चुकीची माहिती पसरवल्यामुळे देशाच्या प्रतिमेची आंतरराष्ट्रीय पातळीवर छीथू होणे, हा सरकारला गांभीर्याचा मुद्दा वाटत नाही का?
अवघा काही काळ लष्करात सेवा करून एका न्यूज चॅनेलच्या स्टुडिओत ज्ञान देत बसणारे एक महाशय… मेजर गौरव आर्या असं त्याचं नाव. त्यांनी इतका कहर केला की इराणबाबत जाहीरपणे त्यांनी अपशब्द वापरले. खरंतर इराणसोबत आपले संबंध हे मैत्रीचे आहेत. पण या महाशयांच्या एका कृतीनं इराण सरकारकडून थेट निषेधाची प्रतिक्रिया आली. इतक्या वाईट पातळीवर जाऊन बोलण्याचं धाडस करणार्या, दोन देशांतल्या संबंधावर विनाकारण परिणाम करणार्या व्यक्तीला खरंतर तात्काळ तुरुंगात डांबायला हवं. पण हे विखारी लोक मोकाट सोडले जातात आणि पत्रकारितेच्या चौकटीत राहून व्यवस्थेला सगळे प्रश्न विचारणारे लोक मात्र सरकारच्या निशाण्यावर आहेत. त्यांना अशा आपत्कालीन स्थितीचा गैरफायदा घेऊन बंदीचा धाक दाखवला जातोय, असा उफराटा कारभार युद्धसदृश स्थितीतही सुरू असेल तर कठीण आहे.
उथळ, बेजबाबदार वर्तन हा भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा स्थायीभाव होऊन बसलेला आहे. देशांतर्गत अनेक महत्वाच्या प्रसंगात याचे दर्शन घडलेच आहे. पण किमान जेव्हा प्रसंग दोन देशातल्या युद्धाचा आहे, जिथे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नॅरेटिव्ह महत्वाचे असते, त्यावेळी तरी माध्यमांनी याचं भान दाखवायलाच हवं. पण बहुदा हा असा उन्माद आपल्या भावी मतदारांसाठी पोषक जमिनीची मशागत करतोय म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जातेय का? आज एका ऑपरेशनच्या निमित्ताने जर हा धुडगूस टीव्हीच्या स्टुडिओत घातला जात असेल तर १९७१च्या प्रचंड मोठ्या युद्धाच्या वेळी जर मीडिया अस्तित्वात असता तर काय झालं असतं हा धडकी भरवणाराच विचार मनात येऊन जातोय.
लष्कराच्या पत्रकार परिषदेत सातत्यानं भारताला युद्ध नकोय, आम्ही नियंत्रित पद्धतीने केवळ अचूक लक्ष्य साधत आहोत, दहशतवाद्यांना टारगेट करायचं आहे सामान्य नागरिकांना नाही, हा मेसेज दिला जात होता. त्याच्या नेमकं उलट माध्यमं करत होती. ‘डिस्ट्रॉय पाकिस्तान’सारखे हॅशटॅग न्यूज चॅनेलवर झळकत होते. इतक्या वाईट पद्धतीनं रिपोर्टींग, चुकीची माहिती हा खरंतर पाकिस्तानी लोकांचा स्वभाव आहे. आपण त्यांच्याशी स्पर्धा करायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार?.. याचा साधा विचार करा. पाकिस्तानी माध्यमांनी या काळात अपप्रचाराचा कहर केला. त्यांचे नेतेही कमालीची बाष्कळ विधानं करत होते. पण त्यांना काही नावं ठेवायला जावं तर आपल्याकडेही माध्यमांच्या बालिश वागण्यानं तीच परिस्थिती आपण करून ठेवलेली.
साडेतीन दिवसांच्या युद्धानंतर शस्त्रविराम जाहीर करण्यात आला. तो अमेरिकेने घोषित केला. खरंतर ज्या काश्मीर प्रश्नात आजवर तिसर्या कुठल्याही देशाला भारताने प्रवेश करू दिलेला नाही, त्या प्रश्नावर तोडगा काढण्यास उत्सुक असल्याचं ट्रम्प जाहीरपणे सांगतायत. या सगळ्याबद्दल प्रश्न विचारणे हे माध्यमांचं काम आहे. पण शस्त्रसंधी झाल्यानंतर आता तिकडे पाकिस्तानमध्ये पोहचलेले यांचेच रणगाडे, उद्ध्वस्त केलेलं कराची बंदर परत करून आपलेच दात आपल्याच घशात घालण्याची वेळ या माध्यमांवर आली आहे. या चार दिवसांच्या युद्धाने काय मिळवलं हा प्रश्न सातत्यानं विचारला जाईलच. त्याचं आपापल्या पद्धतीने विश्लेषण होत राहीलच. पण या चार दिवसांत भारताच्या न्यूज मीडियाने जो थिल्लरपणा दाखवला तोही आपल्या दृष्टीने चिंतेचा विषय असला पाहिजे. भविष्यात किमान देशाची लाज राहील, इतपत तरी गांभीर्य मीडियाने ठेवावं हीच अपेक्षा.