युद्ध म्हटलं की युद्धाशी कधीच कसलाच संबंध न आलेल्या सर्वसामान्य माणसांनाही कसा युद्धाचा ज्वर चढतो, याचं दर्शन गेल्याच आठवड्यात सगळ्या भारतवर्षाने घेतलं… प्राणहानी, वित्तहानी आणि इतर अनेक प्रकारचं कायमस्वरूपी नुकसान करणार्या युद्धांचं, माणसांनी माणसांना मारण्याचं इतकं आकर्षण कुठून आलंय माणसांत? कशामुळे लागली आहे ही युद्धाची चटक? याचाच शोध घेतायत चिकित्सक पत्रकार निळू दामले… त्यांच्या नव्या लेखमालेत…
– – –
ज्येष्ठ पत्रकार, लेखक निळू दामले यांच्या लेखणीतून उमटलेली, माणसामधल्या युद्धाच्या खुमखुमीचा आढावा घेणारी नवी लेखमाला साप्ताहिक मार्मिकच्या वाचकांच्या भेटीला येते आहे… या लेखमालेचा एकंदर पैस आणि त्यामागची भूमिका समजावून सांगणारा हा पहिला लेख!
रशियानं युक्रेनवर २०२२मध्ये स्वारी केली. युद्ध अजून चालू आहे. दोन्ही बाजूचे मिळून १ लाखापेक्षा अधिक सैनिक मेले आहेत.
२०२३च्या ऑक्टोबरमध्ये इस्रायलचं सैन्य गाझात घुसलं. सुमारे ७० हजार माणसं इस्रायलनं मारली, इस्रायलची दोनेक हजार माणसं मेली.
या दोन लढायांनी पेपरांची इतकी जागा व्यापली की आप्रिâकेत कांगो आणि सुदानमध्ये लढाया चालल्या आहेत हे लोकांच्या लक्षातही आलं नाही.
विसावं शतक उजाडलं बोअर युद्ध घेऊन. द. आफ्रिकेतल्या बोअर समाजावर विजय मिळवून त्यांना ब्रिटीश साम्राज्यात सामील करणं हा दोन युद्धांचा विषय होता. त्यात एक लाखापेक्षा जास्त माणसं मेली. त्यानंतर आजवर किमान ३० तरी मोठी युद्धं झाली आहेत. सहजच २० कोटी माणसं मेली असतील. जखमी किती झाली, किती कुटुंबं अनाथ झाली, किती कुटुंब बेघर झाली याची तर गणतीच नाही. पहिलं आणि दुसरं महायुद्ध पटकन लक्षात येतं, कारण त्यात जवळपास सर्व जग ओढलं गेलं होतं.
पहिल्या महायुद्धातला विनाश पाहून विचार करणारी माणसं व्यथित झाली. युद्ध टाळण्यासाठी काही एक संस्थात्मक व्यवस्था करायची म्हणून लीग ऑफ नेशन्सची निर्मिती झाली. या लीगमध्ये असलेल्या देशांनीच दुसरं महायुद्ध केलं. लीगही होती, युद्धही सुरू राहिलं. पुढं चालून लीगचं रूपांतर युनायटेड नेशन्समध्ये झालं. नंतर आंतरराष्ट्रीय कोर्ट तयार झालं. विधायक कामं करणार्या अनेक शाखा युनायटेड नेशन्सनं काढल्या. पण, आज युनायटेड नेशन्स ही एक मस्करी आहे, थट्टा आहे असं सांगणारी युद्ध चालू आहेत. गाझा आणि युक्रेन ही ताजी उदाहरणं.
आपण इतिहासाची साक्ष काढतो. भगवान बुद्धानं अहिंसेचा मार्ग सांगितला. तोच विचार जैन धर्मानं मांडला. माणसानं युद्धाची वेळ येऊ नये यासाठी अनेक संस्था तयार केल्या. ग्रीसनं ख्रिस्त जन्मायच्या आधीपासून शहाण्या माणसांनी राज्य करावं असं सांगितलं, थेट लोकशाही प्रस्थापित केली. पश्चिमी जगात रेनेसान्स झालं. त्या पाठोपाठ लोकशाहीची नवनवी रूपं जन्माला आली. शांतता आणि अहिंसेचा विचार मांडणार्या गांधीजीना सार्या जगानं मान्यता दिली.
तरीही युद्धं का होतायत?
माणसाच्या रक्तात म्हणा डीएनएमध्ये म्हणा, हिंसा आणि युद्ध आहे काय?
तंत्रज्ञान माणसाच्या मेंदूत सुरुवातीपासून आहे. विज्ञानाची जोड मिळाल्यावर तंत्रज्ञान कायच्या काय वेगानं विस्तारलं, माणसाच्या जगण्याच्या प्रत्येक अंगाला ते स्पर्शून जातं. गंमत अशी तंत्रज्ञानानं जे सतत नवनवं दिलं त्याचा उपयोग माणूस संहारासाठीच करत सुटला. जमीन फोडण्यासाठी सुरुंगाचा शोध लावला, माणूस शत्रू मारण्यासाठी स्फोटकं तयार करू लागला. अवकाशाचा वेध घेणारी दुर्बीण; तिचा उपयोग माणूस दूरवरचा शत्रू हेरण्यासाठी करू लागला. वाहतूक सोयीची व्हावी म्हणून माणसानं वेगवान वाहनं शोधली (कार, विमानं), माणूस त्यांचा उपयोग बाँबिंगसाठी करू लागला. अभ्यास निरीक्षणं करणं शक्य व्हावं यासाठी माणसानं ड्रोन शोधले, तर तेही आज माणूस दूरवर बाँब टाकण्यासाठी वापरतोय.
– – –
प्राचीन माणसाच्या अवशेषांचा अभ्यास रेमंड डार्ट यांनी केला. माकडापासून माणूस कसा झाला याचा अभ्यास डार्ट यांनी केला. प्राचीन माणसाच्या जबड्याचा अभ्यास त्यांनी केला. काळवीटाची शिंगं आणि मांडीची हाडं हत्यारं म्हणून वापरून माणसावर समोरून हल्ला केला जात असे हे डार्ट यांनी शोधून काढलं. अभ्यासांती त्यांनी काढलेला निष्कर्ष असा की माणूस शिकारी होता, मांसाहारी होता, माणूस माणसाचं मांस खात असे.
कॉनरेड लोरेंझ यांनी ४ ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या माणसाच्या अवशेषांचा अभ्यास केला. त्या माणसांना लोरेंझ यांनी जावा मॅन,
पेकिंग मॅन अशी नावं दिली. लोरेंझ म्हणतात की त्या काळात माणसानं अग्नीला आपलंसं केलं. अग्नीवर तो आपल्याच भावांचं मांस भाजून खात असे असा निष्कर्ष त्यांनी जळलेल्या हाडांच्या अवशेषांवरून काढला. ६ लाख वर्षांपूर्वीचा माणूस कदाचित बदलला असावा. माणसाचं मांस खाण्याऐवजी तो जनावरांचं मांस खाऊ लागला असावा.
७० हजार वर्षांपूर्वी माणसं दगड, हाडं आणि काठ्यांचा वापर करत असत. ७० हजारच्या सुमाराला माणसानं भाल्याचा शोध लावला. माणसानं लाकडाच्या टोकाला अणकुचीदार दगड, टोकदार हाडं बसवून भाला तयार केला. माणसांनी बाण वापरणार्या माणसाची चित्र इसवीपूर्व ३५ हजार ते १२ हजार या काळांत गुहांमध्ये दगडांवर काढली. या चित्रांमध्ये बव्हंशी प्राणी दिसतात. भोसकलेले प्राणी दिसतात, प्राण्यांवर रोखलेले भाले दिसतात, माणसं प्राण्यांचा पाठलाग करताना दिसतात. अगदी क्वचित प्रसंगी माणसाला भाला लागल्याचं चित्र दिसतं. अभ्यासकांतला एक वर्ग म्हणतो की तोवर युद्ध ही कला विकसित झाली नव्हती, माणूस शस्त्राचा वापर शिकारीसाठी करत होता.
प्राण्याची शिकार करणं हा माणसाच्या हिंसकतेचा घटक आहे की शिकार पोटासाठी केली जात होती? युद्ध हा प्रकार नंतर माणूस शिकला का?
साधारणपणे इसवीपूर्व १२ हजार ते ८ हजार या काळात भाल्याला जोडून धनुष्यबाण, गलोल, खंजीर आणि गदा ही शस्त्रं माणूस वापरू लागला. भाले कमी झाले कारण भाले फक्त ५० मीटरपर्यंत जात आणि बाण १०० मीटरपर्यंत पोचू शकत होते. गलोलाला दगड लावून तो भिरकावण्याची कला माणसाला अवगत झाली. गलोलाचा दगड भाला आणि बाणापेक्षाही दूर जाऊ शकत होता. परंतु गलोल भिरकावायला जागा लागते, बाण धनुष्याला जोडून मारणं जागच्या जागी उभं राहून जमतं. गलोलानं दगड मारण्यासाठी चार माणसं एका रांगेत उभं करणं तापदायक होतं कारण दोन माणसांमध्ये जास्त अंतर आवश्यक असे. धनुष्य हाती असलेली माणसं एकमेकाला खेटूनही बाण मारू शकतात. खंजीर ही तलवारीची सुरुवातीची अवस्था होती. इसवीपूर्व १२ ते ८ हजार वर्ष या काळात तलवारीसाठी आवश्यक धातूचा शोध लागला नव्हता. लाकूड किंवा तासलेला दगड खंजिरासारखा वापरला जात होता. पैकी गदा हा प्रकार भारतात वापरला गेला, जगात अन्यत्र तो मागे पडला.
दुरून बाण मारून, दगड फेकून, भाला फेकून माणसं मारणं ही एक गोष्ट. पण माणूस समोर उभा ठाकला की त्याला मारण्याचं प्रभावी साधन तलवार. तलवार हा शस्त्रांचा राजा किंवा राणी मानली जाते. धातूचा शोध लागल्यावर आधुनिक काळात तलवारी प्रचलित झाल्या. भारतात गोवळकोंड्यातून कच्चा धातू दमास्कसला जाई, तिथं त्याचं संस्कारित धातूत रूपांतर होऊन त्याला धार लावली जाई. तिथून ती तलवार जगभर जाई.
शत्रूपक्ष हल्ला करणार म्हटल्यावर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी गावाभोवती तटबंदी हवी. युद्ध ही गोष्ट प्रचलित होण्याआधी जंगली जनावरांना थोपवण्यासाठी तटबंदी उभारली जात असे. शेतीच्या अगदी सुरुवातीच्या काळात शेती आणि साठवण दोन्हीचं संरक्षण करण्यासाठी भिंती उभारल्या जात. जनावरांचा कळप असे, त्याला तोंड द्यायचं तर माणसांनाही कळप किंवा टोळी करावी लागणार. त्यातून सामूहिक शिकार आणि त्यातून युद्धाची रचना विकसित झाली.
इसवीपूर्व ४ हजार ते ३ हजार या काळात युद्ध ही घटना आकाराला आली. मेसोपोटामियातल्या साम्राज्यातल्या युद्धांबद्दल लिहिलं गेलंय, युद्धांची चित्र काढली गेलीत. त्या नंतरच्या काळात भारतात वेदवाङ्मय, रामायण आणि महाभारतात लढायांची वर्णनं आहेत. पश्चिमेकडं बायबल आणि इलियडमध्ये युद्धाची वर्णनं आहेत. रामायण महाभारत इत्यादी साहित्यामध्ये अमुक अक्षौहिणी सैन्य युद्ध खेळलं असे उल्लेख येतात. एका अक्षौहिणीमध्ये २१,८७० रथ, २१,८७० हत्ती, ६५, ६१० घोडे आणि १,०९,३५० सैनिक असत असे उल्लेख येतात. ही संख्या अतिरंजित आहे. पण कदाचित अतिरंजित नसेलही. फक्त अक्षौहिणी या शब्दाला प्रत्येक काळात नवे अर्थ जोडून घोटाळे केले असतील. अक्षौहिणी प्रत्यक्षात काही शेकड्यांची असे, लोकांनी ती फुगवली.
मेसोपोटामियात इसवीपूर्व १० हजार ते २ हजार वर्षं या काळातल्या शहरांची वर्णनं येतात, त्यात शहराभोवती बांधलेल्या तटबंदीची वर्णनं आहेत. तेरा ते पंधरा फूट उंच आणि ३० फूट रुंद अशा तटबंदीमध्ये आतल्या आतच जिने केलेले होते. अगदी अलीकडं म्हणजे इसवीपूर्व २२० मध्ये चीनमधली प्रसिद्ध भिंत बांधली गेली.
इसवीपूर्व ३ हजारच्या आसपास खेळल्या गेलेल्या लढायांत (मेसोपोटामिया) गाढवाचा वापर वाहन म्हणून करण्यात आलाय. घोडे नंतर आले. गाढवं शिकत नाहीत. गाढवं ही गाढवं असतात, त्यांना शिकवणं कष्टाचं असे. सैन्य म्हणजे पायदळ असे. सेनेतले अधिकारी गाढवांनी ओढलेल्या रथात बसत. रथ हे बहुदा जगातलं पहिलं वाहन. रथाला प्रतिष्ठा असे. राजा, समाजातले प्रतिष्ठित लोक, रथामधून फिरत, इतरांना रथ वापरण्याची परवानगी नसे.
तट फोडण्यासाठी महाकाय ओंडके वापरण्याची कला या काळात विकसित झाली. मेसोपोटामियापाठोपाठ इजिप्शियन सिविलायझेशनमध्ये चिलखती गाड्यांचा वापर झाला. त्या काळात काढलेली चित्रं चिलखती गाड्या, शिरस्त्राणं, चिलखतं दाखवतात.
गाढव, नंतर घोडे, नंतर रथ यामुळं गती वाढली. इतकी जनावरं गोळा करणं, त्यांना राखणं हा एक मोठाच उद्योग होऊन बसला. चिलखत आणि शिरस्त्राणामुळं सैनिक सुरक्षित झाला. स्वतःला सुरक्षित करून समोरच्याचा जीव घेणं या सुरक्षाव्यवस्थेमुळं शक्य झालं. त्याचा तोटाही होता. अवजड चिलखत आणि शिरस्त्राण घातलं की सैनिकाची हालचाल करण्याची क्षमता खूपच कमी होते.
इसवी पूर्व पाच हजार ते इसवी विसावं शतक या काळात युद्धात माणसं तर खूपच मरत होती, पण ती मारण्यासाठी खूप खटपट करावी लागत होती. विसाव्या शतकात कोळसा आणि पेट्रोल ही उर्जा साधनं आली आणि वाहन या कल्पनेत क्रांती झाली. रणगाडे तयार झाले. रणगाडे मोठा भूप्रदेश काही तासात, काही दिवसांत उद्ध्वस्त करू लागले. गलोलाचं तंत्रज्ञान विकसित करून माणसानं तोफा तयार केल्या. वजनदार आणि स्फोटक गोळे कित्येक मैल दूरवर भिरकावता येऊ लागले. आपला जीव धोक्यात न घालता दूरवरची जनता बेचिराख करण्याचं तंत्र माणसाला सापडलं.
विसाव्या शतकात विमान तयार झालं. हवेत उडणं ही एक कविकल्पना होती, ती विसाव्या शतकात प्रत्यक्षात आली. मग काय विचारता? पहिलं महायुद्ध झालं, त्यात ४ कोटी माणसं मेली.
पहिलं महायुद्ध संपत असतानाच माणसानं पुढल्या युद्धाची तयारी सुरू केली. दुसरं महायुद्ध झालं. त्यात ७.५ कोटी माणसं मेली.
पहिल्या ते दुसर्या महायुद्दाच्या मधल्या काळात माणसानं अणुऊर्जेचा शोध लावला. हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन शहरं काही मिनिटांत बेचिराख झाली. लाखो माणसं मेली, काही माणसं नंतरही कित्येक वर्षं मरत होती. मेलेली माणसं सैनिक नव्हती, नागरिक होती.
– – –
काही मनोवैज्ञानिकांचं म्हणणं आहे की माणसाला रक्ताची भूक असते, हिंसेची इच्छा त्याच्या रक्तातच असते, ती इच्छा वेळोवेळी उफाळून येते, माणूस युद्ध करतो.
शांततावादी तत्वज्ञ (उदा. मार्गरेट मीड) मानतात की युद्ध ही माणसाची जैविक गरज नाही, युद्ध माणसाच्या रक्तात नाही, युद्ध ही माणसानं शोधून काढलेली गोष्ट आहे.
आईनस्टाईननी हिटलरनं केलेली हिंसा पाहिली होती. फ्राई़ड या मनोवैज्ञानकांशी त्यांनी चर्चा केली. आईनस्टाईनना शंका होती, त्यांचा तर्क होता, की माणसाचा हिंसेकडं कल आहे. द्वेष आणि विध्वंस करायला माणूस पटकन उद्युक्त होतो, असं त्यांना वाटत असे. फ्राई़डनी आईनस्टाईनना पत्र लिहून सांगितलं की हिंसा आणि आक्रमकता माणसाच्या रक्तातच आहे, ती दाबून ठेवणं अशक्य आहे.
फ्राई़ड यांचे समकालीन विल्यम जेम्स, शिक्षणानं डॉक्टर होते, त्यांना तत्त्वज्ञ म्हणून जग ओळखतं. त्यांनी संशोधनाअंती निष्कर्ष काढला होता की माणूस हा मुळातच शिकारी वृत्तीचा आहे. माणसांना मारणं, स्त्रिया पळवून त्यांच्यावर मालकी प्रस्थापित करणं, गाव लुटणं हे आदिमानवाच्या रक्तात आहे, अशी हिंसा करण्यात माणसाला थरार वाटतो, माणसाला ते प्रतिष्ठेचं लक्षण वाटतं.
– – –
दुसर्याची साधनं लुटण्यासाठी युद्ध होतं. दुसर्याचं असणं आपल्या अस्तित्वाला धोकादायक आहे असं समजून दुसर्याला नष्ट करण्यासाठी युद्ध होतं. दुसरा आपल्यावर हल्ला करेल ही शक्यता मुळातच संपवण्यासाठी युद्ध केलं जातं. आपल्या जनतेच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या जवळची साधनं अपुरी पडताहेत म्हटल्यावर इतरांची साधनं पळवण्यासाठी युद्ध केलं जातं. युद्ध ही पवित्र गोष्ट आहे असं समजून युद्ध केलं जातं. देवानं सांगितलं म्हणून युद्ध केलं जातं. कोणाची तरी पत्नी पळवण्यासाठी युद्ध केलं जातं. आपलाच वंश जगामध्ये टिकवण्यासाठी इतर वंश खतम केले पाहिजेत या विचारानं युद्ध केलं जातं. कम्युनिस्ट देश भांडवलशाही देशांविरुद्ध युद्ध करतात. लोकशाहीवादी भांडवलशाहीवादी देश समाजवादी देशांविरोधात युद्ध करतात. ख्रिस्ती मुसलमानांविरोधात, मुसलमान ख्रिस्तीविरोधात, ज्यू मुसलमानांविरोधात, शैव वैष्णवांविरोधात आणि वैष्णव शैवांच्या विरोधात युद्ध करतात.
माणसं मारण्यासाठी माणूस सतत नवी सबब शोधत असतो.
– – –
युद्धाची तपासणी या लेखमालिकेत करायची आहे.