भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश स्थिती येण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. शेवटचीही नसणार. भारत आणि चीन यांच्यात मात्र अशी वेळ १९६२ साली आली आणि तेव्हा भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारताने चीनबरोबरचे संबंध सुरळीत राखण्याला प्राधान्य दिलं. मात्र, पाकिस्तानबरोबरच्या संघर्षाला जसा धार्मिक पैलू आहे, तसा काही पैलू चीनबरोबरच्या संघर्षाला नाही. शिवाय चीन आता अमेरिकेला ललकारण्याइतकी मोठी महासत्ता बनला आहे. पंतप्रधानांनी कितीही झोपाळ्यावर झुलवले आणि ढोकळे खाऊ घातले, तरी गलवान भागात चीनने भारताचा भूभाग घशात घातलाच. त्याबद्दल आपल्याकडून ना हाक ना बोंब! यावेळच्या पाकिस्तानी कुरापतीत भारताची बाजू न्याय्य असूनही चीनने थेट पाठिंबा जाहीर केला त्या देशाला! पाकिस्तानच्या बाजूला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, बलुचिस्तान स्वतंत्र करा, लाहोरवर झेंडा फडकवा वगैरे वल्गना करणार्या वाचावीरांच्या जिभा चीनचा विषय निघाला की लुळ्या पडतात… भारत-पाक शस्त्रविरामाच्या पार्श्वभूमीवर १९६२च्या नववर्ष विशेषांकात बाळासाहेबांनी रेखाटलेल्या या मुखपृष्ठचित्राची आठवण येते… तेव्हा जाणारे वर्ष शिशुरूपातील येणार्या वर्षाच्या हाती बंदूक सोपवतंय… अनेक आक्रमणं परतवावी लागतील, असा इशारा देतंय… त्या सीमेवरचा शत्रू बलाढ्य आहे आणि तो अधिक घातकीही आहे, हे भारताने कधीही विसरता कामा नये.