संजय शिरसाट
परीक्षेत निकाल लागला
आम्ही झालो नापास
निधी माझा चोरून नेला
जिणे झाले भकास
७२व्या मजल्यावरून
पाहतो झोपडपट्टी
त्यांची दु:खे पाहून माझी
करतो मलमपट्टी
बंद करा खाते माझे
पुरवा त्यांचेच लाड
पाहून घेईल ‘शकुनीमामा’
चाळे तुमचे लबाड
—– —– —–
अजित पवार
कधी कधी मला वाटते
मुख्यमंत्री व्हावे
ज्यांनी ज्यांनी त्रास दिला
त्यांना पुरते नडावे
आहेत माझे दोन शत्रू
पाण्यात पाहतात मला
एक स्वत:ला सीएम समजतो
दुसरा चाबूकवाला
बाकी सगळ्या शत्रूंमध्ये
काका कित्ती चांगले
मी तर त्यांना गुरू मानतो
जरी ना त्यांनी मानले
—– —– —–
अदिती तटकरे
परीक्षेत १०० गुणांच्या
माझा पहिला नंबर
खाते माझे अव्वल पाहून
मोडली त्यांची कंबर
झेंडावंदन माझ्या हस्ते
तेव्हाच कळून चुकले
गोगावल्यांचं पालकपनीर
चटणीसकट हुकले
आता बघा रूबाब माझा
दाखवीन माझा हिसका
कितीही काड्या लावल्या तरीही
बार तुमचा फुसका
—– —– —–
भरत गोगावले
बाप-बेटी यांचेच राज्य
माझा केला पोपट
शीळ घालून घसा सुकला
बाप म्हणाला, धोपट
अमित शहा त्यांच्या घरी
आले भोजनासाठी
इशारा मी समजून गेलो
‘बांधा वळकटी’
माझ्याशी तर पंगा घेणे
पडेल त्यांना भारी
माझी पॉवर कळून चुकेल
केली जर शिरजोरी
—– —– —–
प्रकाश आंबेडकर
अजितदादा-शिंदे आता
करा तुम्ही तयारी
अजगर कधी गिळून टाकेल
विळखा त्याचा भारी
अजगर म्हणजे कोण हे
आहे तुम्हास ठाऊक
करून टाकील चट्टामट्टा
गोड गोड बोलून घाऊक
तुम्हाला तो पाण्यात पाहतो
कधी कापेल पत्ता
स्वत:चीच चमकोगिरी
बाकीच्यांना लत्ता