– कुमार सोहनी
माझ्या नाट्य दिग्दर्शनाची सुरुवात खर्या अर्थाने प्र. ल. मयेकरांच्या नाटकाने झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसे पाहता ४ मे १९७३पासून मी दिग्दर्शक म्हणून कार्यरत होतो. १९७६-७९ ही तीन वर्षे राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून प्रशिक्षण घेऊन मुंबईत आलो होतो. १९८० साली ‘अरूपाचे रूप’ या नाटकाला राज्य स्पर्धेत अंतिम फेरीत पुरस्कारही मिळवला होता. पण १९८३ साली सादर केलेल्या प्र. ल. मयेकर यांच्या ‘मा अस साबरीन’मुळे मला दिग्दर्शक म्हणून खरी ओळख मिळाली. प्र. ल. मयेकरांची आणि माझी पहिली भेट मुलुंडमधील रंगकर्मी जयवंत देसाईंमुळे झाली. मयेकर तेव्हा घाटकोपरच्या बीईएसटी कॉलनीत राहायचे. १९८३ सालच्या राज्य नाटय़ स्पर्धेसाठी मला ‘संस्था’ मुलुंड या माझ्या नाटय़संस्थेसाठी नाटक हवे होते. म्हणून त्यांना भेटायला मी जयवंत देसाईंबरोबर त्यांच्या घरी गेलो. प्र.लं.ना मी फारसा ओळखत नव्हतो. मयेकरांच्या कथा ‘सत्यकथे’तून प्रकाशित होतात आणि त्यांच्या ‘काचघर’ या पुस्तकाला राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे, एवढेच माहीत होते. मयेकरांना मात्र माझी बरीच माहिती होती. ‘नाट्यसंपदा’मधील ‘महाराणी पद्मिनी’मधील अभिनय, ‘सौभाग्य’चे दिग्दर्शन, एनएसडीचा विद्यार्थी ‘अरूपाचे रूप’ नाटक वगैरे… मयेकरांना मी स्पर्धेसाठी नाटक हवे आहे असे सांगितले. त्यावर त्यांनी मला त्यांचे ‘मा अस साबरीन’ हे नवे नाटक सुचवले. मी होकार दिला आणि स्क्रिप्ट घेऊन निघालो. दोन-चार दिवसांत वाचून पुन्हा भेटू या, असे ठरले.
प्रलंच्या पहिल्या भेटीतच मयेकरांशी गट्टी जमल्यासारखे वाटले. कारण त्यांचा स्वभाव. जे काही आहे ते सरळ तोंडावर बोलायचे. अगदी परखडपणे. मग समोरच्याला त्याचा राग आला तरी हरकत नाही, असा बाणा. ‘मा अस साबरीन’ एका बैठकीतच वाचून काढले आणि मयेकरांच्या घरी गेलो. मयेकर बीईएसटीत नोकरी करीत असून सुट्टीच्या दिवशी दुपारी चार वाजता वेळ ठरवून गेलो. ‘संस्था’ मुलुंडतर्फे ते ठाणे केंद्रातून सादर करण्याविषयी मयेकरांना सांगितले. मयेकरांनी तेच नाटक रंगभवन केंद्रातून बीईएसटी करणार असे सांगितले. ‘‘दिग्दर्शन कोण तूच करतोयस ना?’’ असे विचारले. तेव्हा मी ‘सलग तीन वर्षे मी नाटक दिग्दर्शित करतोय. संस्थेतले दुसरे कोणी तरी करील. मी प्रमुख भूमिका करेन’’ असे सांगितले. त्यावर ‘आई.. कॉफी कर… तू घेतोयस ना कॉफी- ती घे आणि नीघ. नाटक जर तू दिग्दर्शित करणार नसशील तर मी नाटक देणार नाही’ असे स्पष्ट सांगितले. इतके चांगले नाटक हातचे जाऊ नये असे वाटल्याने सहकार्यांना विचारल्याशिवायच ‘मी नाटक दिग्दर्शित करेन’ असा शब्द मयेकरांना दिला. त्यांनी मला परवानगी तर दिलीच, पण त्यांनी असे का सांगितले याचे स्पष्टीकरणही दिले.
मयेकर कुठलीही गोष्ट इतक्या मोजक्या शब्दांत सांगायचे की, ते सारे पटायचेही आणि ऐकणार्यांना आवडायचेही. त्यांनी त्यांच्या ऑफिसचा (बॉम्बे सेंट्रल) पत्ता, फोन नंबर दिला आणि केव्हाही ये असे सांगितले. त्या दिवसापासून माझे मयेकरांबरोबर जे बंध जुळले ते कायमचेच. मी त्या काळात मध्य रेल्वेत कल्चरल कोट्यावर नोकरी करीत होतो (व्हीटी). आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या. हळूहळू मी प्रलंना जाणून घेऊ लागलो. प्रलंचे वाचन अफाट होते. सिनेमे तर त्यांनी अगणित पाहिलेही आणि त्याबद्दल भरपूर वाचनही केले. केवळ भारतीय सिनेमाच नाही तर जागतिक सिनेमा, त्याचे दिग्दर्शन, संगीतकार, अभिनेते यांच्याबद्दल त्यांना खूपच माहिती होती. ज्या सहजतेने ते व्ही. शांतारामांच्या चित्रपटावर भाष्य करीत असत त्याच सहजतेने अकिरा कुरोसावा आणि हॉलीवूडच्या चित्रपटांतील बारकावे सांगत असत. त्या काळात प्रसिद्ध झालेला प्रत्येक ‘ज्ञानकोश’ प्र. ल. मयेकरांकडे होता आणि त्याचे ते नियमित वाचन करीत असत.
मी मयेकरांच्या बॉम्बे सेंट्रलच्या ऑफिसात नियमित जाऊ लागलो. विविध विषयांवर आमच्या चर्चा होऊ लागल्या. प्र.लं.ची पुस्तके, एकांकिका, कथा मी वाचून काढल्या आणि त्यांना लेखक आणि माणूस म्हणूनही समजून घेऊ लागलो. त्या काळात ‘सत्यकथा’ मासिकातून कथा छापून येणे हे प्रतिष्ठेचे, सन्मानाचे मानले जात असे. कारण ‘कुठल्याही’ कथांना ‘सत्यकथा’ मासिकात स्थान दिले जात नसे. त्या कथेचा दर्जा पाहूनच त्या कथेला ‘सत्यकथे’त स्थान मिळत असे. एकदा मयेकरांचे मित्र पार्टीत गप्पा मारत होते. त्यापैकी एकाने प्रलंना छेडले. ‘‘मयेकर तुमची कथा अजून सत्यकथेत छापून आली नाहीयै. सत्यकथेच्या दर्जाची कथा लिहून ती सत्यकथेत छापून आणून दाखवा.’’ यामध्ये मयेकरांच्या लेखनाविषयी अविश्वास नव्हता, पण एक चांगली कथा लिहून व्हावी म्हणून लाडिक आग्रह मित्रांनी केला. मयेकरांनी पनामा सिगारेटचा झुरका घेतला आणि समोरच विल्स या शब्दावर आणि त्यावर असलेल्या चांदणीचा अर्थ सांगणारी कथा रचली आणि ती इतकी दर्जेदार झाली की ती सत्यकथेत छापून आली आणि त्याबरोबरच ते सत्यकथेत नियमित लिहू लागले. हा किस्सा प्रलंनी मला सांगितला आणि मला ती कथाही वाचायला दिली. मयेकरांचे अक्षर अतिशय वळणदार होते. ते नेहमी पेन्सिलने लिखाण करीत असत. नाटक, सिनेमा, कथा या सर्व प्रकारांत मयेकरांनी श्रेष्ठ दर्जाचे लेखन केले. त्यांचे संवाद, त्यांची व्यक्तिचित्रणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
‘मा अस साबरीन’ नाटक संस्था मुलुंडतर्फे अंतिम फेरीत गेले आणि रंगभवनमधून बीईएसटीचेही नाटक अंतिम फेरीत सादर झाले. प्रथम बीईएसटीचे नाटक झाले आणि त्या नाटकास प्रथम पारितोषिक मिळाले. संस्था मुलुंडला हात हलवत यावे लागले. प्र. ल. मयेकरांना माझे दिग्दर्शन आवडले होते, म्हणून त्यांनी १९८४च्या स्पर्धेसाठी नवीन नाटक लिहून दिले ‘अथं मनुस जगन हं.’ या नाटकाने इतिहास घडवला. नाटक पहिले आलेच, पण ते नाटक व्यावसायिक मंचावर आले. त्या नाटकाची निवड सातव्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात दिल्ली येथे झाली आणि श्रीराम सेंटरने तेच नाटक हिंदीत दिग्दर्शित करायला मला बोलावले. प्र. ल. मयेकरांनीच त्याचे हिंदी लेखन केले. प्र. ल. मयेकरांच्या व्यावसायिक नाटकाची सुरुवात ‘अग्निपंख’ नाटकाने झाली. लगेचच ‘रातराणी’ नाटक सादर झाले. प्रलंची व्यावसायिक नाटकांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या दोन्ही नाटकांचे दिग्दर्शन करायचे भाग्य मला लाभले. प्रलंची जशी नाट्यलेखनावर हुकूमत होती तसेच चित्रपटाच्या बाबतीतही होती.
१) मा अस साबरीन, २) अथं मनुस जगन हं, ३) आद्यंत इतिहास, ४) अग्निपंख, ५) रातराणी अशी पाच मराठी नाटके, इन्सान अभी जिंदा है (हिंदी अथ मनुस), रेशमगाठ (हिंदी रातराणी) ही दोन नाटके आणि १) जोडीदार, २) रेशमगाठ, ३) तुम्हारा इंतजार है (हिंदी), ४) गिल्टी असे चार चित्रपट. एकूण प्रलंच्या ११ कलाकृती मी दिग्दर्शित केल्या. प्र. ल. मयेकरांच्या कथा, एकांकिका, आजही तेवढीच जबरदस्त खिळवून टाकणारी, मोहात पाडणार्या अशाच आहेत. आज जरी प्र. ल. आपल्यात नसले तरीही त्यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त, त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आठवणींचा संस्मरणीय पट मनात तरळतो आणि मनात एकाच वेळेस आठवणींच्या सुखद शिडकाव्यानं एक मन आनंदित होतंच, पण त्याचबरोबर प्र. ल. नसल्यानं दुसरं मन व्यथितही होत आहे. प्रलंच्या संहितांमध्ये-पात्रांमध्ये प्रचंड ताकद होती. त्यांच्या अनेक व्यक्तिरेखांनी ती साकारणार्या कलाकारांना मोठं केलं. करियरला दिशा दाखवली. अनेक अभिनेते, तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक घडवणारे प्र. ल. रंगभूमीवरील एक विद्यापीठच होते. त्यांच्या नाटकातील कंसातली वाक्य ही विजय तेंडुलकरांप्रमाणे कलाकारांसाठी दिग्दर्शनच असायचं. प्रलंच्या अनेक आठवणी आठवताना त्यांच्या अथं मनुस जगन हं या नाटकातील जंगल्यांची भाषा, अग्निपंखमधले रावसाहेब (डॉ. श्रीराम लागू), बाईसाहेब (सुहास जोशी), पांडगोमधला तात्या (मच्छिंद्र कांबळी), सखाराम भावे (मोज्याच्या वासाने पळणारे भूत), प्रखर राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाचे दर्शन घडविणारे तक्षकयाग, ‘रातराणी’ (अॅना – भक्ती बर्वे), रानभूल, डॅडी आय लव्ह यू अशा अनेक कलाकृती आठवतातच आणि आपल्या नकळत आपण त्यांना दंडवत घालतो. रवींद्र धोत्रे या धडपड्या तरुणाने कथाकार भाषाप्रभू वि. वा. शिरवाडकर राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक कांचन नायक, प्र. ल. मयेकर आणि थोर, चतुरस्र अभिनेता निळू फुले या चौघांना एकत्र आणून ‘नामदेव शिंपी’ हा सर्वत्र गाजलेला पुरस्कारप्राप्त लघुपट निर्माण केला होता. जो आजही मन:स्पर्श असाच आहे. रत्नागिरी-कोकणातल्या मातीतल्या प्र. ल. मयेकर नावाच्या अद्भुत जादुगाराला व त्याच्या लेखणीला आदरपूर्वक त्रिवार दंडवत!
– कुमार सोहनी
(लेखक दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार आहेत.)