भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारताचा सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमातून जाहीर केले. ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांच्या नावाची घोषणा करताना लालकृष्ण आडवाणी यांच्या नावाची घोषणा केली नसल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्या मनात ‘हेचि फल काय मम तपाला’ ही भावना उचंबळून येणे स्वाभाविक होते. आडवाणी यांना भारतरत्न किताब जाहीर करून नरेंद्र मोदी यांनी कर्तव्यपूर्ती केली की गुरूदक्षिणा दिली… की वर्षानुवर्षे या भीष्माचार्यांना बाजूला सारल्यामुळे हा किताब जाहीर करून या कल्याणशिष्याने पापक्षालन केले? असे अनेक प्रश्न निष्ठावंतांच्या मनात उभे राहिले असावेत.
भाजप कार्यालयात २०१४पासूनच निष्ठावंत कार्यकर्त्यांची दबक्या आवाजात ‘हे कसले आमचे सरकार?’ अशी कुजबूज ऐकायला मिळत आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना सभागृहात एका चर्चेत म्हणाले, ‘काँग्रेसची आजची परिस्थिती अशी आहे की ओरिजिनल गोडाऊन में आणि ड्युप्लिकेट शोरूम में’. २०१४पासून भाजपचे स्वरूप पूर्णपणे पालटले असून गडकरी यांनी केलेले विधान आज भाजपसाठीच अत्यंत चपखलपणे लागू होते. मधू चव्हाण, मधू देवळेकर आदी निष्ठावंत कार्यकर्ते आज कुठे आहेत? भाजपच्या सत्तेवरील सारीपाटावर असलेल्या सोंगट्या कोणत्या आहेत? यासाठी संशोधन करण्याची गरज नाही.
सरदार वल्लभभाई पटेल, प्रणव मुखर्जी, कर्पुरी ठाकूर ही नावे मोठीच आहेत. परंतु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, लालकृष्ण आडवाणी या नेत्यांना शासकीय सन्मानात कोणते स्थान आहे, असा प्रश्न सर्रास विचारण्यात येतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचविले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब जाहीर करण्याची मागणी केली होती आणि आजही ती मागणी कायम आहे. २००२ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातच्या दौर्यावर असताना पत्रकार परिषद संबोधित केली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे बाजूलाच बसले होते. पत्रकारांनी वाजपेयींना विचारले, ‘क्या संदेशा है?’ वाजपेयी मोघम बोलले की ‘राजधर्म निभाने की जरूरत है।’ नरेंद्र मोदी तत्काळ उत्तरले, ‘हम राजधर्म ही निभा रहे हैं साहिब!’ वाजपेयी यांनी प्रसंगावधान राखीत ‘हमें नरेंद्र भाई से ऐसी ही उम्मीद है’ असे सांगितले. त्यावेळी युवा नेते तख्त पलटवण्याची शक्यता पाहून अटलबिहारी वाजपेयी हे सावधगिरी बाळगत होते, अशा अर्थाच्या बातम्या आल्या होत्या. नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवावे काय, असा विचार वाजपेयी यांच्या मनात चालला होता. त्याच संदर्भात लालकृष्ण आडवाणी हे मुंबई दौर्यात बाळासाहेब ठाकरे यांना भेटले. बाळासाहेबांनी परखडपणे सांगितले की, ‘मोदी को मत हटाओ, मोदी गया तो समझो गुजरात गया.’ एका अर्थाने बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी यांना अभय मिळवून दिले.
याच सुमारास शंकरसिंह वाघेला यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती आणि ते मातोश्रीवर आले होते. मला शिवसेनेत प्रवेश द्या, मी गुजरातमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून काम करतो, असे ते म्हणाले होते. बाळासाहेबांच्या मनाचा मोठेपणा पाहा. ते क्षणार्धात म्हणाले, ‘आम्ही वाघ आहोत, वाघेला नव्हेत.’ बाळासाहेब ठाकरे यांची मोदी यांच्यासंदर्भातील व्हिडिओ, ऑडिओ क्लिप गुजरातमध्ये प्रत्येक निवडणुकीत वाजविण्यात येते.
भाजपने २०१३नंतर लालकृष्ण आडवाणी यांना दूरच ठेवले. २०१४ साली आडवाणी यांचा पंतप्रधानपदाचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा तेव्हा होत होती. चारवेळा राज्यसभा, पाचवेळा लोकसभा सदस्य आणि तीनवेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्या माजी उपपंतप्रधानांना राष्ट्रपतीपदापासूनही दूर ठेवण्यात आले. मोदी हे आडवाणी यांना गुरूस्थानी मानतात. परंतु अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणातले आरोपी म्हणून त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा होती. नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी प्रकरणी निर्णय दिला आणि सर्वार्थाने मळभ दूर झाले. स्वा. वि. दा. सावरकर, पं. दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या नावाचा आजतागायत विचार करण्यात आला नाही.
ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न किताब जाहीर केला, त्याचवेळी अडवाणी यांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला असता तर ते उचित ठरले असते. अखेर आत्ता तो जाहीर करून मोदी यांनी चूक सुधारली? पापक्षालन केले? कर्तव्यपूर्ती केली? की गुरूदक्षिणा दिली? आता उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे स्वा. वि. दा. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न किताब जाहीर करून उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न करावा. शिवसेनेच्या खांद्यावर उभे राहून गगनाला गवसणी घालणार्या तसेच २०१४ ते २०१९ या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याच पाठिंब्यावर राज्य करणार्या भाजपने एवढी जाणीव ठेवावी.