□ दहावी, बारावी परीक्षांचे काही खरे नाही; परीक्षांसाठी वर्गच नाहीत…
■ करायचंय काय शिकून? त्यापेक्षा कट्टे खरेदी करा, ते चालवायला शिका पोरांनो. काम तरी मिळेल नव्या भारतात आणि नव्या महाराष्ट्रात!!
□ झाडावर विषप्रयोग करणार्या विकासकाच्या विरोधात तक्रार.
■ इथे माणसं मारून, बलात्कार करून लोक जामीनावर, पॅरोलवर मुक्तपणे फिरतायत; झाडांच्या खुन्याला काय डोंबलाची सजा मिळणार?
□ ‘आपलं सरकार’ सेवा केंद्रातून ४५ हजार कोटींची लूट; हायकोर्टात जनहित याचिका.
■ एकदा असलं सरकार ‘आपलं’ सरकार म्हणून स्वीकारलं की मग लूट झाल्याबद्दल बोंब तरी कशाला मारायची?
□ गँगलीडरच मुख्यमंत्री असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? – आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारवर घणाघात.
■ इथेही मिळणार नाही, वरही मिळणार नाही… परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे आदित्यजी!
□ कुलाब्यातील श्रीरामकथा पालिकेने बंद पाडली; संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावरच सुरू ठेवला कार्यक्रम.
■ रामाचं नाव घेऊन मतं मागण्याचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत एकाच टोळीकडे. बाकीच्यांनी रामकथा सांगायला सुरुवात केली तर रावण कोणाला ठरवणार? अडचण लक्षात घ्या.
□ मिंधे गटात प्रवेशासाठी दबाव; निवडणुका जवळ आल्याने सूडबुद्धीने खोट्या केसेस, छापेमारी.
■ आता फक्त मतदारांवर खोट्या केसेस आणि छापे घालण्याचा पराक्रम पाहायचा राहिलाय, त्यानंतर भारतीय लोकशाही दु:खाने डोळे मिटून टाकेल कायमचे.
□ महानगरपालिकेत मुकादम बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार.
■ कोणत्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत नाही, त्याची बातमी दिली तर ती बातमी. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार ही बातमी तरी आहे का? ती परंपरा आहे.
□ आचारसंहितेची भीती; कोट्यवधींच्या प्रस्तावांसाठी आठवड्यातून दोनदा कॅबिनेट.
■ शेवटची संधी आहे, आठवड्यातून १४ वेळा पण घेतील काही दिवसांनी.
□ मिंधे सरकारने रायगडातील मच्छिमारांचे ३२ कोटी थकवले
■ ‘ऐसा कोई सगा नही, जिसको हमने ठगा नहीं..’ असा एक डायलॉग होता कुठल्या तरी सिनेमात.
□ शहापूर ते मंत्रालय पायी निघालेल्या आशासेविका चक्कर येऊन कोसळल्या.
■ त्यांच्यावर ही वेळ आणणारं सरकार कोसळल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही…
□ पंडित नेहरूंनी देशाला आळशी बनवलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ अगदी बरोबर. आराम हराम आहे, अशी घोषणा त्यांनी टिंबक्टूमध्ये केली होती आणि मोदी सरकार ज्या मित्रांना कवडीमोलाने विकतंय त्या पायाभूत यंत्रणा त्यांनी ग्वाटेमालात उभ्या केल्या होत्या!
□ मिरा-भाईंदर काँक्रिट रस्त्यांच्या कामात घपला.
■ तरीच चांगले, १० वर्षं टिकले असते असे डांबरी रस्ते खोदून बळे बळे काँक्रिटीकरणाचा, लोकांना धुळीचे खकाणे खायला लावणारा कुटीरोद्योग जोरात आहे तिथे.
□ दाढीची नाडी दिल्लीश्वरांच्या हातात – उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी घेतले फैलावर.
■ दादांची गत काही वेगळी नाही… दोन्ही खेळण्यांची सगळी कळसूत्रं तिकडेच आहेत, चावी दिली की बोलू, चालू, हलू लागतात.
□ शेतकर्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखले.
■ त्याचे शाप तख्त उलटतील, तेव्हाच दिल्लीश्वर कायमचे तडीपार होतील…
□ हक्काच्या पैशांसाठी चार राज्यांचे आंदोलन; चारही मुख्यमंत्री जंतरमंतरवर.
■ संघराज्यपद्धतीला काळिमा फासणार्या दिल्लीश्वरांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पण, तो शब्द यांच्या कोषात असेल तर ना!
□ महाराष्ट्र गुंडांच्या हाती, राष्ट्रपती राजवटीची मागणी.
■ आता राज्य सुरक्षित ठेवणारं मविआ सरकार थोडेच आहे सत्तेत, इथे राष्ट्रपती राजवट आणायला?
□ गाडीखाली कुत्रा आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल – फडणवीसांचे बेताल वक्तव्य.
■ शिवसैनिकांनो, कोण कोणासंदर्भात काय बोलले आहेत, ते नीट लक्षात ठेवा. नंतर अक्षराअक्षराचा हिशोब घ्यायचा आहे.
□ भारतरत्नांची लयलूट; आता नरसिंह राव, चरणसिंह आणि स्वामीनाथन यांना सर्वोच्च सन्मान.
■ आणि हे रेवडी संस्कृतीवर विनोदी बोलत असतात!
□ गणपत गायकवाडची व्हॉइस टेप पोलिसांकडे; मुख्यमंत्री शिंदेंनी करोडो रुपये हडपल्याचा आरोप रेकॉर्डवर येणार.
■ टेप गहाळ नाही तर निकामी झाल्याशिवाय राहात नाही आता!
□ पुण्यात भाजपची झुंडशाही; निखिल वागळे यांच्यावर हल्ला.
■ भ्याड जनता पार्टीला पराभव दिसायला लागलाय स्पष्ट!
□ धर्म बघून अटक करता का? – हायकोर्टाने उपटले मिंधे सरकारचे कान.
■ नशीब, उत्तर प्रदेशात आपलं हायकोर्ट नाही!
□ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे शेवटून तिसरे.
■ काहीतरी गडबड आहे, पहिलाच असायला हवा होता… असं कसं! कुठून ते तुम्ही ठरवा.