पुणे शहराचे महत्व महाराष्ट्रासाठी सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे, विद्येचे माहेरघर म्हणून देखील आहे, उद्योगांची नगरी म्हणून आहे; तसेच महाराष्ट्राला राजकीय, वैचारिक दिशा दाखवणारे शहर म्हणून देखील पुण्याचे महत्व आहे. पुण्याने ठरवावे व महाराष्ट्राने ऐकावे असा लौकिक असणारे हे शहर, छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊंचे , महात्मा फुलेंचे, लोकमान्य टिळकांचे शहर अशी जगाला ओळख असणारे हे शहर आता गजा मारणे, शेख, घायवळ, बोडके, आंदेकर, मोहोळ अशा लोकांच्या नावाने ओळखले जात असेल, दाभोळकरांची हत्या झालेले शहर म्हणून ओळखले जात असेल, ललित कला केंद्रात तोडफोड करणार्या मवाल्यांचे शहर म्हणून ओळखले जात असेल आणि निर्भय बनो आंदोलनाच्या अहिंसक पुरोगामी कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे शहर म्हणून ओळखले जात असेल, तर ते फारच दुर्दैवी आहे. विज्ञान, कला, विचार व आध्यात्म यांचा संगम असलेले शहर गुंड, मवाली व हिंसक राजकीय कार्यकर्त्यांचे माहेरघर झाले असेल तर दोष कोणाचा आहे? पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांनी जीव मुठीत धरून जगावं, असाच संदेश आजची गुंडगिरी देते आहे. नामांकित जागतिक आयटी कंपन्यांची कार्यालये असणारे हे शहर जर सुरक्षित नसेल तर इथले व्यवसाय यानंतर टिकतील का?
पुण्याच्या अधोगतीला सर्वात जास्त जबाबदार आहे तो भारतीय जनता पक्ष. या पक्षाने महाराष्ट्राची जी गत आज केलेली आहे, तीच गत पुण्याची फार आधीच केलेली आहे. पुणे शहरावर भाजपाचे प्रेम पुतना मावशीचे आहे. भाजपासाठी पुणे म्हणजे फक्त लोकसभा आणि विधानसभेच्या सगळ्या जागा देणारे, महानगरपालिका हातात देणारे, म्हणजेच पक्षावर एकतर्फी आंधळे प्रेम करणार्या मतदारांचे शहर इतकेच आहे. कोल्हापूरने मातीत लोळवून फेकलेली धुणी कोथरूडमध्ये धुवून काढण्याचे भाजप धारिष्ट्य दाखवतो ते यामुळेच.
अॅड. असीम सरोदे, लोकपाल आंदोलनातील आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची ‘निर्भय बनो’ आंदोलनातली सभा उधळून लावण्यासाठी त्यांच्या मोटारवर पोलिसांच्या उपस्थितीत भाजपच्या गुंडांनी चढवलेला हिंस्त्र हल्ला खेदजनक आहे. निर्भय बनो या आंदोलनाचा उद्देश हा हुकूमशाही खाक्याच्या मोदी सरकारला न घाबरता सामान्य माणसाने निर्भय बनून धोक्यात असलेल्या लोकशाहीचे संरक्षण करावे हा आहे. भाजपच्या मंदबुद्धी भक्तांसाठी सदैव कुचेष्टेचा विषय असलेले पुरोगामी कार्यकर्ते आणि संघटना एकजूट नसल्याने एकांड्या शिलेदारांसारख्या लढत आहेत. अहिंसावादी आणि अराजकीय असल्याने आजवर भाजप व संघासाठी ते फारसे दखलपात्र देखील नव्हते. मात्र, पन्नासपेक्षा अधिक यशस्वी सभा घेऊन निर्भय बनो आंदोलन जनजागृती करू लागले, तेव्हा मात्र भाजपा खडबडून जागा झाला. समाजात जेव्हा जनजागृती होऊ लागते, तेव्हा तेव्हा प्रतिगामी सत्ताधारी कितीही शक्तिमान असले तरी त्यांचे धाबे दणाणते आणि ते गलितगात्र होतात. देवभोळी आणि डोळे मिटलेली जनता प्रतिगामी ताकदींना वाढण्यासाठी अत्यावश्यक असते. वैचारिक भाषणात न रमता बुवाबाजीमध्ये रमणारी जनता हेच त्यांचं शक्तिकेंद्र असल्याने जनतेत जागृती होणार नाही याची प्रतिगामी संघटना व पक्ष पुरेपूर काळजी घेतात. जनतेच्या हातात संविधानाची प्रत न देता हनुमान चालिसा वाटण्यामागे हेच कारण असते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी , प्रबोधनकार ठाकरे या सर्वांना आयुष्यभर प्रतिगामी शक्तींशी झगडावे लागले. आजदेखील हा लढा संपलेला नाही आणि इतक्यात तो संपणार देखील नाही. कारण, धर्माचे नाव घेत आर्थिक आणि राजकीय भांडवलदार जोपर्यंत विनासायास प्रचंड लाभ पदरात पडून घेत आहेत, तोपर्यंत त्यांची पोलखोल करण्याचे काम जिवाला धोका आहे. पोलखोल करणारे जिवानिशी संपवले जातात हे दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हौतात्म्याने सिद्ध केले आहे.
निर्भय बनो आंदोलनाच्या वत्तäयांवर पुण्यात जो हल्ला झाला, त्याची कुप्रथा सावित्रीबाईंवरील हल्ल्यापासूनची आहे. तिघेही या हल्ल्यातून सहीसलामत बचावले असले तरी त्या हल्ल्याचे एकूण स्वरूप आणि त्याची दहशत पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ग्रासलेली भाजप कोणत्या हिंसक थराला जाणार आहे याची ही एक झलक आहे.
राज्यात ज्या पद्धतीने राजकीय कार्यकर्त्यांचे खूनसत्र सुरू आहे ते पाहता लोकसभेच्या निवडणुकीत खाजगी शस्त्रे खरोखर स्वसंरक्षणार्थ वापरली जाणार का स्वपक्षाला विजयी करण्यासाठी वापरली जाणार यावर पोलिसांनी आत्तापासूनच कडक नजर ठेवायला हवी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हल्ले व खूनसत्र प्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत, त्यात नवल नाही. विरोधात असताना एखादे चिलट मेले तरी राजीनामे मागत आकांडतांडव करणारे भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस आता मात्र खुर्चीला चिकटून बसलेले आहेत आणि एका राजकीय कार्यकर्त्याच्या खुनानंतर ‘गाडीखाली कुत्रा मेला तरी विरोधक माझा राजीनामा मागतील’ अशी असंस्कृत, हिणकस भाषा वापरून आपलं उच्चशिक्षण किती वरवरचं आहे आणि कुसंस्कार किती खोलवर रूजले आहेत, ते दाखवून देत आहेत.
एकेकाळी राजकारणात नैतिकता हवी यासाठी दांभिक आग्रह धरणारा भाजप आणि त्यांची मातृसंस्था हे दोघेही आजकाल सत्तेसाठी सगळी नैतिकता कोळून प्यायलेले आहेत, हे इतके निर्ढावलेले आहेत की त्यांच्या पक्षाच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याच सहकारी पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्याचा गोळ्या घालून खून केला तरी अजूनपर्यंत त्या आमदारावर या बलाढ्य पक्षाने कारवाईची सुई देखील टोचली नाही. राज्यभर असे एकावर एक खाजगी शस्त्रातून गोळीबार सुरू आहेत, खून पडताहेत आणि ते फेसबुकवर लाइव्ह दाखवले जात आहेत, खुनाचे व्हिडिओ सरसकट समाजमाध्यमांवर फिरवले जात आहेत, गंभीर गुन्ह्यातील आरोपी मंत्रालयात रील बनवत आहेत, गुंड मवाली लोक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या राजरोस अधिकृत भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांचे फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकले जात आहेत. गुंड मवाली अशी राजमान्यता मिळवू लागले, तर कायदा व सुव्यवस्थेवर जनतेने विश्वास कसा ठेवायचा? कायद्याची व पोलिस खात्याची भीती उरली नसेल, तर त्याला गृहखाते आणि गृहमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यायला हवा. कोणे एके काळी या देशात नैतिक कारणासाठी दोष नसताना देखील राजीनामे दिले गेले होते. पण भाजपाने राजकारणात नवनैतिकते आणली. त्या नवनैतिकतेला सरावलेले व सत्तेला चटावलेले गृहमंत्री ना खेद ना खंत अशा भावनेने निर्ढावून अहंकारी वल्गना करत आहेत.
गृह खाते राजकारणातील सर्वात स्वच्छ व्यक्तींकडे असावे लागते. महाराष्ट्र आजदेखील आर. आर. पाटील (आबा) यांना आठवून हळवा होतो ते कशामुळे, याचे चिंतन विद्यमान गृहमंत्री करतील का? एखादी पंचलाइन मारून वेळ निभावण्याची ही वेळ नाही याचे गांभीर्य या सरकारला आहे का? उल्हासनगरच्या सत्ताधारी आमदारानेच केलेल्या गोळीबारानंतर भाजपाचा स्वतःचा मतदार देखील हादरला आहे याची कल्पना सरकारला आहे का? नैतिकेने गृहखाते सांभाळत असाल तरच गृहमंत्री म्हणून तुमचा ठसा राहील नाहीतर याआधीच अनेक विशेषणांनी सोशल मीडियावर सन्मानित झाला आहात, तसेच कायमचे लक्षात राहाल.
निर्भय बनोच्या आंदोलकांनी पुणे पोलिस दलावर गंभीर आरोप केले आहेत. त्याची चौकशी करणे हे गृहमंत्र्यांचे आद्यकर्तव्य आहे. दरवेळी एखादा पाळीव प्राणी काढून वेळ मारून नेता येणार नाही. श्वान तर अत्यंत विश्वासू आणि प्रेमळ पाळीव प्राणी आहे व तो स्वामिनिष्ठ आहे. विचारशून्य स्वार्थी आणि कपटी आघाडी करून बनवलेल्या सरकारमध्ये मात्र इमानदारी हा स्थायीभाव असलेला श्वानही बनून राहता येत नाही, माकडउड्या माराव्या लागतात, गरज पडली तर दुतोंडी गांडूळ बनावे लागते आणि दिल्लीचा पोपट वा लकी कबूतर बनून राहावे लागते, हे दुर्भाग्य.
एकीकडे चारशे पार जागा सहज जिंकू असा आत्मविश्वास असणारे सर्वशक्तिमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे त्यांना मते देऊ नका असे निक्षून सांगणारे एक सामान्य पत्रकार निखिल वागळे या दोघांच्या ताकदीची तुलनाच होऊ शकत नाही. तशात तर पुणे म्हणजे भाजपाचे दावणीला बांधलेले शहर- तिथे कोणी काही बोलले, कितीही सभा घेतल्या तरी भाजप आरामात जिंकणार अशी हवा असेल तर मग निर्भय बनोच्या आंदोलकांवर हल्ला करायची गरज भाजपाला नक्की कोणत्या कारणाने भासली असावी? लोकसभा निवडणुकीत अतिशय कळीचा असलेला महाराष्ट्र लोकशाही धाब्यावर बसवणारा इतका नंगानाच करून, गैरमार्गांनी सत्ता बळकावूनही भाजपच्या हाती लागणार नाही, याची जाणीव त्या पक्षाला होते आहे. निर्भय बनो हे वरवर क्षुल्लक दिसणारे आंदोलन सोशल मीडियातून गावागावात पसरू लागले आहे. शिवाय आता या आंदोलनाला थेट महाविकास आघाडीचे समर्थन आहे. दिल्लीची सत्ता घालवण्याची ताकदही अशा जनआंदोलनांत असते, याची भीती भाजपाला आहे. त्यामुळेच, अपूर्ण राममंदिरामध्ये श्री रामल्लाची प्राणप्रतिष्ठापना करून संघाने देशाच्या राजकारणात भावनिक मुद्दे आणायचे नेहमीचे यशस्वी राजकारण निवडणुकीच्या तोंडावर परत एकदा सुरू केले आहे. हिंदूचा विकास करायला दहा वर्षात नाही जमला, मग त्यानंतर राममंदिर हाच पाचशे वर्षात पहिल्यांदाच झालेला हिंदूंचा अभूतपूर्व विकास अशी मांडणी करावी लागते. त्यासाठी प्रचंड पैसे ओतून पोस्टरबाजी आणि झेंडेबाजी केलेलीच आहे. २०२४ची लोकसभा निवडणूक ही जणू आता एक औपचारिकता आहे, रामलल्लाच्या कृपेने मोदी जणू आधीच जिंकले आहेत, अशी चारशेपार जागांची वल्गना भाजपाने केली आहे. नमो नावाची पोकळ हवा भरून राजकीय वातावरणात फुगे सोडलेले असल्याने भाजपा तशी निश्चिंत असायला हवी. पण भाजपा निश्चिंत नाही. हिंदीभाषिक पट्ट्यात भाजपसाठी सारे ठीक दिसत असले तरी दिल्लीचा रस्ता यावेळी उत्तर प्रदेशातून जाणार नाही, तर तो महाराष्ट्रातून जाणार आहे याची राजकीय जाण भाजपाला नक्कीच आहे. महाराष्ट्राने मोदींना नाकारले तर मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत, हे वास्तव भाजपाइतके कोणालाच माहिती नाही. भाजपने गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकारणाचे विकृतीकरण केले आहे, त्यामागे खरे कारण महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा हेच आहेत. भाजपाने जे केले ते सुसंकृत आणि स्वाभिमानी महाराष्ट्राला पटलेले नाही. हे विकृतीकरण पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादानेच झाले आहे, याची जाण इथल्या जनतेला आहे. अकार्यक्षम सरकार, बेरोजगारी , महागाई, खा खा सुटलेल्या सत्ताधारी पक्षांनी चालवलेला भ्रष्टाचाराचा अड्डा हे सगळे पाहून महाराष्ट्राचा मतदार वैतागलेला आहे. मोदींचे सलग तिसर्या वेळी सत्तेत येण्याचा स्वप्नभंग करण्याची ताकद महाराष्ट्राकडे आहे. त्यामुळेच भाजप या राज्यात साधी विद्यापीठांची निवडणूक देखील होऊ देत नाही, कारण त्यांना झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची आहे. त्यात कोणी भाजपाची आणि मुख्यत्त्वे मोदी-शहांची पोलखोल करू लागतात, तेव्हा मात्र भाजपचे मुद्द्याचे राजकारण संपते व भेसूर रूप दाखवत तो पक्ष व संघ हिंसक गुद्द्यांवर येतात. पुढील काही महिने राजकारण गुद्द्यांवर येणार याची ही भयकारी चुणूक आहे.