घरातील टीव्हीवर दिसणारे कलाकार आणि सिनेमातील कलाकार यांच्यातील फरक फारच सुस्पष्ट आहे, तो लगेच दिसून येतो. चार गुंडांना लोळवणं, नाना हिकमती करून आवडती व्यक्ती मिळवणं, सत्तेशी संघर्ष करणं अशा सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसलेल्या गोष्टी मोठ्या पडद्यावरील हिरो हिरॉईन करून दाखवतात तेव्हा ते पटतं. याउलट टीव्हीवर दिसणारे कलाकार असे लार्जर दॅन लाइफ नसतात, ते आपल्या कुटुंबातील भाऊ, वहिनी, मुलगा, सून अशा कौटुंबिक नात्यातले किंवा मित्रासारखे वाटतात. त्यांचं आयुष्यही आपल्यासारखंच वाटतं. त्यांच्याही आयुष्यात संकटांपासून सणवारांपर्यंत सगळं आपल्यासारखं. जणू आपले डिजिटल शेजारीच! टीव्हीचा पडदा आपल्याला आपलाच वर्तमान दाखवतो, तर सिनेमाचा भव्य पडदा आपल्याला स्वप्नं पाहायला शिकवतो… बरेच जण स्वप्नं नुसती पाहण्यातच समाधान मानतात, तर काही स्वप्नाळू स्वप्नांचा मागोवा घेत स्वप्ननगरी मुंबईत दाखल होतात… पण सगळ्यांनाच मोठ्या पडद्यावर संधी मिळत नाही, तेव्हा त्यांची पावले छोट्या पडद्याकडे वळतात, पण नजर कायम मोठ्या पडद्यावर असते.
१९५९ साली भारतात सुरू झालेल्या टेलिव्हिजनवर काम करणं सिनेअभिनेते कमीपणाचं मानत. टेलीव्हिजनला ‘इडियट बॉक्स’ असंही हिणवलं गेलं. आज ६५ वर्षांनी या समजात काही बदल झाला आहे का? आणि तसं पाहिलं तर दोन्ही ठिकाणी कॅमेर्यासमोर अभिनय केला जातो, मग या दोन्ही क्षेत्रांत इतका फरक का, यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप…
भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणार्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाचा कालावधी चाळीस मिनिटांचा होता. कालांतराने सिनेमा बोलू लागला आणि त्याचा कालावधी अडीच तीन तासावर गेला. सिनेमाच बस्तान उत्तम बसलं होत. राज देव आणि दिलीप या त्रयींनी सिनेमात जम बसवला होता. पहिल्या सिनेमानंतर ४६ वर्षांनी भारतात १५ सप्टेंबर १९५९ रोजी ‘टेलिव्हिजन इंडिया’ या नावाने पहिलं टीव्ही चॅनल सुरू झालं, सुरूवातीला आठवड्यातून तीन दिवस शैक्षणिक कार्यक्रम असतं. १९६५पासून दिवसातून एकदा पाच मिनिटांसाठी हिंदी बातम्या प्रसारित करण्यात येत. १९७५ साली टेलिव्हिजन इंडियाचं दूरदर्शन असं नामकरण करण्यात आलं. याच वर्षात दीवार आणि शोले या सिनेमांचा प्रचंड यशानं मोठ्या पडदा व्यापून टाकणारा अमिताभ बच्चन नावाचा सुपरस्टार उदयास आला. पुढील दहा वर्षांत अमिताभच्या बरोबरीने इतर नायकही सिनेमाला अधिकाधिक ग्लॅमर प्राप्त करून देऊ लागले. या तुलनेने टेलिव्हिजन कुठेच नव्हता. १९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने भारतातील टीव्ही सेट रंगीत झाले. १९८४च्या ‘हमलोग’ या पहिल्या वहिल्या भारतीय टीव्ही मालिकेने छोटा पडदा प्रबोधनासोबतच प्रेक्षकांच मनोरंजन देखील करू शकतो, हे दाखवून दिलं. यानंतर ये जो है जिंदगी, करमचंद, बुनियाद, मालगुडी डेज, नुक्कड या मालिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण दूरदर्शन ही सरकारी वाहिनी असल्याने इथे बंधने जास्त होती. छायागीत आणि चित्रहार हे हिंदी चित्रपटगाण्यांचे कार्यक्रम आणि शनिवार रविवारी चित्रपट दाखवले जात, तेवढंच मनोरंजन. इतर पर्याय उपलब्ध नसल्याने लोकांना देखील दूरदर्शन जे दाखवील ते बघावं लागत असे. सिनेमा क्षेत्रातील दोन निर्मात्यांनी सिनेमाची भव्यता टीव्हीवर आणून दाखवली. रामानंद सागर यांनी रामायण आणि बी. आर. चोपडा आणि महाभारत या महामालिकांची निर्मिती केली. रविवारी दूरदर्शनवर रामायण, महाभारत लागायची वेळ झाली संपूर्ण देशभरात अघोषित संचारबंदी लागू व्हायची. या दोन्ही मालिकांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि छोट्या पडद्याची ताकद दाखवून दिली.
टीव्हीने इतकी लोकप्रियता मिळवून देखील मोठ्या पडद्यावरील स्टार मंडळी टीव्हीवर दिसायला इच्छुक नव्हते. दूरदर्शनवरील कार्यक्रम प्रेक्षकांना घरबसल्या फुकटात पाहायला मिळतात, आपण छोट्या पडद्यावर दिसलो तर प्रेक्षक तिकीट काढून आपला सिनेमा पहायला येणार नाहीत ही भीती या स्टार्सच्या मनात होती. हे स्टार कलाकार त्यांच्या चित्रपटांतूनच दूरदर्शनवर दर्शन द्यायचे. पण सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यावर अनेक वर्षांनी ते चित्रपट दूरदर्शनवर प्रसारित होत असत. त्यामुळे स्टार्सना दूरदर्शन ही कधी स्पर्धा वाटली नाही.
पण ऐंशीच्या दशकात भारतात रंगीत टेलिव्हिजनसोबत घरबसल्या सिनेमा दाखवणार्या व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डरचा (व्हीसीआर) शिरकाव झाला तेव्हा मात्र हिंदी चित्रपटसृष्टीला धक्का बसला. कोणत्याही सिनेमाची कॅसेट दोन-तीनशे रूपयांना विकली जायची. ज्यांना कॅसेट विकत घ्यायची नाही अशा सिनेरसिकांसाठी दिवसाला १० रूपये भाडे आकारून कॅसेट देणार्या व्हिडिओ लायब्ररी सुरू झाल्या. अनेक तरूणांनी टीव्हीचे १०, व्हीसीआरचे २० आणि कॅसेटचे १० असे चाळीस रूपये आकारून चाळीत, गल्लीबोळात सिनेमा दाखविण्याचा व्हिडिओ धंदा सुरू केला. याचीच पुढची पायरी म्हणजे ९०च्या दशकात सुरू झालेला केबल टीव्ही. एका व्हिडिओ रेकॉर्डरमधून केबलद्वारे घराघरातील टीव्हीवर एकाच वेळी सिनेमा दाखवला जायचा. आधी दिवसाला एक चित्रपट, मग दोन अशी सुरूवात झाली. पण नंतर केबलचालकांच्या आपापसातील चढाओढीमुळे काही ठिकाणी शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट रविवारी केबलवर चोरून दाखवला जाई. सिनेमाच्या या पायरसीने सिनेसृष्टीचे धाबे दणाणले. पोलिसांनी कारवाई केल्यावर हे प्रकार कमी झाले.
सर्व मोठ्या शहरांत पसरलेल्या केबल टीव्ही जाळ्यांचा आधार घेऊन भारतात दोन ऑक्टोबर १९९२ रोजी झी टीव्ही ही पहिली खाजगी उपग्रह वाहिनी सुरू झाली. झी या भारतीय कंपनीपाठोपाठ स्टार, सोनी अशा परदेशी वाहिन्यांचं भारतात आगमन झालं. खाजगी वाहिन्यांना सरकारी सेन्सॉरशिप नव्हती. काय दाखवलं तर प्रेक्षक जास्त वेळ आपलं चॅनल बघतील असा व्यावसायिक विचार करून कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. ९०च्या दशकातील प्रेक्षकांना आधुनिक वाटतील असे कार्यक्रम लावले गेले. शहरी महिलांच्या जीवनावर आधारित तारा सिरियल असो अथवा विवाहबाह्य संबंधांवर आधारित हसरतें या मालिकांनी बोल्ड विषय लहान पडद्यावर आणले. घरबसल्या करमणूक करणारे अनेक विनोदी कार्यक्रम, नृत्यावर, गाण्यावर आधारित खेळ अशा कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. हिंदी सिनेमात एकाच इमेजमधे अडकलेल्या कलाकारांना वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची इथे मोठी संधी होती, तरीही मोठा पडदा, छोट्या पडद्यापासून अंतर राखून होता.
छोट्या पडद्यावर काम करणारा कलाकार कधीही हिंदी सिनेमाचा हिरो बनू शकत नाही असाही एक समज प्रचलित झाला होता. या समजाला पहिला धक्का दिल्लीतील एका तरूणाने दिला. १९८९ साली फौजी, दिल दर्या, सर्कस या मालिकांमधून दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर काम केल्यावर शाहरूख खानने दीवाना या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर धमाकेदार एंट्री घेतली. बाजीगर, डर, दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे अशा सिनेमांच्या अफाट यशाने पहिल्यांदाच एक टीव्ही कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीचा आघाडीचा नायक बनला. पण शाहरूखला जमलं ते नंतरच्या कोणत्याही टीव्ही कलाकाराला आजपावेतो जमलं नाही, हेही नाकारता येत नाही. टीव्हीवर काम करणारे कलाकार प्रेक्षकांनाआपल्या घरातील सदस्य वाटतात, हा त्यांचा प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट देखील आहे. कारण घरात रोज दिसणार्या माणसाला पाहायला कुणी तिकीट काढून का जाईल?
अनेक मराठी कलाकारांचा मात्र नाटक, मालिका, चित्रपट असा प्रवास झालेला आहे. दिलीप प्रभावळकरांनी दूरदर्शनवर चिमणराव सादर केला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी टुरटुर नाटक, दूरदर्शनवरील गजरा कार्यक्रमात भूमिका साकारल्यावर ते सिनेमात आले. मराठीत ना ग्लॅमर, ना पैसा यामुळे मराठी चित्रपटात सुपरस्टार बनल्यावर देखील लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ ही स्टार मंडळी छोट्या पडद्यावर दिसत राहिली. शिवाय मराठी सिनेमाच्या ठरलेल्या मानधनातून काही रक्कम निर्माता बुडवणार हे काही अपवाद वगळता विधिलिखित आहे. नव्वदीच्या दशकात सहा सात मराठी सिनेमात हिरो असणार्या एका कलाकाराने सांगितलं की त्याच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता. ते ग्राहकांकडे उधारीची वसुली करायला गेले की ग्राहक म्हणायचे, ‘अहो शेठ, तुमचा मुलगा सिनेमात हिरो आहे, तिथे बक्कळ पैसे कमवतोय. कशाला तगादा लावताय? पण निर्मात्यांनी पैसे बुडविल्यामुळे या हिरोची परिस्थिती अशी होती की त्याला दर महिन्याला घरून पैसे मागवायला लागत होते. मराठी सिनेमा प्रदर्शित होताना कलाकार प्रमोशन करताना दिसले नाहीत तर त्याचा अर्थ हाच असतो.
अंकुश चौधरी, भरत जाधव, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, स्वप्नील जोशी या मराठी स्टार्सनी देखील आधी छोटा पडदा मग मोठा पडदा असा प्रवास केला आहे. प्रत्येक मराठी कलाकाराची सिनेमात काम करण्याची इच्छा असते, पण सर्वच कलाकारांना सातत्याने तशी संधी मिळत नाही. या कलाकारांना सेटल होण्यासाठी, घराचा ईएमआय भरण्यासाठी दर महिन्याला एक फिक्स इन्कम लागतो. नियमित मानधन आज फक्त मालिकाच देऊ शकतात. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे काम करून स्टार झालेले मराठी कलाकार ग्लॅमर जपण्यासाठी मालिकांच्या वाटेला न जाता हास्यजत्रा, सारेगामा, आता होऊ दे धिंगाणा यांच्यासारखे कथाबाह्य (नॉन फिक्शन) कार्यक्रम निवडतात. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाला किंवा परीक्षकाला दिवसाला ५० हजार ते एक लाख रूपये मानधन मिळतं जर महिन्याला आठ दिवस शूटिंग झालं तर महिन्याला सात-आठ लाख रूपये मिळतात. यामुळेच बरेचसे नामवंत कलाकार सिनेमांच्या तारखा अॅडजेस्ट करून अशा कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात.
छोट्या आणि मोठ्या पडद्यातलं अंतर खूपच कमी करणारी घटना ३ जुलै २००० रोजी घडली. मोठ्या पडद्यावरील महानायक अमिताभ बच्चन यांचं ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर आगमन झालं. त्या काळात अमिताभचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते. एबीसीएल कंपनीचं कर्ज डोक्यावर होतं, ते फेडण्यासाठी इच्छा नसतानाही अमिताभला टीव्हीवर यावं लागलं. या निर्णयामुळे अमिताभला आर्थिक लाभ तर झालाच, शिवाय केबीसीने त्याला लोकमानसात पुन्हा स्थान मिळवून दिलं. त्याचबरोबर अमिताभसारखा सुपरस्टार रोज दिसायला लागल्यामुळे घरातील छोटा पडदाही लोकांना मोठा भासू लागला. त्यांच्या कम्प्युटरजी अशा संबोधनाने निर्जीव कम्प्युटरदेखील खेळातील जिवंत सदस्य वाटू लागला. शालीनता, नम्रपणा, शुद्ध हिंदी, विनोदी स्वभाव हे गुण पाहून प्रेक्षक या कुटुंबवत्सल अमिताभच्या अधिकच प्रेमात पडले. ७०-८० च्या दशकातला प्रेक्षकवर्ग त्याच्या सिनेमांचा चाहता होताच, पण केबीसीने नवीन पिढीला अमिताभ नव्याने दाखवला, त्याच्या मार्वेâट व्हॅल्यूत पुन्हा पुन्हा वाढ होत राहिली. हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा अमिताभला प्रत्येक भागाचे २५ लाख रूपये मिळत होते म्हणे. आज १५ सिझन प्रदर्शित झाल्यावर मानधनाची रक्कम चार ते पाच कोटीपर्यंत पोहोचली आहे असं म्हणतात. केबीसीच्या जाहिरातींमधून सोनी टीव्हीला ४५० कोटी रूपये मिळतात, म्हणजे पाहा.
अमिताभला मिळालेलं भरघोस मानधन आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून जवळजवळ सर्व मोठ्या सुपरस्टार्सनी छोट्या पडद्याकडे धाव घेतली. शाहरूख खानने केबीसी-३ (२००७), पाँचवी पास (२००८), जोर का झटका (२०११), गोविंदाने छप्पर फाडके (२००१) सलमान खानने दस का दम (२००८) असे कार्यक्रम केले, पण सलमान खान वगळता इतर कोणाही स्टारला अमिताभसारखं टीव्ही प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही. अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला बिग बॉस हा शो चौथ्या सिझनला २०१० साली सलमान खानकडे आला. आज १७ सिझन करून देखील त्या शोची आणि सलमानची लोकप्रियता कायम आहे. या शोच्या एका भागाचे सलमान सहा कोटी रूपये मानधन घेतो अशी चर्चा आहे.
शाहरूख खाननंतर छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी हिंदी सिनेमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. काही अभिनेते स्टारडम मिळविण्यात यशस्वी ठरले तर अनेक जण अपयशी ठरले. टीव्ही मालिकांतून आलेल्या कलाकाराने टॅलेंटच्या जोरावर हिंदी सिनेमात यश मिळवलं तरी त्याची जागा पक्की होत नाही. हिंदी सिनेमात टिकून राहण्यासाठी बिग बजेटवाल्या निर्मात्यांच्या कंपूत त्या कलाकाराचा प्रवेश होणं खूप महत्त्वाचं आहे. सुशांत सिंग राजपूत टॅलेंट असूनही या बाबतीत मागे राहिला. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून हिंदी सिनेसृष्टीत आलेल्या सुशांतने ‘कायपोचे’ सिनेमात उल्लेखनीय कामगिरी बजावल्यावर महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक सिनेमा सुपरहिट करून १०० कोटी क्लबपर्यंत मजल मारली. पण या यशानंतरही सुशांतला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळाले नाहीत. हिंदी सिनेमाचे स्टारपद सांभाळायला खूप खर्च करावा लागतो. छोट्या पडद्यावरील कलाकारासारखं लो प्रोफाईल राहून चालत नाही. महागडी गाडी, ब्रँडेड कपडे, मोठं घर असं स्टेट्स मेन्टेन करावं लागतं. सुशांतच्या घराचं भाडे महिन्याला साडेचार लाख रूपये इतकं होतं यावरून राहणीमान उंचावण्यासाठी काय खर्च असू शकतो याचा अंदाज येईल. वाढता खर्च आणि हाताशी फार चित्रपट नाहीत या दुष्टचक्रातून सुशांतला मार्ग काढता न आल्यानं त्यानं जगाचा निरोप घेतला.
छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता पण मोठ्या पडद्यावर सपशेल लोटांगण घातलेले अनेक अभिनेते आहेत. क्यूँकि सास भी कभी बहू थी या मालिकेतील मिहीर ही अमर उपाध्यायने साकारलेली व्यक्तिरेखा जिवंत करा या मागणीसाठी महिलांनी चॅनलच्या ऑफिसवर मोर्चा काढला होता. इतकी अफाट लोकप्रियता मिळवूनही तो सिनेमात पूर्ण अपयशी ठरला. राजीव खंडेलवालने क्या हादसा क्या हकीकत, कही तो होगा या मालिकेतून भरपूर लोकप्रियता मिळवली आणि याच लोकप्रियतेतून त्याला २००८ साली आमीर या सिनेमात पहिला ब्रेक मिळाला. राजीवने एकूण सात सिनेमांत काम केलं असलं तरी हिंदी सिनेसृष्टीत जम बसवणं त्याला शक्य झालं नाही. कॉमेडी किंग कपिल शर्माचे मोठ्या पडद्यावर येण्याचे सगळे मनसुबे बॉक्स ऑफिसवर साफ कोसळले आहेत. या अनुभवानंतर छोट्या पडद्यावरच्या कलाकारापेक्षा त्याच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेम करतात हे अधोरेखित झालं.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले अनेक अभिनेत्यांनी हिंदी सिनेमात आपलं स्थान निर्माण केलं आहे. पण त्यांचा हिंदी सिनेमातला प्रवेश तितकासा सोपा नसतो. सिनेमात काम मिळण्याआधी मुंबईत उदरनिर्वाहासाठी त्यांना टीव्हीचा मार्ग अवलंबावा लागतो. बँडिट क्वीन सिनेमात मोठी भूमिका साकारल्यावर अभिनेता मनोज वाजपेयीकडे काहीच काम नव्हतं. दूरदर्शनवरील स्वाभिमान मालिकेत दुय्यम भूमिका करून त्याने स्ट्रगल सुरू ठेवला. राम गोपाल वर्मा यांच्या सत्या सिनेमाने मनोजला मोठी ओळख मिळवून दिली. दिवंगत अभिनेते इरफान खान (चंद्रकांता), आशुतोष राणा (स्वाभिमान), नवाजुद्दीन सिद्दीकी (मोहन दास, बीए एलएलबी) यांनी आधी टीव्हीवर आणि नंतर हिंदी सिनेमात भूमिका केल्या, ते यशस्वी झाले. पण हिंदी सिनेसृष्टीने त्यांना फक्त चांगले अभिनेते म्हणूनच स्वीकारलं, शाहरूख, सलमान यांचासारखा सुपरस्टारपदाचा दर्जा दिला नाही. या तुलनेत एमटीव्हीवर व्हिडीओ जॉकीचे काम केलेल्या आयुषमान खुरानाने सातत्यानं हिट सिनेमे देऊन स्टारपद मिळवलं आहे.
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर आलेल्या काही अभिनेत्री आज हिंदी सिनेमात आघाडीच्या अभिनेत्री बनल्या आहेत. यात सर्वात मोठं नाव विद्या बालन यांचं घेता येईल. हम पांच या विनोदी मालिकेतून सुरूवात करून तिने परिणीता, लगे रहो मुन्नाभाई, कहानी, डर्टी पिक्चर या सिनेमांतून मोठं नायिकाप्रधान यश मिळवलं. विद्याच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री प्राची देसाई, यामी गौतम, मृणाल ठाकूर, मौनी रॉय यांनी देखील छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्याकडे झेप घेतली.
भारतात दर वर्षी दीड ते दोन हजार चित्रपट बनविले जातात. मागील वर्षात भारतीय सिनेमांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर १२,००० कोटी रूपयांची कमाई केली असा अंदाज आहे. गंमत म्हणजे अर्थकारणाच्या बाबतीत मोठ्या पडद्याच्या तुलनेत छोटा पडदा खूप पुढे आहे. एका सर्व्हेनुसार भारतातील बावीस कोटी घरांत दिसणार्या छोट्या पडद्याची उलाढाल आज सत्तर हजार कोटी रूपयांपर्यंत पोहचली आहे. आज भारतात २००पेक्षा जास्त वृत्तवाहिन्या आणि १५०पेक्षा जास्त मनोरंजन वाहिन्या आहेत. २०२२ सालात भारतीय प्रेक्षकांनी दीड लाख कोटी वेळा टीव्ही पाहिला. मोठ्या पडद्याशी स्पर्धा करताना छोट्या पडद्यावरील मालिकांनी बजेट वाढवलं आहे. यामुळे नव्वदीच्या तुलनेत आज हिंदी मालिका भव्य दिव्य दिसतात. २०१७ साली प्रसारित झालेल्या पोरस (५०० कोटी) या हिंदी मालिकेचं बजेट पठाण, बाहुबली आणि ब्रह्मास्त्र या बिग बजेट सिनेमांपेक्षा जास्त होतं. याच्याच जोडीला सूर्यपुत्र कर्ण (२५० कोटी), बिग बॉस (३०० कोटी) यांनी मोठ्या पडद्याच्या तुलनेत हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिलं आहे.
कलाकारांचे मानधन या बाजूने दोन्ही पडद्यांच अर्थकारण समजून घेणंही रंजक आहे, हिंदी चित्रपटातील मोठे स्टार्स आज भागीदारी स्वरूपात काम करीत असले तरी शाहरूख, सलमान आणि आमीर खान अंदाजे ८० ते १०० कोटी रूपये मानधन घेत असावेत. अजय देवगण, अक्षय कुमार, ऋतिक रोशन, रणबीर कपूर यांचं मानधन ६० ते ८० कोटींच्या घरात आहे. तर रणवीर सिंग (५० कोटी), टायगर श्रॉफ (५० कोटी), शाहिद कपूर (३५ कोटी) याशिवाय इतर स्टार कलावंत दहा ते वीस कोटी या बजेटमध्ये काम करतात, असं म्हटलं जातं. हिंदी सिनेमात दहा कोटीपेक्षा जास्त मानधन घेणार्या मुख्य कलाकारांची संख्या फक्त एका आकड्यात मोजण्याइतकीच आहे. चरित्र किंवा सहाय्यक अभिनेत्यांना हिंदी स्टार्स आणि सुपरस्टार्सच्या तुलनेत खूप कमी पैसे मिळतात आणि शिवाय त्यांचं शूटिंग देखील कमी दिवसांत संपतं. त्यामुळे काम आणि पैसे मिळवण्यासाठी त्यांना सिनेमाव्यतिरिक्त छोट्या पडद्याकडे वळावं लागतं. छोट्या पडद्यापासून सुरूवात मग मोठा पडदा आणि पुन्हा छोटा पडदा असं मी पुन्हा येईन, पुन्हा येईन पद्धतीने या कलाकारांचं काम दोन्ही पडद्यांवर सुरू राहतं. सतीश शहा आणि राकेश बेदी यांनी ‘ये जो हैं जिंदगी’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. नंतर या दोघांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केलं. नंतर राकेश बेदी ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेत पुन्हा टीव्हीवर झळकला, तर सतीश शहा ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतून पुन्हा टीव्हीवर आला.
छोट्या पडद्यावर यशस्वी झाल्यावर मोठ्या पडद्यावर हिरो म्हणून झळकलेले कलाकार आहेत, त्याप्रमाणे हिंदी सिनेमात फ्लॉप झालेले हिरो कालांतराने छोट्या पडद्यावर यशस्वी झाल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. आसिफ शेखवर चित्रित झालेलं ‘बिन तेरे सनम’ हे गाणं आजही ऐकलं जातं. अनेक सिनेमांतून अपयशी ठरल्यानंतर त्याने २०१५ साली आलेल्या ‘भाभीजी घरपर है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर आगमन केलं आणि मोठी लोकप्रियता मिळवली. ‘जान तेरे नाम’ सिनेमातून यशस्वी पदार्पण केल्यानंतरही रोनित रॉयच्या करीयरने झेप घेतली नाही. नंतर सगळे सिनेमे फ्लॉप झाल्यावर त्याने अभिनयाला राम राम ठोकून कलाकारांना संरक्षण पुरवणारी एस सिक्युरिटी कंपनी सुरू केली. दोन हजाराच्या दशकात छोट्या पडद्यावर कसोटी जिंदगी की, क्यो की सास भी कभी बहू थी, या मालिकांनी रोनितला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आणि त्याचं नशीब पुन्हा फळफळलं. त्या काळात तो दिवसाला त्याला दोन लाख रूपये इतकं मानधन घेत होता, अशी चर्चा होती. गुजराती रंगभूमीवरील अभिनेता दिलीप जोशीने मैने प्यार किया, हम आपके है कौन, हमराज अशा हिंदी सिनेमातून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या, पण सिनेसृष्टीत त्यांचं बस्तान बसलं नाही. २००८ सालातल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने त्याचं आयुष्य बदलून गेलं. आतापर्यंत या मालिकेचे ४०००पेक्षा जास्त भाग प्रसारित झाले आहेत. आज सोळा वर्षे झाली तरी त्याचा जेठालाल आणि ही मालिका जोरात सुरू आहे.
सिनेमांत जशी पुरूष कलाकारांची सद्दी आहे तशी टीव्ही माध्यमात महिला कलाकारांची सद्दी आहे. १००पेक्षा जास्त मालिकांची निर्मिती करणारी एकता कपूर खर्या अर्थानं टीव्ही सम्राज्ञी आहे. तिच्या हम पांच, क्योकि सास भी कभी बहु थी, कुसुम, कहानी घर घर की, ये है मोहोब्बतें अशा अनेक मालिकांनी हजार भागांचा टप्पा गाठला आहे. एकताने टीव्ही कलाकारांना ग्लॅमर आणि पैसा दिला. मालिकांच्या प्रेक्षकांमध्ये स्त्रियांची संख्या अधिक आहे. घरातील टीव्हीचा रिमोट होम मिनिस्टरकडेच असतो. यामुळे छोट्या पडद्यावरच्या स्त्री व्यक्तिरेखा मोठ्या पडद्याच्या तुलनेत अधिक सक्षम आणि कर्तृत्ववान दिसतात. छोट्या पडद्यावरील कलाकारांना मानधन मोठ्या आकड्यात मिळतंय. कपिल शर्मा कॉमेडी नाइटसच्या एका भागाचे पन्नास लाख घेतो. जेठालाल (दिलीप दोशी) महिन्याला ३६ लाख मानधन घेतात. अनुपमा मालिकेची रूपाली गांगुली एका भागाचे तीन लाख रूपये मानधन घेते.
दादासाहेब फाळके यांनी मुहूर्तमेढ रोवलेला मोठा पडदा आज १२३ वर्षाचा झालाय, तर भारत सरकारने सुरू केलेल्या छोट्या पडद्याची पासष्टी सुरू आहे. या दोन्ही माध्यमांनी अनेक वादळे आणि स्थित्यंतरे पाहिली. जे दाखवू ते मुकाट्याने पाहा इथपासून ते प्रेक्षक राजा आहे असं मानण्यापर्यंत मनोरंजन क्षेत्रात बदल झाले आहेत. आज ही दोन्ही माध्यमे प्रेक्षकांना मनोरंजन देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असली, तरीही त्यांना आज यूट्यूबसारखे मोबाईल प्लॅटफॉर्म आणि ओटीटी वाहिन्यांचे मोठे आव्हान आहे. विविध माध्यमं आली त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली की मनोरंजन दर्जेदार आणि किफायशीर होतं त्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टीनं कितीही पडदे बदलले तरी मनोरंजनावर मात्र पडदा पडणार नाही.