इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका चालू असताना भारतीय संघ झगडतोय. नेहमीसारखे मायदेशातील वर्चस्व भारताच्या कामगिरीत आढळत नाही. विराट कोहली आणि इशान किशन भारतीय संघात का नाहीत, हा जसा गंभीर प्रश्न आहे. तसाच केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांच्या सातत्यपूर्ण दुखापती आणि त्यांचे फक्त अतिमहत्त्वाच्या सामन्यांत खेळणे, हे आता भारतीय क्रिकेटसाठी नवे नाही. ‘ते’ सध्या काय करतायत? याचा घेतलेला वेध.
– – –
विराट अनुपलब्ध; चर्चा तर होणारच! इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजीचा बुरूज ढासळत असताना सर्वाधिक उणीव भासतेय, ती तारांकित फलंदाज विराट कोहलीची. पण सध्या चर्चेत आहे, ते त्याचे माघारसत्र. भारतीय क्रिकेटमधील तो एक ‘ब्रँड’ असल्याने आणि त्याची ‘ब्रँड व्हॅल्यू’ खूप मोठी असल्याने चर्चा तर होणारच! एकदिवसीय विश्वचषकात भारतीय मोहिमेचा सूत्रधार असलेला कोहली त्यानंतर मोजून चार सामने खेळलाय. यापैकी दोन दक्षिण आप्रिâका दौर्यावरील दोन कसोटी सामने, तर दोन अफगाणिस्तानविरूद्धचे ट्वेन्टी-२० सामने. ऑस्ट्रेलियाविरूद्धची पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका, आफ्रिकेविरूद्ध प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका तसेच अफगाणिस्तानविरूद्धचा पहिला ट्वेन्टी-२० सामन्यातून त्याने माघार घेतली. पण हे सत्र इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतही कायम राहिले. सुरूवातीला पहिल्या दोन कसोटी सामन्यांत कोहली खेळणार नसल्याचे ‘बीसीसीआय’ने जाहीर केले होते. पण आता तिसर्या सामन्यासह उर्वरित संपूर्ण मालिकेतून त्याने माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
‘वैयक्तिक कारणास्तव’ कोहली या मालिकेत निवडीसाठी अनुपलब्ध असेल. क्रिकेट मंडळ त्याच्या निर्णयाचा आदर करते, असे ‘बीसीसीआय’ने नुकतेच घोषित केले आहे. कोहली का खेळत नाही? हे उघडपणे कुणीच मांडले नाही. पण त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आफ्रिकन साथीदार एबी डी’व्हिलियर्सच्या गेल्या काही दिवसांतील एका ट्वीटने हे सत्य स्पष्ट केले आहे. ते असे की, कोहली आपली पत्नी अनुष्काच्या दुसर्या बाळंतपणाच्या प्रतीक्षेत आहे. डी’व्हिलियर्सने त्यानंतर काही तासांत हे ट्वीट रद्द करीत ही माहिती खोटी असल्याचेही म्हटले. त्यानंतर आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कोहलीची पाठराखण केली आहे. ‘‘कोहली आपल्या दुसर्या मुलाच्या जन्माप्रसंगी पत्नीसमवेत थांबू इच्छितो, तर मला वाटत नाही यात काही गैर आहे. त्याने अनेक वर्षे देशाची सेवा केली आहे. विश्वविजेत्या संघात तो होता, तसेच कर्णधार म्हणूनही अनेक विजय त्याने मिळवून दिलेत. त्यामुळे त्याला क्रिकेटविश्वापुढे आणखी काही सिद्ध करण्याची मुळीच आवश्यकता नाही,’’ असे स्टेनने म्हटले आहे.
अनेक दशकांपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करने वेस्ट इंडिज दौर्यावर असताना बायकोच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतण्यासाठी मागितलेली रजा क्रिकेट मंडळाने नाकारली होती, असे दाखले जुनेजाणते देतात. पण आता काळ बदलला आहे. वर्षभराचे अतिक्रिकेट आणि ताण हा तितकाच वाढला आहे. यात खेळ आणि कुटुंब हा समतोल साधणेही महत्त्वाचे असते. त्यामुळे ‘बीसीसीआय’ आणि स्टेनचा दृष्टिकोन इथे अधिक समर्पक वाटतो. त्यामुळे कोहलीचे ‘वैयक्तिक कारण’ बरेचसे क्रिकेटजगताला सुस्पष्ट झाले असल्याने त्याने तातडीने परतावे, अशी मागणी होताना दिसत नाही.
गेला किशन कुणीकडे?
गतवर्षी जुलैमध्ये पोर्ट ऑफ स्पेनला विंडीजविरूद्ध तो अखेरचा कसोटी सामना खेळला. यात त्याने नाबाद ५२ धावा केल्या. शुभमन गिल डेंग्यूमुळे आजारी असताना अफगाणिस्तानविरूद्धच्या विश्वचषक सामन्यात तो अखेरचा एकदिवसीच सामन्यात दिसला. त्यातही त्याने ४७ धावा केल्या. मग नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे ५८ आणि ५२ धावा चोपल्या. पण त्यानंतर डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशन कुठेच मैदानावर दिसला नाही… नेमके असे काय घडले की आप्रिâका दौर्यावर असताना त्याने ‘बीसीसीआय’ला ‘वैयक्तिक कारणास्तव’ मला घरी जाण्याची परवानगी द्यावी, ही विनंती केली. त्यानंतर ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील स्थान इशानने गमावले. जीतेश शर्माने ‘फिनिशर’ची भूमिकाही उत्तम बजावत आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी दावेदारी पेश केली. केएल राहुलने आफ्रिका दौर्यात एकदिवसीय संघाचे नेतृत्व आणि यष्टीरक्षण केले. याचप्रमाणे कसोटी मालिकेतही यष्टीरक्षण केले.
सध्या चालू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत निवड समितीने केएस भरतवर विश्वास व्यक्त केला. याशिवाय नवख्या ध्रुव जुरेललाही राखीव खेळाडू म्हणून संघात ठेवले आहे. पण गेला किशन कुणीकडे? तसेच यामागचे कारण काय? हे प्रश्न मात्र चर्चेत राहिले. निवडीसाठी उपलब्ध राहण्याआधी इशानने देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असे निर्देश त्याला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दिल्याचे म्हटले जात आहे. आता प्रत्यक्षात इशानने पुढे काय ठरवले आहे, हे जरी स्पष्ट नसले तरी सध्यात तो बडोदा येथील किरण मोरे अकादमीत सराव करीत आहे.
‘सर’ आले धावून,…
‘सर’ रवींद्र जडेजा आता पस्तीशीकडे झुकलाय. पण मोक्याच्या क्षणी दिमाखदार फलंदाजी, अचूक डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण ही त्याची खासियत अद्याप टिकून आहे. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसर्या डावात एकेरी धाव घेताना त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आणि तो दुसर्या कसोटीला मुकला. आता तिसर्या कसोटीत तो खेळेल की नाही, हा निर्णय ‘बीसीसीआय’चे वैद्यकीय पथक त्याच्या तंदुरूस्ती चाचणीनंतर घेईल.
गेल्या तीन वर्षांत हा अष्टपैलू खेळाडू पाच वेळा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळेच ‘बीसीसीआय’च्या श्रेणीनिहाय मानधनरचनेत ‘अ±’ श्रेणीत स्थान मिळवून वार्षिक सात कोटी अधिक सामन्यांचे मानधन कमावणार्या जडेजाच्या अनुपस्थितीने सर्वांच्या भुवया उंचावतात. त्याच्या या दुखापतसत्रामुळे संघाचा समतोल बिघडतो, हे सत्य मुळीच नाकारता येणार नाही. जडेजाला गेल्या काही वर्षांत अंगठा, मनगट, बरगड्या या दुखापतींनी त्रस्त केले. ऑगस्ट २०२२मध्ये आशिया चषकात जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्यावरील शस्त्रक्रियेमुळे त्याला सहा महिने मैदानाबाहेर राहावे लागले. परिणामी ट्वेन्टी-२० विश्वचषकातही तो खेळू शकला नाही. मग रणजी करंडक स्पर्धेत सौराष्ट्रकडून कामगिरी दाखवत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले. त्यानंतर वर्षभर अगदी विश्वचषकातही तो खेळला, पण हैदराबादच्या कसोटीत पुन्हा दुखापत झाली आणि त्याला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार आणि पुनर्वसनासाठी परतावे लागले.
जडेजाने नुकतेच आपले छायाचित्र समाजमाध्यमावर पोस्ट करीत ‘पुढील काही दिवसांचा निवास’ असे म्हटले आहे. आता जडेजा कधी परततो, ही उत्सुकता टिकून असली तरी त्याचा आतापर्यंतचा लौकिक पाहता तो इतक्या लगेच बरा होईल असे वाटत नाही.
राहुलमागे नसत्या दुखापती!
तो खेळतो, त्यापेक्षा तो दुखापतग्रस्तच अधिक काळ असतो. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदासाठी दावा करू शकेल, असा हा उमदा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणजे केएल राहुल. गेल्या तीन वर्षांत तो सहा वेळा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळेच त्याच्या दुखापतीची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. सध्या मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे दुसर्या कसोटीत न खेळलेला राहुल त्यातून सावरेल अशी आशा आहे. पण त्यालाही खेळण्याआधी तंदुरूस्ती सिद्ध करावी लागणार आहे.
त्याला गेल्या काही वर्षांत मनगट, अॅपेंडिक्स, मांडी, हर्निया अशा असंख्य दुखापती आणि आजारपणांना सामोरे जावे लागले आहे. गतवर्षीच्या ‘आयपीएल’मध्ये राहुलला दुखापत झाली आणि त्याला उर्वरित स्पर्धेतून माघार घेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे त्याला तीन महिने मैदानाबाहेर राहावे लागले. परिणामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसह वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दौर्याला त्याला मुकावे लागले. पण जोरदार पुनरागमन करीत त्याने भारतीय संघातील स्थान पुन्हा निर्माण केले. गेल्या वर्षभरात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये न दिसणार्या राहुलबाबत ठोसपणे भाकीत करणे म्हणूनच अशक्य असते.
…तर ‘हार्दिक’ स्वागत!
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या दुसर्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याला दुखापत झाली आणि तेव्हापासून तो जाहिरातीत असो वा चर्चेत अग्रणी असतो. पण मैदानावर अद्याप दिसलेला नाही. पुण्यात बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात स्वत:च्या गोलंदाजीवर फलंदाजाने फटकावलेला फटका अडवण्याच्या प्रयत्नात त्याचा पायाचा घोटा दुखावला आणि त्याने मैदान सोडले… विश्वचषकानंतर भारतीय संघ ११ ट्वेन्टी-२० सामने खेळला. पण ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी कर्णधारपदाचा संभाव्य दावेदार म्हणून पाहिल्या जाणार्या हार्दिकचे पुनरागमन कधी होईल, या यक्षप्रश्नाचे उत्तर कुणालाही देता येणार नाही. किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक मैदानावर दिसणे म्हणजे खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहणापेक्षाही दुर्मीळ योग मानला जातो.
‘बीसीसीआय’चा ‘अ’ श्रेणीचा (पाच कोटी वार्षिक मानधन आणि सामन्यांचे मानधन) करार प्राप्त झालेल्या हार्दिकची गेल्या काही दिवसांत ‘आयपीएल’मुळे चर्चा होतेय. तो गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्स या पूर्वाश्रमीच्या संघात परतलाय. पण नुसताच परतला नाही, तर कर्णधारपदाचा मुकुट रोहित शर्माकडून हार्दिककडे सोपवण्यात आलाय, याची अधिक चर्चा होतेय. त्यामुळे ‘आयपीएल’च्या व्यासपीठावर खेळाडू आणि नेतृत्वक्षमता सिद्ध करून ट्वेन्टी-२० विश्वचषकात तरी हार्दिक परतावा, हीच क्रिकेटरसिकांना आशा आहे.
निष्कर्ष : देशापेक्षा क्लब मोठा ही चर्चा फुटबॉलमध्ये जशी रंगते, तशीच ती क्रिकेटमध्येही आता रंगू लागली आहे. एकदिवसीय विश्वचषकात सर्वच क्रिकेटपटू सर्वस्व पणाला लावून खेळले. त्यामुळेच उपविजेतेपदापर्यंत मजल मारता आली. हार्दिकला झालेली दुखापत वगळता बाकी सर्वच खेळाडू तंदुरूस्तीने खेळले. पण विश्वचषकानंतर समस्यांचे सत्र सुरू झाले. विश्वचषकातील संस्मरणीय कामगिरीनंतर मोहम्मद शमी शस्त्रक्रियेमुळे क्रिकेटपासून दूर आहे. याशिवाय वैयक्तिक कारण, दुखापती किंवा अन्य कारणे देत अनेक महत्त्वाचे क्रिकेटपटू अधूनमधूनच दिसत आहेत. इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत या दिग्गजांची उणीव भारताला तीव्रतेने भासते आहे. मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यरसुद्धा अल्प दुखापतग्रस्त आहेत. ही सारी मंडळी ‘आयपीएल’च्या काळात ताजीतवानी होऊन परततील, हे मात्र नक्की.