स्त्री सर्वात अधिक कशात खुलून दिसते? साडीत की मिडीत?
– विलास पिंगळे, दिंडोर
तुम्हाला जे घेऊन द्यायला परवडेल, त्यातही स्त्री खुलून दिसेल. मग ती स्त्री कोणाची आई असू दे, कोणाची बहीण असू दे… फक्त बायको स्वत:ची असू दे.. (‘स्त्रीने काही घातलं नाही तरी ती सुंदर दिसते’ असं काही ‘शुद्ध देशी बाबा’ विदेशी लोकांसारखं बोलतात, म्हणून तुम्ही ते फॉलो करू नका… देशी बाबा फक्त ट्रोल होतील… आपल्यासारख्याला मार खावा लागेल.)
पहिलीच्या मुलांना ट्यूशन लावावी लागणार असेल, तर मग शिकलेली बायको का करायची?
– सखाराम बागवे, गोसीखुर्द
तुम्हाला काय वाटतं बायको फक्त मुलांना शिकवण्यासाठीच असते का? तुम्ही रात्री घरी आल्यावर काय करणार? मुलांचा गृहपाठ तुम्ही घेणार? तो पण बिचारी बायकोच घेते. बर्याच वेळा नवर्याला माहीत नसलेल्या गोष्टी बायकोच शिकवते. फक्त शिकलेली आणि अनुभवी या शब्दांमधला फरक समजून घ्या आणि तशी बायको करा… करणार असाल तर!
देशात मूतखड्याविषयी जनजागृतीसाठी कोणत्या सेलिब्रिटीच्या मृत्यूचा स्टंट केला तर योग्य ठरेल?
– संग्राम राऊत, पालघर
जे सु आणि शी करतानाही ‘कोणाला तरी’ विचारूनच करतात आणि आपल्याच करिअरवर पाणी फिरवतात, असा कोणीही सेलिब्रिटी मूतखड्याविषयी जनजागृती करेल. पण स्टंट काय असेल ती स्क्रिप्टसुद्धा ‘कोणीतरी’ लिहून दिलेलीच असेल.
ही पूनम पांडे कोण आहे हो? का ती इतकी प्रसिद्ध आहे?
– लॉरेन्स डिसुझा, सांताक्रूझ
का? तुमचा विचार काय आहे? तिच्यासारखं प्रसिद्ध व्हायचं आहे? ती जे करते ते करायची तयारी आहे? पण तिच्याकडे जे आहे ते तुमच्याकडे आहे?… डेअरिंग हो… काहीही बोलण्याचं… काहीही करण्याचं… तसं असेल तर आदर्श तरी मोठा ठेवा.. काही विचारवंत तुम्हाला हसतील, पण काही विचार न करता तुमची भक्ती करतील…
एखादा लोकप्रतिनिधी पोलीस ठाण्यात बंदूक घेऊन का जातो?
– श्रावण भांडारे, अमरावती
‘तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ म्हणणार्यांनी त्यांना चढवला असेल… कोणीतरी त्यांच्या हातात बंदूक दिली असेल… बंदूक त्यांच्या हातात असेल, पण घोडा दुसर्या कोणाच्या तरी हातात असेल… गोळी एकावर झाडायची असेल पण गेम दुसर्या कोणाचा तरी करायचा असेल… दोघांच्या भांडणात आपण का बोला? मलई तिसराच बोका खातो ही गोष्ट माहिती आहे आपल्याला.
एखाद्या धर्माच्या, समाजाच्या भावना सरसकट दुखावतात का? त्या दुखावल्या आहेत, असा सर्वांच्या वतीने कांगावा करण्याचा अधिकार कोणत्याही टोळक्याला कसा काय मिळतो?
– प्रेरणा लोखंडे, जमखिंडी
अशा टोळक्याच्या भावना दुखावल्या नाही, तर तुम्हीच म्हणाल हे टोळकं भावनाशून्य आहे. त्यामुळे आपल्याला भावना आहेत हे दाखवण्यासाठी अशा टोळक्याला भावना दुखावून घ्याव्याच लागतात. किंबहुना तुम्हाला तो कांगावा वाटला तरी त्यांना तसा सांगावा असतो (बाकी दुसर्यालाही भावना असतात, ही अंधश्रद्धा आहे हे या श्रद्धावान टोळक्याला माहीत असतं…) महत्वाचं… टोळकं हा शब्द वाचून कोणाच्या भावना दुखावल्या तर हा शब्द माझा नाही, प्रेरणाताईंचा आहे याची नोंद घ्यावी..
मी मुलाला म्हटलं की तू पदवी घे. मुलगा म्हणाला, त्यापेक्षा मला यूपीमधून एक कट्टा आणून द्या. त्यात चांगलं करियर आहे. आता मी काय करू?
– रमेश वेल्हाळ, पनवेल
तुमच्या मुलाला समजवा, कट्टा चालवणार्यांचं करिअर होत नाही. कट्टा चालवायला सांगणार्यांचं करियर होतं… आणि कट्टे फक्त यूपीतच मिळतात हा त्याचा गैरसमज दूर करा… कट्टे आपल्याकडेही मिळतात (कुठे ते विरोधी नेत्यांना विचारा… त्यांच्या बाईट्सवरून मला ही बातमी कळलीय.)
सामान्य माणसं निर्भय बनली तर सत्ताधीशांना काय त्रास होतो?
– अंजली जोशी, डहाणूकर कॉलनी, पुणे
सर्वसामान्य जनता निर्भय बनली तर सत्ताधीशांचे कार्यकर्ते काम काय करणार? कोणाला धमकवणार? कोणावर हल्ला करणार? कार्यकर्त्यांना काय फक्त ट्रोलिंगमध्येच गुंतवणार? उद्या मारण्या-धमकवण्याचं पण काम नाही म्हटल्यावर, कार्यकर्त्यांनी त्यांच्या मालकांकडे कामधंदा मागितला तर? त्या कार्यकर्त्यांना कोण धमकवणार? त्यांच्यावर हल्ला कोण सत्ताधीश स्वतः करणार? त्यांचा हा प्रॉब्लेम समजून घ्या. त्याला त्रास म्हणू नका.
आमच्या पाच वर्षांच्या मुलाला सकाळी जागे करायचा प्रयत्न केला तरी तो उठत नाही, त्यावरून काही बोललं तर म्हणतो,
मी पंडित नेहरूंचा अनुयायी आहे. त्यांनी मला मस्त आळस करायला शिकवलं आहे. याच्यावर आता उपाय काय?
– मेहुल पाथरे, दादर
लेकाला नेहरूजींच्या डिग्री दाखवा… अशा ‘खर्या’ डिग्री आळस करून मिळत नाहीत, हे लेकाला समजवा, तिथे तुम्ही आळस करू नका. नाहीतर ‘मोठा’ झाल्यावर तुमचीच प्रॉपर्टी विकून तुम्हालाच आळशी ठरवायचा. (तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर दिलंय हे लेकाला सांगा. नाही तर तो भावना दुखावून घ्यायचा आणि माझ्याबद्दल बोलता येत नाही म्हणून मलाही आळशी ठरवायचा.)