भारतरत्न हा देशातला सर्वोच्च नागरी सन्मान अनेक वेळा वादग्रस्त ठरला आहे. काही वेळा पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्तींची (अ)योग्यता चर्चेत होती, काही वेळा पुरस्कार देण्यामागे त्या व्यक्तीच्या सन्मानामागे वेगळीच राजकीय समीकरणं आहेत, हे उघडपणे दिसत होतं. काही वेळा ज्यांना हयातीत हा सन्मान लाभायला हवा होता, त्यांना तो निधनानंतर अनेक वर्षांनी देण्यात आला. पण, हा सर्वोच्च सन्मान द्यायचाही आणि त्याचा निर्भेळ आनंद काही उपभोगू द्यायचा नाही, अशी चमत्कारिक खेळी कधी खेळली गेली नसावी. ती यंदा खेळली गेली आहे.
देशात एका वर्षात फार फार तर तीन भारतरत्न देण्याचा संकेत आहे म्हणे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वभाव पाहता तो ते कधी ना कधी वेळ पाहून पायदळी तुडवतील, हे उघडच होतं. तो मुहूर्त त्यांनी यंदाच गाठला (पुढची फारशी शाश्वती वाटत नसावी). प्रजासत्ताक दिनाच्या आधी बिहारमधल्या ‘पलटूरामां’ची पलटी सोपी करण्यासाठी बहुजनांचे, मागासवर्गीयांचे नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आलं.
प्रजासत्ताक दिनानंतर देशात राममंदिराचा इव्हेंट-ज्वर कायम असताना माजी उपपंतप्रधान (आणि भाजपच्या सत्ताकाळात कायमस्वरूपी ‘पीएम इन वेटिंग’ असे वर्णन झालेले) भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. वयाच्या ९६व्या वर्षी का होईना मोदींना आपल्या गुरूची आठवण झाली आणि त्यांनी त्यांचा सन्मान करून राममंदिराच्या उभारणीत अडवाणी यांच्या रथयात्रेचा मोठा वाटा होता, हे मान्य केलं याचं अनेकांना सुखद आश्चर्यही वाटलं. मोदी हे श्रेय वाटून घेणार्यांतील नाहीत. राममंदिराच्या सोहळ्यातही जिथे प्रभू श्रीरामापेक्षा आपलीच चर्चा अधिक होईल याची त्यांनी काळजी घेतली होती; तिथे, उशिराने का होईना, त्यांना अडवाणींची आठवण झाली, त्यांनी गुरूदक्षिणा दिली, अशी भावना दाटून आली, त्यामागे तशी कारणंही आहेत. २०१४च्या निवडणुकीआधी अण्णा हजारे यांचं लोकपाल आंदोलन हायजॅक करणार्या शक्तींनी आणि त्यांच्यामागे उभ्या असलेल्या धनशक्तीने अचानक, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणलं आणि गुजरातच्या विकासाचे पोकळ ढोल वाजवणं सुरू केलं, त्याआधी अडवाणी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील, अशी खात्री त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, पडद्याआडच्या आणि पडद्याबाहेरच्या अनेक थरारक घडामोडींच्या माध्यमातून शेकडो कोटी रूपये खर्चून पुढे आणल्या गेलेल्या मोदींची विराट प्रतिमानिर्मिती केली गेली आणि अडवाणी कुठल्या कुठे फेकले गेले. मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर एका जाहीर कार्यक्रमात हात जोडून उभे असलेले अडवाणी आणि त्यांना दुर्लक्षून पुढे जाणारे मोदी, हा व्हिडिओही फार बोलका होता.
अडवाणी अलगदपणे मार्गदर्शक मंडळात फेकले गेले, तरी त्यांनी हूं की चूं केले नाही (याला त्यांच्या परिवारात शिस्त, अनुशासन वगैरे म्हणतात आणि त्याची कौतुके सांगतात; ती शिस्त मोडून शिष्यांनी केलेल्या औद्धत्याला काय म्हणतात कोण जाणे! सोयीने शौर्यही म्हणत असतील). राममंदिराच्या सोहळ्याला आधी अडवाणींना निमंत्रणच नाही, त्याची चर्चा झाल्यावर मग निमंत्रण आहे, असं स्पष्ट होणं या सगळ्या घटनाक्रमानंतर तब्येतीच्या कारणांमुळे अडवाणी तिथे गैरहजर राहिले, यात आश्चर्य नव्हतं. हा सगळा कटु कालपट मागे सारून अडवाणी यांना भारतरत्न जाहीर होणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद होतं. पण, त्यांच्या परमशिष्याने पुढच्या काही दिवसांतच तो आनंदही हिरावून घेतला.
सगळे संकेत बाजूला ठेवून निव्वळ राजकीय सोय म्हणून पुढे एक नव्हे तीन भारतरत्न जाहीर झाले. त्यात चौधरी चरणसिंग आणि पी. व्ही. नरसिंह राव या दिवंगत माजी पंतप्रधानांचा समावेश होता आणि एम. एस. स्वामीनाथन या जागतिक ख्यातीच्या कृषिशास्त्रज्ञानाही मरणोत्तर भारतरत्न दिले गेले. चरणसिंग हे जाट शेतकर्यांचे नेते आणि त्यांच्या नातवाच्या पक्षावर एनडीएचा डोळा, यापलीकडे त्यांना सर्वोच्च पुरस्कार देण्यामागे दुसरं गणित दिसत नाही. पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर विश्वास टाकून देशात खासगीकरण आणि उदारीकरणाचे युग आणले. त्यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी अव्वल होतीच. पण, ज्यांना काँग्रेस पक्षाने मान दिला नाही, त्यांचा आम्ही सन्मान करतो आहोत, असं दाखवून काँग्रेसला खिजवणे आणि दक्षिण भारतातल्या जनतेला चुचकारणे हे त्यामागचे प्रमुख कारण. बाबरी पाडली जाण्यात राव यांच्या संदिग्ध भूमिकेचाही उल्लेख होत राहिला आहे. त्या ऋणातूनही मुक्त होण्याचाही हा मार्ग असेलच.
या पुरस्कारावर ज्यांचा नि:संशय अधिकार होता त्या डॉ. स्वामीनाथन यांना गेल्या वर्षीपर्यंत, त्यांच्या हयातीत तो देण्याचं मोदींना सुचलं नाही. त्यांनी शेतकरीहितासाठी सुचवलेल्या उपाययोजनांना केराची टोपली आणि त्यांना भारतरत्न, इतका उघड दांभिकपणा फक्त मोदीच करू शकतात, तो त्यांनी केला.
हे राजकीय खेळ करताना त्यांनी यंदाच्या भारतरत्न खैरातीचे एकमेव हयात मानकरी गुरूवर्य लालकृष्ण अडवाणी यांना ‘पाचापैकी एक’ बनवून त्यांचे चांगलेच पांग फेडले.
गुरूने शिष्य पारखून घ्यावे लागतात ते यासाठी.