कल्याण विधानसभा मतदारसंघाचे लागोपाठ तीन टर्म आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलेले आमदार अशी गणपतशेठ गायकवाड यांची खरी ओळख. यापैकी दोनवेळा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते व २०१९च्या निवडणुकीत ते भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार होते. तरीदेखील शिंदे गटाने त्यावेळी धनंजय बोडारे यांना बंडखोरी करण्यास लावून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे करून गायकवाड यांना शह देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यात यश न येता पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या आठवड्यातील गोळीबार प्रकरणाची मुहूर्तमेढ या निवडणुकीपूर्वीच रोवली गेली होती.
त्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बोडारे यांना जसा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता, तसाच त्यांच्या बहुतांश समर्थक नगरसेवकांनी बोडारेंना सहकार्य केले होते. गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांची कार्यालयं एकाच रस्त्यावर १०० मीटरच्या आत आहेत. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्चस्ववादावरून त्यांच्यात सतत कुरबुरी सुरूच असायच्या. कधी कधी वादाची ठिणगी पडत असे.
गणपत गायकवाड व महेश गायकवाड हे दोघेही बांधकाम व्यवसायात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असल्याने त्यांच्यात व्यावसायिक चढाओढही सुरूच होती. एकनाथ शिंदे यांनी पक्षद्रोह करून स्वत:चा वेगळा गट स्थापन केल्यानंतर २०१९च्या निवडणुकीतील सर्व विरोधक उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. राजकीय पाठबळ व सत्ता लाभल्याने शिंदे गट गणपत गायकवाडांच्या विरोधात सर्व शक्तिनिशी सक्रिय झाला.
गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार असून त्यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना उघड विरोध असणार हे सुस्पष्ट होते. निधी, भूमीपूजन व लोकार्पण या तीन मुद्यांवरून गणपत गायकवाड मुख्यमंत्री व खासदारांवर उघड टीका करीत होते. त्यामुळे देखील शिंदे समर्थक गणपत गायकवाड यांच्यावर कमालीचे नाराज होते.
शिंदे गटाला या मतदारसंघात गणपत गायकवाड यांना प्रखर विरोध करणारा प्रबळ विरोधक हवा होता. महेश गायकवाड हे पूर्वीपासून गणपत गायकवाड यांचे कट्टर विरोधक असल्याने शिंदे गटाचे काम सोप्पे झाले. त्यांनी महेश गायकवाड यांच्या पंखांना बळ देऊन गणपत गायकवाडांचे पंख कापण्याची कामगिरी सोपवली. दोघांमधे असलेले वाद भाजपा नेते व एकनाथ शिंदे वा खासदार बसून मिटवू शकले असते. या प्रकरणातील द्वारली येथील भूखंडाचा वाद नवा नाही. त्यात सामोपचाराने मार्ग काढणे भाजपा व शिंदे गटाला अशक्य नव्हते. परंतु दोघेही तापलेल्या तव्यावर राजकीय पोळी कशी शेकवता येईल, या उद्देशाने हा वाद मिटवण्याऐवी चिघळत ठेवण्यातच धन्यता मानू लागले होते.
अखेर हिल लाईन पोलीस ठाण्यातील ती खळबळजनक दुर्घटना घडली. त्या आधी द्वारली गावातील लोकांनी कोणाच्या तरी चिथावणीने केलेला वाद, कुंपण तोडणे, वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. त्यानंतर गणपत गायकवाड यांच्या सांगण्यावरून वैभव गायकवाड हा हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेला. तिथे महेश गायकवाड व त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने पोहचले. पाठोपाठ गणपत गायकवाडही पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस निरिक्षक जगताप यांच्या दालनात हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न सुरू असताना बाहेर वैभव गायकवाड यांना महेश गायकवाड समर्थक धक्काबुक्की करीत असल्याचे सीसीटिव्हीवर गणपत गायकवाड पाहत होते. आपल्यासमोर आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून गणपत गायकवाडमधील ‘बाप’ जागा झाला. माझ्यादेखत माझ्या मुलाला मारहाण होत असेल तरी मी काही करू शकलो नाही तर मी बाप म्हणून नालायक ठरणार व माझ्या जगण्याला अर्थ नाही, असे विचार मनात येऊन गणपत गायकवाड यांचा संयम सुटला व त्यांनी अविचारीपणे भर पोलीस ठाण्यात अंधाधुंद गोळीबार करून महेश गायकवाड व पाटील यांना गंभीर जखमी केले.
या एका चुकीच्या निर्णयामुळे गणपत शेठ एका क्षणात गुन्हेगार ठरले. त्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. यामुळे त्यांचे राजकीय व वैयक्तिक जीवन संपल्यासारखेच आहे. गणपत गायकवाड गुन्हेगार ठरल्याने त्याचा राजकीय लाभ आगामी निवडणुकीत शिंदे गटाला होईलही, परंतु त्यासाठी महेश गायकवाडसारखा सिंह गमवावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणून महेश गायकवाड वाचले.
ही परिस्थिती टाळता आली नसती का? भाजप व शिंदे गट हे दोघेही सत्ताधारी मांडीला मांडी लावून बसतात, मुख्यमंत्री तर २४ तास काम करतात, खासदार तर संसदरत्न आहेत आणि देवेंद्र फडणवीस तर धूर्त/चाणाक्ष राजकारणी. असे असताना मित्र पक्षातील दोन नेत्यांमधील वाद म्हणा वा वितुष्ट ते मिटवू शकले नाहीत, त्यामुळे महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारी ही दुर्दैवी घटना घडली. या अपयशाला गणपत गायकवाडप्रमाणेच शिंदे व फडणवीस हेदेखील जबाबदार आहेत, असे मत मी व्यक्त केले तर त्यात काय चुकीचे आहे?
ते दोघे अजून एक चूक करीत आहेत. पोलीस स्टेशनच्या फुटेजमध्ये गोळीबाराच्या घटनेच्या वेळी वैभव गायकवाड कुठेही दिसत नसताना त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला. हे सूडाचे राजकारण पोलिसांना वेठीस धरून होत असेल तर तेही दुर्दैवी आहे.