बाळासाहेबांच्या कुंचल्यातून १९७७ सालात उतरलेली ही बोधकथा. त्यात विहिरीत लांडगा पडला आहे. तो आहे मार्क्सवादी पक्ष. वर एक बोकड आहे, तो आहे जनता पक्ष. मार्क्सवाद्यांना जनतेचा पाठिंबा नसल्याने ते विहिरीतून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे तो बोकडाला भूल घालतो. विहिरीतलं दोन घोटांचंही नसलेलं पाणी किती चवदार आहे, अशा थापा मारून बोकडाला आत बोलावतो. त्याच्या पाठीवर चढून तो बाहेर निवडणुकांच्या मोकळ्या जंगलात पोहोचतो, अशी ही कथा. बाळासाहेबांना माणसांना प्राणीरूप देण्याची हातोटी साधली होती. त्यांनी रेखाटलेल्या दिवंगत माजी पंतप्रधान आणि जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या चित्राची गंमत म्हणजे त्यात चंद्रशेखर हे हुबेहूब आजच्या नितीश कुमारांसारखे दिसत आहेत. लांडगा कोण आहे, ते ओळखणं काही कठीण नाही. फक्त तेव्हाचा लांडगा निदान बोकडाला जिवंत ठेवून बाहेर पडला होता… आताचा लांडगा बोकडाचा फन्ना उडवून मोकळा होईल आणि त्याच्याच हाडांची शिडी करून ढेकर देत बाहेर पडेल… पण, हे बोकडांना कळत असतं तर ही कथा पुन:पुन्हा घडली असती काय आपल्या देशात?