महाराष्ट्र
माझ्या राज्यात काय चाललंय
गुंड मोकाट, घालती गोळ्या
कोण देतो त्यांना सुपारी
रात्री आणि दिवसा-ढवळ्या
या गुंडाचे मैत्री-नाटक
फसवा कावा नाही कळला
तरणाबांड सेनेचा छावा
अभिषेक धारातीर्थी पडला
रक्ताच्या त्या थेंबामधुनी
लाखो अभिषेक जन्म घेतील
सूडनाट्याचे जे पोशिंदे
त्यांना अद्दल लोक घडवतील
—– —– —–
सुप्रीम कोर्ट
सत्तेसाठीच इतके हावरट
बहुमताला देऊन टांग
चंदीगडच्या मेयर पदावर
दावा सांगती उटपटांग
इलेक्शनच्या अधिकार्यांनीच
लोकशाहीचा पाडला मुडदा
विजेत्याला पराजीत करण्या
भाजपशीच केला सौदा
व्हिडीओ फीत पाहिली तेव्हा
उघडे पडले यांचे सोंग
बदमाशीचा कळस गाठता
चव्हाट्यावर आणले ढोंग
—– —– —–
हेमंत सोरेन
कोंबडे झाकून ठेवले तरीही
सूर्य उगवायचा नाही राहिला
झारखंडमधल्या हुकूमशाहीच्या
रावणांनाही राम नाही पावला
मतदानात हरूनसुद्धा
इतकी खालची पातळी गाठली
खोटेपणा करूनसुद्धा
अखेर त्यांची अब्रू फाटली
लोकशाहीचा नारा देऊन
धरतात शेवटी तिचाच गळा
सत्तेसाठी हावरटलेले
तिचाच करतात चोळामोळा
—– —– —–
सी सी टीव्ही
पोलीस चौकीत नव्हता पाहिला
कधीच रक्ताचा तो सडा
माझ्या पुढ्यात घडलं सगळं
केवढा मोठा झाला राडा
सारं काही ठरल्यानुसार
कसं गेलं फुटेज बाहेर
मलाच भोवळ आली तेव्हा
कसा केला माझा वापर
सुसाट गोळ्या कशा सुटल्या
नाही शोधणार त्याचं कारण
सत्ताधार्यांची झोंबाझोंबी
लोकशाहीचे झाले मरण
—– —– —–
दिवंगत गँगस्टर
आम्हालाही जमलं नाही
ते यांनी सहज केलं
पोलीस चौकीत गोळीबार?
लोकशाहीचं श्राद्ध झालं
आपसातीलच लत्ताप्रहार
सत्तासुरांची ही लढाई
आम्ही कधीच पाहिली नाही
पुंड नेत्यांची हातघाई
हुकूमाचे ते पोलीस बंदे
ते तर आणखी करतील काय?
सत्ताधार्यांचा हा तमाशा
जनतेला कोण देईल न्याय?