त्या दिवशी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या सकाळीच अगदी विचारवंतासारखा चेहरा करून माझ्या घरी आला. त्याच्या हातात एक कागदपत्र असलेली पिशवी होती. मला म्हणाला, तू मला सांग माझा जन्म नेमका कुठे आणि केव्हा झाला असेल! मी म्हणालो, ते मला कसं माहीत असणार. कारण आपली वयं जवळजवळ सारखीच असली तरी मला तुझ्याच काय माझ्या जन्माविषयीही काही ठाऊक नाही. आपण फूटपाथवर वाढलो, तिथेच आपलं करिअर घडलं एवढं माहिताय. मला माझे आईबाप आठवत नाहीत तसे तुला तुझेही आठवत नाहीत. म्हणून तर आपण मित्र झालो आणि एकमेकांच्या संगतीने शाळा शिकून भायगिरी करून इतके मोठे झालो की आता केंद्रीय मंत्र्यापासून राज्यातल्या मंत्र्यापर्यंत अगदी आमदार, खासदारपर्यंत आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत नाय. पण तुला तुझ्या जन्म रहस्याची आणि जन्मतारखेची, जन्मगावाची आजच एवढी कशाला पडलीय? कुठल्या इंटरनॅशनल अवार्डसाठी तर तुझी निवड झाली नाहीये ना?
त्यावर पोक्या म्हणाला, तसं काही झालेलं नाही. आज आपण काही न सांगता येण्यासारख्या कारणामुळे भाजपचं काम करतो. तू तर ईडीचा अधिकारी आहेस. उद्या देवाच्या म्हणजे मोदी-शहांच्या कृपेने आपण राज्यात काय, केंद्रात मंत्री झालो, चांगली कामे करून लोकप्रिय झालो, राज्यपाल झालो किंवा राष्ट्रपती झालो, एवढंच नाही तर परदेशातील भारताचे राजदूत झालो तर आपला बायोडाटा तरी परफेक्ट हवा ना. तसं आपल्याला आता वरळीचे हातभट्टीवाले म्हणून कोणी ओळखत नसलं तरी आपल्याला आपलं मूळ गाव, जन्मदिनांक तरी माहिती हवा ना. खोटा असला तरी चालेल. पण माहिती असलेला बरा. आता आपल्या दोघांच्या आधारकार्डवर खोटी जन्मतारीख आणि वरळीचा वेगवेगळा पत्ता आहे. तरीही समजा उद्या आपण कोणीतरी फार मोठे आदरणीय आणि परमपूज्य व्यक्तिमत्त्व झालो आणि पाठ्यपुस्तकात आपल्या कार्यकर्तृत्त्वाचे धडे छापले गेले तर त्यात जन्मगावाचा उल्लेख हवा की नको? मला वाटतं नक्की हवा. त्यावरून वाद निर्माण व्हायला हवा. प्रत्येक जिल्ह्याने म्हटलं पाहिजे की ते आमच्या जिल्ह्यातील अमुक तमुक गावचे. गोव्यातसुद्धा वाद निर्माण झाला पाहिजे की पोकेश्वर पेडण्याचे की म्हापशाचे? पणजीचे की वास्कोचे?
त्यावर मी पोक्याला स्पष्टपणे सांगितलं की तू इतकं मोठं होण्याची स्वप्नं पाहू नकोस. तू मोठा कीर्तिमान झालास तर मला त्यात आनंदच आहे. पण हे नवं भूत तुझ्या डोक्यात आताच कसं काय उपटलं? पोक्या म्हणाला, गेले काही दिवस पेपरात काय चाललंय ते वाचतोयस ना तू! उद्या तू किंवा मी आपण मोदींसारखे कदाचित महापुरुषांच्या यादीत जाऊन बसलो आणि आपल्या जन्मतारखेवरून वा जन्मस्थळावरून तेव्हाच्या मंत्रीमहोदयांमध्ये किंवा नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले तर ते सर्वांनाच किती महाग पडेल. तेव्हा आपण तर नसणार. आपल्या आत्म्याला तरी शांती मिळाली पाहिजे ना.
त्यावर मी म्हणालो, आपण वरळीत जन्माला आलो की वाळकेश्वरला, ठाण्यात आलो की फोरास रोडला यावर काय अवलंबून आहे! हे इतिहास संशोधकही जन्मतिथीवरून वाद घालत बसतात हेही महा आवडत नाही. उद्या आपली जयंती किंवा पुण्यतिथी कुठल्याही सालात आणि तारखेला साजरी केली तर काय फरक पडणार आहे! उगाच नको त्या विषयावर वाद घालत बसतात. त्यापेक्षा त्यांचं कार्य बघा, विचार बघा, कर्तृत्त्व बघा, देशासाठी त्यांनी काय कामगिरी केली त्याचे पोवाडे गा. ते सोडून यांचं भलतंच काहीतरी. आता एक तर यापैकी अनेक भल्या भल्या मंत्र्यांना, नेत्यांना या देशाचा भूगोल काय इतिहासच माहीत नसतो. ऐतिहासिक पुरुषांचं देदीप्यमान कार्य माहीत नसतं. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी भयानक हालअपेष्टा सोसल्या त्याचा पत्ता नसतो. कुठेतरी कोण तरी भाषण करण्यापूर्वी कानात सांगतो आणि हे नेते बरळतात. सध्या भाजपमध्ये तर असं बरळण्याची साथच आली आहे. रायगडावर गेले की यांच्या अंगात इतिहास पुरुष संचारलाय या थाटात भाषण करतात. आधी अक्कल तोकडी आणि जीभेचा दांडपट्टा कसाही उभा आडवा चालवला तरी तेव्हा लगाम घालायची कुणाची हिंमत नसते. मग अगदी इतिहास संशोधकाच्या थाटात यांच्या तोंडून जी ऐतिहासिक मुक्ताफळं बाहेर पडतात त्यामुळे लोकांचा संताप अनावर तर होतोच, पण यांच्या अकलेची कीव येते. असे भरपूर अक्कलशून्य बाजारबुणगे नेते आपली अक्कल पाजळत असतात. जणू नवा इतिहासच लिहीत असतात. महामहिमांपासून लाडोबापर्यंत किती म्हणून नावं घ्यावी. शाळकरी मुलांची घेतात ना तशी, या मंत्र्यांची आणि नेत्यांची वार्षिक परीक्षा घेतली पाहिजे. अगदी केंद्रापासून राज्यापर्यंत. मग बघा कसे एकेकाच्या अकलेचे तारे चमकतात ते. मोदी म्हणे चहा विकत होते. आणि महामहिम काय कुत्रे आणि कोंबड्यांच्या मागे फिरत होते? पाठ्यपुस्तकात उद्या हे स्वत:बद्दल काय छापून आणतील याचा पत्ताही विद्यार्थ्यांना लागणार नाही. यांचा इतिहास आणि भूगोल भलताच कसला तरी असेल.
यांचा कालखंड मोदींपासून सुरू होईल आणि तानाजी सावंतांपर्यंत संपेल. परीक्षेत प्रश्न कसे असतील तर खंडणी गोळा कशी करावी? लाच घेण्याच्या पाच युत्तäया सांगा, हप्ते गोळा करण्यासाठी पगारी माणसांच्या टाेळ्या दादर आणि इतर एरियात कशा कार्यरत ठेवाव्या? तुमच्या एरियातील पाच नामचीन गुंडांची नावं लिहा. अंमली पदार्थ अगदी उघडपणे मिळणारी तुमच्या माहितीची पाच ठिकाणे सांगा. शाळेला दांडी मारून महिन्यातून किती वेळा तुम्ही पार्टी अॅरेंज करता. मोबाईलचा जास्तीतजास्त वापर तुम्ही कशासाठी करता? समाजातील वाढती प्रेमप्रकरणे, बलात्कार, अत्याचार, आत्महत्या, चोर्या, दरोडे यांना आळा कसा बसेल? यांसारख्या प्रश्नपत्रिकांचे भेंडोळे विद्यार्थ्यांच्या माथी मारले जाईल. त्यातील कोणतीही माहिती व्हायरल न करता गुप्त ठेवली जाईल, मात्र विद्यार्थ्यांनी सत्य म्हणजे खरं तेच लिहावं, कुणालाही नापास केलं जाणार नाही. अशी तळटीपही असेल. निबंधाचे विषयही डोक्याला चालना देणारे असतील. उदा. आमदारांची गोहाटी सफर, खोके आणि बोके, माझ्या स्वप्नातील धारावी, आदर्श अर्थमंत्री निर्मला सीतारामन इ. ते जाऊ दे. आपण आपल्या म्हणजे माझ्या इमेजबद्दल बोलत होतो. इमेज इतकी मोठी झाली पाहिजे की अमेरिकेच्या अध्यक्षांनाही माझा हेवा वाटला पाहिजे. त्यांनी सकाळी मला फोनवरून गुड मॉर्निंग करून हाऊ आर यू पोक्या? असं आदराने विचारलं पाहिजे.
– पण पोक्या, अरे आपल्याकडे जेव्हा सकाळ असते तेव्हा तिथे रात्र असते. कशाला त्यांना झोपमोड करायला लावतोस? कधीतरी निवांतपणे बोल त्यांच्याशी. तू घेतलेली असल्यावर.
– तू चेष्टा करू नकोस हा. मी सध्या इंटरनॅशनल राजकारणाचा अभ्यास करतोय. तोही भाजपमधले विचारवंत आणि पोतडीतून भ्रष्टाचाराचे नवनवे पुरावे काढणारे तिरकीट भूमय्या यांच्याकडे. सकाळच्या नाश्त्याची चांगली सोय होते.
– अरे, मला सांगितलं असतंस तर मी तुला त्यांच्यापेक्षा भाजपातला हुशार माणूस दिला असता.
– बाईमाणूस नको हां.
– नाय. मंगलप्रभात लोढा रे. काय बेफाट नॉलेज आहे त्यांचं. त्यांची मोगलकालीन बखर वाच. सगळे इतिहास संशोधक झक मारतात त्यांच्यापुढे. कोणता मोगल सरदार कुलाब्याहून किती अब्ज नाणी (होन) घेऊन गेला, याची तेव्हाची नोंद त्यांच्याकडे आहे. कोणी कोणाची किती बोटं छाटली याची तत्कालीन छायाचित्रं त्यांनी मिळवली आहेत. दाढीवाल्यांनी सुटकेचा मार्ग कसा शोधला याचं संशोधन ते सध्या करत आहेत. सगळे विदेशी अध्यक्ष त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे पोक्या, तुला त्यांची शिफारस मी केली आहे. ते तुला बर्याच पळवाटा दाखवतील.