संदीप एका कंपनीत इंजिनीअर होता. हुशार आणि सुस्थापित. तरूण होता. आधुनिक जगातली सगळी सुखसाधनं हात जोडून समोर उभी होती. या पिढीतल्या कोणाही तरुणाप्रमाणे तो व्हॉट्सअप, टेलिग्राम, ट्विटर, फेसबुक या सगळ्यांचा वापर नियमितपणे करायचा.
एकदा मित्रांबरोबर गप्पांचा फड रंगलेला असताना शेअर मार्केटविषयी चर्चा सुरू झाली. शेअर बाजाराचं आकर्षण कुणाला वाटत नाही? तिथे लोक रंकाचे राव होतात. थोडी रिस्क घेतली की माणूस झोपडीतून महालात जातो, हीच आपली कल्पना. फक्त आपल्याला त्यातलं काही कळत नाही, म्हणून लोक दूर राहतात. हल्ली अनेक मार्केट लिंक्ड म्युच्युअल फंड तीही धास्ती दूर करतात. कोविड काळानंतर नोकरी गमावलेल्या अनेकांनी ट्रेडिंगचं तंत्र शिकून घेऊन शेअर बाजारातून माफक उत्पन्न मिळवायला सुरुवात केली आहे. आता मराठी माणसंही या क्षेत्रात उतरत असतात. हीच सगळी चर्चा चालू होती. तिने संदीपच्या डोक्यात ठिणगी पाडली. आपणही काही रक्कम बाजूला काढून शेअर्समध्ये गुंतवली पाहिजे, असं त्याच्या मनाने घेतलं.
विचार तर पक्का झाला, पण यासाठी गाठायचं कुणाला? इथे सोशल मीडिया कामी आला. त्याने टेलिग्रामवर कुणी ब्रोकर, सब ब्रोकर सापडतो आहे का, याचा शोध घेण्याची सुरुवात केली. एकीकडे शेअर बाजाराचा अभ्यासही सुरू होता. दरम्यान, टेलिग्रामवर त्याला एक सब ब्रोकर्सचा ग्रुप सापडला. हा ग्रुप शेअर बाजारात चांगला फायदा मिळवत होता, त्यातली तज्ज्ञ मंडळी देखील खूपच हुशार होती. त्यामुळे संदीपने लगेच हा ग्रुप जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता. तो जॉईन झाला. त्यावर शेअर्समधून किती भरभराट होते आहे, याची माहिती येऊ लागली. संदीप मोहात पडला नसता तरच नवल. एका सब-ब्रोकरच्या माध्यमातून तिथे गुंतवणूक करण्याचा निर्णय त्याने घेतला. गुंतवणूक करण्याचे सर्व अधिकार संदीपने त्या सब ब्रोकरला देऊन टाकले.
त्या सब ब्रोकरने एका वेबसाइट्वर संदीपच्या नावाने एक अकाउंट तयार केले. त्यात संदीपने ब्रोकरच्या सांगण्यानुसार गुंतवणूक करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने २० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्याला आपल्या खात्यामध्ये ४० हजार रुपये दिसू लागले होते. आपल्याला चांगला फायदा होतो आहे, हे पाहून त्याला आनंद झाला. बिल्डर, सरकारचे मालक असलेले उद्योगपती, राजकारणी किंवा ‘ओल्या हाता’चा सरकारी अधिकारी नसलेल्या कोणाकडेही एका महिन्यात दाम दुप्पट करणारा दुसरा कोणता मार्ग आहे आजच्या काळात… संदीपचा त्या ब्रोकरवरचा विश्वास वाढत चालला होता. इतका चांगला परतावा मिळत असेल तर थोडी रिस्क घेतली तर काय जातं, असा विचार करून त्याने आता दोन लाख रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला. तेवढी गुंतवणूक केली तर भविष्यात किमान २० टक्के तरी फायदा होईल, अशी खात्री त्याला देण्यात आली होती. ही गुंतवणूक करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आणि संदीपला आपल्या खात्यामध्ये दोन लाख रुपयांचे साडेचार लाख रुपये झाल्याचे दिसत होते. ही रक्कम पाहून तो भलताच खूष झाला होता. शेअर बाजारात आपण किती छप्परफाड कमाई करतो आहोत, हे शुभवर्तमान त्याने मित्र, नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि ते सगळेही बिनकष्टाने दामदुप्पट होत चाललेल्या या गुंतवणुकीच्या मोहात पडले. संदीपच्या सांगण्यावरून त्यांनीही या सब ब्रोकरकडे पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला आणि तेही इथे जोडले गेले.
दरम्यान, संदीपने होती नव्हती ती सगळी रक्कम, शिल्लक शेअर्समध्ये गुंतवून टाकली. त्याची गुंतवणूक आता ६० लाख रुपयांपर्यंत येऊन ठेपली होती. यावेळी त्याच्या खात्यात चक्क दीड कोटी रुपयांची रक्कम दिसत होती.
आता संदीपला काही रकमेची गरज निर्माण झाली. तेव्हा संदीपने त्या सब ब्रोकरला टेलिग्रामच्या ग्रुपवर त्याबद्दल विचारलं. तेव्हा, ब्रोकरने सांगितलं की, तुम्हाला काही रक्कम काढायची असेल तर टॅक्स म्हणून १८ लाख रुपये आणि सब ब्रोकर सर्विस फी म्हणून ३३ लाख रुपये भरावे लागतील. ती रक्कम भरली तर सव्वा कोटीच्या आसपास रक्कम तुम्हाला काढता येईल असे त्याने सांगितले. संदीपने या प्रोसेसबद्दल नाराजी व्यक्त करत ३३ लाख रुपये सब ब्रोकरने दिलेल्या त्या अकाऊंटमध्ये टाकले. संदीप पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा, एक्सपर्ट चार्जेस आणि सॉफ्टवेअर फीपोटी ६६ लाख रुपये द्यावे लागतील, असे सब ब्रोकरने सांगितलं. ही अव्वाच्या सव्वा रक्कम भरण्यास संदीपने नकार दिला. संदीपसारखेच अनेकजण त्या टेलिग्राम चॅनेलवर त्या सब ब्रोकरशी जोडले गेलेले होते. त्यांच्यापैकी कोणालाच बँकेतून पैसे काढता येत नव्हते. त्यांना अशीच टोपी लागली होती. वेबसाइटवर प्रत्येकाच्या खात्यात दिसत असणारी ती लाखो करोडोची रक्कमही पूर्णपणे आभासी स्वरूपाची होती. हे पाहिल्यावर संदीपवर वज्रा घातच झाला. आपली मोठी फसवणूक झाल्याची जाणीव झाली. संदीप ज्या सब ब्रोकरबरोबर व्यवहार करत होता, त्याचा नाव, पत्ता, काहीच माहिती नव्हतं. आता संदीपच्या बोलण्यावरून त्या ब्रोकरकडे गुंतवणूक केलेले त्याचेच मित्र, नातेवाईक हेही त्याच्या विरोधात एकवटले आणि त्यांनी त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिलाr. आपणही फसवले गेलो आहोत, आपलीही फसवणूकच झाली आहे, हे पोलिसांना जीव तोडून सांगण्यापलीकडे आता संदीपच्या हातात काही राहिलेलं नाही.
…संदीपसारखेच अनेकजण शेअर बाजारात कमी कष्टात भरपूर पैसे कमवण्याच्या प्रलोभनाला बळी पडून फसले असतील. अशा प्रकारांपासून दूर राहायचे असेल तर आपण सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत माध्यमे आहेत. त्याचा आपण अभ्यास करण्याची गरज आहे. तिथे गुंतवणूक करण्याची पद्धत कोणती, हे देखील आपण समजून घ्यायला हवे. आपल्याकडे येत असणार्या माहितीचा सोर्स आपण तपासायला हवा. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे व्यवहार करत आहोत ते कायद्याच्या चौकटीत राहून करत आहोत का, हे तपासून पाहणे.
हे लक्षात ठेवा…
शेअर्स अथवा कोणत्या अन्य ठिकाणी गुंतवणूक करत असताना अनेकजण आपल्याला थोड्या काळात किती फायदा होणार आहे, याचा विचार करतात आणि तिथे डोळे झाकून गुंतवणूक करतात. पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. गुंतवणूक सल्ला देणार्याने एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायचा आग्रह धरल्यास भारत सरकारने त्यांना हे करण्यासाठी परवानगी दिलेली आहे का, याची सर्वप्रथम तपासणी करून खात्री करणे आवश्यक आहे. भारतीय कायद्याने या व्यवहारांना मान्यता आहे का, सेबी, एनएसई यांसारख्या रेग्युलेटरी व्यवस्थांची त्याला परवानगी आहे का, याची तपासणी करून नंतरच यामध्ये उतरले तर तुम्ही अशा फसवणुकीचे बळी ठरण्यापासून वाचाल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या नावाने जर व्यवहार झाला तर त्याची सदर व्यवहाराची पावती किंवा तत्सम डॉक्युमेंट ईमेलवर येत असते, त्याकडे देखील बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
कॉमनसेन्स वापरा
संदीपच्या खात्यात दीड कोटी रुपये दिसत होते. हा सगळा प्रकार अधिकृत असता तर ब्रोकरची फी, टॅक्सेस वगैरे जे काही चार्जेस लागणार होते, ते त्या रकमेतून वजा करून उरलेली रक्कम काढण्याची परवानगी मिळायला हवी होती. खात्यात दीड कोटी रुपये असताना वरून कोणीतरी फी म्हणून तीस पस्तीस लाख रुपये मागत असेल, तर तिथेच सावध होणं आवश्यक आहे. वरून पैसे देणारा संदीप कॉमनसेन्सही वापरायला विसरला, तिथेच त्याचा घात पक्का झाला.
सायबर सुरक्षेच्या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सायबर कथा’ हे सादर सुरु करण्यात आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात सायबर सेल विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितलेल्या अनुभवाच्या आधारे या कथा तयार करण्यात आलेल्या आहेत. यामधील पात्रांची नावे बदलण्यात आली असून त्याच्याशी कुठे साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.