रियुनियन म्हणजे शाळासोबत्यांचं स्नेहसंमेलन. ही कल्पना वास्तविक पूर्ण परदेशी, पण आजकाल आपल्याकडे अगदी शंभर टक्के भारतीय होऊन रुजली आहे. इतकी की एका स्मार्ट वर्तमानपत्राने आपले एक सदर/पान अशा माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी राखून ठेवले आहे, आहात कुठं??
२००८च्या सुमारास, झुक्याचे फेसबुक भारतात अवतरून आबालवृद्धांचे लाडके झाले. २०१२-१३च्या सुमारास स्मार्टफोन आला आणि सर्व अंकल, आंटी, आया, बाबा, मावश्या, काका यांचा तो परमस्नेही बनला. त्यावर व्हॉट्सअप आलं. या काळातच आपले शाळासोबती सध्या काय करतात, याचा शोध काही उत्साही, परोपकारी गंपूंनी सुरू केला, त्यातून मग व्हॉट्सअपवर शाळेचे, वर्गांचे ग्रूप तयार झाले… रेस्ट इज हिस्टरी!!!!
तर हे शाळा समूह. पावसाळ्यात जशी भूछत्रं उगवतात, तसे फटाफट तयार होणारे. फेसबुकमुळे शोध सोपा होतो. व्हॉट्सअपमुळे ग्रूप बनवणं सोपं झालेलं आहे. रिकामटेकड्यांची तर देशात कधीच कमतरता नव्हती. त्यामुळे होतं काय की एक दिवस सकाळी उठल्यावर आपल्याला दिसतं की कोणीतरी आपल्याला बेसावध गाठून कोणत्या तरी शाळा ग्रूपमध्ये अॅड केलेलं आहे. हे अॅडमिन अशा देशविघातक कारवायांकरता मध्यरात्री गजर लावून उठत असावेत बहुतेक. अर्थात, शाळासोबत्यांच्या ग्रूपमध्ये जोडलं जाणं हा अनेकांना सुखद धक्का असतो, माझ्यासारख्या बॅकबेंचरसाठी मात्र वैताग; कारण आयुष्यात आपण काय दिवे लावले, याबद्दल फार काही सांगण्यासारखे नसतेच ना आमच्याकडे राव.
आपण ब्रश करून चहाचा कप घेईपर्यंत ग्रूपवर आठवणींचे धबधबे, झरे कोसळू लागतात. तू कुठे आहेस? तू काय करतेस? माझी दोन मुलं, एक अमेरिकेत, एक इंग्लंडला. माझा मुलगा न्यूझीलंडला, माझी लेक कॅलिफोर्नियात. मी फार्म हाऊस घेतलं, केसरीबरोबर अर्ध जग फिरलोय, अशा तोंडावळ्याचे मेसेज सुरू होतात. यात काही कायमस्वरूपी हायबरनेशनच्या अवस्थेतील मेंबर असतात, त्यांचं काम फक्त मेसेज वाचणे. ही जमात पोस्ट काहीही करत नाही. बहुतेक जण शाळेत बॅकबेंचर असणारे. किंवा शैक्षणिक, क्रीडा, व्यावसायिक वगैरे कोणत्याही क्षेत्रात फारसे न चमकले. असे लोक्स सगळ्यांचे डीपी मात्र आवर्जून बघतात. ग्रूपमधले उत्साही चमको लोक, नायगरा धबधबा ते गावची जत्रा असे कुठलेही फोटो टाकून, ओळखा मी यात कुठे आहे, असली प्रश्नमंजुषा सुरू करतात. पुढचे पंधरा-वीस दिवस आठवणींचा धुमाकूळ.
मग आता सगळ्यांनी एकदा भेटायलाच हवं, अशी टूम निघते. बाली/ मालदीव/ दुबईपासून सुरू होऊन, गोराई/ अलिबाग/ कर्जत इथपर्यंतच्या ‘स्थळां’च्या सूचना होतात. फार्म हाऊसवाले सावध होऊन आपल्या फार्महाऊसवरच्या गैरसोयींचा पाढा वाचणार्या पोस्ट टाकतात. कुठे भेटायचं? काय करायचं? जेवायला काय? असंख्य सूचना.
सुरुवातीला शंभर टक्के असणारा सहभाग तारीख, वेळ, ठिकाण ठरेतो, गळत गळत पंचवीस टक्क्यांवर येतो. त्यातील सुद्धा प्रत्यक्षात किती येतील, याची शाश्वती नसते.
सध्याचे शैक्षणिक चित्र वेगळे आहे. तथापि ३५/४० वर्षांपूर्वी शाळा हा अनुभव सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी फार आनंददायक नव्हता की आठवणीमधे ठेवण्याजोगाही नव्हता. कितीही वय झाले असले तरी शाळेत झालेल्या काही जखमा, अनुभव विसरले जात नाहीत. कोणातरी खूप यशस्वी माणसाचा अनुभव वाचला. त्याच्या म्हणण्यानुसार, आज मी उत्तुंग यश कमावले असूनही शाळेच्या रियुनियनला जाणे मी टाळतो. नकळत मी मुखदुर्बळ, भित्रा, न्यूनगंड असणारा विद्यार्थी होऊन जातो.
हे बर्याच अंशी खरं आहे. शाळकरी वय, विशेषतः मानसिक वय अतिशय संवेदनशील असतं आणि तेव्हाचे काही अनुभव खोलवर ठसून बसतात. शाळकरी मित्रमैत्रिणी भेटल्यावर त्यांनी आपल्याला दिलेली वागणूक आठवते. सर्वांचेच म्हणता येणार नाही, पण बर्याच लोकांचे असे होते हे सत्य आहे.
शाळा ग्रूपमधले अनेकजण ‘स्थितप्रज्ञ दिसे कैसा, बोले कैसा’ या कॅटेगरीतले. यांचे काम म्हणजे, स्नेहसंमेलन असेल तेव्हा मागची जागा पकडून ‘आयला, हा बघ काय जाडा झालाय, बघितलं तिला का? तशीच आयटम आहे, याचा घटस्फोट झाला म्हणे!!’ अशा कुचाळक्या करत स्नॅक्सवर ताव मारून मागच्या मागे कल्टी मारणे. होतं कसं, की शाळेत ज्यांच्याशी आपले जमले नव्हते किंवा थेट खुन्नसच होती, त्यांच्याबद्दल एक विचित्र भावना मनात असतेच असते. आता ६०/७० वयात असणार्या ज्येष्ठांच्या मनात, गुरुर्ब्रह्मा संस्कार असल्याने, शिक्षक भेटले तर पाया पडण्याचे सोहोळे होतात. आठवणी निघतात. तेव्हाच काठावरून बघणार्यांना, या सरांनी पट्टीने हात कसे फोडले होते, किंवा या बाईंनी आपले अधोगती पुस्तक पूर्ण वर्गात कसे वाचले होते, असल्याच आठवणी येतात. तेव्हा दिलाची धडकन असणारी अथवा असणारा कोणी अवतरून ४०/४५ वर्षांपूर्वीची हुरहुर नकळत जागवते/तो.
गळाभेटी, खाणे, पिणे, नाच, आठवणी सर्व यथासांग पार पडते. ग्रूपवर धडाधड फोटो टाकले जातात. सुप्त अवस्थेतील मेंबर बुद्धाच्या तटस्थतेने सगळं वाचतात. परत भेटायला हवं यार, अशी आवई निघते आणि इथेच कुठेतरी हळुहळू मेसेजचा रतीब आटू लागतो. नवीन वाहन घेतल्याचे, पोरांच्या कर्तबगारीचे, आपल्या फॉरेन टूर्सचे चुकार मेसेज असतात. गुड मॉर्निंगवाले इथेही जाज्वल्य एकनिष्ठतेने शुभ सकाळ/ दुपार/ रात्र यांचा भडीमार करतात म्हणा. इथेच कुठतरी ग्रूपमध्ये सब ग्रूप तयार होतात. मूळ ग्रूपवरील मेसेजवर खाजगी चर्चा करणे हे यांचे काम. आणि जन हो, अशा कुचाळक्या फक्त बायकाच करतात, ही समजूत असेल तर मामु तुम्हारा चुक्याच!! पुरुषसुद्धा तितक्याच उत्साहाने असले गॉसिप रंगवताना दिसतील.
सुरुवातीला निव्वळ शाळेच्या आठवणी, शिक्षक यांना वाहिलेल्या ग्रूपमधे हळूहळू सामाजिक-राजकीय बदल होतो. स्वस्त सोशल मीडिया, व्हॉट्सअप विद्यापीठ यातून डॉक्टरेट मिळवलेले विद्वान, लव्ह जिहाद, हिंदूंची (त्यांच्या मनात) कमी होणारी संख्या, ताजमहाल हा तेजोमहाल आहे, विमानाचा शोध आपणच कसा लावला, इथपासून आपणच जगावर राज्य करणार हे नोत्रदमासने कसे सांगितले, इथपर्यंतचे नासाप्रमाणित आणि युनेस्को पुरस्कारित मेसेज टाकू लागतात. शाळा किंवा कुटुंब समूहावर अशी कट्टर मंडळी बाहुल्याने का असतात, हे न उमगलेले कोडे आहे. यांच्या पोस्टचा खोटेपणा उघड करून सत्य सांगू पाहणारे काही समंजस असतात, पण त्यांचा आवाज क्षीण असतो. परिणामी संगीत मानापमान होऊन, ग्रूप सोडणे होते. इथे पण सामंजस्याची भूमिका घेणारे ग्रूप सोडतात. सहिष्णू धर्माचे पाईक मात्र अडेलतट्टू. परोपकारी गंपू अॅडमिन ग्रूप सोडणार्या मेंबराना परत अॅड करतो. परत काही काळाने तेच होतं.
मुद्दा काय की सोशल मीडियामुळे माणसे भेटतात हो, पण मन जुळतातच असं नाही. जुन्या रम्य आठवणीवर जगणे पुरेसे नसते, हे या ग्रूपकरांना पटत नाही. हे असले ग्रूप-बांध-कर अनेक समूहांवर अॅडमिन म्हणून एकछत्री अंमल गाजवताना दिसतील. सोसायटीचा ग्रूप, मॉर्निंग वॉक, हास्य क्लब, सत्संग, शाकाहारी, जाज्वल्य भगवा, असंख्य ग्रूप!!! यांचं काम एकच, चार टाळकी आढळली की ग्रूप करायचा. झुक्याने जर नवा ग्रूप तयार करण्यावर, अगदी एक रुपया इतके शुल्क जरी ठेवले तरी तो अजून कमाल श्रीमंत होईल नक्की.
माझ्यासारखे काही अलिप्त लोक ग्रूपवर कधी काठावर असतात, कधी अधूनमधून डुबकी मारतात, कधी निघून जातात. पण पुन्हा सकाळी जागे झाल्यावर दिसतं की आपण नव्या ग्रूपमध्ये दाखल झालोय. मग कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा तर्हेने कधी कन्नी काटायची हे गनिमी काव्याने ठरवावं लागतं.
झुकेरबर्गांच्या मार्कला आपल्या फुकटच्या सोशल मीडियामुळे अनेकांना असा त्रास होईल, याची कल्पना आली होती का? शक्य झाल्यास त्याला पण कोणत्यातरी सत्संग ग्रूपमध्ये सामील करून घ्यायची जबरदस्त इच्छा आहे किंवा गेला बाजार पॉझिटिव्ह थिंकिंग ग्रूपात. फक्त त्याचा नंबर तेवढा मिळायला हवा. आमच्या डोक्याला शॉट करून ठेवलाय लेकाच्याने…