मुंबई-ठाणे महानगरपालिकेसह २००७ सालच्या इतर दहा महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली. त्याआधी २००६ सालच्या मध्यान्ही झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली होती. अशा परिस्थितीत निवडणुकीत जुन्या शिवसैनिकांना डावलले जात आहे, त्यांचा मानसन्मान राखला जात नाही, अशा आशयाच्या बातम्या वृत्तपत्रातून यायला लागल्या. हा सगळा संभ्रम, समज-गैरसमज दूर व्हावा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी ऑक्टोबर २००६मध्ये रंगशारदा, मुंबई येथे ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा घेऊन अशा सार्या आरोपांना उत्तर दिले.
‘तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. यात कुठेही अंतर येणार नाही. आजही माझ्या जुन्या शिवसैनिकांच्या तलवारींना गंज चढला नाही’, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ज्येष्ठ, कडवट शिवसैनिकांचा गौरव केला. कुठल्याही परिस्थितीत मुंबई व ठाणे महानगरपालिकेवरचा भगवा खाली उतरता कामा नये. त्यासाठी सज्ज रहा असा आदेश शिवसेनाप्रमुखांनी दिला. शिवसेनाप्रमुखांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे त्यांनी बसूनच ज्येष्ठ शिवसैनिकांशी हृद्य संवाद साधला. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘जमलेल्या माझ्या अत्यंत कडवट हिंदू शिवसैनिक बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी भावनिक साथ घातली. गेल्या ४० वर्षांत तुम्ही माझ्याबरोबर आहात याची आठवण कायम आहे. लालबाग-परळचे शिवसैनिक तर सोबत आहेतच. आमचा भविष्यावर, ज्योतिषावर विश्वास नाही. दादांचाही नव्हता. तुम्ही आणि तुम्हीच शिवसेनेचे नशीब घडवणार आहात. शिवसेनेच्या अडचणीच्या, पडझडीच्या काळात शिवसैनिकांनी मोलाची साथ दिली, हे सांगून बाळासाहेबांनी दत्ताजी साळवी, प्रिं. वामनराव महाडिक, शरद आचार्य यांच्यासह इतर ज्येष्ठ पदाधिकार्यांची आठवण काढली, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईत शिवसैनिकांमुळेच १९९३नंतर दंगल घडली नाही. तुमच्यासारखे असंख्य शेलारमामा शिवसेनेत आहेत. शेलारमामाचा एकच वार झाला आणि उदयभानू आडवा झाला. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की उदयभानूंनी मस्तीत राहू नये, असा इशारा शिवसेनाप्रमुखांनी दिला. शिवसैनिकांच्या भीमपराक्रमाचा सार्थ गौरवही त्यांनी केला. ‘जय महाराष्ट्रा’चा पुकारा झाल्यावर तमाम मराठी माणूस आणि हिंदू मजबूतीने एकवटला पाहिजे असे आवाहनही शिवसेनाप्रमुखांनी केले.
‘वंदे मातरम’ मुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. ‘वंदे मातरम’ हा राष्ट्रीय महामंत्र आहे. या राष्ट्रगीताचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. ‘वंदे मातरम’ प्रथम आणि ‘जन-गण-मन’ हे नंतर असावे, अशी सूचनाही त्यांनी केली. शिवसैनिकांमध्ये जुना-नवा असा भेद नको, वाद नको. ‘तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे’ असा विश्वास जागवत शिवसैनिकांना नम्र आवाहन केले. तुमच्या चांगल्या सूचना सीलबंद पाकिटातून पोस्टाने मातोश्रीवर पाठवा, त्याचा नक्की विचार केला जाईल. या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यास शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, सुभाष देसाई, संजय राऊत, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, अॅड. लीलाधर डाके आदी उपस्थित होते.
दरम्यान, मराठीतील ज्येष्ठ कवी विं. दा. करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. याची बातमी महाराष्ट्राला सुखावणारी तशीच अभिमानाची होती. शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या वतीने विंदांना भेटून त्यांचे अभीष्टचिंतन केले. कलाकार, साहित्यिक व पत्रकारांचा मानसन्मान शिवसेनेने व शिवसेनाप्रमुखांनी कायमच राखला.
शिर्डीचे सिंहासन, लोकमत आणि शिवसेनाप्रमुख
महाराष्ट्रातील शिर्डीचे साईबाबा मंदिर म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान. आमदार जयंत ससाणे यांनी आपल्या वाढदिवसाचा सुमुहूर्त साधून साईबाबांचे सिंहासन आणि मंदिराचा कळस सोन्याने मढविण्याचे जाहीर केले. त्यासाठी २५० किलो सोने लागणार असून २२ कोटी रुपयांचा खर्च येईल, असे सांगून हा खर्च देणगीरूपाने गोळा करण्यासाठी ‘सुवर्ण सिंहासन निधी’ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. या घोषणेवर त्यांनी नंतर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेतली. सर्व वर्तमानपत्रांतून ही बातमी झळकली. शिवसेनाप्रमुखांना सोन्याचे सिंहासन बनविण्याची कल्पना मान्य झाली नाही. त्यांनी या गोष्टीला शिवसेनेचा विरोध जाहीर केला. ते म्हणाले, ‘कोणती ही श्रद्धा? कसली ही भक्ती? उलट संकटात होरपळून निघणार्यांना मदतीचा हात देणे ही भक्ती नव्हे काय? कशासाठी हे २२ कोटी रुपयांचे सिंहासन करायचे?’ त्यांनी साई संस्थानला सांगितले, ‘हा वेडेपणा सोडून द्या.’ ते पुढे म्हणाले, ‘शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत, पुरात घरे वाहून जात आहेत, महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूने माणसे मरत आहेत, चिकनगुनियाने धुमाकूळ घातला आहे. असंख्य माणसे बॉम्बस्फोटात ठार झाली आहेत. त्यांच्या नातेवाईकांना मदत करा, परंतु सोन्याचे सिंहासन करू नका.’
बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला तरी भक्तांच्या भावनेनुसार हे सिंहासन बनवले जात आहे, त्यामुळे ते होणारच, अशी घोषणा पुन्हा एकदा साई संस्थानने केली. त्याचवेळी त्यांनी शिवसेनाप्रमुखांबद्दल आदर व्यक्त करून सांगितले की आम्ही सामाजिक काम करतच असतो. आमच्या सामाजिक जबाबदार्या आम्ही जाणतो, परंतु सिंहासन बनविण्यात काही चूक आहे असे आम्हाला वाटत नाही.
दरम्यान, २३ ऑगस्ट २००६च्या ‘लोकमत’मध्ये बाळासाहेबांना उपरोधिक प्रश्न विचारण्यात आला. ९ एप्रिल २००२ रोजी शिर्डीतील महाशिबिरात भारतीय कामगार सेनेने दिलेले भले मोठे चांदीचे सिंहासन बाळासाहेबांनी स्वीकारले. ती उधळपट्टी नव्हे काय? या सिंहासनाचे पुढे काय झाले? ‘लोकमत’ने त्या दिवशी बाळासाहेब चांदीच्या सिंहासनावर बसलेले छायाचित्रसुद्धा बातमीच्या बाजूला छापले. दुसर्या दिवशी बाळासाहेबांनी स्पष्ट केले की, ‘आतून लाकूड आणि वरून चांदीच्या मुलाम्याचे पत्रे ठोकलेले असे हे सिंहासन आहे. माझ्या गोरगरीब शिवसैनिकांनी मोठ्या प्रेमाने दिले म्हणून मी ते स्वीकारले आहे.’ ते पुढे म्हणाले की ‘हे सिंहासन मी ताबडतोब ‘लोकमत’कडे पाठवित आहे. त्याच्यावर शिपाई बसला तरी मला चालेल.’
बाळासाहेब केवळ बोलून थांबले नाहीत तर त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने चांदीचे भले मोठे सिंहासन ‘लोकमत’कडे पाठविले. बाळासाहेबांच्या या कृतीने ‘लोकमत’चे मालक गोंधळून गेले त्यांनी ताबडतोब निवेदन काढले की, ‘सिंहासहनावर अधिकार शिवसेनाप्रमुखांचा.’ ‘लोकमत’चे समूह संपादक विजय दर्डा व संपादक दिनकर रायकर यांनी स्वत: जाऊन ते सिंहासन सन्मानपूर्वक बाळासाहेबांना दिले. पण बाळासाहेबांनी ‘मी या सिंहासनावर कधीच बसणार नाही’ असा निर्धार व्यक्त करून सिंहासनाचा स्वीकार केला. विजय दर्डा म्हणाले की शिवसेनाप्रमुखांचे सिंहासन सांभाळणे आम्हाला शक्य नाही. हा वाद तिथे संपला. बाळासाहेबांना खुर्चीचा मोह कधीच नव्हता. शिवसैनिकांच्या व मराठी माणसाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारे ते सेनापती होते.
शिवसेनाप्रमुखांची भूमिका महाराष्ट्राला आवडली. शेतकरी कामगार पक्षाने बाळासाहेबांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनीसुद्धा बाळासाहेबांच्या विचारांशी सहमती दर्शविली. ते म्हणाले, ‘सोन्याचे सिंहासन बनवून ‘साईबाबांचा सत्य साईबाबा’ बनवू नका.’ या सर्व गोष्टींचा चांगलाच परिणाम झाला आणि शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचा विजय झाला. सोन्याच्या सिंहासनाचा निर्णय रद्द झाला. बाळासाहेबांच्या विचारांचा दणका कसा असतो हे दिसले. समाजाला आणि ‘लोकमत’लाही समजले. २६ ऑगस्ट २००६ रोजी ‘सकाळ’ने अग्रलेख लिहून शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचे समर्थन केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्यात आणि पूजा-अर्चेत अडकणारे नव्हते. अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार करणारे होते. त्यांच्याकडे भंपकबाजीला थारा नव्हता. म्हणूनच शिवसेनेचे हिंदुत्व हे रंजल्या-गांजल्यांची सेवा करणारे आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे!