□ मराठा आंदोलकांनी जीआर धुडकावला; मनोज जरांगे उपोषणावर ठाम.
■ कॉमन मॅनची ताकद फक्त मतदानात दिसत नाही, ठरवलं तर एरवीही दिसू शकते.
□ ललित मोदीच्या सीबीआय चौकशीचा प्रस्ताव सहा वर्षे पडून.
■ आणि हा ‘योगायोग’ निदर्शनाला आणून दिला की राहुल गांधींना शिक्षा होते…
□ तोतया ओएसडीने कमावली कोट्यवधींची माया.
■ तोतयाची इतकी, तर खर्याची किती- जनतेला पडलेला प्रश्न!
□ धनदांडग्या परप्रांतीय कंत्राटदारांना राज्य सरकारच्या पायघड्या.
■ अत्तर शिंपडायलाही उभे राहतील, जी २०च्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नृत्यांगनांनी दाखवले तसे ‘वाजले की बारा’ म्हणून स्वत: नाचूनही दाखवतील!
□ कलंकित व्यक्तींची उच्चपदावर नियुक्ती नको – हायकोर्टाची केंद्र सरकारला सूचना.
■ काहीही काय, सर्वोच्च पदं पण रिकामी राहतील हो अशाने!
□ ‘कोस्टल रोड’च्या सल्लागाराचा खर्च ३५ कोटींवरून पोहोचला ८५ कोटींवर.
■ समृद्धीसाठी किती खर्च केला सल्लागारांवर आणि दर अपघातानंतर त्यातले किती कापून घेतले?
□ अबब… बॉम्बे डाईंगच्या जमिनीचा सौदा पाच हजार कोटींना; जपानची सुमितोमो कंपनी करणार खरेदी.
■ गिरणी कामगारांना काय मिळालं? ते सांगा.
□ विदर्भात शेतनुकसानीचे ७० टक्के पंचनामे झालेच नाहीत; भरपाई मिळणार कधी?
■ भरपाई मिळेल की पुढच्या शतकात वगैरे…
□ तुटपुंजा पगार, सुट्ट्या नाहीत, आरोग्याचा प्रश्न; पालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतील कामगारांचे हाल.
■ असे हाल कोणत्या कामगारांचे नाहीत ते सांगा…
□ साखर तीन टक्क्यांनी महागली; ४० रुपयांवरून पोहोचली ४५ रुपयांवर.
■ आता सणासुदीचा सीझन आहे, कमावून घेणारच ना!
□ जी-२० परिषदेसाठी ४,१०० कोटी खर्च.
■ जगात मोदींचा दबदबा निर्माण होतोय अशी इमेज तयार करण्यासाठी इतका खर्च होणारच ना?
□ दिल्लीत दोन दिवस ‘पंचपक्वान्नांच्या पंगती’.
■ अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. फक्त गरिबी हिरव्या कपड्यात झाकून मेजवान्या झोडताना सत्ताधार्यांना थोडी लाज वाटली पाहिजे.
□ भाजप सरकार गरीबांचे शत्रू – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या.
■ सरकारचे मालक असलेल्या श्रीमंत मित्रांसाठी एवढं करावंच लागणार, गरीबांना चेचावंच लागणार.
□ अलिबागमधील हजारो शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव.
■ शेतीच सगळी कॉर्पोरेट करायची तर शेतकर्यांचा अडथळाच नाहीये का!
□ नेताजींच्या नातवाचा भाजपला रामराम.
■ देर आये, दुरुस्त आये…
□ जरांगे-पाटील हे अण्णा हजारेंसारखे गंडणार नाहीत – संजय राऊत.
■ अण्णा गंडले होते की लोक गंडले त्यांच्या नादाला लागून, राऊत साहेब?
□ महाराष्ट्र दुष्काळसदृश आणि सरकार अदृश्य – उद्धव ठाकरे.
■ संवेदना आणि लोकाभिमुख कार्यकुशलता यांच्या दुष्काळाचा परिणाम!
□ अजित पवारांसह ४० बंडखोर आमदारांना अपात्र करा – शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या फुटीरांना धक्का.
■ निवडणूक आयोग नावाची यंत्रणा कोणाची शाखा आहे, हे विसरून चालणार नाही, पवार साहेब!
□ निवडणुकीनंतर मोदी तिहार तुरुंगात जातील – अॅड. प्रकाश आंबेडकर.
■ आजवरचा इतिहास असा नाही दुर्दैवाने. पण, बाळासाहेब बोलतात तेव्हा त्यात दूरदर्शी तथ्य असते…
□ ‘इंडिया’चा भाजपला जोरदार धक्का; विधानसभा पोटनिवडणुकीत सातपैकी चार जागा जिंकल्या.
■ ये तो सिर्फ झाँकी है, विधानसभा-लोकसभा बाकी है…
□ महाराष्ट्रात भाजपमध्ये पक्षांतर्गत धुसफूस.
■ घर फिरू लागलं की वासे जागेवर राहतात काय?