नावात काय आहे, हा प्रश्न शेक्सपियरने विचारला होता, तेव्हा तो भारतात नव्हता… तो भारतात असता आणि त्या काळात देशात विरोधी पक्षांची इंडिया आघाडी झाली असती, तर त्याला या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळालं असतं. ही आघाडी झाल्याबरोबर भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार यांची जी केविलवाणी धावपळ सुरू झाली आहे, ते पाहून त्याचीही खात्री पटली असती की नावात बराच दम असतो. त्याने कदाचित ‘नावात काय आहे’ हे विधानच मागे घेतलं असतं.
विरोधकांच्या आघाडीचे नाव फार हुशारीने ठरवण्यात आलेलं आहे, यात शंका नाही. आघाडी झाल्यानंतर भाजपला अडगळीत फेकलेल्या सहकारी पक्षांची आपमतलबी आठवण आली. त्यांच्या एनडीए आघाडीच्या विरोधात इंडिया उभी ठाकणार आहे. एनडीएचा डीएनए सर्वसमावेशक नाही, इंडिया मात्र सर्वसमावेशक आहे, हा संदेश या नावातून बरोब्बर पोहोचला आहे. ही आघाडी प्रारंभिक बैठकांच्या फेर्या यशस्वी करून संभाव्य जागावाटपापर्यंत सहज जाऊन पोहोचली तेव्हा मोदी सरकारच्या आणि भाजपच्या लक्षात आलं की तिसर्या आघाडीप्रमाणे ही आघाडी ठिसूळ नाही. ती अंतर्विरोधांमुळे कोसळून पडेल आणि आपण फूटपाडू राजकारणाच्या बळावर आरामात यश कमावू, असं होणार नाही. कारण, सव्वासौ करोड देशवासीयांचा पाठिंबा आपल्यालाच आहे, अशा कितीही वल्गना केल्या तरी प्रत्यक्षात ६० टक्के मतदार आपल्या विरोधात आहेत; ते विखुरलेले आहेत, म्हणून आपण सत्तेत आहोत, याची जाणीव सत्ताधीशांना कुठेतरी असणारच. त्यामुळेच इंडिया आघाडीचं नाव आणि या आघाडीच्या संदर्भातल्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये कुठेही येऊ नयेत, याकरिता या आघाडीच्या बैठकीच्या वेळीच वेगवेगळी पिल्लं सोडली गेली. एक देश, एक निवडणूक, ऐन गणेशोत्सवात संसदेचं अधिवेशन हे हेडलाइन खेचून घेण्याचेच प्रकार होते. पण, जी २० शिखर परिषदेच्या निमंत्रणावर राष्ट्रपतींना ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ असं लिहावं लागणार, म्हटल्यावर कोत्या बुद्धीचे मेंदू ठणकू लागले, इंडिया या नावाची कावीळ उफाळून आली आणि प्रेसिडेंट ऑफ भारत या नावाने निमंत्रण धाडलं गेलं. जी-२० परिषदेत असंख्य शाळकरी चुका असलेली भारतविषयक पुस्तिका घाईघाईने वितरित केली गेली. हा सगळा आटापिटा कशासाठी, तर इंडिया हे नाव टाळण्यासाठी.
पाकिस्तानचं नाव निघाल्यावर छप्पन्न इंची छाती फुगवणारे नेते चीनचं नाव निघताच मिठाची गुळणी धरून गप्प बसतात, हे देशातल्या जनतेने पाहिलेलं आहेच; आता इंडिया या नावाचीही त्यांना इतकी धास्ती असावी? स्किल इंडिया, मेक इन इंडिया वगैरे योजना आपणच सत्ताकाळात जाहीर केलेल्या असताना? शायनिंग इंडिया ही उताणी पडलेली घोषणा यांच्याच पक्षाची होती ना? इंडियाच्या नेत्यांना घमंडिया म्हणून पाहिले, पण ते अंगाशी आले; कारण खरे घमंडिया कोण आहेत, ते देशाला दिसते आहेच. त्यामुळे, ना रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी म्हणून इंडिया हे नाव देशाच्या अधिकृत नावातूनच वजा करण्याची कुबुद्धी भाजपला सुचली असावी. भाजपला लोकसभेतल्या अटळ पराभवाची जाणीव होऊ लागल्यानेच इतक्या घायकुतीचे निर्णय घेतले जात असावेत.
केंद्र सरकारने इंडिया हे नाव बाजूला ठेवल्याबरोबर सरकार आणि समाजमाध्यमांमधले बोलके पोपट कामाला लागले, इंडिया हे कसं ब्रिटिशांनी ठेवलेलं नाव आहे, अशा थापा मारणारे निबंध व्हॉट्सअपवर फिरू लागले आणि इंडिया हे नाव त्यागणं हे कसं ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त होणंच आहे, हे ब्रिटिशांच्या सत्ताकाळात त्यांच्यासाठी कारकुनी आणि गुप्तहेरगिरी केलेल्या विचारधारेचे वाहक सांगू लागले. इंडिया हे नाव इसवी सनाच्या प्रारंभकाळापासून वेगवेगळ्या प्रकारांनी प्रचलित आहे. कोलंबस स्पेनहून ‘इंडिया’ शोधायला निघाला होता आणि अमेरिका हीच इंडिया वाटल्याने तिथल्या मूळ रहिवाशांना त्याने रेड इंडियन्स असं नाव दिलं होतं, हे शाळेतच वाचलं असेल ना हे लिहिणार्यांनी? सिंधू नदीवरून इंडस आणि इंडिया आलेलं आहे, त्याचप्रमाणे हिंदू हा शब्दही बाहेरच्यांनी मारलेली हाक आहे, आपली आंतरिक ‘ओळख’ नव्हे- त्या शब्दाचे काय कराल? हिंदुस्तानचे काय कराल?
शिवाय आपण देशाचे नावच बदलत आहोत, हा काय कांगावा आहे? इंडिया दॅट इज भारत हेच देशाचं नाव आहे. त्यात भारत आहेच. तो इंडिया या नावानेही ओळखला जातो, एवढाच अर्थ आहे. मग आपण देशाचं नावच बदलतो आहोत, असे ढोल कशाला पिटताय? नावातलं काहीतरी गाळताय, इतकंच ना? त्यात नवल काय? वजाबाकीशिवाय दुसरं येतंय काय तुम्हाला? फक्त ‘मैने सोचा बेनिफिट ले सकतें हैं’ म्हणून नाव कुणाला विकून टाकायचं तर ठरलेलं नाही ना, हे तपासून पाहायला हवं.
विरोधी आघाडीचे नाव काही निवडणूक आयोगाकडे रजिस्टर केलेले नाही. या आघाडीने आता वेगळी आद्याक्षरे जोडून भारत असे लघुरूप होणारं नाव ठेवलं किंवा मोदी असं लघुरूप होणारं नाव ठेवलं तर कशाकशाची आणि कोणाकोणाची नावे बदलणार आहात? त्यात पाकिस्तानने सिंधु नदीचा प्रदेश, ज्यातून भारताची इंडिया ही ओळख जगभर प्रचलित झाली, तो आपल्या भूभागात येत असल्याने भारताने हे नाव सोडल्यास आमचाच त्या नावावर दावा असेल, असं सांगितलं आहे… आता तुमच्याविरोधात ब्र काढणार्याला देशद्रोही ठरवून इंडियात पाठवणार? इंडिया दॅट इज पाकिस्तान असा खिचडा करून ठेवणार?
हे सगळं कशासाठी तर कोण्या एका व्यक्तीचा रोगट अहंकार दुखावला म्हणून? देशाची हजारो वर्षांची परंपरा एका माणसाच्या आत्ममग्नतेपुढे छोटी ठरते?… हे उथळ उद्योग कराल, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नुकतेच म्हणाले तेच खरे होणार आहे. हे देशाचं नाव बदलायला निघाले आहेत, लोक यांनाच बदलणार आहेत!!